शिवसेनेला संपवणारेच संपले!

सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागील 15 महिने ते राज्याचा गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही, ...तर शिवसेना दिसली नसती, अशी भाषा करण्याची वेळ भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आली. वास्तविक कोकणात येऊन शिवसेनेला आव्हान दिल्याने वरवर शांत असलेली शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा डोके वर काढणार यात वादच नाही. पण ज्या ज्या वेळी कुणीही शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यानंतर शिवसेना अधिक जोमाने वर आली हा इतिहास भाजपला, अमित शहांना पुन्हा एकदा नव्याने आठवावा लागेल. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करा, अशी विनंती करण्यासाठी हेच अमित शहा मातोश्रीवर गेले होते.

शिवसेना आणि महाराष्ट्र… महाराष्ट्र आणि शिवसेना… म्हटलं तर या चार साडेचार शब्दांचं एक अतूट नातं आहे. गुजरातपासून वेगळा होऊन महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश मुख्यमंत्री या नात्याने यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईत आणला आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने महाराष्ट्र नावारुपाला आला. बरोबर सहा वर्षानंतर 19 जून 1966 रोजी मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी एक संघटना नावारुपाला येते. बाळ केशव ठाकरे मुंबईच्या शिवाजी पार्कवर एका जाहीर सभेत मराठी माणसांसाठी स्थापन केलेल्या संघटनेचे नाव प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या तोंडातून शिवसेना असे पुढे येते. बाळ केशव ठाकरे यांनी उभारलेल्या या संघटनेच्या जोरावर बाळचे बाळासाहेब आणि शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते या इतिहासालाही 55 वर्षे होतील. एकीकडे आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे केले तर दुसरीकडे आगामी पाच वर्षातही शिवसेनाही 60 वर्षांची झालेली असेल. त्यामुळेच महाराष्ट्र आणि शिवसेनेचे एक नाते आहे आणि ते महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे हे नाकारता येणार नाही.

सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मागील 15 महिने ते राज्याचा गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही, …तर शिवसेना दिसली नसती, अशी भाषा करण्याची वेळ भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आली. वास्तविक कोकणात येऊन शिवसेनेला आव्हान दिल्याने वरवर शांत असलेली शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा डोके वर काढणार यात वादच नाही. पण ज्या ज्या वेळी कुणीही शिवसेना संपवण्याची भाषा केली त्यानंतर शिवसेना अधिक जोमाने वर आली हा इतिहास भाजपला, अमित शहांना पुन्हा एकदा नव्याने आठवावा लागेल.

यापूर्वीही अनेकदा शिवसेना संपवण्याची भाषा काँग्रेस, कम्युनिस्टांनी महाराष्ट्रात केली त्या दोन्ही पक्षांची राज्यात काय अवस्था आहे हे बघितल्यास कळेल की शिवसेनेला डिवचल्यावर नेत्यांपेक्षा शिवसैनिक अधिक त्वेषाने उठून कामाला लागतो आणि समोरच्याची दणाणून सोडतो. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांच्या, तर शिवसेना दिसली नसती… या वक्तव्यावर शाखाशाखात, चौकाचौकात प्रतिक्रिया उमटत असून, काहीही झाले तरी आम्ही काय आहोत हे दाखवण्याची वेळ आल्याची भावना शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. सध्याची शिवसेना कॉर्पोरेट, मतांसाठी गुजराती, जैन बांधवांच्या वळचणीला जाणारी दिसत असली तरी शिवसेनेचा भक्कम पाया असलेल्या ग्रामीण भागात मात्र आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांच्याच जोरावर बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेचे 2014 साली 63, 2019 च्या निवडणुकीत 56 आमदार निवडून कसे येतात हेच गमक अजून विरोधकांना कळलेले दिसत नाही.

१९७५ मध्ये काँग्रेसचे नेते रजनी पटेल आणि ९० च्या दशकात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा म्हणाले होते की, शिवसेना संपेल. तसेच पुण्यात काँग्रेसचे मोठे नाव असलेले सुरेश कलमाडीही असेच बरळले होते की, खंडाळ्याच्या पुढे शिवसेना दिसणार नाही. त्यांचीच रि ओढत पुन्हा २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील पुढील काही वर्षात शिवसेना संपलेली असेल असंच म्हटलं होतं. मात्र प्रत्येकवेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली आणि शिवसेनेच्या विरोधात बोलणारे कुठे गायब झाले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या रजनी पटेल यांनी काही संघटनांवर बंदी घालण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक यादी दिली. त्यात शिवसेनेचेही नाव होते. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांच्या मुंबईतील भेटीनंतर शिवसेनेचे नाव वगळण्यात आले, हा इतिहास भाजपवाल्यांना ठाऊक असायलाच हवा. त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेल्या मुरली देवरा यांनीही अशीच बडबड केली होती. मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेवर असलेला काँग्रेसचा हात जाऊन तिथे शिवसेनेचा भगवा फडकायला लागला. आज अडीच दशके शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आहे आणि महापौर शिवसेनेचाच आहे.

काँग्रेसचे पुण्यातील बडे नेते, ऑलिम्पिकवर दबदबा असलेले सुरेश कलमाडी यांनीही शिवसेना खंडाळा घाटाच्या पुढे दिसणार नाही असे वक्तव्य केल्याची आठवण नुकतीच शिवसेनेचे खासदार माजी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत यांनी करून दिली. शिवसेना हा केवळ मुंबई, ठाणे परिघातील पक्ष असल्याने खंडाळा घाटाच्या पुढे दिसणार नाही, असा पुणेरी टोला लगावला होता. मात्र आता कलमाडी यांचे अस्तित्व काँग्रेसमध्ये काय, पुण्यात तरी आहे का, असा प्रश्न आहे. सगळ्यात अलीकडे म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना संपलेली असेल असे वक्तव्य करीत आपल्याच पायावर धोंडा मारला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना साधे विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते आणि त्यांच्या मागे नावाला चार आमदारही उभे नसायचे हे याच महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेतून बडतर्फ केल्यानंतर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते राहिलेल्या नारायण राणे यांना मागील 15 वर्षांत शिवसेनेनंतर काँग्रेस आणि आता भाजपत नाइलाजास्तव जावे लागले. मात्र अजूनही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांच्यापासून चार हात लांबच आहे. दुसर्‍या बाजूला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आहेत.

शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, मात्र आता 15 वर्षानंतरही मनसेला राज्याच्या राजकारणात अजून पीच सापडलेले नाही. शिवसेनेला प्रमुख प्रतिस्पर्धी मानणारे नारायण राणे असूदे किंवा राज ठाकरे यांची मागील 15 वर्षात झालेली राजकीय पिछेहाट बघता आता भाजपनेही शिवसेनेलाच दुश्मन क्रमांक एक मानल्याने आता शिवसेना आणि भाजपात खरी लढाई सुरू झाली आहे.

भाजप बंद दाराआड काही करत नाही, जे करते ते खुलेआम, डंका वाजवून करते, असं म्हणत शिवसेनेवर तोफ डागणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतो, असा सवाल करत यापुढील रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या वागण्या-बोलण्यातून वैफल्य स्पष्टपणे दिसत आहे. महाराष्ट्रातून भाजपची सत्ता उलथवून टाकल्याचा शिवसेनेचा बाण काळजात घुसल्यानेच, आम्ही शिवसेनेच्या वाटेने गेलो असतो तर शिवसेनेचे अस्तित्वच उरले नसते, असा दावा शहा यांनी नुकताच कुडाळमध्ये नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी केल्याने दोन्ही पक्ष आमने सामने ठाकले आहेत.

अमित शहा यांनी शिवसेना व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत शिवसेनेने सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना तापी नदीत सोडले असा आरोप केला. मी शिवसेनेला बंद दाराआड कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं म्हणत आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला. त्यावर शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवर्‍या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असे महाराष्ट्राचा इतिहास सांगतो, असा पलटवार शिवसेनेने केल्याने आगामी काळात होणार्‍या महापालिका, नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने सामने असेल यात वाद नाही.

भाजपच्या वैफल्यग्रस्त होण्यामागे एकमेव कारण महाराष्ट्राची सत्ता गमावल्याची सल काही त्यांच्या मनातून जात नाही. भाजपाच्या वागण्या-बोलण्यातून आता वैफल्य स्पष्टपणे दिसते. याचे कारण म्हणजे सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप विरोधी पक्षात आणि तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळेच 105 भाजप आमदारांचे 150 आमदार कधी होतील हे कळणार नाही, असा युक्तीवाद विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. अगोदर महाविकास आघाडी सरकार एका महिन्यात, मग सहा महिन्यात नंतर एका वर्षात पडेल, अशा पोकळ घोषणा आणि तारखा देणारे भाजप नेते तोंडावर पडले आहेत. त्यानंतर बिहारच्या निवडणुकीचा मुहुर्त, आता पश्चिम बंगालच्या एप्रिल महिन्यात होणार्‍या निवडणुकीनंतर मे महिन्यात सरकार पडेल, अशा नवीन तारखा भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहेत. भाजपकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी हरएक प्रयत्न झाले व सुरूच आहेत. आता तर शिवसेना संपवण्याची भाषा भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांनी केल्याने आता खर्‍या अर्थाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चालून आलेली ही संधी आहे. कारण जेव्हा जेव्हा शिवसेनेला डिवचले जाते तेव्हा तेव्हा शिवसैनिक उसळून उठतो आणि इतिहास घडवतो. बेताल राज्यकर्त्यांना आणि शिवसेनेच्या मुळावर उठलेल्यांना वेसण घालण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते.