Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai

बर्फ आणि साखर…

निवडून आलेले आमदार आणि मंत्री कार्यकर्त्यांशी फटकून वागतात ,त्यांची अवहेलना करतात. या सगळ्यांना या विधानसभेच्या उमेदवार निवडीने जणू एक संदेशच दिला आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली नाही तर राजकीय कारकीर्द खडतर होऊ शकते. ज्या नेत्यांनी काही गरजवंतांचा मानसिक छळ केला त्यांनी दिलेल्या ‘बददुआ’ काहींना उमेदवारीच्या यादीतून बाहेर घेऊन गेल्या तर काहींना येणार्‍या निवडणुकीच्या निकालातून बाहेर घेऊन जातील असंच चित्र दिसतंय.

Related Story

- Advertisement -

विधानसभा निवडणुकांमध्ये बंडखोरांनी भरलेले उमेदवारी अर्ज दसर्‍याच्या आदल्या दिवशी काहींनी मागे घेतले तर काहींनी कायम ठेवले. दसर्‍याच्या मुहूर्तावर खर्‍या अर्थाने निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे चेहरे प्रचारासाठी आहेत. राष्ट्रवादीकडे ऐंशी वर्षांच्या पवारांशिवाय दुसरं कोणालाच खिजगणतीत घ्यायला ग्रामीण भागातला त्यांचा मतदार तयार नाहीये. काँग्रेसबद्दल जे चित्र आहे त्याबाबत न बोललेलंच बरं. आणि हो त्या मनसेचं काय करायचं याची चिंता मराठी मनाला सतावतेय.

288 जणांच्या विधानसभेत जाण्यासाठी राज्यभरातून सुमारे चार हजारांहून अधिक उमेदवारांनी आपलं नशीब आजमवायला सुरुवात केली आहे. ही मंडळी निवडून येतील. आमदार होतील, त्यातले काही मंत्री होतील काही महामंडळांवर जातील आणि त्यानंतर जमेल तितकं आणि त्यांना पटेल तितकंच समाजाचं काम करतील. आणि स्वतःचा उत्कर्ष करून घेतील. राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक उद्योग-व्यवसाय केले. काहींनी साखर कारखाने,सूत गिरण्या, बँका, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, खाणी, मत्स्यव्यवसाय, वाहतूक, जलवाहतूक, पर्यटन व्यवसाय , चित्रपट-मनोरंजन विश्व यामध्ये पैसे कमावण्यासाठी लक्ष घातलं ते गैर नाहीये. हे सगळं योग्य मार्गानं झालं तर व्यवसाय आहे अन्यथा गैरव्यवहार, मग त्याची फळंही कधीनाकधी भोगावीच लागतात. आता निवडणुकीत उमेदवारी मिळालेली मंडळी तुमच्या दारावर येतील, हात जोडतील. सोशल मीडियावरून अगदी थेट तुमच्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करतील. आणि एकदा का यश मिळालं मग त्यांच्या कथनी आणि करणी या दोन्हीमध्ये बदल होईल. त्यानंतर आपलं कोणीच काही बिघडवू शकणार नाही या अविर्भावात जगण्यासाठी वावरण्याचा प्रयत्न करतील. भाजपसहीत काही नेत्यांमधली ही भावना खूपच बळावली होती; पण या नेत्यांवरतीही एक व्यवस्था असते. त्याला कधी प्रमुख म्हणतात तर कधी मुख्यमंत्री… कधी पक्ष म्हणतात तर कधी संघटना … ही व्यवस्था समाजासाठी काम करते.

- Advertisement -

भाजपच्या पाच बड्या नेत्यांना जेव्हा पक्षाने तिकिटं नाकारली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यातही विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये विनोद तावडे यांचं तिकीट कापणं ही सध्याच्या राजकारणातली सगळ्यात आश्चर्यकारक आणि धक्कादायक बाब आहे. पत्रकार म्हणून मला याचा विशेष धक्का बसला नाही. कारण तीन महिन्यांपूर्वी माझ्याकडे असलेल्या बातमीचा मागोवा घेण्यासाठी मी एका भाजपच्या नेत्याकडे चाचपणी केली. आपल्या भागातला कार्यसम्राट म्हणून खर्‍या अर्थाने लोकप्रिय असलेला तो स्पष्टवक्ता नेता मला म्हणाला, “तुम्ही पत्रकार बातमीतून कोणालाही घरी बसवू शकता; पण विनोद तावडे हा छोटा विषय नाहीय”. मी त्या नेत्याची भावना समजू शकतो. याचं कारण विनोद तावडे यांचा जनसंपर्क, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे असलेले वजन, विद्यार्थी चळवळीत केलेलं काम, राजकीय हितसंबंध, माध्यमांमधली मैत्री आणि संसदीय कामकाजाचा अनुभव आणि जातीनं मराठा या सगळ्याचा विचार करता विनोद तावडे यांना पहिल्या, दुसर्‍या,तिसर्‍या आणि चौथ्या उमेदवार यादीतून जीवघेण्या प्रतीक्षेनंतर वगळंण यासाठी वाघाचं काळीज लागतं. अर्थात विनोद तावडे ज्या बोरीवली मतदारसंघातून विधानसभेत पोचले हा मतदारसंघ तावडेंनी बांधलेला नाही. ते तिथे राहत नाहीत. हा मतदारसंघ भाजपने कडेकोट बांधलेला आहे. इथला मतदार गेली कित्येक वर्षे भाजपशिवाय कशाचाच विचार करत नाही. तरीही तावडेंनी या भागात आपला ठसा उमटवला नाही याचं अनेकांना वाईट वाटतं. पण म्हणून तावडेंबद्दलची नाराजी आणि वागणं त्यांना तिकीटापासून वंचित ठेवेल असं कुणालाच वाटलं नाही. तीच गोष्ट प्रकाश मेहतांची आणि आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची… यापैकी मेहता अत्यंत अनुभवी-ज्येष्ठ, दिल्ली दरबारात वजनदार, आर्थिक क्षमतेने संपन्न आणि मतदारसंघात अपराजित त्यांना वगळणं हेदेखील तावडेंसारखंच महाकठीण काम. फडणवीसांनी आधी त्यांना मंत्रिमंडळातून आणि नंतर उमेदवार यादीतून वगळलं. घाटकोपर पूर्वमधून तिकीट मिळालं ते बिल्डर पराग शहा यांना. पराग यांना प्रकाश मेहता यांनीच बोट धरून राजकीय प्रवास सुरू करून दिला. बघता बघता त्यांनी नव्हे तर मेहतांच्या बेफिरीने त्यांना राजकीय अंधारात लोटून टाकलं. मंत्रालयाकडे दुर्लक्ष, गैर पद्धतीने कामकाज करणे, भ्रष्ट म्हाडा अधिकार्‍यांना पाठीशी घालणं, छोट्या मोठ्या ‘गोष्टींसाठी’ जीव व्याकूळ करणं,कार्यकर्त्यांशी- नेत्यांशी फटकून वागणं, अनेक वेळा कॅप्टनला तो ज्युनियर असल्याचं निकटवर्तीयांकडून कळवत राहणं हे सगळं मेहतांच्या अंगाशी आलं.

चंद्रशेखर बावनकुळे हे तर या दोघांपेक्षांही वरताणं. त्यांनी आपली विदेशातली हॉटेल्स, अनेक कंपन्यांमध्ये सत्तेच्या जोरावर मिळालेली भागीदारी आणि त्यातून झालेलं अर्थार्जन यामुळे पक्षनेतृत्व व्यवस्थेलाच गृहित धरायला सुरुवात केली. ऊर्जामंत्री असलेल्या बावनकुळे यांनी नागपूरच्या मौद्यातील एनटीपीसीच्या एका बैठकीत रिलायन्सच्या एका उपाध्यक्षाला पंधरा मिनिटं उशिरा आल्यामुळे आडवा तिडवा झापडला. त्याला झापडताना ते गुजराती समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलून गेले. या अधिकार्‍याबरोबर असलेल्या त्याच्या सहाय्यकाने या सगळ्याची व्हिडिओ क्लिप बनवली. क्लिप मुकेश अंबानींमार्फत दिल्लीत शहा- मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आणि तिथून बावनकुळे यांच्या पडझडीला सुरुवात झाली. चौथ्या यादीत मुख्यमंत्र्यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या सहकार्याने आपल्या दोन निकटवर्तीयांची तिकिटांसाठी वर्णी लावून घेतली. त्यातले एक भंडारा-गोंदियातील परिणय फुके तर दुसरे वरळीतील सुनील राणे. यापैकी फुके मुख्यमंत्र्यांच्या निकटचे मित्र तर राणे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र. शैक्षणिक, फॅशन आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक, पिढ्यान्पिढ्या भाजपाई, आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासाला पात्र ठरताना सांगितलेलं काम चोख करत जमिनीवरील कार्यकर्त्यांना आपला वाटेल असा कोकणी मराठा… राणेंना पंखाखाली घेत फडणवीसांनी अख्खा मुंडेगड ताब्यात तर घेतलाच. आणि स्वत:साठी एक विश्वासू शिलेदार निवडताना आपल्याला प्रदेशाध्यक्ष करताना स्व.मुंडे यांनी केलेल्या उपकाराची परतफेडही केली. एकनाथ खडसेंच्या ऐवजी तिकीट त्यांच्या लेकीला दिलं. आणि मंत्रालयातील आपला मनस्ताप दूर करताना प्रदेशाध्यक्ष होताना राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या समोर फडणवीसांची बाजू खंबीरपणे मांडलेल्या खडसेंचे उपकार फेडले.

- Advertisement -

निवडून आलेले आमदार आणि मंत्री कार्यकर्त्यांशी फटकून वागतात, त्यांची अवहेलना करतात. या सगळ्यांना या विधानसभेच्या उमेदवार निवडीने जणू एक संदेशच दिला आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली नाही तर राजकीय कारकीर्द खडतर होऊ शकते. सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचे दोन्ही नेते म्हणजे देवेंद्र आणि उद्धव हे अत्यंत शांत, संयमी, संस्कारी आणि तरीही अनाकलनीय असेच आहेत. राजकीय विश्व आक्रस्ताळे झाले असताना हे दोन्ही नेते मात्र शांतपणे आपल्या विरोधकांचा आणि आपल्या समोरच्या आव्हानांचा बिमोड करताना दिसत आहे. जे आमदार लोकप्रतिनिधी लोकांशी उर्मटपणे वागतात. कार्यकर्त्यांची गय करत नाहीत. सामान्यांना ताटकळत ठेवतात त्यांना २०१९च्या उमेदवार यादीने धोक्याचा इशारा दिलेला आहे. वेळीच धोका समजला नाही तर कदाचित त्यांनाही भविष्यात खडसे -तावडे-मेहता यांच्या वाटेने जावं लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना नेता, मित्र आणि ‘आपला’ मानणार्‍या सगळ्यांचंच यथाशक्ती भलं करण्याचा प्रयत्न केला. तोही जमेल त्यापेक्षा अधिक चौकटीत राहूनच. मग ते बँक घोटाळ्यांमध्ये डागाळलेले प्रवीण दरेकर असो किंवा भूखंड प्रकरणासह सुप्रिया सुळे यांनी सवाल उठवलेले प्रसाद लाड असो.. सौर ऊर्जेच्या प्रकल्पावर काम करणारा एखादा नागपुरातला व्यावसायिक असो किंवा अमोल काळेसारखा मुंबईच्या क्रिकेटमध्ये नवखा असलेला तरीही राष्ट्रीय क्रिकेट प्रशासनात जाऊ पाहणारा आपला लाडका मित्र असो. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जणू एक परिपाठ घालून दिला आहे. ज्या नेत्यांनी काही गरजवंतांचा मानसिक छळ केला. त्यांनी दिलेल्या ‘बददुआ’ काहींना उमेदवारीच्या यादीतून बाहेर घेऊन गेल्या तर काहींना येणार्‍या निवडणुकीच्या निकालातून बाहेर घेऊन जातील असंच चित्र दिसतंय.

- Advertisement -