घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमोसादचा इराणला रक्तरंजित दणका

मोसादचा इराणला रक्तरंजित दणका

Subscribe

इराणने अणूबॉम्ब तयार केले तर त्याचा वापर आपल्याविरोधात होईल याची खात्री असल्यामुळे इराणचा अणूबॉम्ब तयारच होऊ नये याची काळजी इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद घेत आहे. आतापर्यंत मोसादने इराणच्या १५ अणूशास्त्रज्ञांची हत्या घडवून आल्याचा आरोप इराणने केला आहे. २०१८ मध्ये इराणच्या अणू कार्यक्रमाची माहिती चोरण्यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

भारतात शेतकरी आंदोलन सुरू असताना तेथे आखाती देशांमध्ये गुप्तहेर संघटनांमध्ये युद्ध रंगले आहे. इराणचे अणू शास्त्रज्ञ आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे मुख्य शास्त्रज्ञ मोहसीन फाखरीझादेह यांची मागील आठवड्यात हत्या करण्यात आली. इराणची राजधानी तेहरानच्या बाहेरील रस्त्यावर मशीन गनमधून गोळ्या झाडून फाखरीझादेह यांना ठार मारण्यात आले. ही हत्या इस्रायलची जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना मोसादने केल्याचा आरोप इराणने केला आहे. उच्च तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या या हत्येमुळे केवळ इराणच नाही तर संपूर्ण जग हादरले. विशेष म्हणजे ही हत्या करताना कोणताही मानवी हस्तक्षेप करण्यात आला नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने ती करण्यात आली. मोहसीन फाखरीझादेह हे आपल्या पत्नीसोबत तेहरानच्या उपनगरातील आपल्या घरी सुट्टीनिमित्त निघाले होते. त्यांच्यासोबत तीन सुरक्षा कार होत्या. एका चौकात त्यांच्या सुरक्षा कारपैकी एक कार पुढे गेली. फाखरीझादेह यांच्या घराच्या सुरक्षेची तपासणी करण्यासाठी ही कार पुढे गेली होती. त्यानंतर लगेचच फाखरीझादेह यांच्या कारवर गोळीबार झाला. त्यामुळे त्यांची कार थांबली.

फाखरीझादेह यांना वाटले की गाडी कशावर तरी आपटली म्हणून ते कारच्याबाहेर आले. त्यांची पत्नीही कारबाहेर आली. त्यानंतर फाखरीझादेह यांच्या कारपासून १५० मीटर अंतरावर पार्क करण्यात आलेल्या निसान पिकअप ट्रकमधून फाखरीझादेह यांच्यावर गोळीबार झाला. ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या अ‍ॅटोमॅटिक मशिनगनमधून गोळीबार झाला. ही मशिनगन रेमोट कंट्रोलने हाताळण्यात आली. फाखरीझादेह यांना तीन गोळ्या लागल्या. त्यापैकी एक गोळी पाठीच्या मणक्यात शिरली. काही सेकंदानंतर निसान पिकअप ट्रकमध्ये बॉम्बस्फोट होऊन तो नेस्तनाबूत करण्यात आला. फार्स न्यूज या वृत्तवाहिनीनुसार, तो निसान ट्रक ज्याच्या मालकीचा होता त्याने २९ ऑक्टोबरलाच इराण सोडले आहे. हे संपूर्ण ऑपरेशन फक्त तीन मिनिटे चालले. उपग्रहाचा वापर करून ही मशिनगन नियंत्रित करण्यात आली होती. फाखरीझादेह यांच्यापासून केवळ नऊ इंचाच्या अंतरावर त्यांची पत्नी होती. मात्र त्यांना एकही गोळी लागली नाही. फाखरीझादेह यांची हत्या झाल्यानंतर इराण रिव्होल्युशनरी पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास केला. त्यानंतर ही हत्या इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने घडवून आणल्याचा बोभाटा जगभर झाला.

- Advertisement -

या हत्येनंतर इराणने त्याचा बदला घेतल्याचे सांगितले जाते. फाखरीझादेह यांच्या हत्येनंतर आठवड्याभरातच मोसादचे ज्येष्ठ कमांडरची इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये हत्या करण्यात आली. ६ डिसेंबरला मध्यरात्री तीन वाजता तेल अविवच्या रस्त्यावर या ४५ वर्षीय व्यक्तीची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आल्याचे वृत्त इराणियन प्रेस टीव्हीने दिले. या व्यक्तीचे नाव फहमी हिनावी, असल्याचे सांगण्यात आले. हिनावी यांच्यावर सलग १५ गोळ्या झाडण्यात आल्या. तेल अविवच्या रस्त्यावरून जात असताना सिग्नलला त्यांची गाडी थांबल्यावर त्यांच्या गाडीच्या मागून आलेल्या गाडीतील काही अज्ञान व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्या व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्या. या घटनेचे सोशल मीडियावर प्रसारित झालेले व्हिडिओ आणि फोटो पाहिले तर एक कार चौकात थांबली असून त्यांच्यावर गोळ्यांचे अनेक निशाण दिसून आले. तसेच त्या गाडीभोवती अनेक पोलीस कर्मचारी जमा झाले होते. आता या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध काय? तर फाखिरझादेह यांची हत्या झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खोमीनी यांनी ट्वीट करत फाखिरझादेह यांच्या हत्येची निंदा केली होती. तसेच हे कृत्य करणार्‍या व्यक्तींना कठोर दंड देण्यात येईल, अशी धमकीही त्यांनी दिली होती. त्यामुळे हिनावी यांची हत्या इराणनेच घडवून आणली असे म्हटले जात आहे. पण हे हत्यासत्र येथेच थांबेल असे वाटत नाही. कारण मोसाद या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. मोसादची ख्याती पाहता त्यांनी इस्रायलच्या शत्रूंना शोधून काढून त्यांना नष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात हे हत्यासत्र वाढणार यात शंका नाही.

मोसादने फाखिरझादेह यांची हत्या केल्यानंतर आलेली एक माहिती, ज्याबद्दल अधिकृत खुलासा होऊ शकला नाही ती अशी की, मोसादने इराणच्या एका ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञाला इराणमध्येच गोळ्या घालून ठार मारल्यावर, इराणी आणि पाकिस्तानी गुप्तहेर काही ‘वेगळ्या’ हालचाली करत असल्याची माहिती ‘मोसाद’ आणि भारताची गुप्तहेर संघटना ‘रॉ’ ला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही एजन्सी लगेच कामाला लागल्या. मग, एका मध्य आशियाई देशात संशोधन करत असलेल्या ५० भारतीय शास्त्रज्ञांना इंडियन एअर फोर्सने दोन दिवसांपूर्वी एक सिक्रेट मिशन राबवून परत आणले आहे. त्यांना आणण्यासाठी इंडियन एअर फोर्सने आपले विशेष विमान पाठवले होते. १९ तासांच्या या स्पेशल मिशनसाठी इंडियन एअरफोर्सच्या सी-17 ग्लोबमास्टर या मालवाहतूक विमानाचा वापर करण्यात आला होता. आयएएफने या स्पेशल मिशनसाठी सी-17 ग्लोबमास्टरची निवड केली. कारण या विमानामध्ये भरपूर जागा आहे. या विमानात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याने नेमके असेच विमान उपलब्ध करुन देण्यात आले.

- Advertisement -

कोरोनाचा फैलाव झाल्यापासून सी-17 च्या स्क्वाड्रनला अशा प्रकारची व ‘इतर’ आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचाही अनुभव आहे. नऊ तासांच्या उड्डाणानंतर सी-17 ग्लोब मास्टर त्या देशात पोहोचले. विमानतळावरुन त्या सर्व वैज्ञानिकांना विमानामध्ये हलवण्यात आले. त्याआधी त्या देशातील भारतीय अधिकारी व त्या देशातील इतर कर्मचार्‍यांनी त्या वैज्ञानिकांना सुरक्षितपणे विमानतळापर्यंत आणले होते. हे विमान भारतातील कोणत्या विमानतळावरून गेले, नेमके कोणत्या देशात गेले आणि आल्यावर दक्षिण भारतातील कोणत्या ठिकाणी लँडिंग करून या शास्त्रज्ञांना कोणत्या ठिकाणी हलवण्यात आले आहे, हे अजूनही भारतीयच नाही तर जगातल्या कोणत्याही मीडियाला माहीत नाही, अशी ही माहिती होती. अर्थात ही माहिती गुप्त असल्यामुळे त्याचा जाहीर खुलासा होणे शक्य नाही. पण मोसादची कारवाई आणि त्याचे परिणाम किती मोठे आहेत आणि आगामी काळात असे किती परिणाम जगाला भोगावे लागणार याची चुणूक मात्र त्यातून दिसून येते.

इराणने अणूबॉम्ब तयार केले तर त्याचा वापर आपल्याविरोधात होईल याची खात्री असल्यामुळे इराणचा अणूबॉम्ब तयारच होऊ नये याची काळजी इस्रायल आणि त्यांची गुप्तहेर संघटना मोसाद घेत आहे. आतापर्यंत मोसादने इराणच्या १५ अणूशास्त्रज्ञांची हत्या घडवून आणल्याचा आरोप इराणने केला आहे. २०१८ मध्ये इराणच्या अणू कार्यक्रमाची माहिती चोरण्यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. मोसादचे संचालक योसी कोहेन हे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये मध्यंतरी चर्चा झाली. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू हे सौदीत गेले आणि यांनी प्रिन्स सलमान यांची भेट घेतली होती. त्यावेळी नेत्यान्याहू यांच्यासोबत कोहेन असल्याचे सांगितले जाते. इस्रायल, बहारिन, संयुक्त अरब अमिराती, सुदान यांच्यात सुरू असलेल्या चर्चेमागे कोहेन यांची भूमिका मोठी असल्याचेही सांगितले जाते.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -