घरफिचर्सससून म्हावरे बाजार

ससून म्हावरे बाजार

Subscribe

मुंबई ही महानगरी म्हणजे जागतिक व्यापाराचे केंद्र. अर्थात बाजारपेठ. याच मुंबईत असंख्य छोटे मोठे बाजार दडलेले आहेत. काही काळाच्या ओघात लुप्त झाले तर काही अंतिम घटका मोजत आहेत. त्याच बरोबर काही बाजार काळानुरूप बदलल्यामुळे त्यांना कॉर्पोरेट लूक आलेले आहे. मुंबईत असाही बाजार अस्तित्व आहे! याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अशा मुंबईतील छोट्या मोठ्या बाजारांचा वेध, या मालिकेतून घेण्यात येणार आहे.

जेथून मुंबईची सुरुवात होते अशा कुलाबामध्ये पहिलाच बाजार लागतो तो ससून डॉकचा मासे बाजार! मुंबईतील प्रथम नागरिक अर्थात कोळी समाजातील लोक त्याला ‘ससून म्हावरे बाजार’ असं संबोधतात. मुंबईकरांची माशांची निम्मी गरज या बाजारातून पुरवण्यात येते. मुंबईची निर्मिती झाली तेव्हापासून हा म्हावरे बाजार अस्तित्वात आहे. पण त्याला तेव्हा ससून हे नाव नव्हते. पोर्तुगिजांनी मुंबई हे बेट पहिल्यांदा ताब्यात घेतले. त्यावेळी सध्या ससून डॉक जिथे अस्तित्वात आहे त्या किनार्‍यावर स्थानिक कोळ्यांच्या बोटी मुंबईला लागत होत्या. त्या बोटीतून उरण, अलिबाग, रेवस येथून धान्य, भाजीपाला आणि मासे मुंंबईत येत असत. पोर्तुगिजांनी त्या किनार्‍यावर प्रथम धक्क्यासारखा एक कठडा उभारला. त्यांच्या बोटी मुंबई किनार्‍यावर लागाव्यात म्हणून ही सोय करण्यात आली होती. त्यावेळच्या उपलब्ध माहितीनुसार, या किनार्‍यावरच मासे, धान्य आणि भाजीपाल्याचा बाजार भरायचा.

कधी झाली निर्मिती 

ससून डॉकची प्रथम निर्मिती अर्थातच इंग्रजांच्या काळात झाली. हा डॉक १८७५ साली बँकिंग आणि व्यापारी कंपनी डेव्हीड ससूनने बांधला. त्या कंपनीचा मालक हा अल्बर्ट अब्दुल्लाह डेव्हिड ससून हे बगदादी ज्यू होते. मुंबईतील ज्यु कम्युनिटीचे ते नेते होते. डेव्हिड ससून यांची कुलाबा परिसरात सिल्क आणि कॉटनची गिरणी होती. त्यासाठी लागणारा कच्चा माल आणण्यासाठी आणि मिलमध्ये तयार होणारा माल परदेशात पाठवण्याच्या हेतूने तत्कालिन इंग्रज सरकारकडून परवानगी घेऊन डेव्हीड ससून यांनी हा डॉक अर्थात गोदी उभारली. त्यावेळी प्रामुख्याने मुंबईत येणार्‍या बोटी या गोदीत थांबत. तसेच मच्छिमारांच्या बोटींनाही तेथे आसरा देण्यात येत होता. मात्र कालांतराने इंग्रजांना ही गोदी लहान वाटू लागली. त्यामुळे माझगाव गोदीची निर्मिती करून ससून गोदी ही लहान बोटींसाठी राखीव ठेवण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ससून डॉकचा वापर हा स्थानिक मच्छिमारांकडून येणार्‍या माशांच्या विक्रीसाठी होऊ लागला. ससून डॉकमध्ये आता ज्या ठिकाणी मच्छिबाजार भरतो तो साधारणत: १९४८ सालापासून नावारुपाला येऊ लागला. त्यावेळी मुंबईत येणारे मासे हे ‘भाऊचा धक्का’ आणि ‘ससून डॉक’मधून यायचे. त्यातही भाऊचा धक्का हा प्रवासी बोटींसाठी वापरला जात असल्यामुळे ससून डॉक हा फक्तआणि फक्त मासेमारी बोटींसाठीच राखीव ठेवण्यात आला. तेव्हापासून खर्‍या अर्थाने मुंबईतील ससून डॉक नावारुपाला आला. येथून सध्या निम्म्या मुंबईला पुरतील इतक्या माशांची दररोज खरेदी-विक्री होत असते.

- Advertisement -

प्रवास कसा कराल  

ससून डॉकला जाण्यासाठी चर्चगेट अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन हे ट्रेनचे पर्याय आहेत. चर्चगेटला उतरल्यास १२३ क्रमांकाची बस थेट ससून डॉकला घेऊन जाते. मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनसहून १, ९, ५ अशा आरसी चर्चला जाणार्‍या सर्व बसेस ससून डॉकला जातात. बसमधून जाताना ससून डॉकची १८७५ साली बांधलेली ऐतिहासिक कमान दिसते. बस्स, ती दिसली की, आले ससून डॉक! तिथं पोचल्यावर ससून डॉक कुठे आहे हे विचारण्याची गरज भासत नाही. कारण माशांचा वास आला की, आपोआप कुठे जायचे हे कळते. तरीही बसला उतरून समुद्राच्या दिशेने चालत गेले की ससून डॉकचा म्हावरे बाजार दृष्टीस पडतो. ससून डॉकच्या म्हावरे बाजारात दिवसाला साधारणत: १२२ लहान-मोठ्या बोटी दररोज समुद्रातून मासे घेऊन येतात. या बोटी साधारणत: मध्यरात्री २ ते ३.३० वाजता डॉकमध्ये येतात. पण त्यावेळी बाजार मात्र सुरू होत नाही. या बोटीवरील मासे काढून ते किनार्‍यावर ठेवण्याचे काम सुरू होते. मुंबईत पहिली ट्रेन सुरू झाली म्हणजे साधारणत: साडेचार वाजता शहरातील कोळणी आणि इतर किरकोळ विक्रेते ससून डॉकच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतात. तोपर्यंत बोटीवरचा माल सगळा किनार्‍यावर ओतलेला असतो. हे मासे किनार्‍यावर ओतताना त्यातून उसळी घेताना एखादा मासा दिसला की, ते किती ताजे आहेत, याची कल्पना येते आणि पोटात माशांची आग पडते! किरकोळ विक्रेते साधारणत: पाच वाजता बाजारात येतात आणि मग सुरु होते ती माशांची बोली.

टोपलीच्या भावात बोली

बोटीतून आणलेले मासे टोपल्यात, बकेटमध्ये भरून ठेवले जातात. सुरमई, पापलेट, घोळ असे मोठे मासे किलोवर विकण्यासाठी तेथे मोठे वजन काटेही असतात. कोळणी, किरकोळ विक्रेते आले की मग बोली सुरु होते. लहान पापलेट, हलवा, कोळंबी, मांदेली, झिंगे, डोमी, रावस, राणा असे लहान मासे टोपलीत घालून त्या टोपलीची बोली केली जाते. ते मासे मोजत बसायला वेळ दिला जात नाही. फक्त टोपली बघायची आणि त्यावरून त्यात किती मासे आहेत, याचा अंदाज बांधून बोली करायची. त्यासाठी पट्टीचेच लागतात. कधीतरी बाजार गेलेल्यांचे काम नाही. ते हमखास कमी मासे पदरात पाडून निघतात. एकदा का बोली निश्चित झाली की ते मासे त्या किरकोळ विक्रेत्याचे. आवक जास्त असेल तर कवडीमोल भावातही मिळतात; पण आवक कमी असेल तर या टोपलीला सोन्याचा भाव येतो. मोठे मासे जसे सुरमई, पापलेट, हलवा, रावस, कुप, मोरी, पाकट आदी मासे किलोच्या भावात मिळतात. पण एक-दोन किलो बोलीमार्फत मिळत नाहीत. बोलीत सहभागी व्हायचे असेल तर कमीतकमी दहा किलो मासे खरेदी करावे लागतात. या माशांसोबतच शिवल्या, कालवं, समुद्र खेकडे, माकुल असे सी-फूडही तेथे टोपलीच्या भावात बोली लावून मिळतात.

- Advertisement -

जाताना हे नक्की लक्षात ठेवा 

बोलीतून मासे खरेदी केले की काही कोळणी ते मासे ट्रक, टेम्पो, टॅक्सीमध्ये घालून मुंबईतील स्थानिक बाजारात विकण्यासाठी जातात. तर काही कोळणी ससूनच्या डॉकमध्येच विकायला बसतात. सर्वसाधारण मुंबईकरांसाठी तो बाजार नाही. कारण घरी खाण्यासाठी कोणी टोपलीभर मासे विकत घेत नाही. तेथेच किरकोळ विक्री करणार्‍या कोळणी मात्र स्थानिक बाजारभावापेक्षा काहीशा कमी दराने तेथे मासे विक्री करतात. त्यांच्याकडे मोठ्या माशांपासून ते सी-फूडपर्यंत सर्व काही मिळते. मात्र ते मासे कापून देत नाहीत. पण अडचण काहीच नाही. कारण ससून डॉकच्या गेटवरच काही महिला बसलेल्या असतात. त्या मोठ्या माशांचे खवले काढून त्याचे पीस करून देतात. अर्थात त्यासाठी काही पैसे मोजावे लागतात.ससून डॉकमधील म्हावरे बाजार हा मुंबईतील सर्वात जुना मासे बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराने निदान तो एकदा तरी बघायला हवा. मात्र त्यासाठी सकाळी कमीतकमी सहा वाजता तेथे पोहचायला हवे. हल्ली दुपारच्या वेळीही बाजार भरतो. पण ते अर्थातच बोटीवर अवलंबून असते. दुपारी बोटी आल्या तरच बाजार पहायला मिळतो. ससूनच्या म्हावरे बाजारात जाण्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. तुम्हाला माशांचा वास, अंगावर पडणारे माशांचे पाणी, माशांच्या पाण्याचा चिखल आवडत नसेल तर अजिबात या बाजारात जाऊ नका. कितीही सेंट मारला किंवा नाकाला रुमाल धरलात तरी तुम्ही माशांचा वास रोखू शकत नाही! पुन्हा नाकावर रुमाल ठेऊन गेलात तर ते येथील कोळणींना सहन होत नाही. त्या तुम्हाला शेलक्या शब्दांत नक्कीच सुनावतात! येथे मोठ्या प्रमाणात माशांची ने-आण होत असल्यामुळे स्वत:ला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अंगावर माशांचे पाणी पडतेच. तसेच कोळणींच्या शिव्या, ‘बाजू हो’, म्हणून अंगावर खेकसणे हे सर्रास सुरू असते. मात्र या सगळ्याची तुम्हाला सवय असेल किंवा वावडं नसेल तर तुम्ही या बाजारात बिनधास्त दोन-तीन तास निश्चित काढू शकता.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -