घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर उतरलाय...

बाळासाहेबांचा शिवसैनिक रस्त्यावर उतरलाय…

Subscribe

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिक संतप्त झाला असून आता तो रस्त्यावर उतरलाय! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कमालीचे प्रेम करणारा हा शिवसैनिक आहे. शिंदे आणि त्यांना साथ देणार्‍यांविरोधात त्यांचा राग उफाळून आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदे आणि मंडळींनी सुरत आणि तिथून गुवाहाटी गाठले तेव्हा हे सगळे ठरवून चाललेले असल्याची चर्चा सुरू झाली होती. स्वाभाविक महाविकास आघाडीतही चलबिचल सुरू झाली, मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवर जनतेशी संवाद साधताना सर्वांच्या मनातला गैरसमज मोजक्या शब्दात दूर केला, इतकेच नव्हे तर शिंदे यांना समोर येऊन बोलण्याचे आवाहन केले, मात्र शिंदे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने शिवसेना विरुद्ध शिंदेसेना हा वाद पराकोटीला गेला. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिंदे अडीच वर्षे होते आणि अचानक गेल्या काही दिवसांपासून त्यांना बरेच काही साक्षात्कार होऊ लागले आहेत. त्यातून बंडाचा झेंडा हाती घेण्यात आला. इतकेच नव्हे तर अनेक आमदार, काही मंत्री या बंडात सहभागी झाले. ऐन पावसाळ्यातील हा राजकीय शिमगा सर्वसामान्य माणसाप्रमाणे कट्टर शिवसैनिकालाही पसंत पडलेला नाही.

महाआघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्या तरी हे सरकार या कुरबुरींमुळे लगेचच कोसळेल अशी काही परिस्थिती नव्हती. शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद पराकोटीला पोहचत असताना शिवसेनेच्या काही नेत्यांना केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या चौकशी जाळ्यात अडकविण्यात आले. त्यामुळे भाजपविरोधात शिवसेनेत तीव्र नाराजी आणि संतापही होता, आहे. असे असताना आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडीचाच प्रयोग करण्यात येणार हे उघड होते. याची जाणीव भाजपलाही असल्याने एकनाथ शिंदे यांना बळ देण्याचे काम या पक्षाने केले किंबहुना ते आता लपूनही राहिलेले नाही. शिंदे यांनी पक्षप्रमुखांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरत गाठण्याचे काम केले तेव्हा कुठेतरी टायमिंग किंवा प्लॅनिंग चुकतंय याची त्यांना कल्पना नसेल अशातला भाग नाही. सुरुवातीला मोजके आमदार घेऊन सुरतला आणि नंतर गुवाहाटीला पोहचलेल्या शिंदेसेनेला नंतर अनेकजण येऊन मिळाले. त्यामुळे आपले काम फत्ते झाले असे शिंदे यांना वाटले असावे, परंतु त्यांची आणि इतरांची गल्लत झाली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर निःस्सीम प्रेम करणार्‍या शिवसैनिकांनाही त्यांनी गृहित धरले. या शिवसैनिकांना शिंदे यांचा निर्णय बिलकूल आवडलेला नसल्याने तो रस्त्यावर उतरला आहे. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यापुढील लढाई रस्त्यावर असेल असे यापूर्वीच जाहीर करून टाकले आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या स्थापनेपासून आक्रमकता हे धोरण राहिले आहे. अलीकडे शिवसेना सत्तेत आल्यापासून आक्रमकतेची धार काहीशी कमी झाली. पक्षाला मरगळ आलीय की काय, अशीही चर्चा सुरू झाली, मात्र शिंदे यांनी बंड करताच शिवसेनेचा मूळ गाभा असलेली आक्रमकता उफाळून आली असून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरून शिंदेसेनेचा जाहीर निषेध करीत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे बॅनर, होर्डिंग फाडण्यात आले. अनेकांच्या घरांवर निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यात शिंदे यांनी शिवसेना आपल्या ताब्यात घेण्याची तयारी चालविल्याची चर्चा सुरू झाल्याने शिवसैनिक अधिकच बिथरला आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांशिवाय इतर कुणाची असू शकत नाही हे शिवसैनिकांच्या डोक्यात झालेले घट्ट समीकरण आहे. त्यामुळे आकड्यांचा खेळ करीत किंवा तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत शिवसेनेवर आपली पकड ठेवणे हे शिंदे यांना वाटते तितके सोपे नाही, कदाचित याची त्यांना पूर्ण जाणीवही असेल. एक नक्की झालेय की कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांना सोडून इतरत्र कुठेही जाणार नाही. गेल्या दोन-तीन दिवसांत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला-पुरुष शिवसैनिकांची संख्या पाहिल्यानंतर ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूतीसुद्धा मिळत असल्याचे लक्षात येते.

महाराष्ट्र राज्यासमोर सामान्यांच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कुठल्यातरी ‘मोठ्या’ पक्षाच्या आहारी जाऊन शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केलेले बंड अनेकांच्या पचनी पडलेले नाही. कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन ‘आम्ही तुमचेच’ असे सांगणारे आमदार, मंत्री शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून यातील काहीजण परत येऊन ‘आम्ही तुमचेच’ असे सांगत उद्धव ठाकरे यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसले तर नवल वाटणार नाही. आम्हाला फसवून, बळजबरीने सुरत, गुवाहाटीला नेण्यात आले असेही कदाचित ते सांगतील. आपल्याकडे आलेल्यांचा आकडा पाहून खूश असलेले शिंदे यांनाही मनातून हे माहीत असेल.

- Advertisement -

आता त्यांच्यासाठी शिवसेनेकडून परतीचे दोर कापले गेल्याने त्यांना वेळ पडल्यास उसने अवसान आणून बंडाचा झेंडा फडकावत ठेवावा लागेल. हा सर्व खेळ सुरू असताना शिवसेनाही आक्रमक मोडवर आलेली आहे. युवा नेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे वडिलांच्या मदतीसाठी मैदानात उतरले असून दोन दिवसांपासून त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बैठकांचा सपाटा लावला आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यात काही ठराव घेण्यात आले. ‘बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही’, हा त्यापैकी एक ठराव आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेवर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडताना हे आधी ‘नाथ’ होते, आता ‘दास’ झाल्याचे म्हटले आहे. तुुुुुुुम्हाला मते मागायची असतील तर तुमच्या बापाच्या नावाने मागा आमच्या बापाच्या नावाने नको, अशा कठोर शब्दात त्यांनी खडसावले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेला संपवायला निघालेत, असे शिंदे पिता-पुत्र सांगत आहेत. हे त्यांनी अडीच वर्षांत कधीतरी सांगितले असते तर बरे झाले असते, असे शिवसैनिक सांगत आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोट अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ते भाजपला अडचणीचे ठरणार आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्वचजण शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर ठाम राहतील याची खात्री कुणीही देऊ शकणार नाही. म्हणून आक्रमक झालेल्या ठिकठिकाणच्या शिवसैनिकांचा वाढता दबाव पाहता काही बंडखोर घरट्यात परतले तर फारसे आश्चर्य वाटणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -