घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमहाराष्ट्र से उडा, गुवाहाटी में अटका!

महाराष्ट्र से उडा, गुवाहाटी में अटका!

Subscribe

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे मातोश्रीशी जवळीक असलेले ज्येेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सध्या राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे मातोश्रीशी जवळीक असलेले ज्येेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात सध्या राजकीय अनिश्चितता निर्माण झाली आहे. शिवसेनेत यापूर्वी काही वेळा फूट पडली आणि त्यांच्यातील नेते काही आमदार घेऊन बाहेर पडले आणि ते दुसर्‍या पक्षात सहभागी झाले किंवा त्यांनी स्वत:ची राजकीय संघटना स्थापन केेली, पण आता जी शिवसेनेत फूट पडली आहे, ती अभूतपूर्व अशा प्रकारची आहे. कारण जे फुटून सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हादरून गेले आहेत. कारण गुहावाटीला शिंदे गटात जे आमदार आहेत, त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या खूपच कमी आहे.

सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतली, पण जसे दिवस पुढे सरकत आहेत, तसे शिंदे गटात सहभागी होणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच ही जी अस्वस्थता दिसत आहे, त्याचे स्वरुप खूप व्यापक आहे, हे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्षात घ्यावे लागत आहे, म्हणूनच त्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. तुम्ही परत या, अजून वेळ गेलेली नाही. माझ्या समोर येऊन बोला, मी कुटुंबप्रमुख या नात्याने तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजून घेईन, असे आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाला करण्यात आले आहे, पण शिंदे गटाची मागणी अशी आहे की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजपमध्ये सहभागी व्हावे. म्हणजेच पूर्वीसारखी भाजपसोबत युती करावी, असेच त्यांचे म्हणणे आहे, हे स्पष्ट होत आहे. शिंदे हे भाजपचे नाव घेत आहेत, त्यामुळे या सगळ्या घडामोडींमागे कोण सूत्रधार आहे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण आजवर जेव्हा शिवसेनेत बंड झाले तेव्हा ते लोक महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यांमध्ये गेले नव्हते. सध्या शिवसेनेत बंड तर झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सगळ्यात जास्त आमदार असूनही त्यांची सत्ता येऊ शकली नाही. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेनाप्रमुखांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे मी काहीही करायला तयार आहे, असे जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यांनी तसे करून दाखवले आणि मुख्यमंत्रीपद मिळवून दाखवले. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे हेदेखील शिवसैनिक आहेत, असे उत्तर शिवसेनेकडून देण्यात आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, पण तो कोण व्हावा, असा प्रश्न होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यातून तोडगा काढला. त्यांनी शिवसेनेतील वजनदार व्यक्ती म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आहेत, त्यांनीच मुख्यमंत्री बनावे, असा प्रस्ताव पुढे ठेवून तो मंजूर करून घेतला. काँग्रेस सध्या गरजवंतांच्या भूमिकेमध्ये आहे.

त्यामुळेच ते शरद पवारांच्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये सहभागी होण्यास तयार झाले. मुख्यमंत्री शिवसेनेेचा आणि त्याला पाठिंबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ही खरे तर कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती, पण सत्तेशिवाय जनसेवा करता येत नाही, असा शरद पवारांचा पवित्रा असल्यामुळे आपल्या पक्षाला सत्तेतील वाटा मिळावा म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार केला. आता या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये अस्वस्थ असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला. खरे तर हे कधीना कधी होणारच होते. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राजकीय आघाडी करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले असले तरी शिवसैनिक असलेले नेते आणि आमदार यांची या आघाडीत घुसमट झालेली होती.

- Advertisement -

सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून मार्ग काढणे वाटते तितके सोपे नाही, कारण हा एकूणच मामला विविध कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. त्यात पुन्हा बंडखोर आमदारांना त्यांची आमदारकी जाण्याची भीतीही आहे. दुसर्‍या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडचे आमदार कमी होऊन गुवाहाटीमधील शिवसेना आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. या आमदारांच्या बंडातून एकच गोष्ट दिसून येत आहे की, उद्धव ठाकरे साहेब तुम्ही भाजपसोबत या, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नांदायला जमणार नाही, पण ज्या शरद पवारांनी मुख्यमंत्री बनवले, त्यांच्याशी कशी काय प्रतारणा करायची हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे असे विचित्र त्रांगडे झालेले आहे. शिंदे गटाला फार काळ गुवाहाटीला राहता येणार नाही. त्यांना कधी तरी महाराष्ट्रात यावे लागेल. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे काय होणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

शरद पवार यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्यामध्ये आजवर तसे यश आलेले नाही, नाही तर त्यांनी देशाचे पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली असती, पण महाराष्ट्रात मात्र राजकारणातील अनेक गोष्टी त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. थंडा करके खावो, या काँग्रेसच्या नीतीप्रमाणे शरद पवारांनी जसे अजित पवारांचे बंडे मोडीत काढले, तसे शिंदेंचे बंडही मोडून काढतील, असे वाटत आहे. त्यामुळेच या बंडखोरांबाबत सुरुवातीला आक्रमक असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. कारण या आमदारांचा उद्धव ठाकरे यांना विरोध नसून ते ज्या दोन पक्षांसोबत आहेत, त्यांना विरोध आहे. म्हणूनच शिवसैनिकांच्या मनाचा कल बघूनच उद्धव ठाकरे यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असली तरी त्यांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल, पण कुठल्या पक्षात विलीन व्हायचे असा पेच त्यांना पडलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाप्रमाणे बंडखोर महाराष्ट्रात आले तरी, उद्धव ठाकरे हे काही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे बंडाचा हेतू सफल होत नाही. तसेच ते कुठल्या पक्षात विलीन झाले तरी त्यांचे स्वतःचे महत्त्व उरणार नाही, अशी विचित्र कोंडी या आमदारांची झालेली आहे, त्यामुळे ‘महाराष्ट्र से उडा और गुवाहाटी में अटका’, अशी त्यांची अवस्था झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -