घरफिचर्सवाघोबाची मावशी

वाघोबाची मावशी

Subscribe

मांजर हा आमच्या घराचा अविभाज्य घटक आहे . मी जन्मल्यापासून तर मांजर आमच्या घरात आहेच पण त्याही आधी २० वर्षे म्हणजे जवळपास गेली ४० वर्षे मांजर माझ्या वडिलांचा आवडता पाळीव प्राणी असल्या कारणाने सतत आमच्या घरात आहे.

आता पर्यंत कितीतरी मांजरे आली आणि गेली पण आमच्याकडच्या मांजराचे नाव कधीही बदलले नाही जर मांजरी असेल तर मनी आणि बोका असेल तर बोक्या. मी माझ्या आई आणि वडिलांकडून ऐकलेले (माझा जन्म होण्या आधीचे ) मांजराचे काही किस्से सुरवातीला लिहितोय. एक मांजर असे होते जे माझे वडील ऑफिसमधून आले की टुणकन त्यांच्या खांद्यावर उडी घेत असे, आणि विशेष म्हणजे हे मांजर माझ्या वडिलांच्याच ताटात एका बाजूला काढून ठेवलेला भात किंवा चपातीचा तुकडा खात असे आणि माझी आई दररोज त्याला बास्केटमध्ये ठेऊन फिरून आणत असे.

आता मी पाहिलेल्या पहिल्या मांजराबद्दल ते मांजर थोडसे विचित्रच होते ते अशासाठी की तेव्हा मी दीड -दोन वर्षांचा असेन मी टीव्ही पाहत बसलेला असताना ते मांजर अचानक मागून येऊन त्याच्या पुढच्या दोन पायांनी माझ्या मानेला धरून मला मागे डोक्यावर पाडत असे (ही अतिशयोक्ती वाटत असली तरी हे खरं आहे ) आणि हे मांजर सश्या सोबत चक्क खेळत असे. पुढे माझ्या वडिलांची दुसर्‍या गावाला बदली झाली आणि ते मांजर तिथेच राहिले. नंतर ही आम्ही अनेक मांजर पाळली आणि त्यांना पिल्ले देखील झाली. त्यातल्याच एका पिल्लाला लहान असताना पहिले काही महिने मागच्या दोन पायांवर चालता येत नसे पण नंतर काही दिवसांनी कोणत्याही इलाजाशिवाय ते मांजर व्यवस्थित चारही पायावर चालू लागले. त्याच्या आईच्या चाटण्यानेच बहुतेक ते बरे झाले असावे.

- Advertisement -

आणखी एका बोक्याचा अतिशय मजेदार अनुभव आहे. तो बोक्या मी पहिलीत असताना आमच्या घरी होता. मी तीन चाकी सायकलवर बसून शाळेत जात असे आणि माझी आई मला शाळेत सोडायला यायची तर माझ्या आईसोबत तो बोक्या देखील मला शाळेत सोडायला यायचा तो माझ्या सायकल समोर गडबडा लोळत येत असे आणि मला शाळेत सोडल्यावर माझ्या आई सोबत माघारी येत असे. एकदा हा बोकोबा काही माघारी माझ्या आई सोबत आलाच नाही. मग जेव्हा माझी आई मला शाळेतून माघारी नेण्यासाठी आली तेव्हा हा बोक्या बरोबर माझ्या शाळेच्या दारात बसला होता व तो पुन्हा माघारी घरी आला. ह्या बोक्याच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हा बोक्या त्याच्या आईच्या अनुपस्थितीत आपल्या धाकट्या भावंडांची अगदी आईसारखी काळजी घेत असे.

आमच्या मनीला झालेल्या पिल्लांपैकी बरीच पिल्ले आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांना देखील दिली.त्यातलंच एक पिल्लू आम्ही माझ्या वडिलांच्या ऑफिसमधील सहकार्याला दिले. त्याला त्यांनी अगदी थाटात सांभाळले. त्याच्यासाठी त्यांनी थर्माकोलंच छोटंस घर देखील बनवलं. मला अजूनही आठवतंय त्यांनी तीच नामकरण रुबी असं केलं. ती मनी थाटात नक्की राहायची पण मांसाहारी पदार्थ खाणं तर सोडा ती त्याकडे पाहत देखील नसे.

- Advertisement -

सगळीच मांजर काही माणसांच्या सवयीची नसतात अशीच एक मनी आमच्यापैकी कोणालाच हात लावू देत नसे पण ती झोपल्यावर मात्र हात लावू देत असे. आम्ही तिला असंच झोपल्यावर हात लावून लावून तिला माणसांची सवय लावली मग पुढे चालून ती जागे पाणी देखील आमच्या जवळ येऊ लागली. व्यंग काही फक्त माणसातच असतात अस नाही (शारीरिक व्यंग ) ते मांजरात देखील असतात. माझ्या वडिलांनी एक मांजर आमच्या शेतातून आणली होती .ती चालताना पाय हावेत टाकून चालल्यासारखी चालायची. नंतर आमच्या लक्षात आलं की ती अंध होती आणि शेतात राहिल्यामुळे ती फक्त कारळ(सूर्यफुलाच्या बिया )खात असे. एकदा आम्ही आमच्या एका मनीला आंघोळ घातली.

तर ती जरासाही विलंब न लावता लगेच मातीत लोळायला गेली .तसं करण्यामागंच तीच कारण देखील होतं थंड पाण्यानं ती पार गारठून गेली होती. नंतर मात्र कधीच आम्ही कुठल्या मांजराला आंघोळ घातली नाही. तर हे असं आहे मांजरांच आणि आमच्या कुटुंबाच नातं. आम्ही अगदी ५ -६ दिवसांपूर्वीच एक खारुताईसारख्या रंगाचे मांजराचे एक गोंडस पिल्लू पाळले आहे. ज्याला कोणीही बोलवण्याची गरज लागत नाही ते आपोआप जी व्यक्ती समोर दिसेल त्याच्या मांडीवर जाऊन बसते. ही मनी अजून तरी घराच्या बाहेर देखील गेली नाही म्हणून लाडाने मी तीच नाव ’ओसामा’ ठेवलं आहे.


-रविंद्र लाकाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -