घरक्रीडापराभवाकडून पराभवाकडे!

पराभवाकडून पराभवाकडे!

Subscribe

रणजी करंडकातील सर्वात यशस्वी संघ (४१ वेळच्या विजेत्या) मुंबईला गेल्या पंधरवड्यात मुंबईतच सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. दोन सामन्यांतील चार डावात मुंबईला एकदाही द्विशतकी मजल मारता आली नाही. मुंबईसाठी गेला मोसम विसरण्याजोगाच होता. यंदा मुंबईने बडोद्याला बडोद्यातच हरवून निर्णायक विजयाचे ६ गुण वसुल केले. मुंबईची ही सुरुवात फसवीच ठरली असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. फलंदाजी हेच मुंबईचे बलस्थान! परंतु, फलंदाजीच कोलमडल्यामुळे मुंबईला लागोपाठ दोन पराभवांना सामोरे जावे लागले. रणजी स्पर्धेच्या ८५ वर्षांच्या इतिहासात एका मोसमात सलग दोन पराभव पदरी पडण्याची मुंबईची ही केवळ दुसरीच खेप. गतमोसमातील दारुण पराभवांनंतर अनेक बदल झाले. नवे पदाधिकारी, नवी निवड समिती, नूतन कर्णधार असे बदल करुनही हरदासाची कथा मूळपदावरच!

वानखेडेवरील लढतीत रेल्वे करुन मार खाण्याची आपत्ती मुंबईवर ओढवली, तीदेखील अडीच दिवसात! सामान्याच्या पहिल्या दिवशी वानखेडेच्या हिरव्यागार खेळपट्टीवर टी.प्रदीप, सांगवान, अमित मिश्र या रेल्वेच्या मध्यमगती त्रिकुटाने मुंबईला ११४ धावातच गुंडाळले. ही आफत मुंबईवर मुंबईत प्रथमच ओढवली! रेल्वेने मुंबईवर निर्णायक विजय मिळवण्याची ही पहिलीच खेप. बीकेसीवर कर्नाटकाने मुंबईवर तिसर्‍या दिवशी चहापानाआधीच ५ गडी राखून विजय मिळवला. कर्नाटकाचा रणजीतील हा दोनशेवा विजय. मुंबईने रणजीमध्ये सर्वाधिक २४५ विजय मिळवले आहेत.

- Advertisement -

गेल्या ७ मोसमातील कर्नाटकाचा मुंबईवर हा चौथा विजय होता. २०१३-१४ मोसमात मुंबईच्या मक्तेदारीला शह देणार्‍या कर्नाटकाने मुंबईवर रणजी स्पर्धेत प्रथमच निर्णायक विजय संपादला. त्यानंतर कर्नाटकाची विजयी घौडदौड सुरुच असून मुंबईला ती रोखणे जड जात आहे. मुंबईची कामगिरी खालावत असताना कर्नाटकाची राष्ट्रीय स्पर्धांमधील (रणजी, विजय हजारे करंडक, मुश्ताक अली टी-२०) कामगिरी उंचावत आहे. त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. विशेष बाब म्हणजे कर्नाटक क्रिकेटमध्ये सर्वकाही अलबेल नाही. कर्नाटक प्रिमीअर लीग वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. परंतु, खेळाडूंच्या कामगिरीवर याचा काही परिणाम होत नाही. कर्नाटकाकडून सतत हरण्याची सवय मुंबईच्या अंगवळणी पडू लागली आहे,

हीच धोक्याची घंटा.
कर्णधार सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता सर्व प्रथितयश फलंदाज अपयशी ठरले. अनुभवी खेळाडू आदित्य तरेचे (६ डावांत ५५ धावा) अपयश नजरेआड करता येणार नाही. सूर्यकुमारच्या गैरहजेरीत अनुभवी आदित्य तरेकडे पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड दौर्‍यासाठी सूर्यकुमार, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ (दुखापतग्रस्त पृथ्वी सध्या बंगळुरूमध्ये उपचार घेत आहे) यांनी भारत अ संघात निवड झाली आहे. भारताचा उपकर्णधार तसेच मुंबईचा तारणहार अजिंक्य रहाणेला धावांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. ४ डावात मिळून त्याला केवळ २१ धावा करता आल्या. सलामीवीर पृथ्वीने बडोद्याविरुध्द खणखणीत द्विशतक फटकावून सुरुवात तर सुरेख केली. मात्र, पुढे त्याच्या कामगिरीला ग्रहण लागले. दुखापतीमुळे कर्नाटकाविरुद्ध दुसर्‍या डावात तो फलंदाजीला आला नाही. संकटमोचक सिध्देश लाडचा सूरही हरपला. चार डावात जेमतेम ३० धावा ही कामगिरी त्याला निश्चितच भूषणावह नाही. चार प्रमुख फलंदाजांच्या तुलनेत कर्णधार सूर्यकुमारने किल्ला लढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न अपुरेच ठरले.

- Advertisement -

मिलिंद रेगेंच्या निवड समितीने तामिळनाडूविरुद्धच्या लढतीसाठी भूपेन लालवाणीची निवड केली आहे. भूपेनने सी.के.नायडू स्पर्धेच्या (२३ वर्षांखालील) चार सामन्यांत ६५० हून अधिक धावा फटकावल्या आहेत. भूपेनप्रमाणेच हार्दिक तामोरेचीही मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. सलग दोन पराभवांमुळे मुंबई क्रिकेट वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शुक्रवारी मुंबईच्या विविध निवड समिती सदस्यांची बैठक बोलावली आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेणार्या एमसीएच्या कार्यकारिणीला निवड समिती सदस्यांवर होणार्‍या आरोपांची शहानिशा करावी लागेल. मुंबई क्रिकेटची घसरण रोखण्यासाठी खंबीर धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

टी-२० क्रिकेटच्या अतिरेकामुळे नवोदित खेळाडूंकडे संयमाचा अभाव आढळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डावाची उभारणी करण्यासाठी खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहावे लागते, नेमकी हीच बाब मुंबईच्या खेळाडूंच्या पचनी पडत नाही. रेल्वे, कर्नाटकाच्या (अनुभवी अभिमन्यू मिथुनचा अपवाद वगळता) नवोदित गोलंदाजांसमोर हिरव्यागार खेळपट्टीवर मुंबईच्या तथाकथित, प्रथितयश फलंदाजांनी शरणागती पत्करली याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -