घरफिचर्सतनुश्रीचे आरोप आणि सत्तेचे राजकारण

तनुश्रीचे आरोप आणि सत्तेचे राजकारण

Subscribe

नोकरीसाठी घराबाहेर पडलेली स्त्री एका प्रकारे अबला असते व तिचा गैरफायदा घेणे हे केव्हाही चुकीचेच. त्याबद्दल असे वर्तन करणार्‍या पुरूषांना कायद्याने व समाजाने शिक्षा करणे गरजेचे आहे. तरच हे प्रकार थांबतील. मात्र खरंच हे प्रकार थांबतील का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. केवळ लैंगिकच नव्हे तर सर्वच प्रकारचे शोषण, मग ते आर्थिक असो की सामाजिक सांस्कृतिक असो, सत्तेशी निगडीत असते. जो सत्ताधारी असतो तोच शोषण करू शकतो व जे शक्तीहिन असतात ते या ना त्या कारणांसाठी शोषण सहन करत असतात.

गेले काही आठवडे अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप गाजत आहेत. तनुश्रीचे आरोप समोर आल्यापासून याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तनुश्रीने दहा वर्षांपूर्वी नानाचे वर्तन कसे आक्षेपार्ह होते याबद्दल आज त्याच्यावर आरोप केले आहेत. तेव्हा ‘हॉर्न ओके प्लीज ’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणाच्या प्रसंगी नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य नृत्याची तालिम घेत असताना नानाने हा गैरप्रकार केला होता, असा तिचा आरोप आहे. तनुश्री एवढयावरच थांबली नाही तर अलिकडेच तिने ओशीवरा पोलीस स्टेशनमध्ये नानाविरूद्ध तक्रार केली आहे.

यात भर की काय म्हणून कंगना रनौतने ‘क्विन’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहेल याच्यावरही असेच आरोप केले आहेत. एका सिने पत्रकार मुलीने कैलाश खेरने तिच्याशी असेच गैरप्रकार केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर कालपरवा समांतर सिनेमा नेहमी दिसणारा व मुंबई/ दिल्लीतील हिंदी रंगभूमीवर महत्वाचे योगदान देणार्‍या रजत कपुरनेही आपण असे वागल्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

हा प्रकार फक्त आपल्या देशात होतो असे नसून हॉलिवूड तर यापेक्षा बदनाम आहे. ही मानसिकता फक्त चित्रपट आणि रंगभूमीच्या क्षेत्रातच आहे, असे नाही. थोडक्यात म्हणजे ‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे लैंगिक शोषण’ हा खरा मुद्दा आहे. याबद्दल गेली अनेक दशकं लिखाण होत आलेले आहे. 2006 साली श्रीमती तराना बर्क या तरूणीने ‘मी टू’ ही वेगळया प्रकारची एक चळवळ सुरू केली. यात आपल्यावर तरूणपणी किंवा लहानपणी जे लैंगिक अत्याचार झाले असतील त्याबद्दल स्त्रियांना मोकळेपणी बोलावे असे अपेक्षीत असते.यात काही स्त्रियांनी आज समाजात महत्वाच्या पदावर असलेल्या पुरूषांनी स्वतःच्या पदाचा, अधिकाराचा गैरवापर करून आमच्यावर कसे लैंगिक अत्याचार केले होते वगैरे जाहीरपणे सांगायला सुरूवात केली. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. आता तनुश्री दत्ताच्या आरोपांवर उडाली आहे तशी.हा मुद्दा व्यवस्थित समजुन घेतला पाहिजे.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून स्त्रिया अर्थाजनासाठी, शिक्षणासाठी घराबाहेर पडू लागल्या. त्या आधी स्त्री तिच्या सर्व जीवनात फक्त दोनदाच घराबाहेर पडत असत, एकदा लग्न झाल्यावर तर दुसर्‍यांदा मृत्यू झाल्यावर. अशा समाजात आता स्त्री दररोज व वर्षानुवर्षे घराबाहेर पडू लागली. परिणामी तिच्यावर परपुरूषांची वाईट नजर पडणे सहजशक्य झाले. यातून एका नवीन गुन्हयाचा जन्म झाला व तो म्हणजे ‘कामाच्या ठिकाणी स्त्रीचा लैंगिक छळ’. या बदललेल्या परिस्थितीची दखल घेत भारत सरकारने डिसेंबर 2013 पासून कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी कायदा केला. कायदा केला म्हणजे प्रश्न सुटतो, असे नाही. पण कायदा असणे गरजेचे असते.

- Advertisement -

या संदर्भात पुरूषांची मानसिकता बदलणे नितांत गरजेचे आहे. नोकरीसाठी घराबाहेर पडलेली स्त्री एका प्रकारे अबला असते व तिचा गैरफायदा घेणे हे केव्हाही चुकीचेच. त्याबद्दल असे वर्तन करणार्‍या पुरूषांना कायद्याने व समाजाने शिक्षा करणे गरजेचे आहे. तरच हे प्रकार थांबतील. मात्र खरंच हे प्रकार थांबतील का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. केवळ लैंगिकच नव्हे तर सर्वच प्रकारचे शोषण, मग ते आर्थिक असो की सामाजिक सांस्कृतिक असो, सत्तेशी निगडीत असते. जो सत्ताधारी असतो तोच शोषण करू शकतो व जे शक्तीहिन असतात ते या ना त्या कारणांसाठी शोषण सहन करत असतात. असा आजवरचा इतिहास आहे.या आजवरच्या इतिहासांत सर्व प्रकारची सत्ता पुरूषांच्या हातात एकवटली होती व काही प्रमाणात आजही आहे.

ग्रामीण भागात जमीनदार शेतमजुरांचे शोषण करतात तर शहरांत कारखानदार असंघटीत कामगारांचे शोषण करतात. मुंबई/ पुण्यासारख्या शहरांत सुशिक्षीत व नोकरी करणार्‍या महिला बिनदिक्कतपणे त्यांच्या घरी धुणंभांडी करणार्‍या असंघटीत महिलांचे शोषण करतात. हे तपशील लक्षात घेतले म्हणजे शोषण, मग ते लैंगिक असो की आर्थिक असो, सत्तेशी निगडीत असते; हे मान्य करावे लागेल.

याचा आणखी एक अर्थ म्हणजे शोषणात लिंगभेद नसतोे. हा सत्तेचा खेळ आहे. ज्याच्या हाती सत्ता आहे, मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरूष, त्याचा गैरवापर करू शकतो. तनुश्री दत्ताच्या बातम्या येत होत्या तेव्हाच आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती चंदा कोचर यांच्या राजीनाम्याची चर्चा होत होती. श्रीमती कोचर यांनी ‘अधिकाराचा गैरवापर’ करून व्हिडीओकॉन कंपनीला कोट्यवधी रूपयांचे कर्ज दिले होते. आता त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. श्रीमती कोचर एवढे मोठे कर्ज मंजूर करू शकल्या कारण त्या ‘सत्तेच्या जागी’ विराजमान झालेल्या होत्या. तेथे त्यांना पदाचा गैरवापर करणे शक्य होते.

जेव्हा स्त्रिया सत्तेच्या जागी नव्हत्या तेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असत, आजही होतात. पण जर स्त्री सत्तेच्या जागी असली तर ती सत्तेचा गैरवापर करत नाही, असं नाही. आता ज्या क्षेत्रांत स्त्रियांच्या हाती सत्ता आली आहे, त्या क्षेत्रात त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या पुरूषांशी व स्त्रियांशी खाजगीत बोलले की वेगळेच जग समोर येते. तेथे अधिकारपदावर बसलेल्या स्त्रिया सर्रासपणे आणि वेगवेगळया प्रकारे शोषण करत असतात. यात लैंगिक शोषणसुद्धा आले. याबद्दल अजुन तरी आपल्या समाजात उघडपणे चर्चा सुरू झालेली नाही.

1994 साली ‘डिसक्लोजर’ नावाचा इंग्रजी चित्रपट आला होता. त्यात डेमी मूर ही अधिकारपदावर असलेली स्त्री मायकेल डग्लस या तिच्या हाताखाली काम करणार्‍या पुरूषाचा भरपूर छळ करते.आणखी काही वर्षांनी आपण 2013 साली केलेल्या कायद्यात सुधारणा करून त्या कायद्यात आता जेथे ‘स्त्री’ च्या लैंगिक शोषणाचे उल्लेख आहेत, तेथे ‘स्त्री/पुरूष’ अशी दुरूस्ती करावी लागेल. सत्ता ज्या व्यक्तीच्या हातात असते तीच व्यक्ती शोषण करू शकते, मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष!

प्रा. अविनाश कोल्हे (0989 210 3880)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -