समानतेचे पुरस्कर्ते मार्टिन ल्यूथर किंग

मार्टिन ल्यूथर किंग हे अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचे, महात्मा गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेले, अहिंसा व नि:शस्त्र प्रतिकार यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले ख्यातनाम निग्रो नेते आणि नागरी हक्क समानतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी अमेरिकेतील अ‍ॅटलांटा या गावी झाला. ते वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मोर हाऊस महाविद्यालयातून १९४८ मध्ये पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी क्रोझर थिऑलॉजिकल सेमिनरीची पदवी घेतली. 1955 मध्ये त्यांनी बोस्टन विद्यापीठातून पीएचडी केली.

क्रोझर येथे असताना महात्मा गांधींच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा किंग यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. किंग आपल्या वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक बनले. डिसेंबर १९५५ मध्ये अभावितपणे ते स्थानिक वाहतूक कंपनीच्या निग्रोंना वाहनांमध्ये गोर्‍या लोकांच्या शेजारी बसू न देण्याच्या वर्णविरोधी व पक्षपाती धोरणामुळे सुरू झालेल्या अहिंसात्मक चळवळीचे नेते बनले. ती चळवळ यशस्वी झाली. येथून किंग यांच्या आयुष्यास कलाटणी मिळाली. यानंतर अनेक वेळा त्यांना कारागृहामध्ये जावे लागले. २८ ऑगस्ट १९६३ रोजी त्यांनी वॉशिंग्टन येथे मोर्चा आयोजित केला. त्यावेळी केलेल्या संस्मरणीय भाषणात त्यांनी कृष्णवर्णीयांना समानतेने वागविण्याबद्दल आवाहन केले.

अमेरिकेच्या सामाजिक दृष्टिकोनात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या महान कामगिरीबद्दल वयाच्या पस्तीसाव्या वर्षी १९६४ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. किंग यांनी कारागृहात तसेच इतर उद्योगांतून सवड काढून अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी स्ट्राइड टोअर्ड फ्रीडम (१९५८), स्ट्रेंग्थ टू लव्ह (१९६३), व्हाय वुई कांट वेट (१९६४), व्हेअर डू वुई गो फ्रॉम हीअर (१९६७), द ट्रंपेट ऑफ कॉन्शन्स (१९६८), आय हॅव्ह ए ड्रीम (१९६८) वगैरे महत्वाची आहेत. त्यातून त्यांची विचारसरणी व तत्त्वज्ञान यांचे दर्शन घडते. अशा या क्रांतिकारक नेत्याचे 4 एप्रिल 1968 रोजी निधन झाले.