घरफिचर्समायमहानगर ब्लॉगऑनर किलिंग...जीवघेण्या प्रतिष्ठेमागील जातवास्तव!

ऑनर किलिंग…जीवघेण्या प्रतिष्ठेमागील जातवास्तव!

Subscribe

जातीय प्रतिष्ठेतून होणार्‍या हत्या देशात नव्या नाहीत, महाराष्ट्रातही ऑनर किलिंगची घटना नुकतीच घडल्याची बातमी माध्यमांवर आली. प्रतिष्ठेपुढे नात्यांची होणारी हत्या चिंतेची बाब असताना या प्रतिष्ठेमागील कारणांचा विचार व्हायला हवा. समाजातील माणसांची प्रतिष्ठा ही कूळ, नाम, परंपरा, इतिहासाशी बांधिल असते, आपल्या घराण्यात असे प्रकार झालेले नाहीत, घराण्यातील परंपरा पुढील पिढीकडे पाठवण्यापेक्षा किंबहुना लादली जाते. या परंपरेला सामाजिक संस्कृतीचे कोंदण असल्याने त्याविरोधात आवाज उठवणे सामाजिक दृष्टीने गुन्हा मानला जातो.

सामाजिक प्रतिष्ठेमागे अनेक घटक कार्यरत असतात, ज्यात धर्म आणि जात तसेच आर्थिक फरक हे प्रमुख घटक आहेत. जातीय अहंकाराला प्रतिष्ठेचे नाव देऊन त्यातून आपली कौटुंबिक आणि सामाजिक अहंकार जपण्याचा प्रयत्न या ऑनर किलिंगमागे आहे. जातीय अहंकार विषारी स्वरुपाचा असतो, सामाजिक रचनेतील उतरंडीच्या जातीय रचनेमुळे खालच्या गटातील जाती शोषणासाठी असतात, तर वरच्या गटातील जाती या प्रतिष्ठेच्या असतात. अपवादात्मक स्थितीत खालच्या गटातील जातींमधून ऑनर किलिंगची घटना वरच्या गटांच्या जातींबाबत होते. केवळ जातीय उतरंड एवढेच कारण ऑनर किलिंगमागे नसून आर्थिक फरकामुळे तयार झालेल्या बोगस संकल्पना ही प्रतिष्ठेतून होणार्‍या हत्याकांडाला कारण ठरतात.

ऑनर म्हणजे प्रतिष्ठा, ही सामाजिक प्रतिष्ठा दुखावली गेल्याचे कारण अशा हत्याकाडांमागे असते. सामाजिक प्रतिष्ठेची संकल्पना ही मुळातच दूषित असल्याने त्यातून हत्याकांडे घडवली जातात. लग्न केलेल्या मुलाची किंवा मुलीची जात एक नसल्यास किंवा त्याचा धर्मही सारखाच नसल्यास ऑनर किलिंगला पोषक वातावरण निर्माण होते. प्रतिष्ठेच्या खोट्या आणि चुकीच्या संकल्पनांमुळे या घटना वाढल्याचे स्पष्ट होते. देशातील जास्तीत जास्त कायदे मोडणारे नेते समाजात प्रिय असतात, जास्तीत जास्त केलेल्या हत्या किंवा त्याशी संबंधित खटले असलेल्यालाही समाजात मोठा मान मरातब मिळत असतो, त्यामुळे सामाजिक नैतिक मूल्यांच्या संकल्पनाच दूषित असल्याने त्यातून निर्माण होणारी खोटी प्रतिष्ठाही बोगसच असते. आदरयुक्त भीती असलेल्यांना प्रतिष्ठा असते, भीती आणि प्रतिष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू मांडल्या जातात. आपल्याकडे भीतीलाच प्रतिष्ठा समजले जाते. थोरामोठ्यांचा आदर करावा, म्हणजेच त्यांना घाबरून राहावे, असेही मानले जाते. एका माणसाने बहुसंख्याकांना भीतीखाली ठेवणे म्हणजेच नेतृत्व कौशल्य असल्याचेही समजले जाते. या भीतीला ज्यावेळी नाती जुमानत नाहीत, त्यावेळी खोट्या प्रतिष्ठेतून अहंकार दुखावल्याने संबंधितांच्या हत्या केल्या जातात.

- Advertisement -

पुरुषप्रधान समाजरचनेत आणि संस्कृतीच्या नावाखाली पुरुषांनी महिलांची मालकी आपल्याकडे घेतलेली असते. कायद्यानुसार जरी प्रत्येक व्यक्ती आणि नागरिक ही स्वतंत्र विचारांची असली आणि त्यांना मर्यादित अधिकाराखाली जगण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेनुसार मिळालेले असले तरी सामाजिक स्वातंत्र्य मिळालेले असलेच असे नाही, महिलांच्या बाबतीत सामाजिक किंवा कौटुंबिक स्वातंत्र्याची तिलांजली देणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असते. एखादी महिला पतीचा, पित्याचा अत्याचार सहन करून शांत बसत असेल तर तिला कुटुंब व्यवस्थेची रक्षणर्ती म्हणून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. सामाजिक प्रतिष्ठेसाठी स्वतःचा बळी देण्याची ही परंपरा सतीकाळातही होती.

अलिकडच्या काळात व्यक्तीगत स्पेस आणि खासगी आयुष्याच्या विचारांमुळे लग्नसंस्थेवर विश्वास नसलेला समुदाय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहाण्यास पसंती देतो, त्यावेळी त्याला सामाजिक टीकेला सामोरे जावे लागते. दुसरीकडे लिव्ह इनमध्ये राहणार्‍यांना परस्परांशी बांधिल असण्याची गरज नसते, त्यामुळे परस्परांच्या व्यक्तीगत स्पेसचा विचार करून लिव्ह इनचा पर्याय निवडला जातो. लग्नसंस्थेतील विवाह हा संस्कार मानला जात असल्याने सामाजिक बंधने त्यावर असतात. कायदेशीर नोंदणी करून लग्नसंस्थेला कायद्याचे अधिष्ठान दिले जाते. सामाजिक कायदे आणि घटनात्मक कायदे हे परस्परांना पूरकच असतील असे नाही. सामाजिक संरचनेमुळे व्यक्तींवर असलेला परिणाम हा राजकीयपेक्षा सामाजिक कायद्यांचा जास्त प्रबळ असतो. समाज बहिष्कृत करण्याची शिक्षा, कौमार्यचाचणी किंवा पंचाकडून दिल्या जाणार्‍या शिक्षा किंवा काढल्या जाणार्‍या फतव्यांची भीती राजकीय कायद्यापेक्षा मोठी असते. खोट्या प्रतिष्ठेतून होणार्‍या हत्याही याच सामाजिक नियमांच्या वर्चस्वामुळे होत असतात.

- Advertisement -

महिला, मुलींनी आपल्या पद्धतीने जगण्यासाठी कुटुंबाविरोधात बंड करणे, मुलामुलींनी स्वतःच्या इच्छेने लग्न करणे किंवा जोडीदार निवडण्याचा अधिकार कायद्याने जरी दिलेला असला तरी समाजाने दिलेले नसतो, समाजातील माणसांची प्रतिष्ठा ही कूळ, नाम, परंपरा, इतिहासाशी बांधिल असते, आपल्या घराण्यात असे प्रकार झालेले नाहीत, घराण्यातील परंपरा पुढील पिढीकडे पाठवण्यापेक्षा किंबहुना लादली जाते. या परंपरेला सामाजिक संस्कृतीचे कोंदण असल्याने त्याविरोधात आवाज उठवणे सामाजिक दृष्टीने गुन्हा मानला जातो.

व्यक्ती किंवा समाजही भविष्याबाबत अनभिज्ञ असतो, त्याच्याजवळ विचार करण्यासाठी केवळ त्याचा भूतकाळच असल्याने नाईलाजास्तव भूतकाळ स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसते, अशा वेळी आपल्या समाजाचा भूतकाळ कसा प्रतिष्ठेचा होता, याचे ढोल पिटण्यामागे याच प्रतिष्ठेची वर्तमानातली जपवणूक असते, या खोट्या प्रतिष्ठा अहंकाराच्या मार्गाने ज्यावेळी सद्सद्विवेकाबाहेर जातात त्यावेळी त्या कमालीच्या धोकादायक होतात. वैजापूर तालुक्यात ऑनर किलिंगची भयावह घटना समोर आलेली आहे. तरुणीने आपल्या मर्जीने लग्न केल्यानंतर तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि आईने मिळून मुलीची हत्या केल्याचे हे प्रकरण असल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत संबंधित आरोपींनी मुलीची भीषण हत्या करून मृतासोबचा सेल्फी काढल्याचे म्हटले जात आहे. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर घराण्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्यामुळे तिला धडा शिकवल्याचे इतरांना (समाजाला) दाखवण्यासाठी असा सेल्फी घेतला गेल्याची शक्यता आहे. यातून गेलेली सामाजिक प्रतिष्ठा आपण या मार्गाने परत मिळवल्याच्या अहंकाराचा गंड आहे.

मनाविरुद्ध लग्न करून घराची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. आता गेलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपल्याच गर्भवती मुलीची हत्या करण्याशिवाय पर्याय नाही, इतका जातीय अहंकार ज्या समाजात पोसला जातो, त्या समाजाला कायमच आत्मचिंतनाची गरज असते. वैजापूर घटनेच्या तपासात बातम्यांमधून समोर आलेली माहिती अशी आहे की, मृत मुलगी एका तरुणासोबत लग्न करण्यास इच्छूक होती. त्या तरुणासोबत निघून गेल्यावर दोघांनी कोर्टात लग्नासाठी नोंदणी केली होती. यातील तरुणीचा भाऊ आणि आई मुलीला भेटायला तिच्या घरी आले होते. त्यावेळी मुलीने माहेरची माणसं आल्याच्या आनंदात चहा करण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली, त्यावेळी भावाने तिची निघृण हत्या केली. त्यानंतर भावाने पोलिसांकडे समर्पण केले. ही घटना जवळपास सैराट चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगाप्रप्रमाणेच घडवली आहे.

देशात ऑनर किलिंगच्या घटना नव्या नाहीत. वर्ष 2018 मध्येही अशीच घटना महाराष्ट्रात घडली होती. या शिवाय आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्यांनी भीतीने गाव सोडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. विवाह केलेल्यांनी कुटुंबाच्या आणि जातीतील धनदांडग्यांच्या हल्लाच्या भीतीने न्यायालयाकडे, पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केल्याचीही उदाहरणे आहेत. पितृसत्ताक पद्धतीमुळे ऑनर किलिंगच्या घटना घडल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर अशा घटनांची बिजे ही इथल्या सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेत असल्याचेही सामाजिक जाणकारांचे म्हणणे आहे. महिलांनी त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे नसतात, असा विचार रुजलेला आहे. माणसं आणि नात्यांपेक्षाही जात आणि जातीची प्रतिष्ठा महत्वाची असल्याचे मानणारा वर्गही आहे. अहमदनगरमध्ये काही महिन्यांपूर्वी एका जोडप्याला जिवंत जाळण्याची घटना घडली होती. तर वर्ष 2016 मध्ये सवर्ण जातीतील मुलीशी लग्न केल्यामुळे एका तरुणाला गोळ्या घातल्या होत्या.

हरियाणामध्ये आंतरजातीय विवाह करणार्‍या तरुण-तरुणींसाठी कायद्यानुसार ‘प्रोटेक्शन होम’ साकारले आहेत. तसेच या आणि अशा प्रकरणांच्या जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्टही स्थापन केलेले आहेत. ऑनर किलिंगच्या घटनेत आपला पती गमावलेल्या एका तरुणीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यातील पीडित तरुणी वरिष्ठ जातीतली होती आणि एलएलबीचा अभ्यास करत होती. या तरुणीला एका कथित कनिष्ठ जातीच्या तरुणासोबत लग्न करायचे होते. मात्र घराच्यांनी विरोध केला आणि मुलीचे कॉलेज, बाहेर जाणे बंद केले. हा छळ एवढा वाढला की या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे याचिकेत म्हटले होते. या दोघांनाही हत्येच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यानंतर ही मुलगी संधी साधून घरातून पळून गेली ती परत आलीच नाही.

त्यानंतर तिने घरच्यांच्या भीतीने पोलीस आणि न्यायालयाकडून संरक्षणाची हमी मागितली. ऑनर किलिंगच्या घटनांनी येथील जात आणि वर्गव्यवस्थेचे भीषण वास्तव अनेकदा समोर मांडले आहे. मात्र कुठलीही व्यक्ती ही मुलगी, बहीण, भाऊ, मुलगा असण्याआधी एक स्वतंत्र माणूस असल्याचे विसरले जाते. सामाजिक आणि कौटुंबिक बंधनात गॅस चेंबरसारखी घुसमट होत असल्यास आणि या चेंबरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास भीषण हत्येची शिक्षा दिली जाते, अशा वेळी हत्या करणारेच नाही तर संपूर्ण सामाजिक व्यवस्था, संस्कृती आणि परंपराच आरोपीच्या पिंजर्‍यात उभी असल्याचे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -