Eco friendly bappa Competition
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग जनमनात 'कालमुद्रा' उमटवणारा अधिकारी म्हणजे डॉ. भाऊसाहेब दांगडे

जनमनात ‘कालमुद्रा’ उमटवणारा अधिकारी म्हणजे डॉ. भाऊसाहेब दांगडे

Subscribe

डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची समर्थपणे धुरा सांभाळली. आता ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्त झाले आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा आणि जिल्हा परिषदेच्या सेवाकाळाचा समग्र आढावा घेणार हा लेख.

पंकज दिनेश चव्हाण

ही कहाणी आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या गेल्या 1 वर्ष 7 महिने 15 दिवसांची. पाहायला गेलं तर हा काळाचा तुकडा अगदीच नगण्य. पण एवढ्या अल्प काळातही आपल्या कामानं जनमानसाच्या पटलावर कालमुद्रा उमटवता येते, हे दाखवून देणारा हा काळ. आणि या काळाचे नायक आहेत, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची, धुरा समर्थपणे सांभाळलेले डॉ. भाऊसाहेब दांगडे!

- Advertisement -

कोविडच्या दुसऱ्या लाटेचे आव्हान उभे ठाकलेले असताना, 2020 सालच्या नोव्हेंबरमध्ये, डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा, कार्यभार हाती घेतला. आपल्या अनुभवाच्या आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर, त्यांनी जिल्ह्यातील कोविड साथ नियंत्रणात आणली, आणि जिल्हा परिषदेच्या कामांना गती दिली.

अगडबंब पसरलेला ठाणे जिल्हा. त्यात कोरोना महामारीचे अवघड आव्हान. त्यामुळे मंदावलेला अर्थगाडा. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत आणीबाणीची परिस्थिती. पण हे चित्र डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अल्पावधीतच पालटून टाकले. ते आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं – ही लोकम्हण डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याबाबतीत तंतोतत खरी ठरली.

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये, डॉ. भाऊसाहेब दांगडे हे, ठाणे जिल्हा परिषदेचे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. तोवर कोविडची पहिली लाट ओसरून जनजीवन सुरळीत होते आहे, तोच दुसऱ्या लाटेची मगरमिठी आवळली जात होती. जिल्हा परिषदेसमोर दुसरी लाट लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचे आव्हान होते. स्वत: पशुवैद्यक असल्यामुळे आरोग्य क्षेत्राची डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना पार्श्वभूमी आहे. त्यामुळे कोरोनाचे आव्हान त्यांनी लीलया पेलले. जनसंपर्क कक्षाच्या माध्यमातून कोरोनाविषयी गावागावांत कल्पकतेने जनजागृती केली. तसेच प्रत्येक तालुक्यात कोविड दक्षता केंद्र उभारले. यातल्या गोठेघर कोविड केंद्राचा विशेष उल्लेख करावा लागेल. शिवाय लसीकरणाच्या मोहिमेला त्यांनी गती दिली. स्वत: मैदानात उतरून कोरोना आघाडीवरील सर्व समस्यांचा सामना केला. यामुळे आपली काळजी घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याचे समाधान जनसामान्यांमध्ये व्यक्त झाले.

एकीकडे कोविडची लढाई सुरू होतीच पण दुसरीकडे विकासात्मक कामाचा धडकाही त्यांनी सुरू केला होता. त्यासाठी नियमितपणे विभाग प्रमुख/गट विकास अधिकारी यांच्या साप्ताहिक आढावा बैठका घेऊन कामांना गती देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या कार्यकाळात जनसुविधा, नागरी सुविधा आणि तिर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ७३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झाला. तसेच मालमत्ता सर्वेक्षणात जिल्हा परिषदेच्या तब्बल 9,477 स्थावर-जंगम मालमत्तांचे एकत्रीकरण करून अद्ययावत दस्तावेजीकरण करण्यात आले.

महिला व बालकल्याण विभागासाठी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी रचनात्मक कार्य उभारले. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार, बाळंत विडा, पोषक वडी, झोळीमुक्त अभियान स्मार्ट अंगणवाडी यांसारखे उल्लेखनीय उपक्रम त्यांच्या कार्यकाळात राबवले गेले. तसेच ‘उमंग’, ‘दप्तरालय’, ‘एक गाव-एक ग्रंथालय’ यांसारख्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांद्वारे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शैक्षणीक प्रगतीला चालना दिली.

समाजकल्याण विभागामार्फत वंचित, दुर्बल, दिव्यांग घटकांसाठी जिल्हा परिषद सेसमधून विविध योजना राबवत सर्वसमावेशक विकासाची प्रक्रिया त्यांनी राबवली. त्यांच्या कार्यकाळात सुमारे 22 लाख इतका सशस्त्र ध्वजनिधी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. शिवस्वराज्य दिन साजरा करत सर्वसामान्यांसाठी प्रशासन कार्यरत असल्याचा संदेश त्यांनी जनमानसात रुजवला.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ गावागावांमध्ये पोहोचवला. उदाहरणार्थ स्वच्छ भारत मिशन. यामार्फत ठाणे जिल्ह्यातील 2 लाख 7 हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यात आला आहे. त्यांच्याच कार्यकाळात ठाणे जिल्हयाला सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात राज्यात प्रथम क्रमाकांचे मानांकन प्राप्त झाले.

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन या योजनेद्वारे गावातील प्रत्येक कुटुंबाला दररोज दरडोई ५५ लीटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तसेच जिल्हात १ लाख ४३ हजार २५४ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली आहे.

लघु पाटबंधारे विभागाची कामांनादेखील डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या कार्यकाळात गती मिळाली. त्यामुळे 214 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांअंतर्गत महाआवास अभियानात ३ हजार ३०३ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्ह्याने राज्यात तिसरा आणि कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला.

करोना काळात मनरेगा योजनेद्वारे अनेक कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून देत योजना प्रभावीपणे राबवली. यामुळें बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले. आणि श्रमाचे हक्काचे मानधानही.

जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवत, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचेही प्रश्न मार्गी लावत, सर्व संवर्गाच्या पदोन्नती, वरिष्ठ वेतनश्रेणी दिल्या तसेच 946 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना यांसारखे लाभ त्यांनी मंजूर केले. तसेच अपंग सेवा जेष्ठता यादी, मैल कामगारांनाही लाभ मिळवून दिले. मागील काही वर्षांपासून रखडलेली अनुकंपा भरती सुरू करून मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांनी न्याय मिळवून दिला. अशा 29 उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषद सेवेमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. इतकेच नाही, तर विकल्पविपरित कर्मचाऱ्यांना परत आपल्या जिल्ह्यात सामावून घेण्याकरिता आवश्यक सर्व कार्यवाही डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली.

डॉ. भाऊसाहेब दांगडे हे ग्रामीण पार्श्वभूमीतून आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेती-भातीची त्यांना उत्तम जाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी आणि पशूसंवर्धनाच्या कामांना त्यांनी गती दिली. विशेषतः जिल्हा परिषद सेस योजनेतून त्यांनी कृषी विभागामार्फत तब्बल 18 थेट लाभ हस्तांतरण योजना राबवल्या. तसेच पशूपालकांसाठी देखील पशूसंवर्धन विभागाच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजना राबवल्या.

हे सर्व करताना, जिल्हा परिषदेचा आर्थिक तोल मात्र त्यांनी ढासळू दिला नाही. कोरोनाकाळातही जिल्हा परिषदेची आर्थिक घडी न विस्कटू देता केलेल्या कारभारामुळेच 100 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय भरारी जिल्हा परिषदेला घेता आली. याच कालखंडात त्यांच्याकडे स्टेमचाही व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. ही जबाबदारी देखील त्यांनी लीलया पेलली. काही वर्षात जिल्हा परिषदेची बारा मजली भव्य दिव्य प्रशासकीय इमारत उभी राहील. या इमारतीच्या प्रशासकीय परवानग्या मिळण्यासाठी त्यांनी केलेली धडपड महत्वाची आहे.

असे हे कुशल नेतृत्व कुटुंबप्रमुख म्हणून जिल्हा परिषदेला लाभले. त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, नियोजनबद्ध कामाची पद्धत आणि या साऱ्यामागे जनहिताची, जनसेवेची, जनकल्याणाची तळमळ असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रशासनाचा चेहरा अधिक मानवी झाला. लोकप्रतिनिधींशीही त्यांचे संबंध सलोख्याचे राहिले. गिर्यारोहक असलेले डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तरुणांना लाजवेल असा दांडहा उत्साह आहे. चैतन्याने सळसळणारे हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकात चैतन्याचा अंश पेरणारे आहे. याचा अनुभव ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहेच. यापुढे ते जिथे जिथे जातील तिथे तिथे ही चैतन्याची दीपमाळ प्रज्वलीत करत जातील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून मन:पूर्वक शुभेच्छा!

(लेखक हे ठाण्यातील जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

- Advertisment -