घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहोय... मुंबई लवकरच पूर्ववत होईल

होय… मुंबई लवकरच पूर्ववत होईल

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी, लाखो लोकांची स्वप्न नगरी असलेली मुंबई नगरी सध्याच्या कोविड संसर्गाच्या विळख्यातून लवकरच बाहेर येईल. कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे चाक सध्यापुरते थांबले असले तरी लवकरच हे चाक नेहमीप्रमाणे पळू लागेल. मुंबईतील व्यावसायिक, कामगार, मच्छिमार, उद्योजक परत मोठ्या जोमाने कामाला लागतील असा मला विश्वास आहे.

जगभरात कोविड-१९ अर्थात कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. या साथीच्या रोगाचा देशात त्याचबरोबर महाराष्ट्रातही शिरकाव झाला असून स्वप्नांची नगरी असलेल्या व मोठ्या प्रमाणात नागरीकरण असलेल्या मुंबईमध्येही हा संसर्ग सुरु आहे. नैसर्गिक असो की मानवी अशा कोणत्याही संकटात न थांबलेली मुंबई या संसर्गाला रोखण्यासाठी थांबली आहे. देशाचे आर्थिक चाक असलेली मुंबई थांबली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तसेच या रोगाला आळा घालण्यासाठी, त्याचा सामुहिक संसर्ग पसरू नये, यासाठी राज्य शासनाबरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर व उपनगर जिल्हा प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून या उपाययोजनांवर लक्ष ठेवणे व मुंबईतील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी सदैव कार्यरत आहे.

- Advertisement -

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये रुग्णसंख्या वाढणे ही चिंतेची बाब होती. मात्र, पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याने ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाबरोबर वारंवार बैठका घेतल्या. धारावीप्रमाणेच इतर भागात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर दिला. ट्रेस, टेस्ट अँड क्वारंटाइन या त्रिसुत्रीचा वापर करून तसेच घरोघरी जाऊन चाचण्या केल्यामुळे मुंबईतील विशेषतः वरळी, धारावी भागातील रुग्ण संख्या कमी करण्यावर भर दिला. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी केलेले काम, स्थानिक जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे नियोजन यामुळे धारावीतील संसर्ग कमी होण्यास मदत झाली. या अनोख्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.

आरोग्य सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी मुंबई शहरचा जिल्हा विकास नियोजन निधीतील रक्कम आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा संच देण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जारी करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले. महानगरपालिकेनेही तातडीने सूचनांची अंमलबजावणी केली.

- Advertisement -

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात टाळेबंदीचे (लॉकडाऊन) कडक पालन होणे आवश्यक होते. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची अमंलबजावणी करण्यासाठी आणि पोलीस, महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची विभागनिहाय नेमणूक करण्यात आली. या निर्णयामुळे शहरात कोविडचा संसर्ग रोखण्यात मदत झाली. कोविडच्या उपचारासाठी रेसकोर्स येथे आठशे बेडचे आयसीयू सेंटर बनविण्यात आले होते. तसेच गोरेगावमधील एनएससी मैदान व बांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथेही सुविधायुक्त सेंटर बनविले.

एकिकडे मुंबईमधील कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान तर दुसरीकडे टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या सर्वसामन्य नागरिक, कामगार, डब्बेवाले, मच्छिमार यांच्यासारख्या अनेकांना मदत करण्याचे आव्हान समोर होते. यावर मार्ग काढण्याचा माझ्यापरीने प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिक, कामगार, मच्छीमार, डब्बेवाल्यांना रेशन किटचे वितरण असो की विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जे.जे. रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणे असो. यासारख्या विविध माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.

कोविड संसर्गातून मुंबईला सावरण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू असतानाच मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री म्हणून मच्छिमारांना दिलासा देण्याचे कामही केले. कोविड परिस्थिती असतानाच निसर्ग चक्रीवादळाचा फटका मच्छिमारांना बसला. निसर्ग चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले. या परिस्थितीत त्यांना दिलासा देणे आवश्यक होते. यासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मच्छिमारांच्या नुकसानीची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. या संकट काळात नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनास व मत्स्य व्यवसाय विभागास सूचना दिल्या. मच्छीमारांना आर्थिक मदतीचे पॅकेज देणे प्रस्तावित आहे. तसेच केंद्र शासनाकडेही आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याशिवाय ‘कोरोना’ संकटकाळात मच्छीमारांना दिलासा मिळावा यासाठी मच्छिमारांच्या नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या ३२ कोटीच्या रक्कमेतून राष्ट्रीय विकास निगमच्या कर्जाची वसुली न करण्याची मागणी मी वित्त विभागाकडे केली होती. वित्त विभागाने त्याला मंजुरी दिल्यामुळे मच्छिमार बांधवांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

तसेच टाळेबंदीच्या काळात सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना, ठेक्याने दिलेल्या तलावांचा परवाना, मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे, पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनासाठी देण्यात आलेल्या ठेक्याचा परवाने तसेच कोळंबी संवर्धन प्रकल्पाचा परवाने यांचे नुतनीकरण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली होती. मत्स्य बीज केंद्राची चालू वर्षाची भाडेपट्टी भरण्यासही मुदत वाढ दिली आहे.

लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय बंद झाले होते. त्याचा फटका मत्स्य व्यवसायांनाही बसला होता. त्यावर मार्ग काढून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मासे, मत्स्य बीज व मत्स्य खाद्य यांना अत्यावश्यक बाबींमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीचा आणि विक्रीचा मार्ग मोकळा झाला.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ३१ मे ला मासेमारी हंगाम संपतो. त्यानंतर विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून आलेले मच्छिमार/खलाशी मजूर हे आपल्या गावी जातात. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक मच्छिमार, मजूर हे मुंबईत अडकून पडले होते. अशा मत्स्य व्यवसायाशी निगडीत मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची व्यवस्था केली. कोविड परिस्थितीमुळे कापड उद्योगावरही संकट आले आहे. या उद्योगाला चालना मिळावी, यासाठीही विचार करत आहोत. कापड उद्योगाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल.

कोरोना संसर्गाचा सामना करत असताना मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासन, महानगरपालिका व स्थानिक जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात जोमाने काम करत आहे. कर्मचारी, आरोग्य सेवक हे कोविड योद्धे दिवसरात्र लढत आहेत. पालकमंत्री म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदरे विकास मंत्री म्हणूनही मच्छिमार, कापड उद्योगातील कामगार यांना सहाय्य करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुढील काळात नक्कीच प्रयत्न करू. मला खात्री आहे की, सध्याच्या परिस्थितीतून महाराष्ट्र आणि सर्वांच्या स्वप्नांची नगरी असलेली मुंबई लवकर बाहेर येईल. मुंबईचे चाक पुन्हा सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यक्त करतो.



लेखक अस्लम शेख राज्याचे
मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास व वस्त्रोद्योग मंत्री आहेत

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -