घरफिचर्सपाऊस, नदी अन् तू

पाऊस, नदी अन् तू

Subscribe

जुना पाऊस कधी कधी फार आठवतो. भूरभूर पावसात आपण स्टेशनवर प्यायलेला चहा, तुझ्या केसांतून ओघळणारं पाणी, तुझ्या भाबड्या चेहर्‍याला स्पर्श करण्यासाठी झुरत राहणारा चिवट पाऊस. मी पहिल्यांदाच तुझ्या घरी आलो तेव्हा मला दारापर्यंत सोडायला आलेली तू. तेव्हा वाटलं जणू मी पहिल्या पावसात भिजत आहे.

मी प्रत्येक पावसाळ्यात तुझी वाट पाहतो. सगळ्या ढगांना तुझ नाव विचारतो अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठी भांडत राहतो. तुझ्या ओल्यचिंब हातातल्या हिरव्या काकणांचं थोडस हिरवेपण मलाही दे. माझ्या सुकत चाललेल्या बुंध्यावर या पावसात तुझा कोंब उगू दे. तुझ्या पूल ओंलाडणार्‍या पावलांना मंदिराची ओढ मग पुलाशी मैत्री कोण करणार? नदीचं पाणी तुझ्या मनासारखं खोल, मग तुझा तळ कसा गाठणार? दुधडी भरून वाहणार्‍या नदीत हेलकावणार्‍या ओंडक्यासारखा मी अन् पहाडावर उमललेल्या नाजूक पिवळ्या फुलासारखी तू. पण आपल्यातून वाहणारा पाऊस एकच. आता आपण एकमेकांचे कोणीच नसताना पाऊस मात्र दोघांच्याही जीवाभावाचा. कित्येक जन्म पुरेल एवढं मोठं हे पावसाच महावस्त्र आणि त्याच्या दोन-चार धाग्यांनाच समजून घेताना सरत जाणारं आपलं आयुष्य.

कधीतरी दुपारीच काळोखून येते. रानात नुसती कालवाकालव होते अन् जांभळीच्या झाडावर पुन्हा तुझे नाव उमटून जाते. कधी कधी सकाळीच मी करवंदीच्या बेटात. कधी तरी करवंदीचे काटे टोचतात बोटांना अन् रक्तातून तुझी कविता वाहून जाते. रक्त ओघळत येते तुझ्या उशीपर्यंत अन् तुला सकाळीच जाग येते. एखादा दिवस एवढा उदास का उगवतो या प्रश्नाचे उत्तर तुला न विचारताच मिळून जाते. तू मला भर पावसात दिलेल्या प्राजक्ताच्या फुलांची शपथ, मी प्राजक्ताचा गंध आणि तुझा सुगंध काळजात जपून ठेवला आहे. तुझ्या पापण्यांना स्पर्श करणारा पारदर्शी पाऊस मी पुन्हा एकदा आभाळाला मागितला आहे. आता कधी कधी पाऊस एकटाच रडत राहतो. मी डोळे पुसतो माझे अन् खिडकीतून त्याला पाहत राहतो.

- Advertisement -

जुना पाऊस कधी कधी फार आठवतो. भूरभूर पावसात आपण स्टेशनवर प्यायलेला चहा, तुझ्या केसांतून ओघळणारं पाणी, तुझ्या भाबड्या चेहर्‍याला स्पर्श करण्यासाठी झुरत राहणारा चिवट पाऊस. मी पहिल्यांदाच तुझ्या घरी आलो तेव्हा मला दारापर्यंत सोडायला आलेली तू. तेव्हा वाटलं जणू मी पहिल्या पावसात भिजत आहे. त्यानंतरचे कितीतरी पावसाळे मी याच आठवणीवर काढले आहेत.तुझ्या बोटांना झालेली जखम सांभाळताना तुझी पावसात दमछाक व्हायची आणि आता या मुसळधार पावसात ही यातनांची कमळं जपताना माझी होणारी घालमेल तुला दिसत नाही. काहीही झालं तरी जगतच राहतात ना माणसं. तू कुठे का असेना सुखात आहेस, एवढीही गोष्ट पुरेशी आहे मला जगण्यासाठी आणि सगळेच पावसाळे सोबतीनं जगता येत नाहीत, खूप काळ लागतो हे समजण्यासाठी.

वर्गातल्या मुलांना पावसाची कविता शिकवताना तुला भरून येत नाही? गावाजवळच्या ओढ्यातून तू वाहून जात आहेस, असं स्वप्न तुला मध्यरात्री पडत नाही? बालपणी गावच्या नदीवर तू आईसोबत धूण धुवायला जायचीस, त्या दिवसांची आठवण तुला येत नाही? आईकडून हट्टाने घेतलेल्या बांगड्यांचे काचतुकडे तुला मध्यरात्री टोचत नाहीत? चावडीपासून जाणार्‍या रस्त्यावर तुला भला मोठा साप दिसला होता, त्याच्या विळख्यात असल्याचा भास तुला उत्तररात्री होत नाही?
उगाच कधीतरी फार पाऊस पडतो, उगाच कधीतरी फार रडू येत. तू पावसाच्या बरसण्याचं आणि माझ्या रडण्याचं कारण नको विचारू. तू पावसाच्या वाहण्याला आणि माझ्या रित होत जाण्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. कदाचित तुला पाऊस कळणार नाही, पण निदान मी तरी तुला कळेन. ही हरवत जाणारी पायवाट कधीतरी तुझ्या रस्त्याकडे वळेल.
तुझी आठवण म्हणून तू मला दिलेल रेल्वेचं तिकिट, स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर आपण खाल्लेलं आईस्क्रीम, कॉलेजसमोरच्या कॅफेत कॉफी पिताना तुझ्या डोळ्यात मिसळलेले ढग, माझ्या केसांत अडकलेली गुलमोहराची पानं काढणारे तुझे हात, लग्नानंतर जेव्हा तू पहिल्यांदा भेटलीस तेव्हा घातलेल्या सुती साडीचा पिवळा काठ.

- Advertisement -

कधी कधी वाहून जातात पावसाळे आणि आपल्या आवडीची रोपटी लावायचं राहून जातं. कधी कधी माणसं निघून जातात आयुष्यातून आणि त्यांच्यासोबत भिजायचं राहून जातं. आपले पावसाळे असे एकमेकांशी अनोळखी होतील असं तुला कधी वाटलं होतं का? तुझी लाडकी मांजरीची पिल्लं तुझ्याकडे अनोळख्या नजरेनं पाहतील, असं तुला कधी वाटलं होतं का?
आता तुझं मन म्हणजे जिथं माझ्या पावसाचा आवाजही पोहचत नाही. तुझ्या नव्या घरांच्या भिंतीवर माझी जुनी पाऊसचित्र शोभत नाहीत. तरीही माझं सगळं काही तूच. तू माझी मूळं, तू माझं झाडं. तू माझी जमीन, तू माझा पहाड. तू माझा पाऊस, तू माझं रान. तू माझा ढग, तूच माझी तहान. पण फक्त एक सांग, एकदा कोसळायला लागल्यानंतर न थांबणारा पाऊस, एकदा वाहायला लागल्यानंतर कुणालाच न जुमानणारी नदी, एकदा निरोप दिल्यानंतर एकदाही पाठीमागे वळून न पाहणारी तू; यापैकी सगळ्यात जास्त काय खरं होतं..?


-अरुण सीताराम तीनगोटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -