घरताज्या घडामोडीपँथरची पन्नाशी आणि पिवळसर मुखपृष्ठ!

पँथरची पन्नाशी आणि पिवळसर मुखपृष्ठ!

Subscribe

लढाऊ संघटना दलित पँथरने पन्नाशी गाठली...पँथरचा इतिहास, आंदोलनांनी काय साध्य झालं, यावर समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. मग ही चर्चा पँथर नामदेव ढसाळांवर गेली, तिथून त्यांच्या कवितेवर चर्चा झाली. नामदेवच्या गोलपिठाचं मुखपृष्ठ पिवळसर रंगात महापालिका हॉस्पिटलच्या केसपेपरवर उमटलेलं आहे. त्यावर एका नग्न व्यक्तीचं छायाचित्र आहे. या नग्नतेतून उगवलेली हिरवी पालवी आकाशाला भिडू पाहतेय...साहित्यातील नग्नता आणि माणसातील शारीरिक आणि मानसिक नग्नतेत असलेला फरक या पँथरच्या पन्नाशीच्या निमित्ताने...

जीवाच्या एकपेशीय अवस्थेपासून ते माणसाच्या उत्क्रांतीपर्यंत माणूस नग्नावस्थेतच होता, ही नग्नावस्था निसर्गाशी जुळवून घेणारी होती, मात्र मेंदूच्या विकसित होण्याबरोबर समाज, व्यवस्था, संस्कृती रुजत गेली तसतसे नैतिकता, लैंगिकता आणि नग्नतेचा संबंध जोडला जाऊन तो दृढ होत गेला. त्यातून नग्नता नकारात्मक बनत गेली. नैतिकतेच्या आधुनिक समाजातील व्याख्या विकसित होत गेल्या. त्यामुळे नग्नतेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. विचार, अनुभवातून विकसित होत गेलेल्या माणसाला बदलत्या सामाजिक प्रवाहानुसार बदल करणं भाग पडले, परंतु नग्नतेविषयीचा पूर्वग्रह दृष्टिकोन त्याला बदलता आला नाही. कलेच्या प्रांतात तसा प्रयत्न झाला, परंतु तो तोकडा पडला.

कुठल्याही अच्छादनाने देह झाकलेला नसणे म्हणजे नग्नता, अशी ढोबळ व्याख्या नग्नतेविषयी आहे, मात्र अश्मयुगात नग्नता ही नैतिक अनैतिकच्या कुठल्याही चौकटीत बंदिस्त नव्हती, लैंगिकतेचे आक्रमणही त्या काळात नग्नतेवर नव्हते. वल्कले परिधान केलेल्या माणसाची संकल्पना ही आधुनिक काळातील, समाजाच्या निर्मितीनंतरची…कला आणि समाज या दोन्ही बाबी एकाच वेळेस उदयास आल्या. अनुभवातून विकसित झालेल्या मेंदूतील विचार हा त्यामागे होता. नैसर्गिक जगण्यावर संस्कृतीचे आक्रमण झाले हे याच काळात. चित्र, शिल्पकलेतही त्याचे प्रतिबिंब उमटणे स्वाभाविक होते.

- Advertisement -

रवी जाधवच्या ‘न्यूड’ या सिनेमातही नग्नता आणि त्याला विरोध असलेला सांस्कृतिक प्रवाह यातील संघर्षाचे चित्रण आहे. मायकल एंजलोची अजरामर शिल्पकलाकृती डेव्हीड नग्नरुपात आहे. कला ही नैसर्गिक सत्य सांगते, माणसांनी निर्माण केलेल्या कुठल्याही संस्कृती आणि संकल्पनांच्या चौकटीत कलेला बंदिस्त करता येत नाही. त्यामुळेच देहरुप रेखाटणार्‍या किंवा दगडातूंन साकारणारे मानवी देह हे नग्नरुपांतच आढळतात.

ह्युमन अनाटॉमीची रचना आणि त्याच्या नियमनातील अडथळ्यांचा अभ्यास हा वैद्यकीय क्षेत्रातला विषय, पण कलेच्या क्षेत्रात नग्नतेचा विषय जाणीव, संवेदना, कुतूहल, कल्पनाविलास आणि मानवी आसक्ती असा विस्तृत परिघातून पाहिला जातो. चित्रकलेच्या भरभराटीच्या काळात मानवी देहांना आपल्या कुंचल्यातून साकारणारे कलाकार रोमँटीसीझमकडे वळलेले दिसतात. मानवी देह त्यातही स्त्रीदेहाचे आकर्षण अधिक असल्याने कलेच्या प्रांतात आजपर्यंत चितारलेल्या मानवी आकृतींवर रोमँटीसिझमचा प्रभाव दिसतो. हाच रोमँटीसिझम पुढे लैंगिकतेपर्यंत विकसित होत गेला असावा, खजुराहोच्या मैथुनमूर्तीत आकारलेली शिल्पं ही याच विकसित होत गेलेल्या रोमँटीसीझमचा परिणाम.

- Advertisement -

त्यामुळेच मानवी देहांचे चित्रण कॅनव्हॉसवर करणार्‍या कलाकारांना नग्नता आकर्षित करतेच, यामागे अश्लीलता असल्याचा आरोप आधुनिक संस्कृतीतील काही समाजघटकांकडून केला जातो. त्यातून कलाकृतींची मोडतोड झाल्याचे प्रकार नवे नाहीत, मात्र नग्नतेचा वापर हत्यार म्हणून केल्या जाणार्‍या समाज समुदायात मानवी अवहेलनेचे सर्वोच्च उद्दीष्ट म्हणून महिलांना भर रस्त्यात, गावाच्या पारावर नग्न करण्याचा प्रयत्न आपल्या देशांत अनेकदा केला जातो. त्याचे चवीने चित्रण केले जाते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ चवीने पाहिले जातात, टाकले जातात.

नग्नता ही अब्रुशी संबंधित कधीच नसते, तशी ती नसावीही, मात्र आधुनिक समाजनिर्मितीतून संस्कृतीच्या नावावर जी काही विकृती चालवली गेली. त्यातून नग्नता अब्रू किंवा इज्जत अशा अर्थाने जोपासली गेली. नग्नतेविषयी समाजातील हा दुटप्पीपणा अशा रितीने समोर येतो. धर्म आणि सांप्रदायिक संस्कृती लयास गेल्याच्या नावाखाली देहांवर कसे आणि किती कपडे असावेत याचा आकृतीबंध आधुनिक संस्कृती असलेल्या समाजात मांडला जातो, मात्र त्याच समुदायात मागास मानल्या गेलेल्या जातींच्या अवहेलनेसाठी त्यांची नग्न करून धिंड काढली जाते. ही दांभिकता कायम पोसली जात आहे.

देवदासी म्हणून सोडल्या गेलेल्या महिलांची नग्नपूजा करण्याचा प्रकार महाराष्ट्र आणि शेजारी कर्नाटकात केला जात होता. विशिष्ट जात समुदायातील हा एक धार्मिक विधी म्हणून त्याला मान्यता होती, नव्हे ती त्या समुदायाची संस्कृती मानली गेली होती, मात्र त्याविरोधात विवेकनिष्ठ चळवळी उभारल्यावर हे प्रकार कायद्याने बंद करण्यात आले. या प्रकारांना धर्म आणि श्रद्धेचे अधिष्ठान असल्याने त्याला समाजातून पुरेसा विरोध झाला नाही, मात्र नग्नतेला त्याज्य मानणार्‍या संस्कृतीतील फोलपण यातूनही उघड झाले. पराकोटीच्या अवहेलनेचे हत्यार म्हणून नग्नता आजही वापरली जाते.

आपल्या सामाजिक, राजकीय आणि नैसर्गिक हक्कांसाठी लढणार्‍या संघटनाही नग्नतेचा वापर निषेध म्हणून करतात. वर्ष 2013 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नग्नतेच्या नैसर्गिक अधिकारासाठी अनेक महिला आणि पुरुष नग्नावस्थेत रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन केले होते. नग्नता हा घटनात्मक अधिकार आणि नैसर्गिक अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. आपल्याकडेही अर्धनग्नावस्थेतील छायाचित्र एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. निखळ नग्नता ही संकल्पना अद्याप युरोपीय देशांमध्येच रुजली गेलेली नाही, त्यामुळे इथल्या परिस्थितीशी त्याची तुलना नको, दुसरीकडे नग्नता ही गूढ विरक्ती आणि वैराग्याचीही निदर्शक मानली जाते. इथं नग्नतेचा संदर्भ अवहेलनेचा नसतो तर तिला धार्मिकतेचे उच्च अधिष्ठान मिळते. कुठल्याही भौतिक सुखाची इच्छा नसण्याची अशी नग्नता निदर्शक असते.

कला आणि आधुनिक संस्कृतीत संघर्षाचे प्रसंग त्यामुळेच अधून मधून उद्भवतात. नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिली जाणारी नग्नता आणि कृत्रिम उभारणीच्या समाज संस्कृतीत ही लढाई कायम होत राहते. मायकल एंजलोचा डेव्हीड पाहिल्यावर लैंगिकतेपेक्षा त्यातली मानवी देहाचे निसर्गाशी असलेले तादात्म्य लगेचच लक्षात येते. तीच बाब खजुराहोच्या शिल्पकृतींची, इथं मानवी मनांत अनेक वर्षांपासून वसलेली नग्नतेची बिघडलेली संकल्पना दुरुस्त केली जाते. ती त्याज्य, हिडीस, अश्लील राहात नाही, तर निसर्गाचा आविष्कार आणि सृजनाची आनंददायी गरज म्हणून समोर येते.

नग्नतेबद्दल एकूणच नकारात्मक सूर असलेल्या आधुनिक समाजात त्यामुळेच याविषयी कुतूहल आढळते. हेच कुतूहल आणि आकर्षण कलेच्या इतिहासातही होते. त्यामुळेच राजा रवी वर्मांची चित्रे ही मानवी देहाच्या आखीव रेखीवतेतून नग्नता अधिक आकर्षक करतात. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दलचे आकर्षण हा निसर्गनियम मानला गेला तर चित्रांतून साकारली गेलेली नग्नता ही निसर्गतः लैंगिक आकर्षणातून निर्माण झालेली असते का, ते चित्र रेखाटणार्‍या कलाकाराचे कलेत गुंतवून टाकणारे कौशल्य असते हा वादाचा प्रश्न आहे.

मानवी देहात उत्क्रांतीनंतर विकसित मानव साकारणार्‍याच्या टप्प्यापर्यंत मानवी देहामध्ये तुरळक बदल झालेला आहे. त्यामुळेच कॅनव्हॉसवर मानवी देह रेखाटणार्‍यांचा नावीन्याचा शोध थांबला, पण नावीन्याचा शोध घेण्याची उपजत उर्मी कलाकारांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातून पुढे या अस्वस्थेतून मानवी देहाकारांपलीकडच्या मनांचा शोध घेण्याच प्रयत्न कलाकारांमधून मधून सुरू झाला. हा आधुनिक चित्र किंवा शिल्पकलेसाठी क्रांतीकारक टप्पा होता.

मानवी देहाच्या शामियान्यात कुठल्याशा कोपर्‍यात दडलेले मन शोधण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळेच पिकासो किंवा लिओ नार्दोच्या चित्रांमध्ये वेड्यावाकड्या मानवी आकृतींच्या पलीकडे मन शोधण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो. थोड्या बहुत फरकाने आपल्याकडे व्यंगचित्र कलेच्या उगम आणि विकासामागेही हाच प्रयत्न दिसतो. मानवी देह चालतो, खातो, पितो मात्र, त्यापेक्षा जास्त तो बोलतो, ज्यांना ही देहाची बोली समजते… कलेचे गमक त्यांना उमगते. मग, अभिनय, चित्रकला, रेखाटनं, शिल्पकला असे कुठलीही कलामर्यादा त्याला राहात नाही.

नग्नता ही अनिश्चलतेपेक्षा सत्याचलाकडे जाते, असं कलाकार छातीठोकपणे सांगतात. ती जसं जे आहे तसंच मांडते. हे सत्य ज्यांना समजते ते संत मानले जातात. या सत्याचा म्हणजेच निसर्गातील नावीन्याचा शोध हीच सृजनाची आणि विज्ञान चिकित्सेची गरज असते, त्यामुळेच नावीन्याचा तपास लागल्यावर युरेका युरेका ओरडत आर्किमिडीज आंघोळीच्या टबमधून नग्नावस्थेतच बाहेर पळत येतो. त्याची नग्नावस्था त्याच्या सृजनाच्या आड येत नाही. तर नावीन्याचा शोध नग्नतेवर मात करतो.
मानवी देहबोलीची ही भाषा कुठल्याही विद्यापीठात शिकवली जात नाही. तो मनाचा अनुभव असतो.

कुठल्याही कलाकाराला आपल्या मनाशी खोटं बोलता येत नाही. तो खोटं बोलूच शकत नाही. कारण कला ही सत्यावरच आधारलेली असते. असं सत्य जे मनांतून जसं आहे तसं बाहेर येतं आणि मनांतून निखळपणे बाहेर आलेलं सत्य हेच दुसर्‍याच्या मनांतील सत्यापर्यंत पोहचू शकतं. मानवी देहाच्या पलीकडे मनाचा शोध घेण्यासाठी आधी ही देहाची नग्नता जशी आहे, तशी समजून घ्यावी लागते. कलाकाराचा तोच प्रयत्न असतो, असं मानवी चित्रांतून कलेची देहबोली समजून घेण्याच्या प्रयत्न करणार्‍या नव्या पिढीचा चित्रकार तुषार मोलेश्वरी सांगतो. दीनानाथ दलाल यासारख्या प्रसिद्ध चित्रकारांनी मानवी देहातील हेच सौंदर्य कॅनव्हासवर चितारले. त्यामुळे त्यांची चित्रे माणसांना आकर्षक वाटतात.

हमाम में सभ नंगे किंवा नंगे से खुदा भी डरता है…ही वाक्ये आपण ऐकलेली असतात, मात्र नग्नतेला खुदाच नाही, सामान्य माणूसही घाबरत असतो. अशी नग्नता एक आतली असते आणि एक बाहेरची, बाहेरची नग्नता कपड्यांनी लपवली जाऊ शकते, मात्र देहाच्या आतली नग्नता झाकता येत नाही. ती उघडी पडते, ज्यावेळी असहाय्य महिलेचे भर रस्त्यात झुंडीकडून कपडे फाडण्याचे प्रकार होतात, ज्यावेळी अत्याचार केलेल्या लहानग्यांचे नग्न मृतदेह कचरापेटीत सापडतात.

ज्यावेळी नामदेव ढसाळांच्या भाषेत पासले पाडले जातात, त्यावेळी धर्म, संस्कृतीच्या नावावर माणसं माणसांना भोंगळं करतात, त्यावेळी मानवता या घटनांचा निषेध करून नग्न होते. ही नग्नता ओळखण्यासाठी समाज संस्कृतीचा टेंभा मिरवणार्‍या माणसाला आपल्या कपड्यातील, देहातील नग्नता कृत्रिम कपड्याच्या आतून डोकावून पाहण्याची गरज असते. तिथं देहातल्या नागडेपणाचा पराभव नक्की असतो. नामदेव ढसाळांच्या कवितेतल्यासारखा, तिथं ओळखता येतात नग्नतेच्या पलीकडे गेलेली पिकासोच्या चित्रातली माणसं…नग्नता गुंडाळून माणूसपणाच्या शोधात निघालेली, हतबल माणसं.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -