मुस्लीम उद्रेक भाजपच्या पथ्यावर

prophet muhammad row mumbai police team in delhi to summon nupur sharma

मुस्लीम धर्मियांसाठी परमोच्च श्रद्धेय प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीसंबंधीच्या विषयावर मुलाखत देताना आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपचे दिल्लीतील मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांनी ट्विट करून प्रेषितांविषयी आक्षेपार्ह मत मांडले होेते. या प्रकारानंतर मुस्लीम धर्मियांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातील त्यांच्या पदावरून दीर्घ कालावधीसाठी निलंबित केले आहे. नुपूर शर्मा यांनी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली, तसेच आपल्या विधानाबद्दल आपण मुस्लीम अभ्यासकांशी चर्चा करायला तयार आहोत, असेदेखील सांगितले, पण हे ऐकण्याच्या स्थितीत भारतातील मुस्लीम समाज आणि त्यांचे नेते नाहीत. त्यांनी नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली.

इतकेच नव्हे तर देशभरातील मुस्लीम लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. शुक्रवारी जामा मशिदीत नमाज झाल्यावर मुस्लीम लोक नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरून आक्रमक झाले. देशभरात नुपूर शर्मा यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या. यात काँग्रेससह काही राजकीय पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या प्रेषितांविषयीच्या आक्षेपार्ह विधानानंतर केवळ भारतातच नव्हे, तर आखाती देशांमध्ये निषेध करण्यात आला. त्यावेळी काही जणांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचर्‍याच्या डब्यावर लावले आणि त्यावर बुटांचे छापे उमटवले. इतकेच नव्हे तर काहींची मजल भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्यापर्यंत गेली. आखाती देशांमध्ये पहिल्यांदाच असे घडले असावे. थेट पंतप्रधानांच्या प्रतिमेची विटंबना करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

मोदींच्या नावाचा सध्या जगभर डंका आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारत सगळ्याच बाबतीत आक्रमक होताना दिसत आहे. अगदी चीनसारख्या बलाढ्य देशाला भारत थेट आव्हान देताना दिसत आहे. पाकिस्तानलाही सडेतोड उत्तर दिले जात आहे. केंद्रातील बदललेल्या विचारसरणीचा हा परिणाम आहे. त्याचसोबत धार्मिक बाबतीत भारत अधिक आग्रही झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले. विशेष म्हणजे राम मंदिराच्या पायभरणीच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले होते.

नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून रामायणाच्या माध्यमातून भारत आणि आशिया खंडातील अनेक देश कसे जोडले गेले आहेत ते सांगितले होते. त्यांच्या भाषणातून त्यांना हेच सांगायचे होेते की, पूर्वी त्या आशियाई देशांमध्ये हिंदू धर्मीय लोक होते, पण पुढील काळात त्या भागावर जी मुस्लीम आक्रमणे झाली, त्यावेळी तेथील मूळ हिंदू संस्कृती आणि धर्मप्रतिके झाकोळली गेली. आजही इंडोनेशियासारख्या देशांमध्ये रामायण आहे. त्यांच्या विमानसेवेचे नाव गरूडा आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर विशेषत: हिंदू धर्माचा प्रभाव वाढू लागला. इतकेच नव्हे तर भाजप ज्या मातृसंस्थेची राजकीय शाखा आहे, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढू लागल्या. प्रेषितांविषयी यापूर्वीही काही वेळा मुस्लिमांच्या भावना दुखावणारी वक्तव्ये काही जणांनी केली होती, पण यावेळी भाजपच्या नेत्यांनी जी वक्तव्ये केली, त्यानंतर जो उद्रेक झाला त्याची तीव्रता आणि व्यापकता मोठी आहे.

काहींनी ही प्रकरणे संयुक्त राष्ट्रांपर्यंत नेल्यानंतरही केंद्रातील मोदी सरकारने अतिशय संयमित अशी प्रतिक्रिया दिली. मोदींचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाल्यानंतर हिंदुत्ववादी विचारसरणींना अधिक बळ मिळाले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला केंद्रात एकदा नव्हे तर दुसर्‍यांदा बहुमत मिळाले आहे. त्याचसोबत मुख्य विरोधी पक्ष असलेली काँग्रेस सध्या नेतृत्वहिन झालेली आहे. कारण इतक्या वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसला सध्या कायमस्वरूपी अध्यक्ष मिळणेही मुश्कील होऊन बसले आहे. त्यामुळे मोदींना पर्याय देणे दुरापास्त होऊन बसले आहे. मोदींचा वाढता प्रभाव हा हिंदूंविरोधी आणि मोदींविरोधी मंडळींच्या पचनी पडणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधात असलेले अनेक राजकीय पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांच्यातही एकी होणे अवघड होऊन बसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोदींविरोधी आघाडी स्थापण्याचे प्रयत्न होताना दिसत असतात, पण त्याला फार काही यश येताना दिसत नाही. कारण त्या तिसर्‍या आघाडीत सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचे असते.

मोदींविरोधातील राजकीय पक्षांमध्ये प्रादेशिक पक्षांचा भरणा मोठा आहे. काँग्रेसलाही आपले जुने वैभवाचे दिवस यावेत असे वाटत आहे. त्यामुळेच सध्या भाजपच्या दोन नेत्यांनी प्रेषितांबद्दल जी आक्षेपार्ह विधाने केली, त्याला खतपाणी घालून आपल्या देशातील मुस्लीम लोक कसे अधिकाधिक आक्रमक होतील याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या वतीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या जात आहेत. मुस्लिमांच्या ज्वलंत धार्मिक भावनांचा वापर हे नेते आपल्या राजकारणासाठी करत आहेत.

मोदींच्या विरोधात ताकद उभी राहून त्यांचे सरकार कसे पडेल यासाठी खटपट करत आहेत, पण असे करण्याच्या प्रयत्नात एक गोष्ट होत आहे, ती कदाचित मुस्लिमांच्याही लक्षात येत नाही, जी त्यांच्यासाठी दीर्घकालीन हानिकारक आहे. मुस्लीम लोक हे आपल्या धार्मिक भावनांबद्दल अतिशय संंवेदनशील असून ते रस्त्यावर उतरून आक्रमक होतात. काही ठिकाणी त्या आक्रमक आंदोलनांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. हिंदूंच्याही आराध्य दैवतांबद्दल काही वेळा आक्षेपार्ह विधाने केली जातात, पण हिंदू मुस्लिमांसारखे मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. त्यामुळे या देशातील बहुसंख्य हिंदूंच्या मनात वेगळी भावना निर्माण होत आहे. त्याचा फायदा मोदींना आणि भाजपला होत आहे. कारण मुस्लीम जर आपल्या धार्मिक भावनांविषयी इतके जागरूक आणि आक्रमक होऊ शकतात, तर मग आपण का नाही, असे हिंदूंना वाटू लागते. अशा प्रकारे हिंदू मतांचे एकत्रीकरण मंदिर वही बनायेंगे, या घोषणेने केले होेते.

त्यावेळी भाजपच्या खासदारांची संख्या २ वरून २०० झाली होती. त्यानंतर भाजपची केंद्रात सत्ता आली. गुजरात दंगलीनंतर मोदींची प्रतिमा मुस्लीमविरोधी बनली, पण मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. त्यावेळी त्यांना मुस्लीम मतांची चिंता नव्हती. कारण हिंदू मतांचे एकत्रीकरण मोदींच्या आणि पर्यायाने भाजपच्या पथ्यावर पडत आहे. ते मुस्लिमांसाठी दीर्घकालीन नुकसानदायक आहे, पण लक्षात कोण घेणार?