घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबाळासाहेब ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे !

बाळासाहेब ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे !

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शिवसेनेचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण आजची शिवसेना ही बाळासाहेबांची ‘जहाल’ सेना राहिली आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ती मवाळ झाली आहे. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. शिवसेना हा एकाधिकारशाहीने चालत आलेला राजकीय पक्ष आहे. मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना आज धर्मनिरपेक्ष भूमिका असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात सरकार चालवत आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे आक्रमक दिसत नसले तरी ते धाडसी आहेत. समयसूचकता दाखवणारे नेतृत्व असल्याचे एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आले असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या मंगळवारी झालेल्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा शिवसेनेच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा.

मराठी माणूस, भूमिपूत्र, अडल्या नडलेल्यांना मदत आणि 80 टक्के समाजकारण करीत ज्या संघटनेने मराठी समाजाला भुरळ घातली ती म्हणजे शिवसेना आणि या चार अक्षरांमागे खंबीरपणे उभे होते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. 17 नोव्हेंबर हा बाळासाहेबांचा स्मृतीदिन. 2012 या वर्षी ऐन दिवाळीनंतरच शिवसेनाप्रमुख आपल्या सगळ्यांना सोडून गेले. मराठी माणूस, अन्याय, भूमिपुत्र यासाठी 60 वर्षांपूर्वी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून सर्वांना विचार करायला भाग पाडले होते. मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक मराठी माणसांच्या वेदनेचे व्यासपीठ होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. त्यातल्या व्यंगचित्रांनी इतिहास घडवला. सामर्थ्य कशात असते? सामर्थ्य तलवारी, तोफगोळे, बंदुका, तलवारी या सगळ्यांमध्ये असते. पण शिवसेनाप्रमुखांनी जे सामर्थ्य दाखवलं ते कुंचल्याच्या फटकार्‍यातून. वक्तृत्वाबरोबरच बाळासाहेब ठाकरे भेदक लेखनदेखील करत. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती.

शिवसेनेत लोकशाहीपेक्षा ठाकरेशाही चालवत ज्यांच्या आदेशाने मुंबई काय पूर्ण महाराष्ट्र बंद पडत असे, थांबत असे ते बाळासाहेब. जुन्या शिवसैनिकांनी त्यांचा दरारा आणि प्रेम, आपुलकी प्रत्यक्ष अनुभवली. त्यांच्या या आपुलकीने एका हाकेवर शिवसैनिक चाल करायचे. बाळासाहेब एक व्यंगचित्रकार होते. ते बॉलिवुडचे गॉडफादर होते. अडल्या-नडलेल्याला मदतीचा हात देणारे, बाळासाहेब दोस्तांचे दोस्त आणि दुष्मनांचेही दोस्तच होते. स्वतःच्या शैलीत, स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या तंद्रीत आणि स्वतःच्या आवेगात त्यांनी राजकारण केले. एक अत्यंत वलयांकित आणि कलंदर नेता असे बाळासाहेबांचे वर्णन करता येईल. मार्मिकनंतर 19 जून 1966 साली वडील प्रबोधनकार यांच्या संकल्पनेतून चार अक्षरांची संघटना शिवसेना नावाने काढली. सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या मूळ हेतूने जन्माला आलेल्या शिवसेनेने 1980 पासून हिंदुत्ववादाची भूमिका जाहीरपणे घेतली.

- Advertisement -

लाखालाखांच्या सभा सलग साडे चार दशके गाजवणारा, जिंकणारा, एखाद्याच्या मागे योद्ध्याप्रमाणे उभे राहत परिणामांची पर्वा न करणे हा तर त्यांचा स्थायीभाव. व्यंगचित्रकार, पत्रकार, संपादक, शिवसेनेचे संस्थापक आणि तितकेच प्रेमळ अशी त्यांची ख्याती होती. भाषणांतून कठोर रागीट वाटणारे बाळासाहेब हे अत्यंत प्रेमळ होते हे आजही जुने शिवसैनिक, आताचे सर्वच नेते सांगतील. जेवढा दरारा तेवढीच माया लावणारे वडीलधारे, ठाकरी बाणा जपणारे आणि बोलून झाल्यावर पश्चाताप न करणारे किंवा मी असे बोललोच नाही असा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. विरोधक असू देत किंवा परदेशी पाहुणे मुंबईत महाराष्ट्रात आल्यावर बाळासाहेबांना भेटल्याशिवाय कुणीही जात नसे. त्यामुळेच त्यांच्या अंतिम प्रवासाच्या वेळी मुंबईतील सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. सुमारे २० लाखांहून अधिक जनसमुदाय आपापल्या मनातील बाळासाहेबांना साश्रुनयनांनी निरोप देण्यासाठी जमला होता. आजही वांद्रे कलानगर ते शिवाजी पार्क हा बाळासाहेबांचा प्रवास लख्ख डोळ्यासमोर येतो आणि परत या परत या… बाळासाहेब परत या… ही घोषणा मेंदूत घर करून राहिली आहे.

‘आवाज कुणाचा’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा घोषणा होताच समोर येतात ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खांद्यावर ‘भगवा’ टाकलेले शिवसैनिक. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनाप्रमुखांचा पुत्र पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकत आहेत. राज्यात असलेली शिवसेनेची सत्ता, सद्यस्थितीतील हिंदुत्वाचा मुद्दा, काँग्रेसचा हातात घेतलेला हात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदबाबूंच्या सहकार्याने टिकून राहिलेले सरकार या एकंदर स्थितीचा विचार करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हवे होते, अशी भावना सर्वांचीच आहे. पुढील 10 दिवसांत महाविकास आघाडीच्या सरकारला 28 नोव्हेंबर रोजी एक वर्ष होईल आणि वर्षभरातील कामाचा लेखाजोखाही मांडला जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या जहाल शिवसेनेचा उल्लेख केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण आजची शिवसेना ही बाळासाहेबांची ‘जहाल’ सेना राहिली आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ती मवाळ झाली आहे, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. शिवसेना हा एकाधिकारशाहीने चालत आलेला राजकीय पक्ष आहे. मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना आज धर्मनिरपेक्षतेची भूमिका असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात सरकार चालवत आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे आक्रमक दिसत नसले तरी ते धाडसी आहेत. राजकारणाची दिशा कोणती आहे, तात्काळ कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया न देता समयसूचकता दाखवणारे नेतृत्व असल्याचे एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आले असेल. ठाकरे घराण्यातून कुणीही थेट निवडणूक लढविलेली नसतानाही मुलगा आदित्यला वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणे. निवडून आणणे, थेट कॅबिनेटमंत्री बनवणे आणि वर्षानुवर्षे वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करून स्वत: मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यापर्यंतचे आव्हान उध्दव ठाकरे यांनी स्वीकारले नसते. साठीत असलेल्या या पक्षप्रमुखाने संघटनेचा, ठाकरे या ब्रँडचा आणि होणार्‍या परिणामांचा विचार केलेला असणार कारण राजकाराणाचे बाळकडू मुख्यमंत्री ठाकरे यांना वडिलांकडूनच मातोश्रीत मिळाले त्यात काही वाद नाही. 2002 सालच्या महापालिका निवडणुका उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आणि 2003 साली महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या शिबिरात उध्दव ठाकरे यांना अधिकृतपणे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासून उध्दव ठाकरे यांनी मागे वळून पाहिले नाही. तीन वर्षांतच नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे नेते पक्ष सोडून गेले तरी शांत, संयम असलेल्या उद्धव यांनी शिवसेनेचे अवघड धनुष्य लीलया पेलले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना सांभाळू शकतील का, अशी शंका त्यावेळी अनेकांनी उपस्थित केली होती. अरेला कारे करणार्‍या आक्रमक शिवसैनिकांना एक शांत, संयमी आणि मीतभाषी नेतृत्व लाभले होते. कोणत्याही राजकीय पक्षाला बदलावेच लागते, नाहीतर त्याचा र्‍हास होतो. त्यानुसार शिवसेनेमध्येही बदल झाले. राडेबाजी करणारी शिवसेनेची ओळख पुसून आता निवेदने देणे, तोडफोड न करता आंदोलने करणे, सत्तेत असूनही निर्णय न पटल्यास लोकशाही मार्गाने निषेध करणे असे नवीन प्रकार शिवसैनिकांनी अनुभवले. अन्यथा पत्रकार अर्णब गोस्वामी याने आपली पातळी विसरून एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अरे तुरे करणे, एकेरी बोलणे हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकाने खपवून घेतले नसते. सत्तेत येण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी हा बदल शिवसेनेसाठी आवश्यक होता.

त्यामुळेच आता वर्षभर मुख्यमंत्रीपदी सत्तेत बसूनही उध्दव ठाकरे हे त्यांच्या स्वभाव मर्यादेप्रमाणे हळूहळू निर्णय घेत आहेत आणि कोरोनाच्या महामारीतही जनतेला त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी नाही हे विशेष. उद्धव ठाकरेंनी आपल्या निवडक विश्वासू नेत्यांंच्या मदतीने शिवसेनेचे नेतृत्व सांभाळले आणि शिवसेनेला थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवले हे नाकारून चालणार नाही. जे बाळासाहेबांच्या काळातही जमले नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. बाळासाहेबांच्या काळातही एकट्याच्या जीवावर 63 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले नाहीत. जी किमया उध्दव ठाकरे यांनी 2014 मध्ये करून दाखवली. पहिल्या पिढीचा शिवसैनिक आता साठी सत्तरीत आहे. तो काळ आता गेला आहे, तर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा जमाना आला आहे. जो मारामारी, राडे, आंदोलने, तोडफोड संस्कृतीला नाकारतो आणि टेक्नोसॅव्ही असल्याने सोशली कनेक्टेड असतो. अशा तरुण वर्गाला जोडण्याचे काम आदित्य करत आहे. मात्र खेडोपाड्यातला शिवसैनिक हा भगव्या झेंड्यामुळेच शिवसेनेशी जोडलेला होता आणि आहे.

शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीसह धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत सत्तेत आहे.शिवसैनिक हा स्वभिमानी माणूस आहे. त्यामुळे ही तडजोड शिवसैनिकांसाठी कठीण आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधला संभ्रम वाढण्याआधी शिवसेनेला आपली विचारसरणी, भूमिका आणखी ठळकपणे सांगण्याची गरज आहे. बाळासाहेबांनी ज्या मुद्याला उचलून शिवसेना पक्ष स्थापन केली तोच मराठीचा मुद्दा आता शिवसेनेला तारेल की मोठ्या शहरांमध्ये मराठी माणसासोबतच भूमिपुत्र असलेल्या इतर भाषिकांच्या प्रश्नांनाही मुख्यमंत्री उध्दव आणि आदित्यलाही लक्ष घालावे लागेल यावर बरंच काही अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. राज्याच्या साडेबारा कोटी जनतेच्या नजरा त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर अवलंबून आहेत. राज्यासमोरील आर्थिक संकट, बेरोजगारी, गरिबी, शिक्षण, आरोग्य यावरही शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहे.शिवसेनेचा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनाच घ्यायचा आहे. कारण 25 वर्षे नैसर्गिक मित्र असलेला भाजप हा सध्या विरोधक आहे. त्यामुळे काळ कसोटीचा आहे, शिवसेनेसाठीही आणि उध्दव ठाकरे यांच्यासाठीही.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -