टोमॅटोची लाली उतरल्याने शेतकरी चिंतेत!

प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने 2 महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल अशी आशा मनात असतानाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन झाले. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरू झाला आहे. देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार निर्यातदार हे कर्नाटककडे वळल्याने ही उतरण सुरू झाल्याचे व्यापारी सांगतात. मागील काही वर्षे तेजीचे दर मिळाल्यामुळे यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपरिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले. त्यामुळे लागवड अर्थातच वाढलेली आहे. यंदाच्या परतीच्या पावसाने जो तडाखा दिली त्याने टोमॅटोची लॉली उतरली आणि शतेकरी चिंतेत पडले.

price of onion tomato may shoot beyond 700 rs per kg in pakistan may import from india due to floods

द्राक्ष, कांदा, मका आणि टोमॅटो उत्पादनात नाशिक जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. अलिकडील काही वर्षांपूर्वीपर्यंत डाळींब उत्पादनातही नाशिक अव्वल स्थानावर होता. पण सद्यस्थितीला उपरोक्त चार पिकांमध्ये देशात नाशिक जिल्ह्याची मक्तेदारी राहिली आहे. अव्वल स्थान असतानाही शेतकर्‍यांवर दरवर्षी रडण्याची वेळ का येते, याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. पावसाळ्यात उत्तर भारतातील पिके जवळपास हाती लागतच नाहीत. त्यामुळे जून ते ऑक्टोबरपर्यंत देशभरातील टोमॅटो, कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. दिवाळीचा हंगाम संपला की उत्तर भारतातील भाजीपाल्यासह फळपिके बाजारात येतात आणि इतर राज्यातून होणार्‍या मागणीत हळुहळु घट होत जाते. दरवर्षी याच पध्दतीने व्यापारी नियोजन करतात. परिणामी, ऑक्टोबर महिन्यानंतर नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोची लाली एकदम उतरली आणि शेतकर्‍यांवर रडण्याची वेळ आली. एकिकडे शेतकरी रडत असले तरी याच शेतकर्‍यांच्या जीवावर जगणार्‍या ‘नाफेड’सारख्या संस्थेचे अधिकारी मुजोर झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे मागितलेली कागदपत्रे देण्यास नकार देत त्यांनी या चौकशीला एकप्रकारे तिलांजलीच दिली.

प्रतिकूल वातावरणातही पीक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने 2 महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल अशी आशा मनात असतानाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन झाले. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरू झाला आहे. देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार निर्यातदार हे कर्नाटककडे वळल्याने ही उतरण सुरू झाल्याचे व्यापारी सांगतात. मागील काही वर्षे तेजीचे दर मिळाल्यामुळे यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपरिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले. त्यामुळे लागवड अर्थातच वाढलेली आहे. यंदाच्या जोरदार पावसाने त्यातही चित्रा नक्षत्रातील (सप्टेंबर महिना) परतीच्या पावसाच्या तडाख्याने उत्साहाची हवा बरीच कमी केली. या काळात पीक वाचवण्यासाठी या शेतकर्‍यांनी जीवाचे रान केले. औषधे, खते, मजुरी यासाठीचा खर्च दीड ते 2 पटीने वाढलेला असताना टोमॅटोला मिळणारे दर बघता हा खर्चही निघेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. त्यातही काही वाणांनी मोठाच दगा दिला. बरेच प्लॉट मर, सुकवा या रोगांना बळी पडले. याही परिस्थितीतून वाचलेल्या टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेटला 500 ते 800 रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता. पण दिवाळी संपताच दर अचानकपणे कोसळले आणि टोमॅटोचे प्रति क्रेटचे दर कमाल 800 वरुन हे 400 पर्यंत म्हणजे निम्म्याने खाली आले आहेत. हे इतके दर तरी टिकून रहावेत अशी उत्पादकांची अपेक्षा आहे. तसे झाले तरच यंदाचा झालेला भरमसाठ खर्च निघून येईल. पण प्रत्येक वर्षी असेच का घडते याचा विचार करायला शेतकर्‍यांजवळ वेळच राहिलेला नाही. उसाच्या दरापेक्षा कारखान्यांच्या गाळप हंगामाविषयी राहिलेली अनिश्चितता आणि ऊसतोड कामगारांचा अभाव यामुळे उभे पिक जागेवरच सोडून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. पैसे कमी मिळाले तरी चालतील पण सर्वच हातातून नको जायला म्हणून शेतकरी टोमॅटोकडे वळला. त्यातही निफाड, दिंडोरी, नाशिक या तीन तालुक्यांंमध्ये सर्वाधिक भाजीपाला व टोमॅटो द्राक्षाचे पिक घेतले जाते. नाशिकसह मुंबईची बाजारपेठ जवळ असल्यामुळे दर चांगला मिळतो. काही टोमॅटो हा प्रोसेसिंगसाठी वापरला जात असल्याने त्यालाही मागणी चांगली असते.

पण बेंगलोरचा नुकताच सुरू झालेला हंगाम तसेच मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापार्‍यांकडून सांगितली जात आहेत. मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्याचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बेंगलोर हंगाम अगोदरच आटोपला होता. महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले. मागील वर्षीचा धडा घेऊन बेंगलोर भागातील उत्पादकांनी लागवड उशिराच्या केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते 2 महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. कर्नाटक भागातील बहुतांश लाल मातीत येणारा तेथील स्थानिक टोमॅटो एक सारखा रंगात येत आहे. त्यामुळे त्याला पसंती मिळते. नाशिकच्या तुलनेत काहीशा कमी दरात मिळत असल्याने नाशिक भागातील टोमॅटोच्या व्यापारी खरेदीदारांनी बेंगलोरकडे मोर्चा वळवला आहे.

नाशिकच्या गिरणारे भागात मागील 10 वर्षांपासून व्यापार करणारे नसीम यांच्या म्हणण्यानुसार या भागातील 80 टक्के व्यापार्‍यांनी बेंगलोरकडे मार्गक्रमण केले आहे. बेंगलोर येथील टोमॅटो हा नाशिकच्या तुलनेत 100 ते दीडशे रुपये कमी दराने मिळत असल्याने त्या टोमॅटोलाच प्राधान्य दिले आहे. बांगलादेश हा भारतीय टोमॅटोसाठी सर्वात महत्वाचा खरेदीदार देश राहिला आहे. मागील 4-5 वर्षांपासून दोन्ही देशातील हा व्यापारही अडचणीत आलेला आहे. बांग्लादेशाने वाढविलेला 34 टक्के हा आयातकर हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी टोमॅटोची निर्यात मंदावलेली आहे. गिरणारे, पिंपळगाव बसवंतच्या बाजारातून बांगलादेशाकडे होणार्‍या निर्यातीत 70 टक्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्वीकारला जातोे. मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात. नाशिक बाजार समितीत टोमॅटो व्यापारी असलेले राजेश म्हैसधुणे हे टोमॅटो उत्पादकही आहेत. ते म्हणाले की, मागील 2 महिने टोमॅटोला तेजीचे दर मिळाले. बाजारात तुटवडा असल्याने हे दर मिळत होते. आताच्या दरात उतरण झाली असल्याने शेतकर्‍यांत नाराजी येणे साहजिक आहे. मात्र तरीही हे दर फारच कमी म्हणता येणार नाहीत. मंदीमुळे पिकाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. चांगला व जास्त माल मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यातूनही झालेला खर्च भरुन येण्यास चांगली मदत होऊ शकते.

आधीच अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ नुकसान झाल्याने डोळ्यादेखत पिके वाहून गेली. मागील एक महिन्याचा विचार केला तर, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला. या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, शेतकर्‍यांची दिवाळी अडचणीत गेली. दिवाळीनंतर तरी शेतकर्‍यांच्या राहिलेल्या मालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे चित्र सध्या दिसत नाही. बाजापरेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरल्याची माहिती यावेळी नाशिक बाजारातील विक्रेत्यांनी दिली. हे दर आणखी घसरण्याची शक्यतादेखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपासून नाशिकमधील गिरणारेच्या बाजारपेठेत सुरू असलेल्या टोमॅटोच्या आवकेत वाढ झाल्यामुळे तिथेही टोमॅटोच्या बाजारभावात घसरण पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ सर्वात महत्वाची समजली जाते. त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. गिरणारे परिसरातील हजारो शेतकरी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असून या बाजारपेठेत कोटींची उलाढाल होते. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपरिक द्राक्ष उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले आहेत. त्यामुळे गिरणारे परिसरात टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. लहानात लहान शेतकरीदेखील भाताचे एक वावर कमी करून टोमॅटो लागवड करण्यावर भर देत आहेत. अशातच यंदा झालेल्या जोरदार पावसाने त्यातही परतीच्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा तडाखा बसला. कांद्याप्रमाणे आता टोमॅटोच्या दराची सर्वदूर चर्चा होऊ लागली आहे. एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की शेतकरी दुसर्‍या वर्षी त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. अर्थात, त्याचे कारणही तसेच आहे. कोणत्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. एखाद्या शेतमालाची मागणी वाढली की शेतकरी दराच्या अपेक्षेपोटी त्याचे उत्पादन घेतात. असाच चक्रव्यूव्हात टोमॅटो पीक अडकले आहे. टोमॅटो सॉस, केचअप सारखे उत्पादन घेण्यासाठी टोमॅटोचा वापर होतो. पण कंपन्यांची संख्या मर्यादित आणि उत्पादित होणारा माल हा मोठ्या प्रमाणात तोही नाशवंत असल्याने वाटेल त्या किमतीला विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर येते. व्यापार्‍यांचे संगनमत हादेखील शेतकर्‍यांच्यादृष्टीने चिंतेचा विषय आहे. व्यापारी एकमेकांना सांभाळून घेत असल्याने दराचे चढउतार त्यांना माहीत असतात. त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसतो. ज्या ठिकाणी माल स्वस्त मिळेल तिकडून व्यापारी खरेदी करतात. त्यामुळे शेतकर्‍यांना आतातर उत्पादन खर्चही भरुन निघतो की नाही, याची चिंता वाटू लागली आहे.

ेदोन वर्षांपूर्वी ‘नाफेड’ने कांदा खरेदी केल्यानंतर कांद्याचे दर दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. ऑगस्ट महिन्यात कांद्याची आवक कमी होते. महाराष्ट्रासह कर्नाटकात परतलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या मान्सूनच्या पावसाने कहर केला. पावसात नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होऊन ते बाजारात विक्रीसाठी आलेे. तेव्हा मात्र कांदा तेजीत होता. गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. पण बोगस बियाणे व खराब हवामान यामुळे कांद्याची प्रतवारी एकदम घसरली आणि एकरी 120 क्विंटल निघणारा कांदा फक्त 50 ते 60 क्विंटलपर्यंत घसरला. एकतर प्रतवारी घसरली त्यात भाव अजून घसरल्याने कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले. नाफेडने खरेदी केलेला कांदा चाळीतच सडत असल्याने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी या अधिकार्‍यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. पण जिल्हाधिकार्‍यांनाही हे अधिकारी जुमानत नाहीत. त्यांच्या चौकशीला दादच मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींसह अधिकारीही हतबल झाले आहेत. अशा मुजोर अधिकार्‍यांच्या भरोशावर शेतकर्‍यांचे कल्याण कसे होणार, याचा सारासार विचार व्हायला हवा. शेतकर्‍यांच्या जीवावर जगणार्‍या या संस्था आणि त्यांचे मुजोर अधिकारी जर लोकप्रतिनिधींनाच दाद देत नसतील तर शेतकर्‍यांना काय जुमानतील. अशा मुजोर अधिकार्‍यांना वेळीच लगाम घातला नाही तर एक दिवस या संस्थाही शेतकर्‍यांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाहीत.