Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स मी टू ची दुसरी बाजू

मी टू ची दुसरी बाजू

अनेक दिवसांपासून देशभर गाजत असलेल्या मी टू प्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणांची एक बाजू महिलांचे शोषण किंवा तसा सांभाव्य प्रयत्न त्याची चाहूल लागताच रोखण्याचा प्रयत्न हा आहेच. तो स्वागतार्ह आहे. मात्र या प्रयत्नांतून एखाद्या संबंधित पुरुषाचा किंवा आरोपी म्हणून समाजमाध्यमांमध्ये ठरवला गेलेल्याचा बळी जाण्याचा धोकाही आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या एकूणच मोहिमेचा विचार होणं गरजेचं आहे. माध्यमांकडून हा विषय समोर आणला जाईलही. पण त्याची सिद्धता, चाचपणी, तपास आणि त्यातील दोषींना शिक्षा आणि पिडितांना न्याय देण्याचा अधिकार इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे. समाजमाध्यमांवर सरकारी किंवा तत्सम यंत्रणेचे नियंत्रण ठेवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत त्याचा गैरवापराचा धोकाही आहे. दुसरीकडे न्यायव्यवस्थेचा गैरवापर करून वैयक्तिक उद्देशांसाठी असे आरोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ महिलांच्या संवेदनशीलतेच्या बाजूने मी टू मोहिमेचा विचार होणं जसं गरजेचं आहे. तशीच त्याची दुसरी बाजूही तेवढ्याच संवेदनशीलतेने समजून घेण्याची आवश्यकता आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण समाज आणि प्रसारमाध्यमातूंन मोठ्या प्रमाणात समोर आणलं गेलं. या प्रकरणात आरोप करणारी आणि ज्यांच्यावर आरोप झाले ती व्यक्ती असेही दोघेही सेलिब्रेटी प्रकारात मोडत असल्यामुळे या बातमीचं मूल्य हे माध्यमांमध्ये वाढणार होतंच. तसंच त्यावर समाजमाध्यमांवरही चर्वितचर्वण होणार हे उघड होतं. त्यानंतर चित्रपटसृष्टी, पत्रकारिता, राजकारणासह इतर अनेक क्षेत्रातील महिलांनीही मी टू प्रकरणातून आपला आवाज समोर मांडला, मांडत आहेत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे ठरवण्याचं काम संबंधित सुरक्षा, तपास आणि न्याय यंत्रणेचे आहे. ते त्यांनाच करू द्यावं. मीटू मध्ये होणारे आरोप हे व्यक्तीच्या नैतिकता, शील आणि एकूणच मानसन्मानावर होणारे असल्यामुळे त्यात होणारा उथळपणाही संबंधित व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतो.

तनुश्रीनं नानावर आरोप केले. घटना घडल्यानंतर दहा वर्षांनी हे आरोप झाल्याचं मान्य जरी केलं तरी त्या आरोपांमधील गांभीर्य कमी होणारं नाही. महिलांसाठी महत्वाची असलेली ही कायद्याची बाजू आहेच. पण झालेली घटना, नजर, स्पर्श, उच्चार हा लैंगिक किंवा मानहानीकारक शोषणाच्या उद्देशानेच केला गेला होता. हे सिद्ध करणं कठिण आहे. त्याचे निकष कोणते ? हा प्रश्न आहेच. यावेळी केवळ संबंधित महिलेने केलेला आरोप हाच पुरावा मानणं धोक्याचं आहे. खटल्याच्या दृष्टीने हा पुरावा परिपूर्ण आहे का, किंवा कृतीला पुराव्याचं स्वरुप देणं हा तपास यंत्रणांच्या कामाचा भाग झाला. मात्र तोपर्यंत अनियंत्रित असलेल्या समाजमाध्यमांवरील धिसाडघाईने संबंधित व्यक्तीला दोषी ठरवलं जातं. त्यावेळी मानहानीचा आरोप एखाद्याच्या जिवितहानीसाठी कारण ठरल्यास त्याला जबाबदार कोण? याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे वैयक्तीक पातळीवरील या दोन्ही परस्परविरोधी संघर्षामुळे मीटू मोहिमेच्या मूळ उद्देश बाजूला पडण्याचा धोकाही आहे. हा संघर्ष आता शोषण करणारा आणि पिडीत यातून स्त्री विरुद्ध पुरुष असाही होऊ लागला आहे.

- Advertisement -

पुरुष संघटनांनी आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी पुरुषांची बाजू मांडणारी मोहीम सुरू केली. सांगलीत पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात लढणार्‍या एका संघटनेने ही मोहीम सुरू केली. महिला जर व्यक्त होत असतील तर पुरुषांनी सुद्धा व्यक्त व्हायलाच हवे, असे या संघटनेचे मत आहे.

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एक जाहीरात दाखवली जात होती. खचाखच भरलेल्या बसमध्ये एका तरुण मुलीसमोर एक तरुण मुलगा उभा असतो. त्यावेळी बसला ब्रेक मारल्याने त्या तरुणीचा तोल जाऊन ती पुरुषाला धडकते, ती मुलगी पुरुषाला सॉरी म्हणते. त्यानंतर हाच प्रकार उलटा होतो. अचानक मारलेल्या ब्रेकमुळे तरुणाचा धक्का तरुणीला लागतो. त्यावेळी संबंधित तरुणाला समूहाकडून त्या मुलीकडूनही फैलावर घेतलं जातं. अशा प्रकरणात तरुणांना मारहाणही होत असल्याचं मुंबई सारख्या शहरात नेहमीच घडतं.

- Advertisement -

आपल्यावरी अत्याचार किंवा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिला बोलू शकल्या नाहीत, असंही शक्य आहे. त्यासाठी मीटू चळवळ महत्वाची आहेच. मात्र या चळवळीत कित्येक महिलांनी आरोप केलेत, ते सगळेच खरे आहेत का याची चौकशी होणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे मीटू चळवळीच्या मुख्य उद्देशच बाजूला सारला जाण्याची धोकाही आहेच. कित्येक महिलांनी तर जुन्या भांडणाचा राग काढून किरकोळ आणि नकळत घडलेल्या गोष्टींना मीटू मोहिमेचं रूप देऊन स्वतःला खरं आणि पुरुषाला खोटं सिद्ध केल्यास त्याचा निकाल कसा दिला जाईल. हा प्रश्नही आहेच.

दुसरीकडे पुरुषांना देखील अत्याचारांचा सामना करावा लागतो. असे अत्याचार लैंगिकच असतात असे नाही. तर मानसिक, शारिरीकही असू शकतात. त्यामुळेच पुरुषांच्या मनस्थितीची विचारसुद्धा करणे गरजेचे आहे. मानसिक त्रास देणे, ब्लॅकमेल करणे किंवा इतर प्रकारे देखील पुरुषांना टार्गेट केलं जाऊ शकतं. बरेच वेळेस सामाजिक दबावाखाली पुरूष याबद्दल जाहीर वाच्यता करणे टाळतो. शिवाय, कुटुंबाचा दबाव हा असतोच. मग झालेल्या प्रकाराबद्दल बोलणार कुठे? मानहानीची भीती त्यालाही समान असते. या अशा प्रकरणात पुरुषांवर येणारे दडपण आणि इतर गोष्टींविषयीही निष्पक्षपातीपणे विचार झाला पाहिजे.

पुरुषांच्या बाबतीत होणारे नेमके अत्याचार कसे असतात. पुरुषांकडूनच पुरुषांचं लैंगिक शोषण होतं का? तसेच प्रयत्न होतात का? हे प्रश्नही समोर यायला हवेत. अत्याचार हे केवळ लैंगिक असू शकत नाहीत. मानसिक छळ, खच्चीकरण, अस्वस्थता, भीती दाखवणं, हे प्रकारही अत्याचारात मोडत असतील तर त्याचाही विचार व्हायला हवा.ऑफिसमध्ये एखादे काम नीट झाले नाही तर सर्वांसमोर ज्यावेळी बॉस ओरडतो त्यावेळी अपमान झाल्याची भावना ही प्रत्येक नोकरदाराची असते. मात्र हेच जर महिलेच्या बाबतीत घडलं तर त्यात मानसिक छळाचा आरोप होऊ शकतो.

परभणीतील सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहलेल्या सुसाईड नोटमधल्या नोंदीनुसार एका महिलेकडून त्याचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यातून त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ आणि माध्यमं उपलब्ध होतात. पुरुषांचं काय? दुसरीकडे पुरुष मात्र काहीच बोलू शकत नाही, जरी त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर कोणी सहजासहजी विश्वास ठेवणार ? हा प्रश्नही असतोच.

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावरसुद्धा मी टू अंतर्गत आरोप करण्यात आले. पण त्यामध्ये किती तथ्य होते ते नंतर समोर आले. ज्या अभिनेत्रीने हे आरोप केले तिचाच एक आक्षेपार्ह इ-मेल त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केला होता.पण हे समोर आणण्यापूर्वीच भगत यांना समाजमाध्यमांवर साफ खोटे ठरवण्यात आले. मी टू प्रकरणांची योग्य चौकशी करून संबंधितांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. मात्र त्याआधीच आरोपीला दोषी ठरवून त्याची माध्यमांमध्ये सामाजिक, नैतिक मानहानीची शिक्षा सुनावण्यातही आपल्या कायद्याचा आणि स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा पराभव आहे.

- Advertisement -