नरेंद्र मोदींना पर्याय अरविंद केजरीवाल ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यात बरेच साम्य आहे, असे काही राजकीय विश्लेषक मानतात. कारण दोघेही त्यांच्या राजकारणात राष्ट्रवाद आणि धर्माला महत्त्वाचे स्थान देतात. केजरीवालांची तिरंगा यात्रा, ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचा मोफत प्रवास, ‘जय माता दी’ आणि ‘भारत माता की जय’चे नारे तसेच आंबेडकर किंवा भगतसिंग अशी नवी प्रतीके शोधणे हे मोदींसारखेच आहे. जनतेला वीज आणि पाणी, मोफत रेशन देण्यावर दोघांचा विश्वास आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना अरविंद केजरीवाल पर्याय असू शकतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी समोर आला. या पाच राज्यांपैकी चार राज्यांवर भाजपनं घवघवीत यश मिळवलं. भाजपच्या यशाचं कौतुक व्हायलाच हवं; पण दुसरीकडे विरोधी पक्ष असलेला आणि देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर बरीच चर्चा सुरू आहे. यामध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची कामगिरी तसंच दिल्लीनंतर पंजाबवर सत्ता मिळवलेल्या आम आदमी पक्षाची पुढील घौडदौड, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाची कामगिरी… या निवडणुकांमध्ये कोणी काय कमावलं, काय गमावलं? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदींना दुसरा चेहरा कोण? याच्या चर्चा सुरू आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की, काँग्रेसचे काय होणार… म्हणजे राहुल गांधी पुढे काय करणार…? पंजाबबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा राहुल गांधींनी कॅप्टन बदलून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले, तेव्हा राहुल गांधींनी मास्टरस्ट्रोक मारला असं बोललं जात होतं, पण आज परिस्थिती अशी आहे की चन्नी यांनी दोन्ही जागा गमावल्या आहेत… काँग्रेसचा पराभव झाला आहे. ५९ जागा… प्रियांका गांधी वड्रासोबतचे फोटो ट्विट करणारे नवज्योतसिंग सिद्धूही पराभूत झाले आहेत… सिद्धू काँग्रेससाठी भस्मासुर ठरले आहेत… जिभेवर ताबा न ठेवणारा नेता, तसंच जो आधी बोलतो, नंतर विचार करतो, काँग्रेसची नाव त्यांनीच बुडवली म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात काँग्रेसकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, पण कमावलं काय? याचा विचार करावा लागेल. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात लढल्या, हिंमत हारल्या नाहीत. अशाच पद्धतीने खंबीरपणे उभ्या राहिल्या तर काँग्रेससाठी फलदायीच ठरेल. पण या निवडणुकांच्या निकालानंतर आता काँग्रेसकडे राजस्थान आणि छत्तीसगड ही दोनच राज्ये उरली आहेत. काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाचा मुद्दा गेली काही वर्षे प्रलंबित आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं का? काँग्रेसने अधिकृतपणे प्रियांका गांधींना अध्यक्ष बनवावं का?… सचिन पायलट यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवावी का?… हे सर्व प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. पण काँग्रेसला एक थिंक टँक तयार करण्याची गरज आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील लोक असावेत. ज्यांना अजूनही काँग्रेसबद्दल सहानुभूती आहे… आणि काँग्रेसने हे सर्व करायला वेळ लावू नये, नाहीतर अजूनही सावरले नाही, तर काँग्रेसमुक्त भारत व्हायला वेळ लागणार नाही.

तथापि, उत्तर प्रदेशच्या निकालांवर बोलताना भाजपचं कौतुक करत असलो तरीदेखील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी २०१७ च्या तुलनेत ७० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. याशिवाय २०२४ साठी भाजपसमोर मोठी रेषाही आखली आहे. सपाच्या मताधिक्क्यात झालेली वाढ याचा पुरावा आहे. सपाची कामगिरी ऐतिहासिक शिखरावर आहे. अखिलेश यादव यांनी नेताजींपेक्षा जास्त मते गोळा केली आहेत म्हणजेच अखिलेशचे वडील आणि सपा संस्थापक मुलायम सिंह यादव यांना जमले नाही, ते त्यांनी करून दाखवलं. आकडेवारीबद्दल बोलायचे तर, १९९२ मध्ये स्थापन झालेल्या समाजवादी पक्षाने १९९३ मध्ये यूपीमध्ये पहिली विधानसभेची निवडणूक लढवली आणि सपाला १७.९४ टक्के मते मिळाली.

तीन वर्षांनंतर, १९९६ च्या निवडणुकीत, मुलायम सिंह यांच्या नेतृत्वाखाली, ही मतांची टक्केवारी जवळपास चार टक्क्यांनी वाढून २१.८ टक्के झाली. यानंतर मधल्या काळात सपामध्ये बर्‍याच घडामोडी घडल्या. दरम्यान, २०१७ ते २०२२ या काळात अखिलेश यादव यांनी अनेक प्रयोग केले. कधी वडिलांच्या कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मायावतींच्या हत्तीला सायकलवर बसवलं, कधी देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस आणि चौधरी चरणसिंग यांचा वारस जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाने जुगलबंदी केली. २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचा मार्ग अवलंबत सर्व मागास जातींची इंद्रधनुष्य युती केली, मात्र ते सत्तेपासून दूर राहिले. तथापि, त्यांच्या अभिनव प्रयोगामुळे त्यांना ३६.१ टक्के मते मिळाली, जी आजपर्यंत कधीही सपाच्या खात्यात आली नाहीत.

युपीसारख्या विशाल राज्यात भाजपसमोर एक सक्षम विरोधक म्हणून अखिलेश यादव प्रस्थापित झाले आहेत. आपल्या वेगळ्याच सुरात चालणारी काँग्रेसही ताज्या निवडणूक निकालांनी जमिनीवर फेकली गेली आहे. भारतीय राजकारणात, विशेषत: उत्तर प्रदेशात, जिथून ८० खासदार निवडून येतात आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवली जाते, तिथे आता आपली आघाडीवर खेळण्याची वेळ नाही, हे काँग्रेसला चांगलंच समजलं असेल. या निवडणूक निकालांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना सपासोबत येण्यास भाग पाडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यांना पाठिंबा दिल्याने आणि दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत बिगर-काँग्रेस पर्यायासाठी वेगाने हालचाली सुरु असल्याने २०२४ च्या निवडणुकीत अखिलेशची इंद्रधनुष्य युती एक नवीन आशा म्हणून उदयास आली आहे. आणि इतर राज्यांसाठी जिथे मंडल विरुद्ध कमंडल राजकारण सुरू आहे, त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी विरोधकांचा चेहरा कोण असू शकतो? या विधानसभा निवडणुकांपूर्वीच यासाठी प्रयत्न सुरू असून ममता बॅनर्जी या त्याचे मुख्य केंद्र आहेत. या संदर्भात त्यांनी दिल्लीत येऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन शरद पवार ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि विरोधी आघाडी स्थापन करण्याची चर्चा झाली. मात्र या आघाडीत काँग्रेस असेल की नाही, याबाबत अद्याप बोलणे बाकी आहे. काँग्रेसशिवाय मोदींच्या विरोधात विरोधकांची आघाडी उभारता येणार नाही, असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांचे मत आहे. मोदींना पर्याय म्हणून ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे. पंजाबमध्ये ज्या पद्धतीने आम आदमी पक्ष (आप) यशस्वी झाला आहे, त्याला राजकीय पक्षांचा ‘सर्वात यशस्वी स्टार्ट अप’ म्हटले जाऊ लागले आहे. कारण दहा वर्षे राजकारणात आहे. दोन राज्यांत कमी वेळेत सरकार स्थापन होणे अशक्य मानले जाते.

बहुजन समाज पक्षाची स्थापना करून युपीमध्ये सत्ता काबीज करणारे बसपाचे संस्थापक कांशीराम म्हणायचे की कोणत्याही राजकीय पक्षासाठी पहिली निवडणूक हरायची असते, दुसरी हरायची असते आणि तिसरी जिंकायची असते. बीएसपीची स्थापना १९८४ मध्ये झाली आणि मायावती २००७ मध्ये म्हणजे २३ वर्षांनी स्वबळावर युपी जिंकू शकल्या. आम आदमी पक्षाची स्थापना २०१२ मध्ये झाली आणि आज आपची दोन राज्ये आहेत. पण २०२४ मध्ये विरोधकांचा चेहरा बनण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना आधी ‘आप’ हा राष्ट्रीय पक्ष बनवावा लागेल. प्रादेशिक पक्ष होण्यासाठी काही नियम आहेत…जसे की ४ राज्यांमध्ये ८ टक्के मते किंवा ४ राज्यांच्या विधानसभेत ६ टक्के मते आणि २ जागा किंवा ४ विधानसभांमध्ये ३ जागा, मतांच्या टक्केवारीत फरक पडत नाही. आता दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार आहे आणि गोव्यात त्यांना ६.७ टक्के मते आणि २ जागाही मिळाल्या आहेत. म्हणजे गुजरात किंवा हिमाचलच्या निवडणुकीत २ जागा आणि ६ टक्के मते घेऊन ‘आप’ राष्ट्रीय पक्ष बनला तर अरविंद केजरीवाल यांचाही कौल वाढेल. आणि दावेदेखील.

केजरीवाल आणि मोदी यांच्यात बरेच साम्य आहे असे मानणारे अनेक तज्ञ आहेत, कारण दोघेही त्यांच्या राजकारणात राष्ट्रवाद आणि धर्माला महत्त्वाचे स्थान देतात. केजरीवालांची तिरंगा यात्रा, ज्येष्ठांना धार्मिक स्थळांचा मोफत प्रवास, ‘जय माता दी’ आणि ‘भारत माता की जय’चे नारे एकत्रितपणे लावणे, आंबेडकर किंवा भगतसिंग अशी नवी प्रतीके शोधणे. जनतेला वीज आणि पाणी, मोफत रेशन देण्यावर दोघांचा विश्वास आहे. एक गुजरात मॉडेल विकायचे आणि दुसरे दिल्ली मॉडेल विकत आहेत. म्हणजे मोदींचे उत्तर केजरीवाल असू शकतात, कारण आता भारतात दोनच प्रकारची मते आहेत, एक मोदींना जिंकणारे आणि दुसरे मोदींना पराभूत करणारे. अडचण अशी आहे की पराभूत मते जास्त आहेत, पण ती विभागली गेली आहेत, ती गोळा करण्यात कोण यशस्वी होईल, तो मोदींना आव्हान देऊ शकेल. २०२४ मध्ये मोदींना पर्याय कोण ठरतो त्याची लोकांना उत्सुकता आहे.