वाचनाला मिळावी प्रेरणा

feature sampadkiy
संपादकीय

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो. अब्दुल कलामांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वत:ला घडविले. देशाच्या संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य सदैव स्मरणात राहील. अभ्यास आणि दर्जेदार वाचनाने माणूस राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचू शकतो याचा वस्तूपाठ म्हणजे अब्दुल कलाम. ‘पुस्तकाच्या सहवासात ज्ञानाबरोबर नेहमीच मला आनंदही मिळाला आहे. ग्रंथ ही माझी सर्वात मौल्यवान अशी ठेव आहे. युवक वाचतील तर देश वाचेल, अशी त्यांची खात्री होती. वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच म्हणतो, पण त्या बोलण्याला खर्‍या अर्थाने अर्थ प्राप्त होणे हीच अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल.

हा एक दिवस केवळ साजरा करण्यापुरताच मर्यादित न राहता तो दररोज साजरा होणे गरजेचे आहे. मुलांना वाचन करण्याचे महत्व समजावे या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. खरे तर, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री केवळ कागदावर मर्यादित न होता ती कृतीतून प्रत्ययास आणण्याचे कार्य वाचनाच्या रुपाने होऊ शकते. आजच्या पिढीवर असे संस्कार करण्यासाठी वाचनाशिवाय दुसरे प्रभावी माध्यम नाही. आपल्या संस्कृतीत पहिल्यापासूनच ज्ञानाला महत्व आहे. कालिदास हे चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या राजसभेमध्ये राजकवी होते. कालिदासांनी रघुवंशम, कुमारसंभव यासारखी कित्येक नाटके लिहिली. आजही त्यावर अभ्यास केला जातो. राजेशाहीत राजदरबारामध्ये बखरी लिहिल्या जात, स्त्रियांना, राणीवशाला शिकवण्यासाठी गुरू असायचे. त्या काळी रामदास स्वामींच्या शिष्य वेणाबाई एका मठाच्या मठाधिपती होत्या. त्या दासबोधावर निरूपण करायच्या, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली.

ज्या काळात स्त्री शिक्षणाचे नावही काढले जात नव्हते अशा साडेसातशे वर्षांपूर्वीच्या काळात जनाबाई लिहायला-वाचायला शिकली, अभंगरचना करू लागली. तर जाणत्या राजांचा जाणता पुत्र शिवबांचा छावा संभाजी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा..याच शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला, ‘नखशिखा’सारखी रचना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील रामजी पुस्तक आणून देत, तेव्हा ते हरखून जात. पुढे पुढे तर बाबासाहेब वाचनात अठरा-अठरा तास बुडून जायचे. ज्ञानाचा प्रचंड सागर त्यांच्याकडे होता म्हणूनच त्यांनी संविधान निर्माण केले. असे कितीतरी आदर्श आपल्या डोळ्यांसमोर आहेत.

लोकमान्य टिळकांनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा’ असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी केला. वाचनामुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होत असतात. देशाचा विकास हा भौतिकदृष्ठ्या कितीही झाला तरी तो सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने किती विकसितआहे, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे वाचन चळवळीचा, वाचनसंस्कृतीचा विकास व्हायला हवा. लहानपणी एकदा वाचन संस्कार झाला म्हणजे तो तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्थेपर्यंत कायम राहतो, यात शंका नाही. विविध प्रकारच्या कथा, कादंबर्‍या, कविता, ललित साहित्य यातून एक विलक्षण आल्हाद आणि आनंद व्यक्तीला प्राप्त होतोच; शिवाय त्याचे जीवन समृद्ध, संपन्न बनते. मन खर्‍या अर्थाने श्रीमंत होते. वैचारिक ग्रंथांच्या वाचनातून त्याच्या बुद्धीला धार चढल्या वाचून रहात नाही. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईलवरदेखील गुगल सर्चचा पर्याय निवडल्यानंतर जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीकडे ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता.

जवळपास ८० टक्यांच्या वर जनता निरक्षरच होती. त्यामुळे वाचनाचा मक्ता काही सुधारलेल्या सुशीक्षित समाजापुरताच सिमीत होता. आता शिक्षण सर्व सामान्यापर्यंत पोहोचले आहे. परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष वाचन आणि तेही कसदार वाचन निश्चितच कमी झालेले आहे. लहानपणी जुन्या पिढीत मुलांच्या हातात इसापनीती, साने गुरूजींच्या संस्कारक्षम गोड गोष्टी, ‘श्यामची आई’ यासारखी पुस्तके असायची. आताची मुलेे सलग पानभरदेखील वाचायची तसदी घेत नाही. चित्रांमार्फत २-२ ओळींची माहिती संकलित केलेली कार्टून्स त्यांना जास्त आवडतात, दीर्घ कथा, लघु कादंबरी, मोठी वैचारिक पुस्तके, सुंदर कवितांचा संग्रह या गोष्टी तर त्यांच्या आजुबाजुला फिरकतसुद्धा नाही. बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असल्याने पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. पालकही याबाबत उदासीन झाले आहेत. अब्दुल कलामांनी स्वत:ही अनेक पुस्तके लिहून विद्यार्थ्यांना वाचनाची आणि विचारांची प्रेरणा दिली. आपला भारत देश विकसित देशांच्या पंगतीत बसावा, यासाठी त्यांनी युवकांना प्रेरित केले.

शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या वैध/अवैध मार्गाचा अवलंब या सर्व दुष्टचक्रात आताचा पाल्य आणि पालक दोघेही अडकले आहेत. त्यातून वेळ काढून परीक्षा निरपेक्ष, निखळ आनंद देणारे वाचन करण्यास त्यांना वेळच नाही. या मंडळींना हे उमगलेलेच नाही की, माणसाला असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतो. वाचनामुळे रसिकता वाढीस लागते. सृजनशीलतेला वाट सापडते. सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यास आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. वाचन-संस्कृतीचे भवितव्य हे समाजाच्या धारणेवर अवलंबून असते. जो समाज आपल्या भौतिक-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्या समाजातील वाचन-संस्कृतीचे भवितव्य हे उज्ज्वल राहते. जो समाज भौतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञानाशिवायचे मार्ग अवलंबतो, त्या समाजातील वाचन-संस्कृती ही अस्तंगत होऊ लागते. आणि अशी वाचन-संस्कृती अस्तंगत होऊ घातलेला समाज ज्ञाननिर्मिती, तिचा आदर करेनासा होता. परिणामी त्याची भौतिक प्रगती होत राहते, पण तो सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ठ्या कुपोषित होऊ लागतो. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती केली, पुस्तकांविषयीची ओढ तरुणांच्याही मनात कायम स्वरुपी निर्माण होईल असे उपक्रम राबवले तरच आजचा वाचक प्रेरणा दिन सार्थकी लागेल.