पुरुषांना हवीच हक्काची सुट्टी!

रोजचं ट्रॅफिक, नोकर्‍यांमधले ताण, घरगुती व्यवधानं, घरी आल्यावर बायको मुलांना द्यायचा वेळ यांत ते पिदाडून जातात.

आजही अनेक घरांमध्ये स्त्रिया या घरातल्या विविध जबाबदार्‍या सांभाळण्याकरिता कमावण्यासाठी बाहेर पडत नाहीत. ती जबाबदारी पुरूष हसतखेळत उचलतो. रोजचं ट्रॅफिक, नोकर्‍यांमधले ताण, घरगुती व्यवधानं, घरी आल्यावर बायको मुलांना द्यायचा वेळ यांत ते पिदाडून जातात. ते कधीमधे मित्रांना भेटायला जातात, खाणे पिणे विरंगुळा असतो; पण सुट्टी घेताना पुरूष बर्‍याचदा आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत बाहेर जाण्याचीच आखणी करतात. त्यात आनंद असतो निश्चितच; पण आपल्या कुटुंबियांसोबत बाहेर जाणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण आपले स्वतंत्र बाहेर जाणे हीसुद्धा गरज आहे…

वाहून गेल्याशिवाय कसे पहायला मिळतील नवे प्रदेश व कशी काय मिळावी ऊर्जा..? त्यासाठी घातलेले बांध क्वचित उठवायला हवेत. पुरूषाला काय स्वातंत्र्य नेहमी मिळतंच हे गृहीत धरतो आपण सगळेच. कारण ते आपल्या सोयीचं असतं. ते जातात कामानिमित्ताने बाहेर मग अजून एकट्याच्या वेगळ्या सुट्टीची काय गरज आहे पुरुषांना? असं अनेकींना वाटतं. हेही वाटतंं की माझ्या नवर्‍याला माझ्याच सोबत, मुलांसोबतच एन्जॉय करायला आवडतं.. अरेरे.. गैरसमजाय म्याडम तुमचा! जरा मोकळं सोडून बघा. कोणत्याही कामाशिवाय, आपल्याशिवाय पुरूष जेव्हा एकटा बाहेर फिरतो तेव्हा आनंद गगनात माझ्या माईना असा माहोल असतो क्काय. मुलांच्या सुट्ट्या, आपल्या सुट्ट्या असताना त्यांनी आपल्या सोबत जाणं वेगळं आणि त्यांनी आपल्याला वगळून नव्हे तर सोलो ट्रीपला जाणं फार वेगळं आहे बयो. आपले वडील, बॉयफ्रेंड, नवरा, मुलगा ह्यांना काहीच कळू न देता एखाद्या छानश्या ठिकाणी त्याची सारी सुट्टी प्लॅन करून त्याच्या हातात ती सुट्टी प्रेमाने भेट म्हणून ठेऊन तर बघ.. मग दिसतील तुला त्याच्या डोळ्यात दोन ड्रॉप्स.. आनंदाश्रू गं.. विवाहानंतर सतत एकत्र बाहेर येण्याजाण्याने स्त्री-पुरुषांचे आऊटिंग हे एकप्रकारचे घरातलेच जिणे ठरावे इतके मिळमिळीत होऊन जाते. हॉटेलात, फिल्म पहायला सतत एकत्र आल्याने काही वर्षांत एकमेकांचे चॉईस फारच अंगात मुरायला लागतात. गप्पा संपतात त्यातला रोमॅन्स संपतो आणि नवरा बायको अगदी भावाबहिणीसारखे एकजीव एकरूप एवढंच नाही तर एका चेहरापट्टीचेही वाटू लागतात. कडक शिस्तीची बायको असेल तर बाहेर रिसॉर्टला गेल्यावर नवर्‍याला गजर लावूनच सकाळी सात म्हणजे सातलाच उठून हा पॉईंट तो पॉईंट पहावा लागेल. एखाद्याला फक्त रिसॉर्टमध्ये जाऊन लोळायचे असेल आणि फक्त आठ दिवस एकाच ठिकाणी राहून बाहेरचा एकही पॉईंट पहायचा नसल्यास तो चॉईसच उरत नाही. मग ती कसली घंटा सुट्टी? बाझवत गेल्या सगळ्या डोंगर-दर्‍या.. मी कुठेही चढणार नाही, मला कुठलाही सूर्यास्त पहायचा नाही, काहीकाही करायचं नाही. मी आरामात उठणार.. आसपास पाय मोकळे करून येणार, गरम जेवणावर ताव मारणार, कोंबडीची तंगडी खाणार, दारू पिणार, टीव्ही पाहणार मधे एकही व्यत्यय नको.. मग बेडवर पडून आरामात लोळत पुस्तक वाचणार आणि मग घोरत पडणार असे एखाद्याचे स्वप्न असेल तर.. पॉईंट टू पॉईंट कव्हर करण्याच्या मिषाने सोबत असलेला जोडीदार काय, आपल्याला आराम करू देणार नाही हे तर पक्कय.

एकत्र जाण्यात मजाच असते; पण ती वर्षानुवर्षं अनुभवून झाली असेल तर निदान प्रवासातला रोमॅन्स बदलण्याची संधी तरी आपण घ्यायला हवी. जिथे मुलांची पॅपॅ नसेल, बायकोचे सतत सांभाळावे लागणारे त्सूनामिक भूकंपिय मूड नसतील. जिथे प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी आपली नसेल, जिथे फक्त आपण असू क्वचित आपल्यासोबत आपले हक्काचे चड्डीमित्र किंवा मैत्रिणी असतील. जिथे आपण जगू शकू, फुकू शकू, ऊतू मातू शकू च्यायला.. कोणतेही कवच न पांघरता उंडारू शकू अशी सुट्टी प्रत्येक पुरुषाने घ्यायलाच हवी. जिथे आपण घाम गाळून कमावलेला पैसा थोडा तरी उडवू शकू.. काय हरकतै?

बायकोसोबत नवरा किंवा नवर्‍यासोबत बायको असेल तर मित्रांसोबत क्वचित मैत्रिणींसोबत हवं तसं हवं ते बोलण्यावर बंधन येतात.. हे मी खोटं बोलतेय तर सांगा की हे खोटय म्हणून. सुट्टी म्हणजे सुट्टी, ऐश करणार आपण. दुनिया (बायको) जिंदगी (बायको) राहिली टोकावर. हे असं जगण्याची एक सवलत मुभा पाहिजेल ना राव. ती बायकोनेच नवर्‍याला द्यावी हसत हसत.. जा बेटा जिले अपणी अपणी जंदगी.

या थोड्याश्या सेपरेशनने नवरा बायकोमधल्या नात्यात हरवत चाललेला तजेला पुन्हा येऊ लागतो. शहरात परतल्यावर शहर पुन्हा अंगावर ओढून घेण्याचं धैर्य येतं. झालेली झीज भरून निघते. हो होतं असं.

पुरुषांनी अशी सुट्टी घेतलेली असताना बायकोने त्यांना सतत पाचशे फोन करून ‘हं, कुठे पोहोचलात, काय करताय, किती किलोमीटरवर आलात, आता काय खाताय, तिखट असेल ज्यादा तर जरा कमी तिखट खात जा पोट बिघडेल, बिघडलं तर हे हे औषध ह्या ह्या कप्प्यात ठेवलेलं आहे,नाहीच आवडणार तुम्हाला बाहेरच शेवटी घरचं ते घरचं, रात्री वेळेवर झोपलात का, झोपलात तर एकटे झोपलात की कुशीत उशी घेऊन झोपलात, उशीला नाक ओठ होते काय, कॉण्डोम सोबत घेतले होतेत का, एकच घातलात की डबल? झोपलाय तो बेड फार मऊ आहे की कडक? मित्रांसोबत काय गप्पा मारल्यात, पोट साफ झालं का, मग घरी आज हेहे झालं, मला तुमची फार आठवण येतेय, मी आज पिठलं भाकरी केलीये तुमच्या आवडीची आणि घास घश्यात अडकलाय..’ हे सतत नॉन्सेन्स नॅगिंग करायचं नाही हं!

कारण मग काय होतं फोन ठेवल्या ठेवल्या आपली बायको किती येडझवी आहे आणि ती कशी जगूच देत नाही श्वास घेऊच देत नाही हे दातओठ खात पुरूष बोलू लागतात. मग समोरचा त्याचा मित्रही त्याची बायकोही तशीच येडझवी आणि सतत वॉच ठेवणारी असल्याचं सांगू लागतो. थोडक्यात ‘बायको’ हा विषय घेऊन लग्नाने लग्नं कसं संपलेले आहे आणि आयुष्याची त्यामुळे कशी टिंबटिंब लागलेली आहे हे बोलू लागतात. बोलत असताना ग्लासमध्ये पेग ओतला जातो आणि डोळेही डबडबून येतात समदु:खी मित्रांचे. आपलं पूर्वीचं आयुष्य किती भारी होतं ना.. आता संपलं आयुष्य.. कशाचंच काही वाटत नाही या अशा भावनांचा निचरा होता होत नाही.

आपण द्यावी ना आपल्या नवर्‍याला, बॉयफ्रेंडला स्पेस! का नाही देऊ शकत..? जाऊ द्यावं त्यांना कोष सोडून… घुसमट होत असते सतत आतबाहेरच्या जगात. आपल्याला वाटतं पण पुरूष सतत सगळीकडे मनमानी करत असतो मज्जा करत असतो असं नसतं. कापलेल्या पतंगांसारखे ते लटकत, फाटत-फाटत, लोंबकळत घरी येतात. त्यांचा जो दोर आहे त्याला आपण ढील दिली नाही तर ते आपल्याला ज्या कारणांसाठी आवडले होते तो सबस्टन्स हरवून नाही का जाणार? आपला नवरा कुठे आहे, काय करतो आहे, कुणाशी बोलतो आहे याची सततची शहानिशा वैतागवाणी आहे. आपण प्रेम करतो समोरच्यावर. पण त्याचे जे अवकाश आहे त्याचे मालक नसतो. पुरुषाला स्त्रीने किंवा स्त्रीला पुरुषाने त्याचे अवकाश पाहू द्यायला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. काय करून टाकतो आपण एकमेकांचं ओरबाडत राहून.. फार वाईट आहे हे.

बायकोने पुरुषांना पकडून ठेवायला हवं हे अजिबात पटत नाही. आपल्याशिवाय आपल्या नवर्‍याला सहन करणारं ह्या जगात आणि दुसरं कुणीकुणी नाही हा आत्मविश्वास असेल तर कशाला करावेत नवर्‍याला सतत फोन.. का विचारायच असतं त्यांना हेच की ते आहेत तरी कुठे कुणासोबतआहेत ते? पुरुषांनी स्वत:ची एक सुट्टी घ्यावी वर्षातून किमान आठवडाभर.. त्याकाळात घरच्यांनी त्यांना अर्जंट असल्याखेरीज फोन करूच नये. पुरुषांनीही त्यांचा फोन भिरकावून द्यावा समुद्रात किंवा दरीत एक स्विच ऑफचं बटन दाबून. ‘स्विच ऑफ’ होणं फार गरजेचं आहे ह्या रोजमर्राच्या जिंदगीतून. निरूद्देश एखादी हिरवी पाटवाट चालणं फार गरजेचं आहे. पुढे काही मिळवायचं शोधायचं नसताना..

(लेखिका ब्लॉगर आहेत)