घरफिचर्समायमहानगर ब्लॉगग्लोबल लोकलच्या पेचात मराठी

ग्लोबल लोकलच्या पेचात मराठी

Subscribe

अमेरिकी लेखक थॉमस फ्रिडमन यांनी ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मूळ गाभाच असा आहे की, आधुनिक संपर्क साधने आणि वेगवान वाहतूक साधने यांनी आता जगाचे सपाटीकरण झालेले आहे. तुम्ही जगात कुठेही असलात तरी तुम्हाला कामाची संधी मिळवता येते. फक्त तुमच्याकडे गुणवत्ता असण्याची गरज आहे. आधुनिक संपर्क साधनांमुळे आता अंतर हा घटक जवळजवळ नष्ट झालेला आहे. सोशल मीडियामुळे तर जगातील सगळे लोक एकमेकांशी सहज जोडले गेले आहेत. त्यामुळे जसा विविध विषयांवर एकमेकांशी संवाद होतो तशीच मोठ्या प्रमाणात एकमेकांना आपल्याकडील उत्पादनांची माहिती मिळून आर्थिक उलाढाल होत असते. यामध्ये एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी भाषा हा घटक महत्वाचा असतो. आपल्याला भाषा अपरिचित असली तरी भाषांतराची सुविधा असते. त्यामुळे आपल्याला त्या माध्यमातून पुढच्या माणसाने काय लिहिले आहे ते जाणून घेता येते. मराठी भाषा आणि त्यातील वैविध्यपूर्ण साहित्य, पुढची वाटचाल याविषयी दरवर्षी भरणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चर्चा होत असते.

नाशिक येथे भरलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३,४,५ डिसेंबरला पार पडले. मराठी भाषेची विविध पातळ्यांवर अशी अनेक साहित्य संमेलने पार पडत असतात. त्यासाठी मराठी साहित्यिकांचा आणि माणसांचा उत्साह अतुलनीय असतो. उत्तर भारतात विशेषत: हास्य कवी संमेलने आणि मुशायरे बर्‍याच ठिकाणी होतात, त्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. मराठी भाषेचे हे साहित्य संमेलन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात विविध ठिकाणी होत असते. पंजाबमध्येही ते झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या या साहित्य संमेलनाचा विस्तार देशभर होत असतो. संमेलन महाराष्ट्राच्या बाहेर आयोजित करण्यात आले तर, त्या भागातील मराठी मंडळी तिथे प्रामुख्याने हजेरी लावतात. भाषा ही एकमेकांना जोडणारा दुवा आहे.

- Advertisement -

आपल्या मातृभाषेत बोलल्यानंतर आपल्याला कुठलाही विषय अधिक बारकाव्यांसह कळतो, त्याचे चांगले आकलन होते, इतकेच नव्हे तर आपली भाषा बोलताना अधिक जिव्हाळा निर्माण होतो. जगातील सर्व भाषा या तशा भगिनीच असतात. एका भाषेतील काही शब्द हे दुसर्‍या भाषेमध्ये आढळतात. आज इंग्रजी भाषेचा पगडा जगाच्या मोठ्या भागावर दिसतो. जग हे ग्लोबल व्हिलेज होत असताना त्या जगाची संपर्क भाषा इंग्रजी होत आहे. आज प्रत्येक माणूस हा जागतिक संधींचा शोध घेत असतो. त्यामुळे विशेषत: भारताचा विचार केला तर पालक आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषांमध्ये शिक्षण न देता इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये देत असतात. त्यामुळे पुढे जागतिक पातळीवर नोकरी व्यवसायाच्या विविध संधी शोधताना कुठली अडचण येऊ नये हा त्यामागचा हेतू असतो. प्रगत देशांमध्ये जाण्याचा मुलांचा कल असतो.

इंग्रजीचा व्यापक प्रसार होण्यामागील मुख्य कारण ब्रिटिशांचे जगाच्या मोठ्या भागावर साम्राज्य होते हे आहे. आता ब्रिटिशांचे साम्राज्य नसले तरी इंग्रजी भाषेला पाय रोवण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी त्या काळात निर्माण झाल्या तसेच ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केले तिथे अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यात बरेच ब्रिटिश शिक्षक प्राध्यापक म्हणून इथल्या मुलांना शिकवत असत. ते इंग्रज असल्यामुळे त्यांची भाषा इंग्रजी, ते शिकवत इंग्रजीमध्ये, त्यामुळे जे शिकणारे होते, त्यांना इंग्रजी भाषा आत्मसात करावी लागे. ब्रिटिशांच्या सत्तेसोबतच त्यांचा धर्म असलेल्या मिशनरींच्या अनेक शाळा कॉलेजस उभी राहू लागली. त्यात जसा शिक्षण प्रसाराचा हेतू होता तसाच ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचाही सुप्त हेतू होता. कारण त्यासाठी त्यांना पैसा मिळत असे. ब्रिटिश अधिकारी ज्या ज्या देशांमध्ये गेले तिथल्या भाषाही त्यांनी शिकून घेतल्या, त्यामुळे स्थानिक लोकांशी त्यांना संपर्क साधता येत असे. इंग्रजी भाषा असलेल्या ब्रिटिशांची अमेरिका ही वसाहत होती. त्यामुळे तिथेही इंग्रजी भाषेचा प्रसार झाला.

- Advertisement -

अमेरिकेमध्ये युरोपातील विविध देशांमधील लोक गेले असले तरी तिथे ब्रिटिशांचा प्रभाव मोठा होता, त्यामुळे अमेरिकेतील लोकांची भाषा इंग्रजी झाली. नव्या आशाआकांक्षा घेऊन पुढे येणार्‍या या नव्या देशाची अल्पावधीत अतिशय वेगाने प्रगती झाली. अमेरिकेत मोठ्या विज्ञान संशोधन संस्था आहेत, जगभरात ज्यांची व्याप्ती आहे, अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळेच त्यांची जी इंग्रजी भाषा आहे, तिचाही तसाच प्रसार आणि प्रभाव आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये इंग्रजी शिकण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जगात इंग्रजी भाषा शिकण्याला प्राधान्य देणार्‍या देशांमध्ये भारत हा एक प्रमुख देश आहे. अनेक भारतीय रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी अमेरिकेला जातात. अमेरिकी सरकारच्या प्रशासनामध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक आहेत. अगदी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांच्या देशातील अनेक कंपन्यांचे सीईओ हे भारतीय वंशाचे आहेत. भारतातील अनेक सणही अमेरिकेत मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दिवाळीसारख्या सणांमध्ये अमेरिकेतील राजकीय नेते सहभागी होत असतात. थोडक्यात, काय तर अमेरिकेत राहणार्‍या भारतीय लोकांच्या मतांचे महत्व वाढू लागले आहे. या सगळ्याचा थेट परिणाम हा भारतातील राज्याराज्यांमधील भाषांवर होत आहे.

महाराष्ट्राचाच विचार केला तर असे दिसून येईल की, अगदी शहरापासून ते गावापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. पालक आपल्या मुलांना प्रसंगी जास्त पैसे खर्च करून इंग्रजी शाळांमध्ये पाठवत आहेत. बर्‍याचशा शाळांमध्ये थेट इंग्रजी शिकवले जाते, त्यामुळे त्या वस्तूला मराठीत काय प्रतिशब्द आहे ते त्या विद्यार्थ्याला कळत आहे. त्याला चंद्र दाखवून याला मून म्हणतात, असे सांगितले जाते, पण मराठीत त्याला चंद्र म्हणतात, असे सांगितले जात नाही. अशा प्रकारे आता अगदी लहानपणापासून मुलांचा मातृभाषेशी असलेला संबंध तोडण्यात येत आहे. त्यामुळे मुलांना मराठी चांगल्या प्रकारे बोलता येत नाही, लिहिणे तर दूरच. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्रात तर मराठी भाषा न शिकवणार्‍या शाळांना एक लाख दंड करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पण आता जागतिक परिस्थिती बदलत आहे. आपली मुले जागतिक नागरिक आहेत, त्यांना युरोप अमेरिकत जाऊन संधी मिळवायच्या आहेत. जसे गावच्या माणसांना वाटते आपल्या मुलांनी भविष्य काढण्यासाठी मुंबई-पुण्याला जावे, तसेच शहरातील भारतीय पालकांना वाटत असते की, आपल्या मुलांनी उज्ज्वल भविष्यासाठी युरोप-अमेरिकत जावे. त्यांना उच्च शिक्षण घेताना कुठली अडचण येऊ नये, त्यामुळे ते त्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. तेही द्विधा मन:स्थितीत असतात. मराठी भाषेची ओढ असते, पण दुसर्‍या बाजूला मुलांनी जागतिक भरारी घ्यावी, असे त्यांना वाटत असते. ग्लोबल आणि लोकल अशा पेचात पालक, मुले आणि भाषा अडकलेली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था कवी मंंगेश पाडगावकरांच्या, ‘घरट्यातून गगनातून शापित हा तगमगतो,’ या कवितेसारखी झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -