घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग सच्चा शिवसैनिकाची सत्याची मशाल - राजन विचारे

सच्चा शिवसैनिकाची सत्याची मशाल – राजन विचारे

Subscribe

– संदीप (गणेश) कुंभार

1966 साली सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. त्यावेळेस राजन विचारे हे पाच सहा वर्षाचे असतील. ठाण्यासारख्या सांस्कृतिक, वैचारिक नगरीत त्यांचे तारुण्य गेले. त्याकाळी शिवसेना ही रस्त्यावर उतरून जनतेच्या न्यायासाठी लढत होती. ही शिवसेनेची, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांची तळमळ पाहून कित्येक तरुण शिवसेनेत दाखल होत होते. ह्याच विचारांना भारावून जाऊन म्हणा किंवा समाजसेवेची आंतरिक ऊर्जा म्हणा राजन विचारे शिवसेनेत दाखल झाले. हाच तो ऐंशी नव्वदीचा काळ होता जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि ठाणे हे समीकरण ठाण्याच्या, राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवत होते. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत शिवसैनिक घडत होता. धर्मवीर साहेबांच्या शिकवणीत राजन विचारे घडत होते. मूळच्या धार्मिक प्रवृत्तीचे असणारे विचारे साहेब आणि दिघे साहेबांची नाळ जुळण म्हणजे गुरु शिष्य ह्या नात्याचा जन्म होता. आनंद दिघे साहेबांचे त्यांच्यावर कायम प्रेम, लोभ राहिला होता. विचारे साहेबांठायी असणारी समाजसेवेची तळमळ पाहूनच की काय वयाच्या 31 व्या वर्षी जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिले. एक कार्यकर्ता नंतर शाखाप्रमुख म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास फक्त 4 वेळा नगरसेवक ह्या पदापर्यंत सीमित न राहता हाच प्रवास वृद्धिंगत होत राहिला.

- Advertisement -

सभागृह नेते स्थायी समिती सभापती, ठाणे शहर नियोजन समिती अध्यक्ष, वयाच्या 44 व्या वर्षी महापौर, 48 व्या वर्षी आमदार आणि 53 व्या वर्षी खासदार म्हणून जनतेने वेळोवेळी राजन विचारे साहेबांवर विश्वास दाखवला. हाच विश्वास म्हणजे राजन विचारे साहेब ह्यांना असणारी समाजसेवेची चाड. ह्याचा प्रत्यय ठाणेकरांना पदोपदी जाणवत आला आहे. त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत ठाणे रेल्वे स्टेशनवरील सॅटिस प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकालात काढण असो किंवा 2000 झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करत ठाण्यात दुसरी चौपाटी विकसित करण्याचे कार्य असो, ठाणे शहराचे आमदार असताना ठाणे गावदेवी मंडईचा 10 ते 12 वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न असो, शहरातील तीन उड्डाणपूल असो, ठाण्याच्या विद्यार्थ्याला मुंबई सारख्या शहरात विद्या शाखांसाठी वारंवार धाव घ्यावी लागत असे, विद्यार्थ्यांच्या ह्या समस्येच निवारण करत सभागृहात लक्षवेधी मांडून मुंबई विद्यापिठाचे उपकेंद्र ठाण्यात सुरू करून घेतले. अश्या एक ना अनेक विकास कार्यांचा जणू धडाकाच विचारे साहेबांनी लावला होता.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत ठाण्याची जागा लढविण्यास शिवसेनेतून कुणीही तयार नव्हते, पण राजन विचारे साहेबांनी हे आव्हान लीलया पेलले आणि थेट दिल्लीत धडक मारली. ह्याच काळात महाराष्ट्र सदनाच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या खराब पदार्थांच्या विरोधात तिथेही ह्या शिवसैनिकाने संघर्ष केला आणि संपूर्ण देशाला आपली ओळख एक कडवा शिवसैनिक म्हणून करून दिली. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत जांभळी नाक्याला सुरू केलेला दहीहंडी, चैत्र नवरात्र महोत्सव ठाण्याचा मानबिंदू ठरलेला आहे. आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेत आहेत.

- Advertisement -

आज ठाणे शहर प्रमुख औद्योगिक शहरांपैकी एक आहे. लाखों रेल्वे प्रवासी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ठाणे रेल्वे स्थानकातून ये-जा करतात. या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचे मल्टी मॉडेल हब रेल्वे स्थानक तसेच ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती होण्यासाठी वारंवार लोकसभेच्या सभागृहात मुद्दा उपस्थित करून या सर्व रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळवून यांचे काम सुरू केले. खासदार म्हणून ठाणे शहरासाठी सीमित न राहता त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली -कळवा एलिव्हेटेड या रेल्वेचा महत्वकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील दिघा रेल्वे स्थानाकाची केलेली निर्मीती हे या आदर्शवादच पहिल पाऊल ठरले आहे, अस म्हणण वावग ठरणार नाही.

त्याचबरोबर मीरा-भाईंदर शहरातील मिरारोड व भाईंदर या रेल्वे स्थानकांचा डेक लेव्हलवर असलेल्या बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धरतीवर पुनर्विकासाची कामे सुरू केली आहेत. असे हे पहिलेच खासदार असावे की, त्यांच्या ठाणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या सर्वच रेल्वे स्थानकांचा विकासाचा विडा उचलला आहे. हे येत्या काळात राज्यासाठी एक आदर्श ठरणार आहे, ह्यात वादच नाही.

ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी तसेच शहरातील प्रदूषणाला आळा बसण्यासाठी नियोजित केलेले जलवाहतुकीसाठी केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून घेतली ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर शहरात प्रवासी जेट्टी व रो-रो जेट्टी विकसित करून काही ठिकाणी सेवा सुरू केल्या आहेत. त्यापैकी ठाण्यातील कोलशेत व घोडबंदर फाउंटन हॉटेल येथे तयार केलेली प्रवासी -पर्यटक जेट्टी, भाईंदर ते वसई तयार झालेली रो-रो जेट्टी यामुळे भाईंदरकरांना वसई येथे जाण्यासाठी एक तासाचा वळसामारून आता जावे लागणार नाही. आपली वाहने बोटीत टाकून त्यांचा प्रवास फक्त दहा मिनिटांमध्ये होणार आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथील सुरू केलेली प्रवासी जेट्टी, नेरूळ येथे तयार केलेली रो-रो जेट्टी या जेट्टीवरून नेरूळ ते अलिबाग हा प्रवास फक्त 45 मिनिटांचा असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील जड-अवजड वाहनांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गायमुख ते साकेत या खाडी किनारा मार्गाला मंजुरी, हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील अरुंद रेल्वे कोपरी पूल रुंद करून घेतला. 14 वर्ष संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हद्दीत अडकलेला घोडबंदर येथील सर्विस रोड रस्ता निकालात काढला. पटणी रोड ते आनंदनगर कोपरी हा खाडीपुलास मंजुरी, त्याचबरोबर नवी मुंबईतील ऐरोली ते कटाई नाका या नव्या भुयारी मार्गाची निर्मिती तसेच गेली 14 वर्ष अपूर्ण अवस्थेत राहिलेला घनसोली-ऐरोली रोड जोडरस्ता मार्गी लावला. मीरा-भाईंदर शहरातील गुजरात राज्याकडे जाणारा वर्सोवा पूल असो किंवा गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत उन्नत मार्ग असो या नव्याने होणाऱ्या मार्गातील पर्यावरणाच्या सर्व मंजुऱ्या मिळवून अडथळे दूर करून मार्ग सुरू केले आहेत.

ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरामध्ये विविध ठिकाणी पर्यटकांना चालना मिळण्यासाठी नवी मुंबईतील घणसोली नोडमधील गवळीदेव व ऐरोली येथील जैवविविधता केंद्र तसेच भाईंदर येथील धारावी किल्ला या पर्यटन स्थळांचा विकाससाठी निधी मंजूर करून कामे सुरु केली आहेत. इलेक्ट्रिक बसेस, शहरात मेट्रो, नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, ठाणे कोपरी पूर्व सॅटीस २, आरोग्यासाठी ठाणे जिल्ह्याचे ओळखले जाणारे विठ्ठल सायन्ना शासकीय रुग्णालयाचे आधुनिकीकरण यांच्या निर्मितीसाठी असलेली तळमळ तसेच भाईंदर उत्तन येथील मच्छिमारांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून देण्यासाठी ब्रेकवाटर, समुद्रात दीपस्तंभ उभे केले आहेत. ही कामे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून घेणारा हा एकमेव नेता अशी विचारेंची ओळख.

ज्याप्रमाणे फणस दिसायला काटेरी पण आतून गोडवा असतो, याचा अनुभव प्रत्यक्ष अधिकारी त्यांच्या अनुभवातून घेत आहे. कारण अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम करून घेण्याची त्यांची वृत्ती व त्यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप सुद्धा तेच देत असतात. त्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळेच प्रकल्प मार्गी लागतात.

ज्या ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात त्याच ठाण्यात 2022 साली गद्दारी झाली. सत्तेसाठी, पदासाठी शिवसेनेत फुट पडली, परंतु राजन विचारे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या, हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सच्चा शिवसैनिकाप्रमाणे सत्याची मशाल, समाजकरणाची जाणीव मनात घेऊन अजूनही ठाम उभे आहेत. ही एक ठाणेकर म्हणून गौरवास्पद बाब म्हणावी लागेल. नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार म्हणून चारही पदे भूषवण्याचे भाग्य राजन विचारे साहेब ह्यांच्या नशिबात आले ते केवळ आणि केवळ राजन विचारे ह्यांच्या ठायी असणाऱ्या समाजसेवाच्या आंतरिक जाणिवेमुळेच. नेते येतील आणि जातील पण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळसाहेबांचा कानमंत्र आचरणात आणणारा नेता राजन विचारे दुर्मिळच.

(अध्यक्ष, कला व पर्यावरण सामाजिक चॅरीटेबल ट्रस्ट, ठाणे)

- Advertisment -