घरफिचर्समायमहानगर ब्लॉगआधीच कोरोनाची हौस; त्यात डेंग्यूचा पाऊस

आधीच कोरोनाची हौस; त्यात डेंग्यूचा पाऊस

Subscribe

वैद्यकीय पेशा आणि डॉक्टरांची सेवा ही पवित्र मानली जाते. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीपर्यंत समाजात डॉक्टरांबद्दल अतिशय आदर होता. खेड्यापाड्यात तर लोक मृत्यूच्या दाढेतून परत आणणारा देव, अशाच नजरेतून डॉक्टरकडे पाहत. डॉक्टरही त्याच भावनेतून जनसेवा करत असत. पण आता या सेवेने ‘व्यवसाया’चे स्वरूप धारण केले आहे. आपले आर्थिक आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर समाज निरोगी ठेवून चालणार नाही, हाच या पेशाचा पायाभूत सिद्धांत झाला की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कोरोनाने हा समज अधिक पक्का केला आहे. त्यातच काही दिवसांपासून आणखी काही आजारांनी कमालीचे डोके वर काढलेय. पण त्यांना सध्या ‘साईड हिरो’सारखी ‘ट्रिटमेंट’ दिली जातेय. कोरोनानंतर आज कुठला आजार वार्‍याच्या वेगाने फैलावत असेल तर तो म्हणजे डेंग्यू. कोरोनाबरोबर डेंग्यूच्याही नावानं चांगभलं’ म्हणत खासगी डॉक्टर्स रुग्णाला अक्षरश: लुबाडत आहेत..पण कोरोनाचं गारुड इतकं वाढलंय की आपण डेंग्यूकडे साफ दुर्लक्ष करून मोकळो झालो. त्यातून ‘वेगळ्या’ प्रॅक्टीसला अधिक जोर चढलाय.

एखाद्या उंची हॉटेलला लाजवेल अशी हॉस्पिटल्स शहरांमध्ये उभी राहताहेत. त्यातून रुग्णांना ‘फाईव्ह स्टार’ सेवा मिळते यात वादच नाही. पण ही सेवा मिळवण्यापोटी खिसे रिकामे होतात, त्याची काळजी कोण घेणार? या उंची हॉस्पिटल्सपोटी आजारांची संख्याही अचानकपणे वाढलेली दिसते, हे देखील नाकारून चालणार नाही. अर्थात त्याला काही अपवाद आहेत. मात्र, सर्वच डॉक्टर्स रुग्णसेवा देतात असे म्हणनेही धाडसाचे ठरेल. प्रत्येक क्षेत्रात काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. त्याला वैद्यकीय क्षेत्र अपवाद कसे ठरणार, असा सूर साधारणपणे डॉक्टरांचा असतो. मात्र, इतर कोणत्याही क्षेत्रावर जितका विश्वास ठेवला जात नाही, तितका विश्वास वैद्यकीय क्षेत्रावर सर्वसामान्यांचा असतो. मंदिरातील देवानंतर तो डॉक्टरांना देवाच्या रूपात बघतो. किंबहुना काही प्रसंगात तर देवापेक्षाही पुढचे स्थान डॉक्टरांना दिले जाते. त्यामुळे अशा देवत्व बहाल केलेल्या पेशाकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे स्वाभाविकच आहे. प्रत्यक्षात अनुभव फारसा सुकर नाही.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाच्या चर्चेने घातलेले थैमान बघितले, तर त्यात कोरोना विषाणूपेक्षाही भयंकर असे काही डॉक्टर्स असल्याचे दिसते. कोरोना रुग्ण दाखल होताच अर्थकारणाची ‘मालिका’ सुरू होते. दुसरीकडे या काळात डेंग्यूचेही रुग्ण राज्यभर प्रचंड वाढले आहे. पण कोरोना रुग्णांचे प्रमाण भरमसाठ असल्याने डेंग्यू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळेल की नाही अशी भीती असते. मग हीच भीती ‘कॅश’ केली जाते. डेंग्यूचा  रुग्ण आढळल्यास त्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळवणे गरजेचे असते. मात्र, कोरोनाच्या गदारोळात डेंग्यूच्या रुग्णाला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने अशा रुग्णाची माहिती कळवण्यास डॉक्टरांकडूनच टाळाटाळ केली जाते. दुसरीकडे हेच डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या अहवालाचा दाखला देत पेशींची संख्या कमी झाल्याने डेंग्यू असण्याची शक्यता असल्याचे ठामपणे सांगताना दिसतात हे विशेष.

कोरोनाचा विषाणू माणसाच्या शरीर आणि मनात घर करतो. तर डेंग्यूचा डास केवळ माणसाच्या शरीरालाच चावतो. पण काही डॉक्टर्स माणसाच्या खिशालाच नव्हे तर त्याच्या विश्वासाला चावा घेत असल्याचे दुर्दैवी चित्र राज्यात सर्वत्र दिसतंय. अनेक ठिकाणी डेंग्यू विषाणूंची चाचणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नसताना काही डॉक्टर मात्र एनएस-१ ही प्राथमिक रक्त तपासणी अवघ्या पाच मिनिटांत करून मोकळे होतात. नियमानुसार डेंग्यूबाबतच्या रक्ततपासण्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतच केल्या जातात. त्यानंतर रुग्णाला डेंग्यू झाला किंवा नाही याचे निदान होते. प्रत्यक्षात मात्र या तपासणी अहवालाची वाट न पाहताच बहुतांश डॉक्टर एनएस-१ या रक्ततपासणीच्या आधारेच डेंग्यूचे निदान करतात. साधा ताप आला तरी डेंग्यूच्या भीतीपोटी रुग्ण गरज नसतानाही रुग्णालयात दाखल होतात. पहिल्या पाच दिवसांत एनएस-१ चाचणी घेतली की अहवाल पॉझिटिव्ह मिळतो. त्या आधारे डेंग्यू झाल्याचे जाहीर करून उपचार केले जातात. या चाचणीसाठी पाचशे ते आठशे रुपये आकारले जातात. खरे तर, एन.एस.१ चाचणीच्या आधारे कुणी डेंग्यूचे निदान करीत असेल तर तो गंभीर गुन्हा ठरू शकतो. पण रुग्णांच्या वैद्यकीय अज्ञानाचा फायदा घेत अशा चाचण्यांचे आधारे थेट निदान केले जाते. आयजीएम चाचणीत सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यास आणि प्लेटलेट्स ५० हजारांपर्यंत आल्यास डेंग्यूचे निदान होऊ शकते. मात्र, डेंग्यूविषयी समाजात निर्माण झालेल्या भीतीला ‘कॅश’ करण्याचे काम अनावश्यक तपासण्यांतून होत आहे. या आजारावरील उपचाराचा या मंडळींनी अक्षरश:‘धंदा’ मांडला आहे.

- Advertisement -

पैशाचा धंदा झाला की नितिमत्तेची सगळी गणिते कोलमडून पडतात. पैसा कमविणे हेच एक ध्येय ठरते आणि हे ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब मग निषिद्ध ठरत नाही. डेंग्यूच्या बाबतीतही तसेच होत आहे. डेंग्यूची शंका येताच संबंधित वैद्यकीय व्यवस्था रुग्णाच्या प्लेटलेट्सवर लक्ष केंद्रित करते. निरोगी व्यक्तींमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण दर प्रतिघनमिली लिटरमागे दीड ते चार लाख असते. ते घसरल्यास एक-दोन दिवसांआड तपासावे लागते. हे प्रमाण अचानक एक लाखांखाली गेले तर रोज हे प्रमाण बघावे लागते. हे प्रमाण सहसा सातव्या दिवसापासून बघावे लागते. साधारणत: सातव्या दिवसापासून प्लेटलेट्स काऊंट वाढू लागतो. गंभीर लक्षणे नसतानाही प्लेटलेट्स-काऊंट ५० हजारांपेक्षा कमी झाला तर रुग्णालयात दाखल व्हायला हवे. प्लेटलेट्सचे प्रमाण १० हजारांखाली घसरले तर प्लेटलेट्स दिल्या जातात. प्लेटलेट्सचे प्रमाण महत्त्वाचे असले तरी सर्व लक्ष केवळ त्यावरच केंद्रित करणे हेही चुकीचे आहे. पण प्लेटलेट्स थोड्याफार घटल्या की लगेचच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्वात गंभीर बाब म्हणजे रुग्णाचा आरोग्य विमा असला तर त्याला बहुतांश ठिकाणी दाखल करून घेतलेच जाते. किंबहुना आरोग्य विमा असलेल्या रुग्णांवर डेंग्यूच्या नावाने उपचार करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अर्थात आरोग्य विमा असल्यावर रुग्णही अ‍ॅडमीट होण्यासाठी स्वत: इच्छुक असतो.

डेंग्यूच्या अनेक रुग्णांना अशक्तपणा येतो. पण भरपूर पाणी, द्रवपदार्थ व विश्रांती यामुळे काही दिवसांनी तो जातो. काही डॉक्टर्स अशा रुग्णांना सलाईन लावतात. काही रुग्ण, आप्तेष्ट यांचा तसा दबाव असतो. खरे तर सलाईन म्हणजे फक्त निर्जंतूक मिठाचे पाणी असल्याने त्याने अशक्तपणा जात नाही. पण सलाईनने अशक्तपणा जातो, या गैरसमजाचा काही डॉक्टर्सही गैरफायदा घेताना दिसतात. तसेच आप्तेष्टांचा दबाव, विमा कंपन्यांचा कारभार यामुळेही काही डॉक्टर्स गरज नसताना सलाईन लावतात. रक्तदाब कमी होण्यासारखी गंभीर लक्षणे वा चिन्हे आढळली तर सलाईनची गरज असते. मात्र, रुग्णांमधील गैरसमज निघून गेल्यास आपले खिसे कसे भरले जाणार? हे सर्व थांबण्यासाठी याबाबतची समाजाची मानसिकता बदलायला हवी. डेंग्यूत एक टक्काच रुग्ण दगावतात हे प्रत्येकानेच लक्षात घ्यावे. किंबहुना डॉक्टरांनी अशा वेळी अधिक समजदार पालकाची भूमिका बजावणे अपेक्षित असते. वैद्यकीय पेशाला समृद्ध असा इतिहास आहे. सेवाभावी वृत्तीच्या लोकांनी या व्यवसायाला समाजात आदराचे स्थान प्राप्त करून दिले आहे. आजही सेवाभावी वृत्तीने काम करणारे काही डॉक्टर्स या पेशाची गरीमा उंचावीत आहेत. त्यातूनच वैद्यकीय पेशाविषयीचा विश्वास आजही दृढ आहे. मात्र, काही खिसाभरू डॉक्टर्स या विश्वासाला तडा देण्याचे, रुग्णाचे शोषण करण्याचे पद्धतशीरपणे काम करीत आहेत. कोणतीही व्यवस्था शोषणावर आधारित असली तर त्या व्यवस्थेचे भवितव्य कधीच उज्ज्वल असू शकत नाही. त्यामुळेच पैसा मिळविताना आपण कुणाचे अधिकार, कुणाचे हक्क अथवा कुणाला न्याय तर नाकारत नाही ना, याची काळजी घेतली जाणे आवश्यक ठरते. अन्यथा विनाश जवळ आलाच म्हणून समजा.

आधीच कोरोनाची हौस; त्यात डेंग्यूचा पाऊस
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -