घरफिचर्सनवरात्रीसाठी मुंबई झाली सज्ज

नवरात्रीसाठी मुंबई झाली सज्ज

Subscribe

मुंबई:आजपासून सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. तब्बल नऊ दिवस रंगणार्‍या या नवरात्रोत्सवासाठी तरुणाईसह आबालवृद्ध तयार झाले आहेत. ठिकठिकाणी देवीच्या आगमनासाठी मंडप सजले असून काही ठिकाणी देवी विराजमान झाल्या आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.

नवरात्रोत्सवासाठी बाजारामध्ये लगबग सुरू झाली असून देवीसाठी लागणारी ओटी, साड्या, धूपदीप, अगरबत्ती या सगळ्या वस्तू विक्रीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात आणल्या आहेत. इतकंच नाही तर होम हवनासाठी लागणार्‍या गौर्‍या, चंदनाची लाकडे अशा वस्तूदेखील बाजारात उपलब्ध आहेत. सजावटीसाठी लागणार्‍या वस्तूंनी दादर, भुलेेश्वर या महत्त्वाच्या बाजारपेठा फुलल्या आहेत.

- Advertisement -

दांडियासाठी क्रॅश कोर्स

इतकंच नाही तर दांडिया आणि गरब्याचे विविध क्रॅश कोर्स करून अनेक महिला आणि तरुणाई नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये रंगून जाण्यासाठी आजपासून अगदी तयार झाल्या आहेत. दांडिया हा नवरात्रमधील सर्वात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग त्यामुळे जिममध्ये जाऊन आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन न थकता गरब्याचा आणि दांडियाचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण तरुणाई तयार झाली असून आजपासून नवरात्रीचं स्वागत करत आहे.

नवरात्रीच्या नऊ रंगांसह रंगीबेरंगी फुलांचा बाजारही सजलेला दिसतो आहे. ठिकठिकाणी दादर असो वा गिरगाव असो क्रॉफर्ड मार्केट असो झेंडूची फुले, तोरणांच्या माळा, विविधरंगी गुलाबांची विक्री चालू आहे. वास्तविक या विविधरंगी फुलांच्या रंगांनी बाजारपेठ सजलेली दिसत आहे. लहान मुलांसाठी खास नवरात्रीसाठी डिझाईन केलेले कपडे, चनिया चोळी, घागरा हेदेखील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे.

- Advertisement -

आजपासून उत्सव सुरू होत असल्यामुळे दुकानंही माणसांच्या गर्दीनी भरून गेलेली आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंगांचे विशेष महत्त्व असते, त्यामुळे या रंगांच्या विविध वस्तू घेण्यासाठीदेखील भाविकांची आणि उत्साही मंडळींची झुंबड सध्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. इतकंच नाही भाविकांप्रमाणे मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीची ऐतिहासिक इमारतदेखील नऊ रंगांत उजळताना दिसणार आहे. आता पुढचे नऊ दिवस भक्तीच्या रंगांसह नवरंगी कपड्यांमध्ये मुंबईकर रंगून गेलेले दिसतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -