म्युझिक इंडस्ट्रीला लो-फायची भुरळ

लो-फाय संगीत हे आरोग्यपूरक असून त्याचे थेट परिणाम मानवाच्या मेंदूवर होतात. दिवसातून काही काळ हे संगीत ऐकले तर आपल्याला दिवसभरात आळस येणार नाही किंवा दैनंदिन काम करताना इअरफोनचा वापर करून आपण हे संगीत ऐकले तर आपल्याला कामाचा थकवा जाणवणार नाही आणि आपण प्रसन्नतेने काम करू शकतो

– प्रमोद उगले

संगीत म्हणजे आत्म्याला परमातम्याशी जोडणारा दुवा. आजच्या आधुनिक युगात अगदी चार पाच वर्षाच्या मुलापासून ते नव्वदीच्या वृद्धांपर्यंत संगीत ऐकले जाते. यात ज्याप्रमाणे वय भिन्न असते त्याप्रमाणेच संगीत ऐकण्याच्या शैलीही वेगळ्या असतात. जसे की लहान मूल पक्ष्या प्राण्यांचे आवाज, आईचे अंगाई गीत ऐकणे पसंत करतात, युवक प्रेमाची गाणी ऐकायला पसंती देतात. उतारवयाला लागलेले भजन, हरिपाठ ऐकणे पसंत करतात. संगीताची सुरुवात खर्‍या अर्थाने भारतातच झाली असल्याच्या उल्लेख प्राचीन ग्रंथांमधून आढळतो. भारतात संगीत क्षेत्रात मुख्यता गुरु-शिष्य परंपरेने संगीताची दीक्षा घेतली जाते. तानसेन व त्याचे गुरू स्वामी हरिदास हे याचे एक आदर्श उदाहरण सांगता येऊ शकते. संगीत क्षेत्र काय आहे ते कशा प्रकारे काम करते हे नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी संगीत कलाविहार, बागीश्वरी, धृपद वर्णिकी, इंडियन म्युझिक जर्नल, छायानट, संगीत सेतू अशी अनेक संगीतविषयक मासिके संगीताच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.

ज्याप्रमाणे तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत त्याचप्रमाणे संगीत क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत आहेत. तानसेन हे बादशाहा अकबरच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न होते. तानसेनने राग मल्हार गायला सुरुवात केली की निसर्गातील मंगल लहरी एकवटल्या जाऊन आभाळ भरुन यायचं आणि धो-धो पाऊस कोसळायला लागायचा. यावरुन आपल्या लक्षात येते की संगीतात किती प्रचंड ताकत आहे. संगीतात गायनासोबतच वादनही तितकेच महत्वाचे मानले जाते. भारतीय वाद्यांना फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. काळाच्या ओघात काही नवीन वाद्ये उदयास आली. वर्तमानामधील प्रसिद्ध तंतुवाद्य म्हणून सतार या वाद्याचा उल्लेख सापडतो. सतारीला ‘द क्विन ऑफ इंडियन इंस्ट्रुमेंट्स’ असे संबोधले जाते. सनई, जलतरंग, तबला, ढोलकी, डफ, संबळ या वाद्यांनी भारतीय संगीताला एक वेगळेच स्थान मिळवून दिले आहे. त्याचबरोबर तानसेन, उ. विलायत खाँ, पं. रविशंकर, भारतरत्न उ. बिस्मिल्ला खाँ, नझिम खाँ, पंकज साखरकर, पं. दत्तोपंत मंगळवेढेकर, रामराव परसातवार, मास्तर बर्वे, शंकर विष्णू कान्हेरे, मिलींद तुळाणकर, सीता दोरया स्वामी, रागिणी त्रिवेदी यांनी भारतीय संगीत शास्त्राचा जगाच्या कानाकोपर्‍यात प्रसार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.

हल्लीच्या काळात तरुणांची पसंद क्षणोक्षणी बदलत असते. मग ती कपड्यांची असो किंवा इतर काही गोष्टींची. मागच्या काही वर्षांपासून युवक युवतींमध्ये कोरियन गाण्यांचे प्रचंड क्रेझ निर्माण झाले होते. कोरियन भाषा जरी समजत नसली तरीही युवक त्या गाण्याच्या संगीताशी जुळवून घेत ते गाणे ऐकण्याची मजा तरुणाईने लुटली. पुन्हा पुन्हा कोरियन गाणे ऐकून काही तरुणांचे तर ते गाणे तोंडपाठ झाले होते. जिमिन, जुंगकुक, जे-होप, जिन, सुगा, आरएम, आणि वी हे प्रसिद्ध कोरियन संगीत समुह बीटीएसचे सदस्य आहेत. त्यांच्या गाण्याची संपर्ण जगावर भुरळ पडली. अगदी 10 ते 12 वर्षाच्या मुलांपासून ते अगदी 30 ते 35 वर्षांच्या युवकांपर्यंत हे गाणे ऐकले जायचे. आजच्या घडीला तरुणाईने कोरियन गाण्यांना पाठ दाखवत लो-फाय गाण्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. लोफी गाणे हे मुख्य गाण्याच्या आवाजात किंवा संगीतात काही प्रमाणावर सौम्यता टाकून ते प्रदर्शित केले जातात. यात अगदी नव्वदीच्या शतकपासून ते आताच्या नवीन गाण्यांवरसुद्धा हा प्रयोग केला जात आहे. विशेष म्हणजे हे गाणे ऐकायला खूप सौम्य असल्याने त्या गाण्यामधला सार मनापर्यंत अगदी सहज पोहोचतो. तज्ज्ञाच्या मते लो -फाय गाणे शांततेच्या ठिकाणावर किंवा एकांतात बसून ऐकले तर त्यांचे आपल्या मनावर खूप सकारात्मक परिणाम घडून येतात. गाणे जितके शांत असेल तेवढे ते आपल्या मनाला लागते. आपण दिवसांतून आपल्या सवडीच्या वेळेनुसार किमान अर्धा तास लो-फाय संगीत ऐकले तर ट्रेसचे हार्मोन्स आपल्यापासून दूर राहतात. महत्वाचे म्हणजे मानसिक समस्यांवर संगीत हे एखाद्या थेरेपी सारखे काम करते.

लो-फाय गाणे ऐकण्याच्या फायद्यांचा आपण विचार केला तर यांचे आरोग्य शास्त्राच्या मते सौम्य गाणे ऐकल्याने आपल्या मनावर त्याचे खूप सकारात्मक परिणाम होतात. लो-फायचा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. लो-फाय म्हणजे कमी आवाजाचे संगीत किंवा सौम्य संगीत. अगदी थोड्याच कालावधीत या संगीताने संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीवर ताबा मिळवला आहे. लो-फायची वाढती लोकप्रियता लक्षात घेत यू-ट्यूबनेही एक पाऊल पुढे टाकत लो-फाय निर्मात्यांना मदत करायला सुरूवात केली आहे. नाशकातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमंत सोनानी यांच्याशी ‘आपलं महानगर’ने संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लो-फाय संगीत हे आरोग्यपूरक असून त्याचे थेट परिणाम मानवाच्या मेंदूवर होतात. दिवसातून काही काळ हे संगीत ऐकले तर आपल्याला दिवसभरात आळस येणार नाही किंवा दैनंदिन काम करताना इअरफोनचा वापर करून आपण हे संगीत ऐकले तर आपल्याला कामाचा थकवा जाणवणार नाही आणि आपण प्रसन्नतेने काम करू शकतो. विद्यार्थी अभ्यास करताना मुख्यत: वाचनाच्या वेळी हे संगीत ऐकू शकतात यातून स्मरणशक्ती वाढून दीर्घ काळासाठी वाचलेले लक्षात राहील.

मानसिकदृष्ठ्या कमकुवत असलेल्या रोग्यांवरदेखील म्युझिक थेरेपी नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार केले जातात. यात रोग्याला विविध प्रकारचे संगीत ऐकवले जाते, त्यात वाद्य गायन इत्यादींचा समावेश असू शकतो. या थेरेपीमुळे काही प्रमाणात का असेना मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ट्रेस, नैराश्य, रक्तदाब थकवा यांच्यापासून दूर ठेवते. अमेरिकेच्या कंसास मेडिकल सेंटरमध्ये झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले की संगीत मन आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम घडवून दिवसभर कार्यक्षम राहण्यास मदत करते. सौम्य संगीत हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्याचे काम करते आणि त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. संगीत क्षेत्राचा वाढता आलेख लक्षात घेता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे यांच्यातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीसाठी भारतीय संगीताचा इतिहास व विकास हा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आला आहे, या सर्वातून आपण आता निश्चितपणे म्हणू शकतो संगीतम् आरोग्यवर्धनम.