Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स महान कवी मिर्झा गालिब

महान कवी मिर्झा गालिब

Related Story

- Advertisement -

मिर्झा गालिब यांचा आज स्मृतिदिन. मिर्झा गालिब : (१५ फेब्रुवारी १८६९). हे प्रख्यात उर्दू कवी. संपूर्ण नाव मिर्झा असदुल्ला खान व टोपणनाव ‘गालिब’. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे झाला. त्यांचे वडील मिर्झा अब्दुल्ला बेग खान हे लष्करात अधिकारी होते. गालिब पाच वर्षांचे असतानाच ते एका लढाईत मारले गेले. त्यानंतर त्यांचा सांभाळ आग्र्यास त्यांच्या आजोबांनी केला. तेथे ते ऐषोरामात वाढले. तत्कालीन पद्धतीनुसार त्यांचे अरबी व फार्सीचे शिक्षण झाले. ते मुळातच बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा उमराव बेगमशी विवाह झाला आणि सतराव्या वर्षी (१८१४) ते दिल्लीस स्थायिक झाले. १८२८ च्या सुमारास ते वर्षासनाच्या खटल्यानिमित्त कोलकात्यास गेले. तेथे ते दोन वर्षे होते. तथापि ह्या खटल्याचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेला आणि ते दिल्लीस परतले.

ह्या खटल्यात त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरून त्यांना फार मनस्ताप झाला व कर्जही बरेच झाले. तथापि त्यांनी वर्षासनासाठी आपले प्रयत्न मोठ्या चिकाटीने चालूच ठेवले. त्यांचे बहुतांश आयुष्य दिल्लीतच व्यतीत झाले. मिळणारे तुटपुंजे वर्षासन तसेच अयोध्येच्या नबाबाकडून आणि दिल्ली दरबारातून त्यांना जे काही थोडेफार वेतन मिळे, त्यावरच अतिशय तंगीत ते आपला निर्वाह करू लागले. उत्पन्नाच्या मानाने त्यांचा खर्च बराच होता व त्यांना दारूचेही व्यसन होते. त्यामुळे ते अतिशय कर्जबाजारी बनले. त्यांना जुगाराचाही नाद होता व त्याबाबत त्यांना तुरुंगातही जावे लागले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे त्याच्या काव्यातून आणि पत्रव्यवहारातून दिसते. त्यांना सात मुले झाली. पण ती अल्पवयातच वारली. त्यांचे कौटुंबिक जीवन फारसे सुखी नसावे, असे दिसते. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते दिल्लीतच होते. दस्तंबू ह्या रोजनिशीवजी फार्सी गद्यग्रंथात त्यांनी ह्या उठावाची हकीगत लिहून ठेवली आहे.

- Advertisement -

वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापासूनच तो कविता रचू लागला आणि पंचविसाव्या वर्षापर्यंत त्याने उर्दूत काव्यरचना केली. त्याच्या सुरुवातीच्या रचनेवर फार्सी कवी ‘बेदिल’ याचा प्रभाव होता. बेदिलचे ऋण त्याने आपल्या काव्यात मोकळ्या मनाने मान्यही केले आहे. नंतरच्या त्याच्या रचनेवर मात्र कोणाही कवीचा प्रभाव नसून ती संपूर्णपणे स्वतंत्र आहे. वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून ते त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत मात्र त्याने उर्दूऐवजी फार्सीत रचना केली. त्याचे फार्सीवर विशेष प्रेम होते.

आपली उत्कृष्ट रचना उर्दूऐवजी फार्सीतच आहे, असे त्याने म्हटले आहे तथापि त्याची विशेष ख्याती मात्र उर्दू काव्यामुळेच झाली. १८५० पासून पुढे बहादूरशाह जफर (१८३७-५७) ह्या मोगल बादशहाच्या सांगण्यावरून तो परत उर्दूत रचना करू लागला. ह्या काळातील त्याची उर्दू रचना दर्जेदार व परिपक्क आहे. गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले.

- Advertisement -

त्याच्या समग्र फार्सी कवितांचा कुल्लियात-इ-गालिब (१८४५) हा संग्रह प्रसिद्ध असून त्यात कसीदा, गझल, मस्नवी इ. प्रकारांतील रचनांचा समावेश आहे. त्याच्या उर्दू रचनेचा दीवान-इ-गालिब (१८४१) हा संग्रह इतका गाजला, की गालिबच्या हयातीतच त्याच्या चार आवृत्त्या निघाल्या. फार्सी धर्तीच्या रचनेमुळे यातील त्याची काही रचना दुर्बोध झाली आहे तथापि जी सोपी आहे ती अतिशय कलात्मक व प्रसन्न आहे. आपला आशय तो सखोल अनुभूतीतून व अभिनव पद्धतीने व्यक्त करतो. या दोन काव्यसंग्रहांव्यतिरिक्त त्याचे काही फार्सी व उर्दू गद्यग्रंथही आहेत.
गालिबला दिल्ली दरबारातून ‘नज्मुद्दौला दबीरुल्मुल्क निजामगंज’ हा मानाचा किताब मिळाला होता. हाली, रख्शाँ, जकी, मजरुह, मुन्शी हरगोपाल तुफ्ता, मुन्शी बिहारीलाल मुश्ताक इ. त्याचे प्रमुख अनुयायी होते. हाली हा गालिबचा आद्य चरित्रकार व अनुयायी. त्याने उर्दूत यादगार-इ-गालिब (१८९७) हे गालिबचे आठवणीवजा चरित्र लिहिले असून ते विशेष प्रसिद्ध आहे. गालिब दिल्ली येथे निधन पावले. तेथे त्यांची कबर आहे.

- Advertisement -