घरताज्या घडामोडीमुंबई-गोवा महामार्ग... तारीख पे तारीख!

मुंबई-गोवा महामार्ग… तारीख पे तारीख!

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरू असून काम पूर्ण करण्याच्या तारखा दिल्या जात आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणतात, हा महामार्ग मे २०२३ मध्ये पूर्ण होईल, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्याप्रमाणे हा मार्ग २०२४ मध्ये पूर्णत्वास जाईल. प्रवासी आणि वाहनचालक यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा हा राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण होवो. गडकरी संसदेत ज्या हायड्रोजन कारमधून आले ती या महामार्गावरून लवकरच सुसाट धावावी, असेच सगळ्यांना वाटत आहे.

पनवेल तालुक्यातील पळस्पे येथून सुरू होणारा हा महामार्ग पूर्वी ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७’ या नावाने ओळखला जात होता. अलिकडे त्याचा क्रमांक ६६ झाला आहे. क्रमांकात ‘प्रमोशन’ झाले असले तरी या मार्गाची दुरवस्था संपण्याचे काही नाव नाही. या मार्गाला खरे तर खूप महत्व आहे. कारण हा मार्ग कोकण, गोव्यापर्यंतच मर्यादित नाही तर तो पुढे कर्नाटक, केरळातून थेट कन्याकुमारीपर्यंत पोहचतो. यातील बराचसा मार्ग समुद्र किनारपट्टीवरून जाणारा आहे. कोकण ते कन्याकुमारीपर्यंत पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात बहरला असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी कारखानदारीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. स्वाभाविक या मार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच व्हायला पाहिजे होते. सुुरुवातीला हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता. नंतर त्यात फेरफार झाला तेव्हा त्याचे डांबरीकरण झाले. दुचाकीपासून मल्टी अ‍ॅक्सल वाहनापर्यंत अव्याहत वाहतूक सुरू असते. एका सर्वेक्षणानुसार या मार्गावरून मिनिटाला ५ किंवा त्यापेक्षा अधिक वाहने धावत असतात.

कोकणातील मार्ग बराचसा वळणावळणाचा, अनेक पूल असलेला आहे. कालौघात यातील अनेक वळणे काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रुंदी जैसे थे राहिल्याने एकावेळी दोनच वाहने ये-जा करीत असत. यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे राहिले आहे. एका माहितीनुसार गेल्या २१ वर्षांत या मार्गावर २४४२ जणांचा बळी गेला आहे. हजारो जायबंदी झाले आहेत. याशिवाय या मार्गात कुठे अपघात झाला किंवा वाहन ब्रेकडाऊन झाले तर वाहतूक कोंडी होत असे. यावर उपाय म्हणून महामार्गाची रुंदी वाढविण्याची मागणी वारंवार केली गेली होती. अखेर याला सन २०११ मध्ये मुहूर्त मिळाला. सुरुवातीला देशातील मोठे ठेकेदार या कामात उतरले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने पळस्पे ते इंदापूर या पहिल्या ८० किलोमीटरच्या टप्प्यातील काम ३-४ वर्षांत पूर्ण होईल, असा अंदाज बांधला गेला. कमीत कमी मनुष्यबळ वापरून चाललेले काम पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे वेळेत किंबहुना वेळेपूर्वीच महामार्गाचे काम पूर्ण होण्याचा विश्वास वाटू लागला. परंतु रस्ता रुंदीकरणासाठी लागणारी वाढीव जागा, वन खात्याचा अडसर आणि ते कमी म्हणून की काय ठेकेदार बदल अशा एक ना अनेक कारणांमुळे कामाला उशीर होत गेला तो गेलाच! नंतर तारखांचा सिलसिला सुरू झाला.

- Advertisement -

पळस्पे ते झारापपर्यंतच्या या मार्गाचे काम दोन्ही बाजूंनी सुरू झाले. सिंधुदुर्गात या कामाने बाजी मारली. परंतु रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात कामाचे अक्षरशः तीन तेरा वाजले. त्यामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना कमालीचा मनःस्ताप आजही होत आहे. हा मार्ग कधी नसेल इतका सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. चंद्रावर पोहचणे अवघड राहिलेले नाही, मात्र या मार्गावरून मुंबईहून सिंधुदुर्गापर्यंत प्रवास अवघड आहे, अशी टीका झाली आणि अजूनही होत आहे. आजमितीला या महामार्गाचे अर्धे काम (सरकारी माहितीनुसार ६७ टक्के, ज्यावर अनेकांचा विश्वास नाही) पूर्ण झाले असले तरी रखडलेल्या मार्गावरून प्रवास करणे जोखमीचे वाटत आहे. सन २०२४ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग गुळगुळीत, चकाचक झालेले असतील असे काही दिवसांपूर्वी गडकरी म्हणाले. जे बोललो ते करणारच, अशी गडकरींची ख्याती असल्याने सर्व रस्ते दर्जेदार होतील यात वाद नाही. पण त्यात आमचा मुंबई-गोवा महामार्गही असू देत, अशी मिश्कील टिप्पणी कोकणातील अनेकांनी यावर केली.

मुंबई-गोवा महामार्गाला महत्व येते ते गणेशोत्सव काळात! कारण त्या दरम्यान नेहमीपेक्षा म्हणजे ४ ते ५ पटींनी वाहनांची संख्या वाढते. महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी गणेशोत्सवातील कोकणचा प्रवास नकोसा वाटायचा. कर्नाळा खिंड, खारपाडा, पेण, वडखळ, नागोठणे ते वाकण, कोलाड, माणगाव, पोलादपूर, खेड इथपर्यंतच्या टापूत वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे जिकरीचे ठरायचे. त्यातच मुसळधार पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांवर केलेली मलमपट्टी उखडून गेलेली असल्याने वाहनांचा वेग कमालीचा मंदावायचा. पुढे रस्ता सुस्थितीत असला की वाहनांची पुढे जाण्याची जीवघेणी स्पर्धा लागायची. त्यातून अपघात व्हायचे. गेले अनेक वर्षे हा सिलसिला सुरू होता. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत टीकेचे मोहोळ उठू लागल्याने मंत्री रस्त्यावर उतरू लागले. त्यानंतर खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉकचा उतारा आला. आज या महामार्गावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक जैसे थे असून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल तेव्हाच ते हटवले जाणार आहेत. पेव्हर ब्लॉकवरून वाहन जात असताना अक्षरशः थरथरत असते. महामार्गावर पेव्हर ब्लॉक असणे हा प्रकार बहुधा येथेच असू शकतो.

- Advertisement -

एक तप पूर्ण व्हायला आले तरी चौपदरीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने कमालीची नाराजी आहे. अनेक ठिकाणी दर्जाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले आहे. ज्यावेळी या मार्गाचे काम सुरू झाले तेव्हा भरावासाठी वापरण्यात येणारी माती हलक्या प्रतीची असल्याची ओरड काही राजकीय मंडळींनी केली. परंतु पुढे कोणती तरी जादू घडली आणि याच मातीचा दर्जा ‘उच्च’ झाला. ही मंडळी गप्प बसली. परंतु आजही बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, कामाचा दर्जा बर्‍याच ठिकाणी तकलादू आहे. त्यामुळे जागोजागचे भराव किती वर्षे टिकतील हे कुणीच सांगू शकत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोकणात होतो. मुसळधार पाऊस, भूस्खलन, दरडी कोसळणे अशा एक ना अनेक कारणांमुळे रस्त्याचे मातेरे होत असते. यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. दुर्दैवाने याबाबत कधीच गांभीर्य दाखविण्यात आलेले नाही. मुसळधार पावसामुळे तयार करण्यात आलेला नवीन रस्ता अनेक ठिकाणी खचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात, ज्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

भारतातील हा एकमेव मार्ग असावा की ज्याची चर्चा विधिमंडळात झाली आणि काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. या रस्त्याचे काम पाहणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने न्यायालयात वेळेत काम पूर्ण करण्याचा शब्दही दिला. मात्र अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेला हा मार्ग दिलेल्या वेळेत पूर्ण झालेला नाही. वन खाते हे शासनाचाच एक भाग असले तरी त्यांच्या हद्दीतून रस्ता जाण्यासाठी परवानगी देताना बराच वेळ लागला आहे. अनेक ठिकाणी शहर किंवा गावाबाहेरून रस्ता गेला असला तरी काम पूर्ण झालेले नाही. सर्व्हिस रोड दर्जेदार असणे गरजेचे असताना त्यातील दर्जा तर सोडाच, ते शोधावे लागतात. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याने २०२४ चा वायदा तरी पूर्ण होईल का, याबाबत साशंकता आहे. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले तेथे दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांची फसगत होते. रात्रीच्या वेळी वाहने भरकटतात, अशा तक्रारी आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जाबाबत आम आदमी पार्टीने कोर्टाकडे शंका उपस्थित केल्यानंतर कोर्ट कमिशनरने अलिकडे अनेक ठिकाणी पाहणी केली. कामाच्या दर्जाबाबत कोर्ट कमिशनरनेही नाराजी व्यक्त केल्याने महामार्ग प्राधिकरण अडचणीत आले आहे. ज्या ठिकाणी कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय तेथील पाहणी तज्ज्ञांमार्फत केली गेली आणि खरोखरच तेथे दर्जाहीन काम असेल तर ते पुन्हा करावे लागेल. तसे झाले तर गडकरी आणि चव्हाण यांना काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक तारीख द्यावी लागेल. मार्गावर अनेक ठिकाणी टोल नाके सज्ज झाले असले तरी काम रेंगाळले असल्याने तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्रातील ४८२ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होत नाही तोवर टोल वसुली करू नये ही मागणी आहे. त्यावर गडकरी कोणता निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे. याशिवाय काम सुरू होताना अनेक जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आलेली आहे. त्या बदल्यात नवीन झाडे किती आणि कुठे लावण्यात आली, याचा हिशोब पर्यावरणप्रेमी प्राधिकरणाकडे मागत आहेत. मोठे झाड एका जागेवरून काढून दुसर्‍या जागी लावण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असताना इथे झाडांचे अस्तित्वच नष्ट करण्यात आल्याने नाराजी असणे स्वाभाविक आहे.

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या अनेकदा घोषणा झाल्या. मात्र नियोजित ‘कॅलिफोर्निया’त जाण्याचा मार्ग किमान सुस्थितीत असावा असे कधीच कुणाला वाटले नाही. कोकणने महाराष्ट्राला तीन मुख्यमंत्री दिले. बॅ. अ. र. अंतुले, मनोहर जोशी आणि नारायण राणे. यांची कामाची पद्धत वेगवेगळी राहिली. बॅ. अंतुले यांनी सागरी महामार्गाला चालना दिली. ते मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा एकदा मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र दुर्दैवाने वापरात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत कुणीही फारशी आस्था दाखविली नाही. नितीन गडकरी यांच्यामुळे हा मार्ग तयार होतोय ही समाधानाची बाब आहे. या मार्गाला अनेक महत्वाचे राज्य महामार्ग जोडले गेले आहेत. पर्यटनाबरोबर उद्योग व्यवसायही कोकणात फोफावला आहे. विकासाचा मार्ग रस्त्यावरून जात असतो असे म्हटले जात असले तरी दर्जेदार रस्त्यांचे जाळे होण्याकडे दुर्लक्ष झाले हे कटू वास्तव नाकारता येत नाही.

महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधी अलिकडे वारंवार गडकरी यांना भेटत आहेत. परंतु हे काम रेंगाळणे कुणाला शोभा देणारे नाही. नितीन गडकरी हे दूरदृष्टीचे नेते समजले जातात. परवा ते हॅड्रोजनवर चालणार्‍या कारमधून संसदेत आले तेव्हा सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. ही कार कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावरून पुढील गुढीपाडव्यापर्यंत सुसाट धावताना दिसेल, अशी अपेक्षा करूया!

मुंबई-गोवा महामार्ग… तारीख पे तारीख!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -