घरफिचर्समुंबईचा जगप्रसिद्ध चोर बाजार

मुंबईचा जगप्रसिद्ध चोर बाजार

Subscribe

मुंबईच्या बाजारांचा आपला एक इतिहास आहे. तो तपासला तर कोणीही या बाजारांच्या प्रेमात पडेल. त्यापैकी काही बाजारांचा इतिहास थेट १५० वर्षे जुना आहे. काही बाजार हे विक्रेत्यांची गरज म्हणून निर्माण झाले आहेत. तर काही बाजार हे ग्राहकांची गरज म्हणून. मुंबईचा जग प्रसिद्ध असा चोर बाजार हा असाच विक्रेत्यांची गरज म्हणून अस्तित्वात आला. या बाजारात जो कोणी एकदा गेला की तो त्याच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. माझ्या कॉलेजच्या पाच वर्षांत मी हा बाजार अक्षरश: पिंजून काढला. असा एकही आठवडा नाही की मी चोर बाजारात शिरलो नाही. येथील उस्मान चाचा या वयोवृद्ध चष्म्याच्या फ्रेम विकणार्‍या व्यक्तीकडून मी या बाजाराचा इतिहास जाणून घेतला.

आज उस्मानभाई हयात नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे आजोबा या बाजारात वस्तू विकायचे, असे उस्मान चाचा सांगायचे. उस्मान चाचांचे आजोबा गुजरातमधून मुंबईत आले होते. सुमारे १८५५ साली. त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी जुन्या वस्तू येथे विकायला सुरुवात केली. भेंडी बाजाराच्या चिंचोळ्या गल्लीत. मोठ्याने आवाज देत वस्तू विकायच्या. ज्यांना क्रॉफर्ड मार्केट, भेंडी बाजार परवडायचा नाही, जुन्या वस्तूंवर ज्यांचे काम भागायचे, त्या व्यक्ती या भागातून वस्तू खरेदी करायच्या. आवाज देऊन येथे वस्तू विकल्या जात असल्यामुळे हा बाजार ‘शोर बाजार’ म्हणून ओळखला जायचा.

पुन्हा हा बाजार काही अधिकृत नव्हता. त्यामुळे पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांचा येथे छापा पडायचा. तेव्हा बाजारातील व्यक्ती सामान घेऊन पळायचे. इंग्रजांनी ‘शोर’चा अपभ्रंश ‘चोर’ असा केला. त्यानंतर ‘शोर’ हे नाव मागे पडून ‘चोर’ असे झाले. तसेच पोलीस आणि महापालिका अधिकार्‍यांच्या छाप्यानंतर येथील विक्रेते माल घेऊन पळ काढत असल्यामुळे, येथे चोरीचाच माल मिळतो, असा समज मुंबईकरांमध्ये झाला. त्यामुळे या बाजाराचे ‘चोर बाजार’ हे नाव पक्के झाले, असे उस्मान चाचा सांगायचे.

- Advertisement -

पण या बाजाराला ‘चोर बाजार’ हे नाव असले तरी येथे चोरीच्या वस्तू मिळत नाही, असे उस्मानचाचा अभिमानाने सांगतात. पण येथे वापरलेल्या वस्तू मिळतात, हे सत्यही उस्मानचाचांनी कधीच लपवून ठेवले नाही. त्यामुळे येथील मालाची किंमत ही सर्वसाधारण मालापेक्षा खूपच कमी असते. या बाजाराबाबत अजून एक आख्यायिका सांगितली जाते. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ही मुंबईत आली होती. त्यावेळी तिचे सामान जहाजातून उतरवताना त्यातील एक व्हायोलिन आणि अन्य सामान हरवले होते. ते सामान नंतर चोर बाजारात सापडले, असे सांगितले जायचे. त्याबाबत मी उस्मानचाचांना एकदा विचारले होते. त्यावेळी ते म्हणाले की, मी तरी असे काही ऐकले नाही. ना माझ्या आजोबांकडून, ना बाबांकडून. मात्र या बाजारात इंग्रजांकडून वेळोवेळी छापे टाकले जायचे, हे निश्चित.

- Advertisement -

मुंबईभर फिरायचे, जुना माल गोळा करायचा आणि तो येथे विकायचा. काहीवेळी, काही लोक त्यात चोरीचा मालही विकत असत. पण चोरीचाच माल विकला जातो हे साफ खोटे आहे, असे उस्मानचाचा छातीठोकपणे सांगायचे. तर असा हा चोर बाजार मोहम्मद अली रोडजवळच्या मटण स्ट्रिटवर हा बाजार भरतो. शुक्रवारी हा बाजार मोठ्या प्रमाणात असतो. जुम्माचा नमाज झाला की, बाजारात गर्दी उसळते. अनेक विक्रेते या बाजारात येतात. येथे सुईपासून गाडीच्या पार्टपर्यंत सर्व काही मिळते. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे सेकंडहॅण्ड. काही दर्दी लोक शुक्रवारी या बाजारात गर्दी करतात. जुन्या पार्टसाठी, अ‍ॅण्टीक पिससाठी. अगदी परदेशी व्यक्तीही बाजारात हजेरी लावतात. एक गल्लीतून दुसर्‍या गल्लीत शिरतात बाजाराचा रागरंग बदलतो. एखाद्या गल्लीत चित्रकलेसाठी मोठे कॅनवास, विविध ढंगी ब्रश, कलर्स विक्रीला ठेवलेल्या असतील तर दुसर्‍या गल्लीत विविध कपडे.

आपल्याला जे हवे ते सर्वकाही या बाजारात उपलब्ध आहे. पुन्हा किमतही कमी. मात्र त्यासाठी बार्गेनिंग करता आले पाहिजे. हा भाग अरुंद गल्लीबोळ्याचा असल्यामुळे बाजारात शिरताना आपले पाकीट सांभाळलेले बरे. या बाजारात चोर नाहीत. पण गर्दीच्या वेळी पाकिटमार मात्र हात साफ करून घेतात. त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहायला हवे. तुम्ही बार्गेनिंग केले आणि तो दर विक्रेत्याला पटला की कसलीही घासाघीस न करता ती वस्तू तुमची होते. हा भाग गल्लीबोळ्याचा असल्यामुळे येथे स्वत:चे वाहन न घेताच गेलेले बरे. बाजारात जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गिरगाव कुंभारवाड्यातून गोल देऊळ आणि तेथून जे.जे.च्या दिशेने चालत जाणे. डाव्या बाजूला गल्लीबोळ्यातून मग हा बाजार दिसू लागतो. सकाळी साधारणत: ११ वाजता बाजाराला सुरुवात होते. रात्री ७.३० वाजेपर्यंत हा बाजार असतो.

बाजारात पोहचल्याबरोबर थेट खरेदी करण्यापेक्षा अगोदर संपूर्ण बाजार फिरून त्याचा आस्वाद घ्या. कुठे काय वस्तू आहेत हे निश्चित करा. मग आपल्याला काय खरेदी करायचे आहे हे मनाशी ठरवा. त्या विक्रेत्याकडे जाऊन त्याच्या किमतीचा अंदाज घ्या. पण ती वस्तू, तुमची आत्यंतिक गरज आहे हे त्याला अजिबात भासवू देऊ नका. त्यानंतरच खरेदी करा. येथील विक्रेते हे कमालीचे चालाख आहेत. एखादी वस्तू, तुमची आत्यंतिक गरज असल्याचे त्यांना कळले की, ती वस्तू ते तुमच्या भावात देणारच नाहीत. ते तुमच्याकडून जास्त पैसे वसूल करणार हे निश्चित. तुम्ही मुंबईकर असाल तर एकदा तरी चोर बाजारात तुम्ही शिरला असणार आणि नसलात तर एकदा तरी या बाजाराला भेट द्या. हा संपूर्ण परिसर रिडेव्हलप होतोय. पुन्हा लोकांच्या गरजा बदलल्या आहेत. त्यामुळे अजून काही वर्षांनंतर ‘चोर बाजार’ तेथे अस्तित्वात असेल की नाही ही शंका आहे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -