घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअनिल देशमुख आले, परमबीर सिंह कधी येणार?

अनिल देशमुख आले, परमबीर सिंह कधी येणार?

Subscribe

ईडीने माझ्या कुटुंबीयांच्या घरांवरही छापे टाकले. पण या संपूर्ण प्रकरणात ईडीला सहकार्य केल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एकूणच तपास यंत्रणांना गेले अनेक दिवस सापडत नसलेले अनिल देशमुख सोमवारी अचानक ईडीसमोर येणं हा केवळ योगायोग होता, की यामागेही काही रणनीती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सचिन वाझेची कस्टडी आणि अनिल देशमुख यांची हजेरी या दोन्ही प्रकरणात एकच कॉमन लिंक आहे, ती म्हणजे खंडणी प्रकरण. आता खुद्द अनिल देशमुख यांनीच आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिवाळीच्या तोंडावरच ड्रग्स कनेक्शनमध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गौप्यस्फोट, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीसमोर हजेरी, मुंबई पोलिसांकडून सचिन वाझेची कस्टडी, किरीट सोमय्यांचा अजित पवारांवरील आरोप, दिवाळीनंतरच्या बॉम्बचे फडणवीसांचे संकेत अशा अनेक गोष्टी आजच्या एकाच दिवसात स्पष्ट झाल्या. पण या सगळ्या घटनाक्रमात सगळ्याच गोष्टी अचानकपणे घडून आलेल्या नाहीत. अनेक गोष्टी या अतिशय पूर्वनियोजित आहेत. तर काही गोष्टी या ठरलेल्या रणनीतीचा भाग म्हणून समोर येत आहेत. विरोधकांकडूनही या सगळ्या घटनांना त्याच पद्धतीने परतवून लावण्याचा प्रयत्न होतोय खरा. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोकाला गेलेले संघर्ष हा आजच्या रिव्हरमार्चच्या गाण्याच्या निमित्ताने समोर आला. देवेंद्र फडणवीस यांनाच थेट राष्ट्रवादीने आव्हान दिल्याने आता सत्ता टिकवण्याच्या आणि पलटवण्याच्या खर्‍या वॉरला सुरुवात झाली आहे. त्यातलेच काही योगायोग हे सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहेत हे नक्की.

गोरेगावच्या एका प्रकरणात सचिन वाझे याच्याविरोधात काही दिवसांपूर्वी तक्रार झाली होती. या तक्रारीची चर्चा झाली होती खरी, पण इतक्या दिवसात मात्र काहीच कारवाई झाली नव्हती. गुन्हे शाखेकडून परमबीर सिंह यांच्या वाळकेश्वर येथील घरी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, परमबीर सिंह त्या ठिकाणी नसल्यामुळे दाराला समन्स चिटकवण्यात आले होते. दरम्यान, गुन्हे शाखेने एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज करून खंडणीच्या गुन्ह्यात वाझेचा ताबा मागितला होता. विशेष न्यायालयाने गुन्हे शाखेला वाझेचा ताबा घेण्याची परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखेने सोमवारी तळोजा तुरुंगातून वाझेचा ताबा घेतला आहे. वाझेला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. वाझेला सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली आहे. दुसरीकडे खंडणीच्या प्रकरणात तपास यंत्रणांना हवे असलेले अनिल देशमुख हे एकाएकी तपास यंत्रणांसमोर हजर झाले. मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले.

- Advertisement -

ईडीच्या प्रत्येक समन्सला उत्तर दिले असल्याचा दावा देशमुख यांनी केला. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही मी या प्रकरणात दाद मागितल्याचा दावा देशमुख यांनी केला. या प्रकरणात ईडीने माझ्या कुटुंबीयांच्या घरांवरही छापे टाकले. पण या संपूर्ण प्रकरणात ईडीला सहकार्य केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. एकूणच तपास यंत्रणांना गेली अनेक दिवस सापडत नसलेले अनिल देशमुख ईडीसमोर येणं हा केवळ योगायोग होता, की यामागेही काही रणनीती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सचिन वाझेची कस्टडी आणि अनिल देशमुख यांची हजेरी या दोन्ही प्रकरणात एकच कॉमन लिंक आहे, ती म्हणजे खंडणी प्रकरण. आता खुद्द अनिल देशमुख यांनीच आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल केला आहे.

औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्याचा विसर पडता कामा नये. अनेकदा कोर्टात जाऊन आयुष्य निघून जाते. पण अनेक प्रकरणात तक्रारदार गायब आहेत, तरीही केसेस सुरू आहेत, असेही पहायला मिळत आहे. फक्त आरोप केलेत आणि खोदत रहा, असेही अनेकदा अनुभवायला मिळते असे सांगत त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला. तक्रारदार गायब आहेत, पण आरोप केलेत म्हणून खणून काढायचे काम सुरू आहे. त्यामुळेच चौकशा आणि धाडसत्र सुरू आहे. परमबीर सिंह यांचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यावर टीका केली. याच लाईनवर आता माजी गृहमंत्रीही बोलत आहेत. आरोप करणारे परमबीर सिंह कुठे आहेत? असाच प्रश्न मुख्यमंत्र्यांशी मिळता जुळताच अनिल देशमुख यांनीही केला आहे. राज्याचे गृहमंत्रीपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळचे बडे नेते कामाला लागले आहेत.

- Advertisement -

एकीकडे राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांच्या बाबतीत सेफ गेम खेळत ईडीसमोर देशमुखांना हजर केले आहे खरे. पण आता परमबीर सिंह यांची हजेरीची वेळ आहे, असे सांगत एकप्रकारे राष्ट्रवादीने भाजपला थेट आव्हान दिले आहे. भाजपच्या मदतीनेच परमबीर सिंह यांनी भारताबाहेर पळ काढला अशाही चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या. त्यामुळेच परमबीर सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून तसेच मुंबई गुन्हे शाखेकडून खंडणी प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबईतील तसेच चंदीगढ येथील घरावरही तपास यंत्रणांनी चौकशी केली आहे. पण त्याठिकाणी परमबीर सिंह नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळेच तपास यंत्रणांच्या संशयानुसार बनावट पासपोर्टच्या आधारे परमबीर सिंह हे भारताबाहेर पळाले असल्याची शक्यता काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती. त्यामुळेच परमबीर सिंह या प्रकरणात हजर राहणार का? की त्यांच्याशिवायच या प्रकरणाची चौकशी संपणार? असे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

परमबीर सिंह यांना भारताबाहेर घालवण्यात भाजपचा हात असल्याचीही चर्चा झाली होती. भाजप परमबीर सिंह यांचा पत्ता योग्यवेळी बाहेर काढणार का? हादेखील प्रश्न आहे. त्यामुळेच भाजपच्या रडारवर आता राष्ट्रवादीचे नेते सर्वाधिक आहेत. जितेंद्र आव्हाड प्रकरणानंतर आता नवाब मलिकांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. भाजपकडून अजित पवारांना एकीकडे बेहिशोबी मालमत्तेसाठी टार्गेट केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री हे राष्ट्रवादीच्या रडारवर आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचे किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या नवाब मलिक यांनी थेट महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना शिंगावर घेतले आहे. त्यामुळेच फडणवीस यांच्या दाव्यानुसार दिवाळीनंतरचा धमाका काय असणार हेदेखील लवकरच स्पष्ट होईल. पण किरीट सोमय्यांनी केलेल्या दाव्यानुसार हे सगळं पवार, ठाकरेंच्या इशार्‍यावर सुरू आहे, हे जर खरं असेल तर आता सत्तासंघर्षाच्या अटीतटीच्या लढाईचे बिगुल वाजले हे म्हणायला हरकत नाही. फडणवीसांचे महत्वाकांशी असे भाजपमधील नेतृत्व पाहता ते त्यांच्या वाट्याला आलेली ही संधी नक्कीच सोडणार नाहीत.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि धर्माच्या निमित्ताने झालेल्या आरोपांमुळे एकीकडे वैयक्तिक आयुष्यात नवाब मलिकांनी आरोप केल्याची चर्चा एकीकडे झाली. पण रिव्हर मार्चच्या गाण्याच्या माध्यमातून आता थेट भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे फडणवीस हा वार खाली जाऊ देणार नाहीत. त्याची सुरुवातच अजित पवार यांच्यावर झालेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या चर्चेने झाली आहे. किरीट सोमय्यांनी पवार कुटुंबीयांच्या जावयांच्या नावे कोट्यवधी रूपये ट्रान्सफर केल्याचा आरोप करत दिवाळीतला पहिला बॉम्ब फोडला खरा. पण आता नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड कनेक्शनचे पुरावे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना देणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

खुद्द पवारांवरही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप बाळासाहेबांनी केल्याची आठवण किरीट सोमय्यांनी करून दिली आहे. त्यामध्येच फडणवीस नवाब मलिकांविरोधात नेमका किती शक्तीशाली दारूगोळा आणणार यावर नवाब मलिकांच्या यापुढच्या काळातील पिक्चरचा क्लायमॅक्स ठरणार आहे. फडणवीस आणि शरद पवारांमधील गेल्या काही दिवसांतील आरोप प्रत्यारोपांचे सत्र पाहता, या प्रकरणात फडणवीसांविरोधात शरद पवारही सज्ज राहणार यात शंका नाही. नवाब मलिक यांनी इंटरवलपर्यंत आणलेला यापुढचा पिक्चर कसा असणार हे कोडं सध्या तरी एखाद्या गुपितासारखंच आहे. नवाब मलिकांनी सुरुवात केली आहे, या प्रकरणाला अंतापर्यंत न्यावेच लागेल, असाही इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील यापुढच्या काळातील संघर्ष टोकाचा होणार हे मात्र नक्की.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -