संगीत- काळाचं प्रतिबिंब!

आज करोनाच्या काळात जग शांत, संथ नाही तर पुरतं स्तब्ध झालं आहे. काळ जणू गोठल्यासारखा झाला आहे. म्हणूनच ढिंगच्यँग ढिंगाचिकालाच संगीत समजणारा काळही केवळ अडीच महिन्यांत मागे पडला आहे. कुणाच्याही पेनड्राइव्हमधून, कुणाच्याही होम थिएटरमधून अशी गाणी वाजायची बंद झाली आहेत. चूकूनमाकून जिन्यातून येताना त्या सुरांचा तो कलकलाट कानावर पडायचा बंद आता झाला आहे. मागच्या आठवड्यांत, करोनाच्या बंदिस्त काळाचा फायदा घेऊन सोसायटीतलं कुणीतरी कराओकेवर गात होतं. आवाज तरुण होता, पण गाण्याचे शब्द होते, जाने कहाँ गये वो दिन!

लॉकडाऊन वाढवला गेला आहे. रस्ते, हमरस्ते, गल्ल्या, बोळ सुनसान झाले आहेत. मध्यरात्री येताना रस्ते गपगार असावेत तसं वातावरण भर सकाळी, भर दुपारी अनुभवायला येतं आहे. सगळं कसं चिडीचुप, चूपचाप. वातावरण एकदम बेसूर, भेसूरही. करोनाचा काळ असला म्हणून काय झालं, सगळे आधीच डिजिटल युगात पोहोचलेले. धावपळीच्या, पळापळीच्या जगातले. आता घरात निपचित पडलेत म्हणून, नाहीतर, नेमकं काय साध्य करायचं आहे ते माहीत नाही, पण इकडून तिकडून पळत सुटणारे, सदान्कदा घाईत असणारे, घायकुतीला येणारे, कानात वारा शिरलेले. पण आता तो वारासुध्दा पुतळा होऊन पडलेला. अखंड जगाला नाट्यपूर्ण कलाटणी मिळालेली आहे. फिरत्या रंगमंचावर राजवड्याचं दृश्य जाऊन पडक्या वाड्याचं नेपथ्य समोर यावं तसं झालेलं आहे.

माझ्या सोसायटीत ढिंगच्यँग ढिंगाचिका म्युझिक लावणारे आणि मोठा आवाज करून अख्ख्या सोसायटीला ते ऐकणं अनिवार्य करणारेही आता त्यांचं ते ढिंगच्यँग ढिंगाचिका लावेनासे झाले आहेत. हा काळाचा किंवा करोना काळाचा परिणाम म्हणायचा का? की जीवनाचा वेग पार मंदावून जीवन साफ ढिम्म झाल्याचा परिणाम? मला आठवतं आहे, माझ्या शाळकरी वयातला, कॉलेज जीवनातला किंवा मी नुकताच नोकरीला लागलो होतो तेव्हाचा काळ वेगळा होता. तो रम्य काळ आठवून उगाच आठवणींचे कढ काढण्याचं काही कारण नाही. पण एक मात्र सांगता येईल की तेव्हाचा काळ संथ होता, तेव्हाचं जीवन संथ होतं. अगदी संथ वाहणार्‍या नदीसारखं.

…म्हणूनच तेव्हाचं संगीतही तसंच संथ होतं, शांत होतं. त्या संथ, शांत जीवनाचं प्रतिबिंब तेव्हाच्या संगीतातही उमटत होतं. ते संगीत धबधब्यासारखं धबा धबा धोपटत सुटणारं नव्हतं, कानावर आदळत, आपटत नव्हतं. ते चवीचवीने ऐकायचं संगीत होतं. एका घासात भुरकायचं संगीत नव्हतं.

मी शाळेत जाण्यासाठी निघताना रेडिओवर ‘भावभोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी’ हे गाणं रेडिओवर लागायचं. माझ्या शाळकरी वयातही ते भावगीत माझ्या कानामनावर भावभावनेचा मोहर फुलवून जायचं. दुपारी अकरा-साडेअकराचा सुमार असायचा तो. पण माझ्या बालमनात ते अख्खं गाणं शाळेत पोहोचेपर्यंत घर करून राहायचं. श्रीनिवास खळेंच्या संगीतातलं, लता मंगेशकरांच्या आवाजातलं आणि मंगेश पाडगावकरांच्या शब्दांतलं ते गाणं. संगीतकार, गीतकार आणि गायिका ह्या तिघांनीही एकेमकांना खास समजून उमजून गायलेलं ते गाणं जेव्हा जेव्हा नव्याने कानावर यायचं तेव्हा तेव्हा नव्याने समजायचं. जीवनाचा वेग कमी असलेल्या त्या एका विशिष्ट काळातलं एक शांत स्वभावाचं, संथ गतीतलं गाणं. त्या काळाच्या गतीला बिलकूल समांतर जाणारं.

पुढे संगीतकार श्रीनिवास खळेंशी चांगली ओळख झाली तेव्हा एका मुलाखतीदरम्यान मी त्यांना नेमकं ह्याच गाण्याबद्दल विचारलं. ते म्हणाले, ‘मंगेश पाडगावकरांच्या कवितेतली भावभोळी भक्ती आणि त्या जोडीला येणारी एकतारीच मुळी शांत सूर खुणावत होती. तिथे सुरांचा किंवा वाद्यांचा कल्लोळ करून कसं चालणारं होतं?’ श्रीनिवास खळेंनी मला त्यांच्या त्या एका गाण्याबद्दल समजावलेलं असलं तरी त्या काळातली सरसकट गाणी एकूणच त्या शांत प्रकृतीच्या काळासारखी होती. ‘नंबर फिफ्टी फोर’ किंवा ‘हिंरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट’ किंवा ‘पक पक पक पक पकाक पक’ ह्यासारखी धुमधमालीची गाणी एखाद्या अमावास्येपौर्णिमेला व्हायची. पण तशी गाणी कितीही चालली, कितीही गाजली तरी तशा गाण्यांचा भडीमार व्हायचा नाही. बहुतांश गाणी ही धीरगंभीर असायची. जगण्याबद्दलची समजूत वाढवणारी असायची. चिंतन-मनन करायला लावणारी असायची.

आज सुरेश वाडकर त्या काळाबद्दलची आठवण सांगताना म्हणतात, ‘संगीत ही एक गंभीर गोष्ट आहे, ती अतिशय गंभीरपणे घेणारा तो काळ होता. त्या काळात वर्षातून एखादं गाणं जरा धडामधुडुम असायचं, पण ते एखादंच. ते चाललं म्हणून दुसरा कुणी त्याच्या मार्गाने जाऊन तसंच धडामधुडूम गाणं बाजारात आणायचा नाही.’ सुरेश वाडकरांचं ते म्हणणं खरं होतं. कारण त्या काळात हातात मोबाइल नव्हते. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम असली व्यवधानं सांभाळण्याची कसरत नव्हती, कसलं पॅकेज डील सांभाळण्याचं त्रांगडं नव्हतं. कसलं टार्गेट पूर्ण करण्याची भानगड नव्हती. जगण्यात स्थैर्य होतं, कमालीचं समाधान होतं आणि त्यामुळे येणारी शांतता होती. त्यामुळे तशीच शांतता त्यांना गाण्यातूनही मिळायची, किंबहुना तशीच शांततापूर्ण गाणी संगीतकाराच्या हार्मोनियममधून झंकारायची. तो त्या काळातल्या वातावरणाचा परिणाम असायचा. मध्यंतरी श्रेया घोषालची एक मुलाखत पाहण्यात आली. ती खरंतर आजच्या डिजिटल काळातली, पण तिनेही मागच्या काळातल्या गाण्यांचा उल्लेख करताना म्हटलं, ‘तो काळ प्रगत तंत्रज्ञानाचा नव्हता, वेगवान युगाचा नव्हता, त्यांच्या गाण्यांची गतीही वेगवान नव्हती, पण त्या तितक्याच मर्यादित गतीतली गाणी ऐकताना आणि गाताना संगीतातला खरा आनंद मिळतो.’एकूण काय तर, तो काळ तसा धीम्या गतीने पुढे सरकणारा म्हणून गाणंही तसंच धीम्या गतीने पुढे सरकायचं. त्या धीम्या काळाला ते धीम्या गतीचं, शांत, संथ गाणं साजेसं ठरायचं. आज एखाद्या तरुणीच्या पंजाबी ड्रेसला तिची पर्स मॅच व्हावी तसं ते गाणं त्या काळाला मॅच व्हायचं. कारण तो काळच तसा होता.

…आज करोनाच्या काळात जग शांत, संथ नाही तर पुरतं स्तब्ध झालं आहे. काळ जणू गोठल्यासारखा झाला आहे. म्हणूनच ढिंगच्यँग ढिंगाचिकालाच संगीत समजणारा काळही केवळ अडीच महिन्यांत मागे पडला आहे. कुणाच्याही पेनड्राइव्हमधून, कुणाच्याही होम थिएटरमधून अशी गाणी वाजायची बंद झाली आहेत. चूकूनमाकून जिन्यातून येताना त्या सुरांचा तो कलकलाट कानावर पडायचा बंद आता झाला आहे. मागच्या आठवड्यांत, करोनाच्या बंदिस्त काळाचा फायदा घेऊन सोसायटीतलं कुणीतरी करा ओकेवर गात होतं. आवाज तरुण होता, पण गाण्याचे शब्द होते, जाने कहाँ गये वो दिन! …ते शब्द आणि सूर ऐकले…आणि माझी खात्री झाली की संगीत ही काळाचा परिणाम होणारी गोष्ट आहे. संगीतात काळाचा परिणाम दिसू शकतो, काळाचं प्रतिबिंब दिसू शकतं.