घरफिचर्समायमहानगर ब्लॉगविनाश काले विपरित बुद्धी..!

विनाश काले विपरित बुद्धी..!

Subscribe

कोविड निमित्ताने बंद असलेली उपनगरी रेल्वे सुरू करणे, जीएसटीचा परतावा, आणि मेट्रो कारशेड व्यवस्था मिठागराच्या जागेत करणे यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मतभेद सुरू आहेत. ते प्रशासकीय आणि राजकीय होते, परंतु अर्णब गोस्वामी या प्रकरणाने या सगळ्यांना एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या आदेशाने त्यांचे विरोधक आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांना मध्यरात्रीच्या काळोखात पोलिसांनी गाढ झोपेत असताना ज्या पद्धतीत उचलून नेलं. त्यानंतर करुणानिधी यांना एक वेगळी सहानुभूती मिळाली. तीच गोष्ट इथेही होताना दिसत आहे.

भाजपचे खासदार आणि नेते नारायण राणे यांनी दसर्‍यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांची टीका नेहमीचीच होती. नवीन मुद्दा म्हणून राणेंनी उध्दव यांचे चिरंजीव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. मात्र त्या आरोपातील तथ्य राणे पत्रकारांसमोर मांडू शकले नाहीत की पुरावे देऊ शकले नाहीत. राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर मी शिवसेनेच्या तीन प्रमुख नेत्यांना फोन केला आणि प्रतिक्रियेच्या मुलाखतीसाठी विचारणा केली. हे तिन्ही बडे नेते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सध्या निकटवर्तीय आहेत. या तिघांनी राणेंच्या टीकेनंतर बोलण्यास नकार देताना यापैकी दोन नेत्यांना राणे आपल्यावरती घसरू नयेत याचीच चिंता होती. या शिवसेना नेत्यांची भीती मी समजू शकतो, कारण राणेंचा घणाघात हा पुरावे, कागदपत्रे आणि नेमक्या माहितीसह असतो.

पण त्यादिवशीचा त्यांचा परफॉर्मन्स खूपच वाईट होता. याचं कारण शरद पवारांच्या तोडीचं राजकीय गुप्तचर व्यवस्थापन कोणाकडे असेल तर ते नारायण राणेंकडे आहे असं माझं निरीक्षण आहे. पण पत्रकारांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे आत्महत्या असा एम्सने दिलेला अहवाल राणेंना ऐकवला त्यावर त्यांनी दिलेली उत्तरं खूपच वेळ मारून नेणारी होती. याच नारायण राणे यांनी सरकार अकरा दिवसांत पडेल इथपासून ते दिवाळीच्या आधी सरकारचा खेळ आटपेल इथपर्यंतची विधाने केली होती. प्रत्यक्षात असं काही होतच नाहीये. दिवसागणिक सरकार स्थिर होताना पाहायला मिळतंय आणि त्याचा कारभारही सुधारतोय. यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असले तरी त्यांच्या कौशल्या बरोबरच त्यांना असलेली दोन वयस्कर सल्लागारांची साथ खूपच महत्वाची आहे. त्यातले एक आहेत शरद पवार आणि दुसरे आहेत अजोय मेहता.

- Advertisement -

साठ वर्षांचे अजोय मेहता आणि ऐंशी वर्षाचे शरद पवार या दोघांमध्ये असलेला ताळमेळ आणि उध्दव ठाकरे यांच्यावरची त्यांची पकड यामुळे सरकारला धोका दिसत नाही. जी गोष्ट राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्याबाबतीत घडली. त्यानंतर एखाद्या नेत्याच्या मागे जाण्याचा आमदारांचा कल महाराष्ट्रातही दिसत नाही. त्यातूनही सरकार पाडण्यासाठी किमान 60 आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. ते शक्य नाहीय. हे बघून भाजपशी एकनिष्ठ असलेले आमदार आणि नेते आता सत्ताधार्‍यांच्या हाती लागायला सुरुवात झाली आहे. भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाल्यावर त्यांच्या पाठोपाठ मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या शिवबंधनात अडकल्या. हे सरकार स्थिरावते आहे याचे संकेत देणारं होतं.

दुसर्‍या बाजूला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या बिनीच्या नेत्यांचा फोकस हलत असतानाच आणि ‘लंबे समय की देरी’ भाजपच्या वाट्याला येतेय असं वाटत असतानाच मुंबई पोलिसांचे प्रमुख परमवीर सिंग आणि पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांच्याकडून अशी काय चूक घडली की सरकारच तोंडावर पडलं. बुधवारी सकाळी रिपब्लिक टीव्हीचे समूह संपादक अर्णब गोस्वामी यांना इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येच्या जुन्या प्रकरणात भल्या सकाळी ज्याप्रमाणे घरातून ‘उचलण्यात’ आले ते पाहता उध्दव ठाकरे यांच्या खुर्चीखाली कुणाला तरी रस्सीबॉम्ब लावायचा आहे किंवा कुणाची तरी मनमानी मुख्यमंत्री ठाकरेंच्या नकळत सुरू आहे, असंच चित्र पहायला मिळालं. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या मध्य मुंबईतल्या गणपतराव कदम मार्गावरील आलिशान इमारतीच्या 17 व्या मजल्यावरील घरातून ज्या पध्दतीने पोलिसांनी आपल्या गाडीत कोंबलं. त्यामुळे अर्णब बर्‍याचदा चुकीचे असूनही त्यांना सहानुभूती मिळाली आहे. तीन तासांतच सव्वालाख लोकांनी ट्विटरवर अर्णब अटकेवर आपलं मतप्रदर्शन केलं. अर्णब गोस्वामी यांनी आणि त्यांच्या इंग्रजी- हिंदी चॅनेल्सनी सुशांत सिंह राजपूतच्या 14 जूनच्या आत्महत्येनंतर ज्या पध्दतीची बटबटीत पत्रकारिता केली त्यामुळे माध्यमांच्या दुनियेत ते एकटे पडले होते. त्या पाठोपाठ आलेल्या टीआरपी घोटाळा रिपब्लिक टीव्हीच्या अंगाशी आला होता. पण बुधवारी परमवीर सिंह यांच्या पोलिसांनी अर्णबची गचांडी वळली आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कारवाईची पध्दत चुकीचं असल्याचं म्हटलंय.

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची शब्दनिवड चुकीची म्हणणारे गृहमंत्री अमित शहा यांनीही आणीबाणीची आठवण देणारी प्रतिक्रिया दिली आणि लगोलग रणरणत्या उन्हात भाजपाने मंत्रालयासमोर निषेध धरणे सुरू केलं. ही जरी एक घटना असली तरी त्यामुळे काहीसा सुस्तावलेला आणि शांत झालेला भाजप आणि बिहार निवडणुकीमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे महाराष्ट्राकडे काहीसं दुर्लक्ष करणारे भाजपचे दिल्लीश्वर या अटकेने पुन्हा एकदा सक्रिय झालेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका, बिहार निवडणूक, मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारणात व्यस्त असलेल्या दिल्लीच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा आपला चष्मा सरसावत नजरा रोखल्या आहेत. ठाकरे कुटुंबाबद्दल दबक्या आवाजात राजकीय नेते दिल्लीतल्या संस्थांकडे असलेल्या तक्रारींबद्दल बोलत असले तरी भाजपच्या श्रेष्ठींनी कुठलाही नियमबाह्य त्रास आपल्या जुन्या मित्राला अजूनही दिलेला नाही.

मात्र उध्दव ठाकरे आणि त्यांना सल्ला देणार्‍या सल्लागारांकडून अर्णब गोस्वामी यांना उचलताना जी पद्धत आणि घाई करण्यात आली त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात आग ओकायला गोस्वामी आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. कोविड निमित्ताने बंद असलेली उपनगरी रेल्वे सुरू करणे, जीएसटीचा परतावा, आणि मेट्रो कारशेड व्यवस्था मिठागराच्या जागेत करणे यावरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मतभेद सुरू आहेत. ते प्रशासकीय आणि राजकीय होते, परंतु अर्णब गोस्वामी या प्रकरणाने या सगळ्यांना एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या आदेशाने त्यांचे विरोधक आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांना मध्यरात्रीच्या काळोखात पोलिसांनी गाढ झोपेत असताना ज्या पद्धतीत उचलून नेलं. त्यानंतर करुणानिधी यांना एक वेगळी सहानुभूती मिळाली. तीच गोष्ट इथेही होताना दिसत आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांना कायदेशीर कचाट्यात भाजपला अडकवायचं आहे. त्यांनी त्यांची व्यूहरचना पण पूर्णत: कायदेशीर नियमांच्या चौकटीत पूर्ण केली आहे. सत्तेचं सर्वोच्च पंतप्रधानपद हातात असताना ठाकरे सरकारसारखी घाई मोदी यांनाही करता आली असती, पण त्यामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला सहानुभूतीचा आधार मिळून एक वेगळी ऊर्जा मिळाली असती आणि ते मोदी आणि शहा यांना कधीही रुचणारं नव्हतं. जी गोष्ट संयमानं सोनिया गांधी यांच्याबद्दल करण्यात येत होती ती गोष्ट ठाकरे आणि परमवीर सिंह यांना गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही यांच्याविरोधात का करता आला नाही? हाच खरा प्रश्न आहे. बुधवारच्या सकाळच्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाले ती म्हणजे उध्दव ठाकरे यांना कोणीतरी चुकीचा सल्ला देतायत किंवा त्यांनी चुकीची पावले उचलण्यासाठी त्यांना कुणीतरी भरीस घालतेय. उध्दव ठाकरे यांचा स्वभाव मुळीच आक्रस्ताळा नाही तरी अर्णबच्या अटकेनं ते खुनशीपणे वागतायत की त्यांची कुणी फरफट करतेय हेही पहावं लागेल. अर्णब यांच्या अटकेसाठी निवडण्यात आलेली वेळ आणि पध्दत सपशेल चुकली आहे. हे भीष्माचार्य शरद पवारांना माहिती नव्हतं की पोलिसांना चूक करायला त्यांनीच भाग पाडलंय? हे सगळे प्रश्न स्थिर होत असलेल्या सरकारला अस्थिरतेकडे घेऊन जाणारे आहेत. त्याचवेळी अर्णबसारख्या नावडत्या पत्रकार-संपादकाच्या पाठीशी माध्यमकर्मींचा पाठिंबा उभा करण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. परमवीर सिंह हे आपले व्यक्तिगत हिशेब चुकवायला गेलेत, त्याची किंमत मात्र ठाकरे पिता-पुत्रांना आणि त्यांच्या शिवसेनेला चुकवायला लागेल असं चित्रं सध्यातरी दिसतंय. पोलीस आणि सरकार यांना ‘विनाश काले विपरित बुद्धी’ झाली आहे असंच खेदानं म्हणावं लागतंय!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -