घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकेंद्रीय तपास यंत्रणांच्या मागे अदृश्य हात!

केंद्रीय तपास यंत्रणांच्या मागे अदृश्य हात!

Subscribe

रशियाने युक्रेन या छोट्या देशावर हल्ला केला आहे. तिसरे जागतिक युद्ध होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा संघर्ष थांबण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची समजूत काढण्यासाठी तसेच त्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला पाठवा, असे विनोद सध्या सोशल मीडियावर येत आहेत. एका केंद्रीय तपास यंत्रणाची अशा पद्धतीने खिल्ली उडवली जात आहे हे दुर्दैवी आहे. याला ती तपास यंत्रणादेखील कारणीभूत आहे. देशात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी पडली म्हणून समाजाच! कदाचित या तपास यंत्रणांमागे अदृश्य हात असावेत.

देशात विशेष म्हणजे महाराष्ट्रात ईडी, एनसीबी, आयकर, सीबीआय सारख्या तपास यंत्रणा लहान मुलांना देखील माहिती झाल्या आहेत. आणि आता महाराष्ट्रात ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या तरी नवल वाटत नाही आहे. सध्या राज्यात ईडीचे वातावरण आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम पटेल याच्याकडून जमीन खरेदी केल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना अटक झाली. यामुळे महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागणार हे निश्चित होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. याला कारण म्हणजे नवाब मलिक यांनी अलीकडच्या काळात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या कारवाईबाबत गौप्यस्फोट केले.

दिल्लीतील भाजपेश्वरांच्या इशार्‍यावरच समीर वानखेडे नार्कोटिक्स ब्युरोची व्यवस्था हलवत आहेत, हे अत्यंत ठळकपणे नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर सकाळ-संध्याकाळच्या पत्रकार परिषदांमधून आणण्याचा प्रयत्न केला. मलिक यांनी आर्यन खान प्रकरणी केंद्राच्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’वर जोरदार हल्ला चढवला. चित्रफिती, कागदपत्रांच्या आधारे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांना देशभरातील प्रसारमाध्यमांतून मोठी प्रसिद्धीही मिळाली. एवढंच नव्हे तर नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक आरोप आणि प्रत्यारोपांचा सामना रंगला. या लढाईत, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांच्या आधारावरच ईडीने मलिक यांच्यावर बुधवारी कारवाई केली आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश या कळीच्या राज्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे संकेत भाजपचे राज्यातील अनेक नेते गेले काही दिवस देत आहेत. राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगले तापले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणादेखील सतर्क झाल्या आहेत. भाजप नेते आणि भ्रष्टाचार संपवण्याचा विडा उचललेले किरीट सोमय्या हे सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटलेत. बरं, एवढ्यावर न थांबता कोणत्या नेत्याला केंद्रीय तपास यंत्रणा केव्हा उचलणार याची माहितीदेखील देतात.

एवढी अचूक माहिती भाजपच्या नेत्यांना मिळते कशी, असा सवाल भाजपव्यतिरिक्त पक्षातील नेते विचारतात. हा प्रश्न खरं तर योग्यच आहे. भाजप पक्षातील नेत्यांना सोडून इतर जे त्यांच्या विरोधातील पक्ष आहेत, त्यांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडतात, कारवाई होत आहे. त्यामुळे केंद्रीय तपास कोणाच्या सांगण्यावरून कारवाया करतात का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सगळे घोटाळे महाराष्ट्रातच होत आहेत, आशा पद्धतीचे चित्र आहे, कारण सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येऊनच बसल्या आहेत. अथवा या यंत्रणांना महाराष्ट्र टार्गेट दिलं असावं.

- Advertisement -

कारण गुजरातमध्ये नुकताच कोळसा घोटाळा समोर आला आहे. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. देशातील विविध खाणींमध्ये येणारा कोळसा देशातील प्रत्येक राज्यांमधील लघु उद्योगांना वितरीत होतो. यात गुजरातमधल्या लघु आणि मध्यम उद्योगांना वितरीत केला जातो. सुमारे ६० लाख टन इतका कोळसा गुजरातला १५ वर्षांत प्राप्त झाला. आधीच डबघाईत आलेल्या खाणींमधील कोळसा बाजारमूल्याहून कमी दरात गुजरातला मिळाल्यावर यातील लाखो टन इतका कोळसा इतर राज्यांना दामदुप्पट किंमतीत विकला गेल्याची बाब पुढे आली आहे. यासाठी अधिकार्‍यांनी स्वत:च डमी कंपन्या तयार केल्या आणि खरेदी व्यवहारात सव्वाशे पटीत कमाई केली गेल्याचं समोर आलं आहे.

राज्यातून सलग १५ वर्षं कोळशाची चोरी होऊनही सरकारला त्याचा थांगपत्ता लागला नाही? मोदींची सत्ता केंद्रात आल्यापासून ईडी, सीबीआय, एनसीबी आणि आयकर या यंत्रणा अधिक सजग झाल्या आहेत. देशातील भ्रष्टाचार खोदून काढण्याच्या निमित्ताने कामाला लागलेल्या या यंत्रणा भाजपची सत्ता असलेल्या गुजरात राज्याकडे जराही लक्ष देत नाहीत. याही घोटाळ्याकडे सारासार दुर्लक्ष केलं जात आहे. गुजरातमध्ये काही महिन्यांपूर्वी सुमारे अडीच हजार कोटींचे अमली पदार्थ मुंद्रा बंदरामध्ये सापडलं होतं. याचं कनेक्शन कुणाशी होतं, याची साधी माहितीही पुढे येऊ आली नाही. याला काय म्हणावं? महाराष्ट्रातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती संबंध माध्यमांना दिली जाते. मात्र, या ठिकाणी जराशीदेखील माहिती समोर आलेली नाही.

याशिवाय आणखी एक गुजराध्ये देशातील सर्वांत मोठा घोटाळा झाला आहे. एबीजी शिपयार्ड या गुजराती उद्योगाने देशातील २८ बँकांना चुना लावला असून हा घोटाळा देशातील सर्वात मोठा म्हणजे २२ हजार ८४२ कोटींचा आहे. काडीचा संबंध नसलेल्या प्रकरणांमध्ये स्वत:हून हस्तक्षेप करणार्‍या ईडी आणि सीबीआयला कोट्यवधींच्या गुजरातील घोटाळ्यांशी काहीही देणंघेणं नाही याला काय म्हणावं?

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर तुरुंगात कोण कोण जाणार अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादीच जाहीर केली आहे. याच किरीट सोमय्या यांनी जे पूर्वी वेगळ्या पक्षात होते आणि आता भाजपमध्ये आहेत अशा काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र आता त्यांना त्या आरोपांचा विसर पडलेला दिसतोय. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे हेच किरीट सोमय्या आता त्यांच्या नावाचा ‘नारायण नारायण’ असा जप करत आहेत. थोडक्यात, जो भाजपमध्ये आता तो शुद्ध झाला, असा भाजपचा शुद्धिकरणाचा फॉर्म्युला होऊन बसला आहे. पण जनता हे पाहत आहे. केवळ आणि केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपने चालवलेला हा खेळ आता लोकांना स्पष्ट दिसू लागला आहे. दुसर्‍यांना उघडे पाडण्याच्या हेतूने झपाटलेले भाजप नेते आता स्वत:च उघडे पडत आहेत. त्यांचा हेतू हा जनहितापेक्षा स्वहिताचा आहे, असे दिसत आहे.

भाजपचे अनेक नेते भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले मनी लाँडरिंग आणि भूखंड घोटाळ्यातील नारायण राणे, बेकायदा संपत्ती जमविलेले कृपाशंकर सिंह, आदिवासी कल्याण विभागात घोटाळा केलेले विजय गावित, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नात हजेरी लावणारे गिरीष महाजन, जलयुक्त शिवार घोटाळा, कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा, फडणवीस सरकारच्या काळातील मंत्रालयातील उंदीर घोटाळा…असे अनेक घोटाळे आहेत. यातील काही नेत्यांवर स्वतः किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत? मग त्यांच्यावर कारवाई कधी होणार, त्यांच्यापर्यंत ईडी कधी पोहोचणार ?

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. असं असताना आयकर विभागाने शुक्रवारी सकाळी पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली. आयकर विभागाच्या धाडी पण करेक्ट टाईमवर पडतात. या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मागे अदृश्य हात आहे, असंच वाटायला लागलं आहे. भाजपकडून आपलं सरकार नसलेल्या राज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत त्रास दिला जात आहे. भाजपचे नेते हे काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? भाजपचे नेते पापं करतात आणि नंतर गंगेत स्नान करतात. त्यामुळे ‘गंगा मैली’ झाली आहे, अशी टीका संजय राऊत करतात. संजय राऊतांची टीका राजकीय असली तरी ते जे बोलले आहेत ते महत्वाचे आहे. भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचारी नेता सभ्य धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. मुळात आता केंद्रीय तपास यंत्रणांची सुरू असलेली कारवाई सर्वांना संशयास्पद वाटत आहे. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतात आणि त्यांना उत्तर प्रदेशमधून भाजप तिकीट देते याचा अर्थ काय काढायचा? हे सर्व काही एकतर्फी आणि एकाच पक्षाच्या हितासाठी चाललेले आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -