पोलिसांवर हात, कायद्याचा घात !

पोलीस दलाकडून कायमच त्याग, समर्पणाची अपेक्षा केली जाते. पोलिसांकडूनही आपले कर्तव्य बजावत असताना त्याग करण्याच्या परंपरेचा दबाव असतोच. सरकारमधील इतर कुठल्याही विभागापेक्षा पोलीस दलावरील दबाव तुलनेने अधिक असतोच. परिमंडळातील स्थानिक राजकीय नेते, पदाधिकारी, मंत्री, नोकरशाहीतील मोठे अधिकार्‍यांपासून ते अगदी गल्लीतल्या नगरसेवकाकडूनही पोलिसांवर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केला जात असतो. पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार वाढत आहेत, पण पोलिसांवर हात उचलून आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा आपल्याच हाताने घात करत आहोत, हे या लोकांच्या लक्षात येत नाही.

Mumbai police

कानून के हाथ लंबे होते है…असे संवाद पडद्यावरच असतात, वास्तवात असे घडत नसते. पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत अलिकडच्या काळात वाढल्याचे चित्र भयावह आहे. ठाणे स्टेशनवरही एका महिला पोलिसावर स्थानिक नागरिकांनी हल्ला केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. दादा, मामा, भाऊ अशा आकडेवजा अक्षरांच्या फॅन्सी नंबर प्लेट मिरवणार्‍यांकडून पोलिसांवरील अरेरावी ही अनेकदा प्रतिष्ठेची मानली जाते. 15 ते 22 वयातल्या फुटकळ कार्यकर्त्यांच्या घोळक्यात वावरणार्‍या फुटकळ मामा दादांकडूनही पोलिसांवर अरेरावी केली जाते. यातल्या एकाद्या कार्यकर्त्याने वाहतुकीचा नियम मोडल्यास दंडाची पावती फाडणार्‍या पोलिसाला थांब, साहेबांशी बोला सांगून एखाद्या गल्लीछाप भाई नेत्याला फोन लावण्याचे अनुभव पोलिसांसाठी नवे नसतात. दबाव हा नियमित कामाचा भाग असतोच, मात्र आपल्याच संरक्षणासाठी नेमलेल्या खाकी वर्दीतील पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल जाणे हे दूषित समाजाचे लक्षण आहे.

सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने महिलांचा विचार कायद्यात केला गेलेला असतो, मात्र सहानुभूतीचा गैरवापर करून पोलिसांना शिविगाळ, मारहाण केली गेल्याचे मुंबई ठाण्यात अलिकडच्या काळात वाढले आहेत. मुंबई पोलिसांसाठी विशेष करून उच्चभ्रू भागातील नागरिकांकडून पोलिसांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न नवे नसतात. रात्रीच्या वेळी आपल्या स्पोर्ट्स कार किंवा मोटारबाईकवर मद्यपान करून फाटक्या सायलेन्सरमधून इतरांच्या कानांवर अत्याचार करत रटरटत फिरणारे महाभाग, मोठ्या पार्टीजमधून मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांचे तीन तेरा करणे आपल्या अधिकारात असल्याचा भ्रम बाळगणारे तरुण तरुणींचे घोळके पोलिसांसाठी कायम डोकेदुखी असते. मद्याच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करण्याचा आपल्याला कायद्याने दिलेला विशेषाधिकार असल्यासारखे गैरवर्तन या मंडळीच्या जगण्याचा भाग झालेले असते.

पोलीस ठाण्यात नेल्यास त्या ठिकाणी पोलीस कर्मचार्‍याला मारझोड करणे, शिविगाळी करणे पोलीस म्हणजे आपले खासगी नोकर असल्याासारखे वागणार्‍यांना कायद्याचा धाक वाटत नसतो. किंबहुना, जबाबदार नागरिकांची कर्तव्ये हा नागरिकशास्त्रातील धड्यापुरता विषय या मंडळींचा असतो. हे अनुभव पोलिसांसाठी नवे नसतात. पोलिसांवर हात उचलणार्‍यांमध्ये महिलांची वाढलेली संख्या ही सामाजिक दृष्टीने चिंतेची बाब असते. गेल्या वर्षी दुचाकीस्वार महिलेने पोलिसांना शिवीगाळी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांच्या गैरकृत्याचे व्हिडीओही अधून मधून समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात. परंतु ज्यावेळी नागरिकांच्या मनात पोलिसांचा आदर कमी होत जातो. राज्यघटनेतील कायद्याचे राज्य या संकल्पनेला पहिला तडा तिथेच जातो. इथून पुढे हुकूम किंवा लोकशाही विरोधातील घटकांना पोषक वातावरण तयार होत जाते.

पोलीस निष्पक्ष असावेत असा कायद्याचा संकेत असतो. परंतु कायद्याच्या राज्यात पोलिसांचा वापरही राजकीय हेतूने केला जातो. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बिहार प्रदेश आणि मुंबई पोलिसांचा नुकताच झालेला प्रशासकीय संघर्ष याच राजकारणाचा परिणाम आहे. भिवंडीसारख्या एखाद्या वस्ती किंवा मोहल्ल्यात बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांगलादेशीयांची किंवा एखाद्या गुंड टोळीची धरपकड करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर स्थानिक नागरिकांकडून जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना नव्या नसतात. बेकायदा रेती उपसा, वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करताना पोलीस कर्मचार्‍यावर डंपर नेणे, हल्ला करण्याचे प्रकारही नेहमीच घडत असतात. यातील हल्लेखोरा हे विशिष्ट हेतूने हे गुन्हे करत असतात. परंतु ज्यावेळी समुदायातील नागरिकांकडूनच पोलीस दलाचे मानसिक खच्चीकरण केले जाते तेव्हा ही अराजकाची सुरुवात असते. देशातील घटनात्मक लोकशाहीच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याच्या आवरणातील पहिले कवच पोलीस विभागच असतो. पोलिसांवर पक्षपाताचा आरोप महाराष्ट्राच्या पोलीस दलावर काही तुरळक घटना वगळता आजपर्यंत झालेला नाही.

दंगल काळात पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप होतो. अशा वेळी शहरात पेटलेल्या दंगलीत आपल्या खाकीच्या कर्तव्यापुढे इतर सर्व कर्तव्य दुय्यम ठरवून संचारबंदीत हातात दगड घेतलेल्या हजारोंच्या जमावापुढे लाठी घेऊन छाती पुढे करून उभा राहाणारा पोलीस हा संविधान आणि लोकशाहीचा खरा शिपाई असतो. कोरोना साथरोगातही कोविड 19 विरोधातही पोलीस तुटपुंज्या सुरक्षासाधनांसहीत रस्त्यावर उतरतो आणि कोरोनाला रोखण्याची ही लढाई जिंकतो, त्या बदल्यात त्याला अनेकदा जीवाचे मोल द्यावे लागते, कोरोनामुळे मुंबई ठाणे पोलीस दलातील मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची शेकडोंच्या घरातील संख्या आपल्या समाज समुदाय आणि राज्यव्यवस्थेत भूषणावह मानली जाते. पोलिसांकडून त्यागाची अपेक्षा करण्याचा आपला अधिकार असल्याची आपली दांभिकता पोलिसांबाबत कमालीची उदासीन असते.

पोलिसांवर हल्ले होतच असतात, राजकीय व्यवस्थेकडून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न कायम सुरू असतात. सत्ताधारी व्यवस्थेकडून पोलिसांचा राजकीय वापरही नवी बाब नसते. पोलीस म्हटला की तो लाच घेणारा, अत्याचारी अशीच प्रतिमा आपल्या माध्यमांनी, मनोरंजन क्षेत्राने आपल्या व्यवस्थेने आपल्यावर बिंबवलेली असते. आपल्याला ती खरीही वाटत असते. मात्र खाकीच्या आतल्या माणसातील पोलीस काही काळासाठी वजा करून केवळ माणूस म्हणून त्याला ओळखण्याची आपल्याला गरज नसते. ठाणे, मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस लाईनीत राहाणार्‍या पोलिसांच्या कुटुंबाविषयी आपल्याला संवेदना असण्याचे काहीच कारण नसते. इथल्या नळांना पाणी येते का, तडे गेल्याने पोलिसाचे घर गळत असते, मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न, आपल्यासारखाच घरगाडा चालवण्याची जबाबदारीही खाकीतील माणसावर असते. मात्र आपल्याला त्याच्या खाकीची कर्तव्ये माहीत असतात, खाकीतील माणसाविषयी आपापल्या जगण्यात गुंतलेल्या इतर माणसांना देणेघणे नसते.

पोलिसांना मारहाण झाल्यावर आपल्याला अचानक त्यांच्या कर्तव्याची जाणीव होते. काळबादेवी कॉटन एक्सचेंज येथे पोलीस हवालदार एकनाथ पार्टे यांना एका महिलेने मारहाण केली. ही मारहाण सातत्याने सुरूच होती. मात्र या पोलिसाने या आरोपी महिलेवर उलट हात उचलला नाही. आरोपी महिलेने या पोलिसाला मारहाण करताना पोलिसांच्या खाकी वर्दीचाही मान ठेवला नाही. पोलिसांच्या संयमाचे आज कौतुक होत आहे. मात्र हाच संयम हळूहळू सहनशीलतेकडे वळण्याची भीती आहे. पोलीस सहनशील असतातच मात्र अतिसहनशीलता आणि संयमाचा स्फोट जास्त भयंकर असू शकतो. अतिसहनशीलता ही हतबलतेची वाटही प्रशस्त करते. यातील पोलिसाने जर संबंधित महिलेवर उलट हात उचलला असता तर मुंबई पोलीस दल आणि पर्यायाने गृह विभाग आणि सरकारला कोंडीत पकडण्याची संधी म्हणून या पोलीस शिपायाच्या कृत्याला माध्यमांनी दोषी ठरवले असते. परंतु या सोसलेपणाचे होणारे कौतुकही सुदृढ समाजाचे लक्षण नाही. ज्या वेळी संबंधित पोलिसाला महिलेकडून मारहाण केली जात होती, त्यावेळी बघ्याच्या भूमिकेत असलेल्या स्थानिक महिलांनी त्यात हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवला असता तर पोलिसांचे मनोधैर्य निश्चितच दुणावले असते. परंतु महिला पोलीस कर्मचारी येईपर्यंत पोलीस कर्मचार्‍याने आपला संयम कायम ठेवला. त्यासाठी या कर्मचार्‍याचा त्याच ठिकाणी महिला पोलीस अधिकर्‍याकडून गौरव करण्यात आला.

या हल्ल्यामुळे आपल्या संरक्षणाची जबाबदारी वाहणार्‍या आपल्याच पोलीस दलाविषयी आपल्या भवतालमध्ये किती उदासीनता भरलेली आहे, हेही स्पष्ट झाले. अलिकडच्याच दहा दिवसांत महिलांकडून महिलांवर, पोलिसांवर तसेच नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. विरारमध्ये एका महिलेने एका रिक्षाचालकावर चाकूने हल्ला केला. तर कल्याणात एका महिलेने दुसर्‍या महिलेवर कोयत्याने हल्ला केला. आधुनिक समुदायात महिला हिंसेचा आधार का घेत आहेत, हा चिंतेचा विषय आहे. एखाद्या मध्यरात्रीही रस्त्यावरील चौकात पोलिसाला पाहून घरी जाताना आपण सुरक्षित आहोत, ही भावना मुंबई ठाण्यासारखा शहरातील महिलांमध्ये आजही आहे. खाकीवरील हा विश्वास कायम राहायला हवा. खाकीवर हात उचलण्यासारखी घटना पुन्हा घडायला नको, ही इथला समाज आणि कायद्याच्या व्यवस्थेचीही समान जबाबदारी आहे.