घरफिचर्सआठवणी वसतिगृहाच्या....

आठवणी वसतिगृहाच्या….

Subscribe

दहावीच्या वर्गात आम्ही एकूण पाच जण होतो. वसतिगृहात राहणारे अगदी त्या पाच पांडवांप्रमाणे ज्ञानेश्वर,सतीश, पांडुरंग ,किरण, आणि मी... आमच्यात बर्‍याचदा अनेक विषयांवरून मतभेद होत होते, पण इतक्या वर्षांनंतर आजही आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत. आजही चांगले मित्र आहोत. त्या तीन वर्षात मला लाभलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मी बरीच प्रगती केली.

गावात ७ वीपर्यंत शिक्षण घेतलंआणि त्यानंतर वडिलांनी माझी रवानगी गावापासून अगदी १२ किलोमीटर अंतरावर असणार्‍या वसतिगृहात केली. आईवडील, आजी आणि भावंड यांच्यापासून लांब जाण्याची ती पहिलीच वेळ होती. वसतिगृहात वेगवेगळ्या गावाहून आलेल्या त्या ५० मुलांमध्ये मी हळूहळू रमायला लागलो. पण घरच्या आठवणींनी हुंदका आल्याशिवाय राहवत नव्हतं. ‘सर्पशाळा’ अशी नवी ओळख असलेली मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी.
ही माझी शाळा. ५ च्या वर्गापासून अगदी १२ पर्यंत शेकडो मुलं याच शाळेत घडली. वसतिगृह म्हणजे काय हे माहीत नसताना मी त्यामध्ये प्रवेश केला होता. अनेक नियम पाळत त्या वसतिगृहात राहण्याची मला हळूहळू सवय व्हायला लागली. सगळ्या जुन्या मित्रांना सोडून मी नव्या मित्रांच्या दुनियेत हळूहळू रमत होतो. याच शाळेतून माझ्या वक्तृत्व स्पर्धांच्या न संपणार्‍या प्रवासाची सुरुवात झाली.

या शाळेने मला भरभरून दिलंय. प्रेम,हुशारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बाहेर राहण्याची ताकद. घर सोडून जास्त दिवस बाहेर न राहणार्‍या माझ्यासारख्या मुलाच्या मनात एक वेगळा आत्मविश्वास दिला, ज्याचा फायदा मला आजही होतोय. ‘सर्पशाळा’ अशी ओळख असलेल्या या शाळेत आम्हाला फक्त शिक्षणच नाही तर त्याहीपलीकडे जाऊन दैनंदिन जीवनात ज्या गोष्टींची गरज असते त्या सगळ्या गोष्टी दिल्या. फेब्रुवारी महिना संपला की लगेच उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात व्हायची. मग आमचा वसतिगृहात राहणार्‍या सगळ्या मुलांचा ताफा ढोलगरवाडी गावाबाहेर असणार्‍या नदीकडे निघायचा. अशी पहिली शाळा आमच्या तालुक्यात होती जी शिक्षणाबरोबरच पोहणे,सापांची ओळख करून देऊन त्यांना हाताळण्याची हिंमत मिळवून देत होती. पण या सगळ्या गोष्टी जरी आनंद देणार्‍या असल्या तरी घरच्या माणसांची आठवण कोणाला येत नाही? बर्‍याचदा वाटायचं की आठवड्यातून एकदा तरी घरी जावं. कारण घर आणि वसतिगृह यांच्यात असणारं अवघ १२ किलोमीटरचं अंतर सारखं खुणावत होतं की, हाच तो रस्ता आहे जो तुझ्या घरापर्यंत जातो. पण बर्‍याच वेळा शिक्षकांचा नकार मिळायचा. मग आठवणींचा हुंदका कधी आवरतच नसायचा. शाळा सुटली की, रिकामी झालेल्या वर्गात बसून हमसून रडण्याचे प्रसंगसुद्धा आयुष्यात येऊन गेलेत.

- Advertisement -

महिन्यातून कधीतरी गावी जायचो. प्रवास एकाच गाडीचा ठरलेला असायचा. माझ्या गावातल्या सगळ्या दूध डेअर्‍यामधील दूध याच रस्त्याने गाडी घेऊन जायची. सकाळ आणि संध्याकाळी ही गाडी नित्याचीच. त्यामुळे याच गाडीतून गावाकडे येणे जाणे व्हायचे. गावाकडे गेल्यावर मोठ्या तोर्‍यात फिरण वागणं व्हायचं, पण पुन्हा वसतिगृहाकडे येण्याचा दिवस उजाडला की, मग अंतःकरण जड झाल्यासारखं वाटायचं. पण बघता बघता वेळ निघून जात होती आणि या वसतिगृहात मी तीन वर्षे घालवली.दहावीच्या वर्गात आम्ही एकूण पाच जण होतो. वसतिगृहात राहणारे अगदी त्या पाच पांडवांप्रमाणे ज्ञानेश्वर,सतीश, पांडुरंग ,किरण, आणि मी… आमच्यात बर्‍याचदा अनेक विषयांवरून मतभेद होत होते, पण इतक्या वर्षांनंतर आजही आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत. आजही चांगले मित्र आहोत. त्या तीन वर्षात मला लाभलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मी बरीच प्रगती केली. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाने मजल मारण्याची ताकद याच शाळेने मिळवून दिली. आज त्या आठवणींना ६ वर्षे लोटून गेली आहेत. वेळ मिळाला तर नक्की जातो त्या वसतिगृहाकडे. वसतिगृह आता बंद झालं आहे, पण अनेक मुलांच्या भूतकाळाची आठवण देणार्‍या त्या वास्तूच्या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -