शेअर बाजार म्हणजे जुगाराचा अड्डा नव्हे !

शेअर्स आणि म्युच्युअल फंडामधील दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यातील तुमची आर्थिक समस्या नक्कीच मिटवू शकेल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आपण कचरतो. कारण आपल्या मनात बसले आहे की, शेअर बाजार म्हणजे जुगार. काही लोक नशिबावर हवाला ठेवूनही म्हणतात, नशीब नव्हते म्हणून मला तोटा झाला. पण शेअर बाजार म्हणजे निव्वळ जुगार हा समज मानणे याला मी अंधश्रद्धा म्हणतो. कारण या बाजाराविषयी अगदी प्राथमिक माहितीही आपल्याला नसते. फक्त सांगोवांगी आपण इतरांचे ऐकून या गुंतवणूकीच्या अगदी छप्पर फाडके रिटर्न देणार्‍या पर्यायापासून लांब राहतो.

आपणा सर्वांच्या दृष्टीने शेअर बाजार हा एक गुंतवणुकीचा दुर्लक्षित पर्याय बनलेला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक कुठे आणि कशी करायची याची माहिती बहुतांशी लोकांना नसते. त्यामुळे हा बाजार म्हणजे खूप किचकट, अवघड आणि तो आपल्यासाठी नाही असा आपल्या सर्व मध्यमवर्गियांचा एक समज आहे. पण आज शेअर बाजार तुमच्या दाराशी किंबहुना हाताशी आला आहे. आपल्या हातात असणार्‍या या मोबाईलमार्फत आज आपण एका क्लिकसरशी शेअर बाजारात शेअर्स खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो.

शेअर बाजारात गुंतवणूक का करायची? गेल्या काही वर्षांमध्ये कनिष्ट वर्ग मध्यम वर्ग बनला. तर मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग बनला. बर्‍यापैकी लोकांच्या हाती पैसा खेळू लागला आहे. पण जसा पैसा येऊ लागला तशा आपल्या गरजाही वाढल्या. सायकलवरून दुचाकी, दुचाकीवरून चारचाकी हा प्रवासही वेगाने झाला. पण महागाईही तशीच वाढत गेली. आज महागाई दरवर्षी 6 ते 7 टक्क्यांनी वाढते. सर्वच वस्तूंचे भाव दरवर्षी वाढतात. शिक्षणही महाग झाले आहे. लग्न, उच्च शिक्षण या आतापासूनच तरतूद करणे आवश्यक झाले आहे. पुढच्या 15 ते 20 वर्षांचा विचार करता आजच्या 10 रुपयांची किंमत 100 रूपये झालेली असेल. मग अशा परिस्थितीत आपण आज करत असलेली गुंतवणूक या वाढत्या महागाईच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक आपला परतावा देऊ शकेल याचा विचार आता सर्वांनी गांभीर्याने करायला हवा.

आतापर्यंत तुम्ही आम्ही आपल्या गरजा भागवून जी काही शिल्लक उरेल ती बँका, पोस्ट ऑफिसमध्ये ठेवत आलो आहोत. आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या बँकांमध्ये एफडीही असतील. एलआयसीमध्येही आपली गुंतवणूक असते. पण आपण बँका, पोस्ट, एलआयसी यामध्ये करत असलेली गुंतवणूक आपल्याला चांगला परतावा देऊ शकते हा प्रश्न विचारल्यास याचे उत्तर नाहीच असे असेल. कारण आज बँका ठेवींवर देत असलेल्या व्याजाचा विचार करता यापेक्षाही कितीतरी पट अगदी छप्पर फाडके परतावा देण्याची क्षमता शेअर बाजारामध्ये आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंडामधील दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यातील तुमची आर्थिक समस्या नक्कीच मिटवू शकेल.

या पारंपरिक गुंतवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त आपल्याला गुंतवणुकीच्या इतर मार्गांची माहिती नसते. अशी माहिती काहींना असली तरी ती कशी वापरायची याची माहिती नव्हती. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आपण कचरतो. कारण आपल्या मनात बसले आहे की, शेअर बाजार म्हणजे जुगार. काही लोक नशिबावर हवाला ठेवूनही म्हणतात, नशीब नव्हते म्हणून मला तोटा झाला. पण शेअर बाजार म्हणजे निव्वळ जुगार हा समज मानणे याला मी अंधश्रद्धा म्हणतो. कारण या बाजाराविषयी अगदी प्राथमिक माहितीही आपल्याला नसते. फक्त सांगोपांगी आपण इतरांचे ऐकून या गुंतवणूकीच्या अगदी छप्पर फाडके रिटर्न देणार्‍या पर्यायापासून आपण लांब राहतो.

महागाईच्या तुलनेत अधिक रिटर्न : आज महागाई दर वर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढते. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पण त्या तुलनेत आपल्या गुंतवणुकीचे रिटर्न खूपच कमी आहेत. बँकांमध्ये बहुतांशी आपण गुंतवणूक केलेली असते. पण त्यातून मिळणारे रिटर्न खूपच कमी आहेत. गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून बर्‍याच जणांनी एलआयसीमध्ये पॉलिसी असते. पण आज एलआयसीमधून फक्त साडे पाच ते सहा टक्के रिटर्न मिळतात. पण त्या तुलनेत शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमधून तीन ते चार पट अधिक सहज रिटर्न मिळतील.

जर ही गुंतवणूक 10, 15, 20 अशा वर्षासाठी असेल तर यातून मिळणारे रिटर्न पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. काही म्युच्युअल फंड सरासरी वर्षाला 15 ते 20 टक्के परतावा सहज देतात. काही फंड त्यापेक्षाही अधिक. आज घेतलेल्या एका चांगल्या कंपनीच्या शेअर्सचा भाव आणखी पाच ते दहा वर्षांनी नक्कीच जास्त असेल. 1995 साली ज्यांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असेल त्यांच्या या पैशाची किंमत आता 20 वर्षानंतर 40 लाख रुपये झाली आहे. म्हणजे विचार करा कितीपट रिटर्न. भविष्याच्या खर्चाचा आढावा घेतला तर आपल्यापासून आतापासून या गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारणे भाग आहे. कारण प्रॉपर्टी, जमीन सोडली तर एवढा परतावा अन्य कशातून मिळूच शकणार नाही.

शेअर बाजार हा जुगार आहे हा समज : आपल्या बर्‍याच लोकांचा हा समज आहे की शेअर बाजार जुगार आहे. तेथे फसवणूक होते. पण जुगार कुणासाठी. जे लोक कसलीही माहिती न घेता कुणीतरी सांगितले म्हणून एखादा शेअर घ्यायचा. आणि मग त्यामध्ये तोटा झाला तर त्याला जुगार म्हणायचे. पण जो आपणाला सांगतो त्याला कितपत माहिती आहे हे आपण बघतो का. त्याने कशाच्या आधारावर हा शेअर्स घे म्हणून सांगितले याचा आपण कधी विचार केला आहे का. आज बरेच जण बोलतात खूप तोटा झाला. शेअर बाजारातच तोटाच होतो. मग मी त्यांना विचारतो कसा तोटा झाला. नक्की काय केले.

कुठले शेअर्स घेतले. त्यांच्याशी बोलल्यानंतर कळते की कुणीतरी सांगितल्याने शेअर्स घेतलेला असतो. मुळात अशा जुगाराच्या मानसिकतेतून शेअर्स खरेदी केला तर झालेल्या तोट्याला तो व्यक्तीच जबाबदार असतो ना. मात्र तो याचे खापर शेअर बाजारावर फोडून मोकळा होतो. पण मला कळत नाही तर मी हा शेअर्स विकत घेतला हे तो कधी मान्य करत नाही. यासाठी आपणा सर्वांना निदान शेअर बाजाराची प्राथमिक माहिती तरी असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला खरेच भविष्यकाळात आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असेल तर शेअऱ बाजार थोडातरी समजून घ्यायला हवा. आणि तो समजायला तसा अवघडही नाही.

फसवणूक होते ही पण एक भीती : शेअर बाजारात फसवणूक होते अशी पण एक भीती आपल्या मनात बसली आहे. पण शेअर बाजारातील कारभार अतिशय पारदर्शक आणि सुरक्षित आहे. यामध्ये कसलीही फसवणूक होण्याची भीती नाही. कारण शेअर बाजारातील सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. ऑनलाईन शेअर्सची खरेदी, विक्री होते. शेअर्स विकल्यानंतर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. कारण डिमॅट खाते बँक खात्याशी जोडलेले असते. कसलाही रोखीचा व्यवहार इथे होत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची तशी वेळ येत नाही. तुम्ही एखादा शेअर्स खरेदी केल्यानंतर 24 तासाच्या आत तुमच्या ईमेलवर कॉन्ट्रॅक्ट नोट येते.

यामध्ये शेअर्स खरेदीची वेळ, किती शेअर्स घेतलेले तो आकडा, शेअर्सची किंमत, झालेला नफा, तोटा याची सविस्तर माहिती असते. ही नोट तुमच्या ईमेलवर येतेच. पण ती अ‍ॅप्सवर तसेच तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटवरही मिळते. शेअर बाजारात रोज अब्जावधींची उलाढाल होते. अत्यंत शिस्तबद्ध असा हा बाजार आहे. आणि यावर सेबीची कडक नजर असते. समजा तुमच्या ब्रोकरकडून काही फसवणूक झालीच. तर तुम्हाला शेअर बाजाराकडे तसेच सेबीकडे तक्रार करता येते. नुकसानीपोटी तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतची भरपाईही मिळते. मुळात अशी फसवणूक होण्याची शक्यता कमीच आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याचे अनेक मार्ग : 1) एक म्हणजे एकाच वेळी गुंतवणूक करणे. काही ठराविक रकमेचे चांगल्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेऊ शकतो. ही गुंतवणूक दीर्घ काळासाठी ठेवू शकतो. तसेच दर महिन्याला काही ठराविक रकमेचे शेअर्स खरेदी करणे. बँकेत किंवा पोस्टात जशी आपण आरडी सुरू करतो तशीच दर महिन्याला शेअर्समध्ये आपल्याला ठराविक रक्कम गुंतवता येते. म्हणजे त्या रकमेचे शेअर्स विकत घ्यायचे.

2) दुसरे म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला रक्कम गुंतवू शकता. दर महिन्याला एसआयपी सुरू करू शकतो. दीर्घ कालावधीसाठी यामधील गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते.

3) तिसरा पर्याय म्हणजे, शेअर बाजारातून रोजची कमाई करणे. एक ठराविक भांडवल गुंतवून तुम्ही शेअर बाजारातून रोज नफा कमवू शकता. स्विंग ट्रेडींगही करू शकता. म्हणजे आज घेतलेला शेअर्स आज वाढला नाही तर उद्या परवा वाढेल तेव्हा विकून आपल्या नफा कमवायचा.

4) लाभांश (डिव्हीडंड): चांगल्या कंपन्या आपल्या शेअर्स होल्डर्सना वेळोवेळी लाभांश देतात. काही कंपन्या तीन, सहा महिन्यांनी किंवा वर्षाला लाभांश देतात.

5) बोनस शेअर्स : काही चांगल्या कंपन्या बोनस शेअर्सही देतात. एकास एक, दोनास एक अशा प्रमाणात शेअर्स देतात. म्हणजे तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला आणखी एक बोनस शेअर मिळतो.

6) आयपीओ : कंपन्यांना आपल्या विस्तारासाठी भांडवलाची गरज असते. त्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करून शेअर बाजारातून निधी उभारतात. म्हणजे या कंपन्या शेअर बाजारात उतरतात. त्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांनी घेतल्यास लिस्टिंगच्या वेळीच चांगला फायदा मिळू शकतो. किंवा ते शेअर्स तसेच ठेवल्यास काही कालावाधीनंतर मोठा फायदा मिळू शकतो.