घरफिचर्समायमहानगर ब्लॉगधर्मांधता वाईटच...!

धर्मांधता वाईटच…!

Subscribe

अफगाणिस्तानमधील वातावरण बघून खूप वाईट वाटतंय. कोणत्याही राष्ट्रात राष्ट्राऐवजी धर्माला प्रथम स्थान देऊन जिथे धार्मिक कट्टरता तयार केली जाते तिथे त्या राष्ट्राची अधोगती निश्चित असते. भारतात बहुतेकांना आपापल्या धर्माचे राष्ट्र हवंय आणि काही धर्मभोळे तसा उल्लेखही करतात. त्यासाठी एकमेकांच्या धर्मावर चिखलही फेकतात. जर अजून काही वर्ष असंच चालत राहिलं तर घटनेतील धर्मनिरपक्षतेला तडा जाऊन भारताचीसुद्धा अधोगती होणे अटळ असेल. म्हणून धर्माने आंधळं केलेल्यांना आता तरी जाग यायला हवी.

ज्याची चिंता संपूर्ण जगाला होती, तिच घटना घडली. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येताच तालिबानी बंडखोरांनी अवघ्या काही दिवसातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला. तालिबानने १५ ऑगस्टला राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला अन् त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलं नव्हतं. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून गेले. तर जे उरले आहेत त्यांचे हाल हाल होत आहेत. हसतं-खेळतं अफगाणिस्तान स्मशानात बदललं. यामागचं एक कारण म्हणजे धार्मिक कट्टरता.

तालिबान ही संघटना धार्मिक कट्टरता असणारी संघटना आहे. पश्तुन भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं. पश्तुन आंदोलन सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. सोव्हिएत संघाचे सैनिक माघारी परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरीक मुजाहिदीन सत्ताधार्‍यांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं. मात्र, त्यानंतर तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणार्‍या बुरख्याचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं. तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा ताबा मिळविल्यानंतर पत्रकार परिषद घेत शरियत कायदा लागू करणार असल्याचं जाहीर केलं. यामध्ये महिलांवर निर्बंध असणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबान्यांची सत्ता आलेली आहे. त्यानंतर आता तालिबाननं आपल्या क्रुरतेचं दर्शन घडवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधून जीव वाचवून मिळेल त्या देशात आसरा घेण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो अफगाणी नागरिकांची गर्दी झाली आहे. अमेरिकन सैन्यासह नाटो देशांचे सैन्य लोकांच्या सुटकेसाठी कार्य करत आहे; पण आता तालिबानी सरकारनं त्यावर निर्बंध आणत, हिंसाचार घडवण्यास सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस काबुल विमानतळावर मोठे बॉम्बस्फोट झाले. या शक्तीशाली बॉम्बस्फोटात अनेक लोकांच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आणि त्याचबरोबर या देशाबाहेर जाऊन दहशतमुक्त, स्वतंत्र आयुष्य जगण्याची स्वप्न बघणार्‍या हजारो नागरिकांच्या आशाही उद्ध्वस्त झाल्या.

आज तालिबानचे नेते-प्रवक्ते, आम्ही सुधारणावादी झालो आहोत, बदललो आहोत, असे दावे करत आहेत. आंतरराष्ट्रीय अधिमान्यतेची गरज असल्याने, आमच्याकडून पूर्वीसारख्या चुका होणार नाहीत, महिलांबाबतच्या धोरणांत आम्ही उदारता आणू, सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास दिला जाणार नाही, परदेशी नागरिक आणि दूतावासातील कर्मचारी सुरक्षित राहतील, अशा बतावण्याही त्यांच्याकडून केल्या जात आहेत. वास्तव मात्र याविरुद्ध दिसते. तालिबानकडून महिलांवर अन्याय-अत्याचार सुरू झाले आहेत. त्यांना घराबाहेर पडताना पुरुषांची मदत घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. ‘सीएनएन’ची पत्रकार आधी बुरख्याशिवाय वार्तांकन करत होती; मात्र आज ती बुरखा घालताना दिसत आहे. चाळिशीपर्यंत विवाह न झालेल्या तरुणींची- महिलांची यादी तालिबानने मागवली आहे. दुसरीकडे, इस्लामिक स्टेट, जैश ए महम्मद, लष्करे तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचे कार्यकर्ते अफगाणिस्तानात घुसलेले असून, वेगवेगळ्या भागांत पसरले आहेत; त्यामुळे येणार्‍या काळात तेथे अराजकसदृश स्थिती असेल, हे स्पष्ट झाले आहे. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तान हा दहशतवादी तयार करणारी आणि निर्यात करणारी फॅक्टरी बनला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याच्या उंबरठ्यावर आज तो येऊन ठेपला आहे.

- Advertisement -

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मिळेल त्या मार्गाने काही नागरिकांनी देश सोडून जायचा प्रयत्न सुरु केला. या संबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका विमानाला लटकलेल्या दोघांचा हजारो फूट खाली पडून मृत्यू झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये एकजण हा अफगाणिस्तानचा युवा फुटबॉलपटू होता. अफगाणच्या इतर नागरिकांप्रमाणे झाकी अन्वर काबुलहून अमेरिकेला जाणार्‍या विमानाच्या पंख्याला कवटाळून बसला. ज्या पंखांच्या आधारे अन्वरने देश सोडण्याचे स्वप्न पाहिलं त्याच पंखांमुळे त्याच्या आयुष्याचे पंख तुटले. देशासाठी फुटबॉल खेळण्याचं स्वप्न अन्वरने पाहिलं होतं, तोच देश सोडण्यासाठी अन्वरचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा अनेकच कारणांसाठी वेदनादायी आहे. स्त्रियांसह, धार्मिक अल्पसंख्याक, कोवळ्या वयातील मुलं आणि लोकशाही आणि विकासाची आस धरणारे नागरिक यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली… माणूस म्हणून जन्माला येऊन माणसासारखं मुक्त जगता न येण्याचं दु:ख… जिहादी मॉडेल राबविण्याचं दु:ख, आर्थिक विकास न साधता येण्याचं…शिक्षण न घेता येण्याचं, अल्पसंख्याकांच्या मतस्वातंत्र्यावर येणार्‍या बंधनाचं… स्त्रियांच्या होणार्‍या स्वातंत्र्यहानीचं… त्या देशातले साठी सत्तरीच्या दशकातले मुलींचे फोटो बघितले की सध्याची स्थिती बघता जीव कळवळतो.
अफगाणिस्तानमधील वातावरण बघून खूप वाईट वाटतंय. कोणत्याही राष्ट्रात राष्ट्राऐवजी धर्माला प्रथम स्थान देऊन जिथे धार्मिक कट्टरता तयार केली जाते तिथे त्या राष्ट्राची अधोगती निश्चित असते. भारतात बहुतेकांना आपापल्या धर्माचे राष्ट्र हवंय आणि काही धर्मभोळे तसा उल्लेखही करतात. त्यासाठी एकमेकांच्या धर्मावर चिखलही फेकतात. जर अजून काही वर्ष असंच चालत राहिलं तर घटनेतील धर्मनिरपक्षतेला तडा जाऊन भारताचीसुद्धा अधोगती होणे अटळ असेल. म्हणून धर्माने आंधळं केलेल्यांना आता तरी जाग यायला हवी.

कोरोना ही एक महामारी आहे. परंतु, याआधीच आपला देश धार्मिक कट्टरता, प्रखर राष्ट्रवाद या दोन महामारींनी ग्रस्त आहे, असे विधान माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी काही महिन्यांपूर्वी केलं होतं. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशानावेळी बोलताना देशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता व्यक्त केली. देश ‘प्रकट आणि अप्रकट’ विचार आणि विचारधारांमुळे धोक्यात दिसतोय जे ‘आम्ही आणि ते’च्या काल्पनिक मुद्यांवरून देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संकटापूर्वी भारतीय समाजाला धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन कोरोनापेक्षाही गंभीर आजारांना बळी पडला आहे, असे हमिद अन्सारी म्हणाले होते. अन्सारी यांचं वक्तव्य अत्यंत योग्य आहे. ज्या पद्धतीने देशात गेली सहा-सात वर्षे दिसतंय, ते अत्यंत क्लेशदायक आहे.

प्रभु श्रीरामांच्या भूमीत जबरदस्तीने जय श्रीराम वदवून घेतलं जातं. नाही बोलला तर त्याला मारहाण केली जाते. एकीकडे अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या घटनेवर भाष्य करताना धार्मिक कट्टरता किती वाईट अशा गप्पा रंगवत असताना एका मुस्लिम युवक बांगड्या विकत होता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना घडली मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये. या घटनेवर तिथल्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया या हास्यास्पद आणि संतप्त होत्या.

तालिबानी कट्टरता, कर्मठता अफगाणिस्तानच्या उरावर बसताना जग जर उघड्या डोळ्याने बघत असेल तर एक दिवस असा येईल बंदुकीच्या जोरावर जगावर कर्मठतेने राज्य केलेलं दिसेल. हुकूमशाहीने मिळवलेली सत्ता गुलामीला जन्म देत असते, मानवी हक्क, महिलांचे अधिकार संपुष्टात येऊन गुलामगिरी अफगाणिस्तानात सुरू झाली. ही ठिणगी जगासाठी धोक्यांची घंटा आहे. तसंच, जे धार्मिक कट्टरतेने ग्रासले आहेत त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीतून धडा घ्यावा. काही दिवसांपूर्वीच भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने धार्मिक कट्टरतेच्या विरोधात मोहीम राबणार असल्याचं जाहीर केलं. बोर्डाने हा प्रस्ताव मान्य केला. या व्यतिरिक्त, या बैठकीत तालिबानची विचारधारा कट्टरवादावर आधारित आहे आणि ती सर्व धर्मांच्या लोकांमध्ये आहे असा निष्कर्ष काढण्यात आला.

बंदुकीच्या जोरावर लोकशाही मूल्य पायदळी तुडवली की सर्वात आधी चिरडला जातो तो ‘सर्वधर्मीय माणूस’. धर्म कोणताही असो, आपण सर्वजण आधी माणसं आहोत हे लक्षात ठेवायला हवं. कोणताही धर्म कधीच चुकीची शिकवण देत नाही, काही मूठभर लोकांच्या महत्वाकांक्षेसाठी धर्म नावाची अफूची गोळी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्य वेचणार्‍या सर्वसामान्य माणसाला देऊन त्याचा वापर मात्र केला जातो. लोकशाहीला हुकूमशाही हा पर्याय कधीच होऊ शकत नाही, चिरंतन टिकते ती लोकशाहीच!

देश जर संविधानानुसार चालला नाही तर त्यादेशाचे काय हाल होतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे अफगाणिस्तान आहे. धार्मिक कट्टरता मग ती कोणत्याही धर्माची असो देशाच्या शांततेला, अखंडतेला, प्रगतीला अत्यंत घातक असते. सर्व प्रकारच्या धर्मांधांनी यातून बोध घ्यावा, धर्मनिरपेक्ष देश हाच खरा शांततेचा, प्रगतीचा मार्ग आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -