घरफिचर्सजाहिरातबाजीसाठी चित्रपटांचा वाद !

जाहिरातबाजीसाठी चित्रपटांचा वाद !

Subscribe

सध्या सिनेमांवर स्वयंघोषित सेन्सॉरशिप लावली जाते आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत ही काही उदाहरणं सर्वांना ज्ञात आहे. ऐतिहासिक सिनेमे म्हणून हे किती उत्तम होते हा चर्चेचा विषय आहे. पण मूळप्रश्न आहे तो या सिनेमांवरून जसे वाद निर्माण केले गेले त्याचा, सिनेमांना प्रसिद्धी मिळवून द्यायची असेल तर आधी दिग्दर्शक, अभिनेते विविध कार्यक्रमात जायचे. लोकांमध्ये जाऊन त्याची प्रसिद्धी करायचे, मात्र आता काळ बदलला आहे आता ते भन्साळी होतात. स्वतः वाद निर्माण होतील अशी विधानं प्रमोशन दरम्यान करतात अथवा करवून आणतात.

गावात एखादी घटना घडली की एक माणूस जो त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आहे, असा माणूस लगेच त्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी बैठक बोलवायचा. या बैठकीत तोच मुख्य सूत्रधार असल्यानं जो तो सांगेल ते सर्व योग्य, अशाच विचाराने मग लोकं भोवताली गोळा होऊन ते ऐकायची. सरपंचाची मुलगी 2 दिवसापासून घरी आली नाही, इतकी साधी घटना घडली होती, पण या महाशयांनी गावाला पार त्या मुलीचं पाटलाच्या पोरासोबत लचांड होतं म्हणून ते पळून गेलेत, असं काही काही सांगितलं. बैठकीतल्या कोणालाच खरं काय? हे माहिती नसल्यानं मग ते महाशय सांगतील तेच खरं समजून त्यांनी विचार करायला सुरू केला. पण एवढं सगळं ज्या सरपंचासोबत झालं होतं, त्याला एका शब्दाने विचारण्याची तसदीसुद्धा कुणी घेतली नाही. आता त्या महाशयांनी रंगून सांगितलेली कथा खरी समजून लोकांनी सरपंचाला दोष देणं सुरू केलं. पण प्रसिद्धी होत होती त्या महाशयाची, आता या प्रकरणात खरा दोषी कोण ? ज्याने कथा सांगितली तो, ज्यांनी ऐकली ते, का ज्याच्यासोबत ही घटना घडली तो सरपंच ? वर्तमानात याचा संबंध मी लावतोय ऐतिहासिक सिनेमांबद्दल आणि त्यांना मिळणार्‍या प्रतिसादाबद्दल.

आजचा वर्तमान म्हणजे उद्याचा इतिहास इतकं साधं हे गणित आहे. उद्या मी जर माझं अनुभवकथन लिहीत असेन तर ते भविष्यात यावर सिनेमा येणार हा विचार करून लिहिलं का ? म्हणजेच काय तर इतिहासकारांनी त्यांच्यापरीने जसा योग्य वाटेल तसा इतिहास लिहिला. तर हा ज्याचा त्याचा इतिहास असेल तर मग त्या इतिहासाच्या पुस्तकांवर येणारा सिनेमा हा ज्याचा त्याचा सिनेमा का नको…? हल्ली आपल्या देशात सगळ्यात मोठं दुःखणं झालंय ते म्हणजे भावनांच..प्रचंड प्रतिक्रियावादी बनलेला हा भारतीय समाज मग कलात्मक स्वातंत्र्य नाकारतो. आता कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करणं हे चुकीचंच आहे .. पण इतिहास समजावून घ्यायला आपल्याला सिनेमांची गरज केव्हापासून भासायला लागली? बॉलीवुड किंवा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सिनेमा प्रदर्शित होतो तो इतिहास समजावून सांगण्यासाठी नव्हे, तर पैसा कमावण्यासाठी…म्हणून बॉलिवुडचा सिनेमा म्हणजे इतिहास सांगणार्‍या डॉक्युमेंट्रीज नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

इतिहास मांडण्यासाठी इतिहासकारांनी आपलं आयुष्य झिजवलंय,अनेक पुस्तकं लिहिली.ती माध्यम शिल्लक असताना सिनेमांद्वारे इतिहास समजून घेण्याचा अट्टाहास आपण का करावा ? ऐतिहासिक सिनेमा म्हणजे वाद हे समीकरण सध्या अधिकच जोर धरतय, आता याआधी ते अस्तित्वात नव्हत असं काही नाही. मास्टर निस्सार हा मुस्लीम कलाकार आहे म्हणून त्याने बिल्व मंगल उर्फ सूरदास (1932) मध्ये काम करू नये, अशा प्रकारची टीका त्याकाळात सुध्दा झालीच होती.. सोहराव मोदींनी जेव्हा पुकार (1939) ची निर्मिती केली, तेव्हासुद्धा जहांगीर बादशहाचे योग्य चरित्र न दाखवल्याची टीका त्यांच्यावर झालीच होती.

सध्या सिनेमांवर स्वयंघोषित सेन्सॉरशिप लावली जाते आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, पानिपत ही काही उदाहरणं सर्वांना ज्ञात आहे. ऐतिहासिक सिनेमे म्हणून हे किती उत्तम होते हा चर्चेचा विषय आहे. पण मूळप्रश्न आहे तो या सिनेमांवरून जसे वाद निर्माण केले गेले त्याचा, सिनेमांना प्रसिद्धी मिळवून द्यायची असेल तर आधी दिग्दर्शक, अभिनेते विविध कार्यक्रमात जायचे. लोकांमध्ये जाऊन त्याची प्रसिद्धी करायचे, मात्र आता काळ बदलला आहे आता ते भन्साळी होतात (स्वतः वाद निर्माण होतील अशी विधानं प्रमोशन दरम्यान करतात अथवा करवून आणतात).

- Advertisement -

सिनेमा प्रोमोट करण्याचा हा ‘भन्साळी’ फॉर्म्युला जमला की झालं. आता इथे मुद्दा आहे तो सामान्य जनतेचा याला बळी पडण्याचा, सिनेमासंबधित कुठलाही वाद झाला तर त्याच्याकडे जाणारी गर्दी सुद्धा वाढते हे सत्य आहे. सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी एखादा डायलॉग किंवा दृश्य लोकांसमोर असं सादर करायचं की ज्याने त्यांचं लक्ष वेधलं जाईल. बस्स, एवढं केलं की नंतर फक्त मजा बघत राहायची..ती लोकं पुतळे जाळतील, बस फोडतील आपण फक्त बघत राहायचं. ऐतिहासिक सिनेमातून वाद निर्माण केले जातात आणि त्या वादांचा आपल्या राजकीय, वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करून घेतला जातो हे सत्य आहे. मग अशावेळी आपण कुणाच्या पाठीशी उभे राहणार ? मान्य आहे, ऐतिहासिक सिनेमांत सगळं खरं नसतं. पण मग 100 टक्के खरा असा कोणता इतिहास आपल्याकडे आहे ? म्हणून याबाबतीत ज्यांचं नुकसान होत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हेही मान्य आहे की, काही वाद स्वतः निर्माते, दिग्दर्शक उभे करतात, पण याचा फटका सर्वांनाच का बसावा ? अशा वादातून एक समाज म्हणून सर्वाधिक नुकसान होतं ते आपलचं. म्हणून या सर्वातून सामान्य रसिकांनी शक्य तितकं दूर राहायला हवं आणि तो वाद निर्माण होऊ न देणं हेसुद्धा दिग्दर्शकाचं काम आहे.

ऐतिहासिक सिनेमे बनवणार्‍या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनीसुद्धा थोडा विचार केला तर हे सगळं थांबू शकतं. माध्यमांनी लोकांना काय आवडतं यापेक्षा लोकांना काय दाखवलं गेलं पाहिजे यावर भर द्यायला हवा हे अपेक्षित आहे. सिनेमा हे मनोरंजनाच माध्यम असलं तरी त्यालाही हा नियम लागू आहे. काही दिवसातच ‘तान्हाजी’ सिनेमा येतोय, सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तो कसा हे कळेलच, पण त्याच्या प्रदर्शनापूर्वीच जो वाद निर्माण केला जातोय त्याला जबाबदार काही अंशी स्वतः चित्रपट निर्माते आहेत. मागील अनेक ऐतिहासिक सिनेमांना विरोधाचे कारण माहिती असतानासुद्धा पुन्हा पुन्हा तीच चूक निर्मात्यांनी करणं अपेक्षित नाही. प्रत्येक ऐतिहासिक सिनेमांत राजाला नाचवलं, राणीला नाचवलं तर लोकांना आवडतं असं काही नाही. मग ऐतिहासिक सिनेमांत हा हट्ट का धरला जातो ? ऐतिहासिक सिनेमांची आवड असणारा मोठा प्रेक्षक वर्ग भारतात आहे, इतिहासात घडलेल्या घटनांच चित्रण पाहण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे. अशावेळी त्याचा भ्रमनिरास होऊ द्यायचा नसेल तर निर्मात्यांनी या बाबींचा नक्कीच विचार केला पाहिजे.

सिनेमा इतिहास सांगणारा नसला तरी त्याचं सादरीकरण असं व्हायला हवं की प्रेक्षकांना त्या इतिहासाप्रती उत्कंठा निर्माण व्हायला हवी, त्यांनी त्या इतिहासाबद्दल वाचायला हवं. सिनेमा हे साक्षर आणि निरक्षर दोघांसाठी प्रभावी माध्यम आहे, याद्वारे इतिहास समजून घेता येत नसला तरी इतिहासाप्रती आणि इतिहासातील घटनांविषयी नक्कीच आवड निर्माण करता येऊ शकते.

ऐतिहासिक सिनेमांच्या बाबतीत अधिक प्रतिक्रियावादी न बनता त्यांचा आस्वाद घेतला तर योग्य राहील. सिनेमातील कमतरतांबद्दल आणि जिथं इतिहासाची मोडतोड होत असेल तिथं बोलायलाच हवं, पण ते सर्व संविधानिक मार्गांनी. येणार्‍या काळात तरी आपण यापासून धडा घेऊ आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शकसुद्धा धडा घेतील, अशी अपेक्षा आहे.

-अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -