तात्या आणि अण्णांचा वाईन विद्रोह!

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाज प्रबोधनकार बंडातात्या कराडकर आणि समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याविरोधात आवाज उठवला. अण्णांनी तर उपोषणाचा इशारा दिला. सरकारचे म्हणणे आहे की, हा निर्णय आम्ही द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी घेत आहेत. पूर्वी मद्य पिणे हे निशिद्ध समजले जात आहे, बदलत्या काळात तो लाईफ स्टाईलचा भाग बनता चालला आहे. तो लोकांचा सहजभाव होऊ पाहत आहे, अशा स्थितीत बंडातात्या आणि अण्णांच्या वाईन विद्रोहाला खरोखर लोकांचा प्रतिसाद मिळेल का, हे पहावे लागेल.

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनविक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याचे उलटसुलट पडसाद उमटू लागले आहेत. वाईन हे मुळात मद्य या प्रकारात मोडते का, त्यात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे, याची शास्त्रीय चिकित्सा करणारी बरीच चर्चा समाजमाध्यमांवर झाली, तसेच काही तज्ज्ञ मंडळींनी त्याविषयी बाजूने आणि विरोधात मते मांडली. सुपर मार्केटमध्ये आणि जनरल स्टोअर्समध्ये प्रामुख्याने गृहोपयोगी किराणा मालाची विक्री केली जाते. त्यामुळे या ठिकाणी पुरुषांसोबतच महिला आणि मुलांचा वावर असतो. अशा दुकांनामध्ये कुणीही माणूस सहज जातो. किराणा माल असल्यामुळे या दुकानांना घरगुती स्वरुप असते, त्यामुळेच ही दुकाने आणि अन्य दुकानांमध्ये फरक असतो.

देव पूजेसाठी लागणार्‍या सामनापासून ते घरात बनवायच्या जेवणापर्यंत या ठिकाणी सगळ्या वस्तू मिळत असल्यामुळे त्याला एक सांस्कृतिक स्वरुप प्राप्त होत असते. त्यामुळेच अशा सांस्कृतिक वातावरणाच्या दुकांनामध्ये वाईन विक्रीला परवानगी देऊन सरकार संस्कृतीवर घाला घालत आहे, असा आक्षेप घेण्यात येत आहे. कारण या दुकानांमधील वस्तू माणसे जशा अगदी सहजपणे घरी घेऊन येतात, तशीच अशा दुकानांमधून मिळणारी वाईन घरी घेऊन येतील. आता तिला जसे काही अंतरावर ठेवले जाते, ते अंतर दूर होऊन ती घरगुती वापराची गोष्ट होऊन बसेल. त्याचे दुष्परिणाम कौटुंबिक पातळीवर होतील, त्यामुळे मुलांना कमी वयात नकोत्या गोष्टीची सवय लागेल. घरगुती वापराच्या वस्तूंसोबतचा दर्जा वाईनला देऊन तिची प्रतिष्ठा वाढवू नये, असे मानणार्‍यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वाईनविक्री विषयीच्या या निर्णयाला विरोध केलेला आहे.

महाराष्ट्र ही संताची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे ज्या दुकानांमध्ये किरणा माल विकला जातो, तिथे वाइनसारखे पेय विक्रीसाठी ठेवण्यास आमचा विरोध आहे, अशी सर्वात अगोदर भूमिका ज्येष्ठ कीर्तनकार आणि व्यसनमुक्तीसाठी गेली अनेक वर्षे कार्य करणारे बंडातात्या कराडकर यांनी घेतली. त्यांनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचवेळी वाईनच्या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या मुलांचा उल्लेख केला, त्यावरून बंडातात्या यांच्याविरोधात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला. त्यानंतर बंडातात्यांनी ज्यांची नावे घेतली होती, त्या पक्षांच्या नेत्यांनी बंडातात्या हे विशिष्ट राजकीय पक्षाची बाजू घेऊन बोलत आहेत, अशा आरोप केला. बंडातात्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या नेत्यांच्या मुलांवर जाहीरपणे आरोप करून खिल्ली उडवल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले. वातावरण इतके तापले की, बंडातात्यांना प्रसारमाध्यमांवर ज्यांच्याविषयी ते बोलले त्यांची जाहीर माफी मागावी लागली, पण त्यामुळे त्यांची सुटका झाली नाही. बंडातात्यांवर पोलीस तक्रार दाखल करण्यात आली, त्यांना पोलीस ठाण्यात जावे लागले. पोलिसांनी त्यांच्या वयाचा आणि समाजसेवेचा विचार करून त्यांना समज देऊन सोडून दिले.

बंडातात्या यांनी वाईनविरोधात भूमिका घेऊन केलेल्या वक्तव्यांचे प्रकरण जरा कुठे थांडावत नाही तोपर्यंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याला विरोध करून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही. त्यामुळे जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. राज्यात दारूची दुकाने कमी आहेत का, तरीही तुम्ही वाईन सुपरमार्केटमध्ये कशासाठी ठेवत आहात, तरुण पिढीला तुम्हाला व्यसनाधीन बनवायचे आहे का, तुमच्या निर्णयाने मी दु:खी झालो आहे, त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा नाही. असे हताशा उद्गार अण्णांनी काढले. इतकेच नव्हे तर त्यांनी १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा दिला होता, पण अण्णांचे वय आता ८४ आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वयाचा विचार करून उपोषण करू नये, असा ठराव ग्रामसभेने केला.

त्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित करून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइनविक्रीचा निर्णय मागे घेतला नाही, तर पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श गाव म्हणून मान्य प्राप्त झालेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी लोकचळवळीतून ग्रामविकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत, गाव व्यसनमुक्त केलेले आहे. ज्याला व्यसन म्हणून संबोधले जाते, अशी कुठलीच वस्तू अण्णांच्या गावात मिळत नाही. गांधीवादी असलेल्या अण्णांना आपला हा विचार सर्वत्र पसरावा आणि समाज सुदृढ, व्यसनमुक्त व्हावा असे वाटते. हभप बंड्यातात्या हे कीर्तनकार असल्यामुळे तेही समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देत असतात. महात्मा गांधीजींनीही समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी कृतीशील चळवळ चालविली होती. त्यामुळेच गांधीवादी अण्णा आणि कीर्तनकार बंडातात्या यांना राज्य सरकारने किराणा वस्तू जिथे मिळतात, तिथे वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाला विरोध केला.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सरकारने हा निर्णय द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतला आहेत, त्यामुळे त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. सध्या भाजप आणि शिवसेना यांचे सत्ताकारण अटीतटीला पोहोचले आहे. त्यामुळे सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णयाला रस्त्यावर उतरून भाजपने विरोध चालवला आहे. पण भाजपशासित मध्य प्रदेश,गोवा या राज्यांमध्ये मद्यविक्रीला खुली परवानगी आहे. त्याचे उत्तर भाजप नेत्यांकडे नाही.

सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वाइन विक्रीच्या निर्णयाबाबत सुरक्षित भूमिका घेतलेली आहे, सुरुवातीला त्यांनी वाईन विक्रीचे समर्थन केले होते, पण होणारा विरोध लक्षात घेऊन त्यांनी त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही, हे राज्य सरकारने ठरवायचे आहे, असे म्हटलेले आहे. वाईन आरोग्याला चांगली, कारण तो फळांचा आंबवलेला रस असतो, ती बनवताना रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तिचा अमल चढत नाही. त्यामुळे तिला दारू म्हणून हिन लेखू नये, असे समर्थकांकडून म्हटले जातेे. असे असले तरी ती विकण्याच्या जागेवर अनेकांचा आक्षेप आहे. समाजसुधारकांकडून होत असलेला विरोध आणि आक्षेप लक्षात घेऊन वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने लोकांकडून हरकती आणि सूचना मागिविल्या आहेत.

एकूणच भारतीय समाज हा सध्या मोठ्या संक्रमण काळातून जात आहेत. प्रत्येकाच्या हातात आलेल्या अँड्रॉईड मोबाईलमुळे शहर आणि गाव यांच्यातील दरी संपलेली आहे. ज्या गोष्टी शहरात मिळतात, त्या गावात मिळतात, फक्त तुमच्याकडे पैसे असायला हवेत. एकेकाळी फक्त शहरातील सुविधा आणि खाण्यापिण्याच्या सवयी आता गावापर्यंत पोहोचल्या आहेत. शहरातही इमारतीमध्ये किंवा वस्तीमध्ये एखाद्या टीव्ही, एखादा फ्रिज, एखाद्या लॅण्डलाईन फोन असायचा. ती परिस्थिती आता पार बदलून गेली आहे. पूर्वी मुले भाड्याची सायकल चालवत, स्वत:ची सायकल असणे हे त्यावेळी श्रीमंतीचं लक्षण होतं, आता मिसरूड फुटलेल्या मुलाकडे स्वत:ची मोटरसायकल असते, मग शहर असो की, गाव असो. वेगवान संपर्क साधनांमुळे आपण आता ‘जागतिक नागरिक’ झालो आहोत.

१९९१ साली भारतीय बाजारपेठ जागतिक वस्तूंसाठी खुली झाली, त्यानंतर जगातील विविध वस्तूंप्रमाणे तिकडच्या जीवनशैलीनेही भारतात प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय समाजात घरात मद्य पिणे निषिद्ध मानले जात असे. जेव्हा फ्रिज घरात आला, तेव्हा त्याचा उपयोग सुरुवातीला दूध, भाज्या आणि जेवण जास्त काळ टिकवण्यासाठी केला जात असे. उन्हातून आल्यावर फ्रिजमधील थंड पाणी लोक पित असत. पण काळ जसा पुढे सरकला तसा मध्यमवर्गीयांकडेही बर्‍यापैकी पैसा येऊ लागला. आजूबाजूला बदलणार्‍या परिस्थितीचा परिणाम त्यांच्या जीवनावर पडू लागला. त्यानंतर घरातील फ्रिजमधील काही जागा विविध प्रकारच्या मद्याच्या बाटल्यांनी घेतली. अर्थात, याला अपवादही आहेत. पण घरात मद्य पिण्याच्या सवयीने प्रवेश केला. एकत्र जेवण्याप्रमाणेच एकत्र मद्यप्राशन केले जाऊ लागले. नव्या पिढीला तर मद्य पिण्यात काही विशेष वाटत नाही, तो एक जीवनशैलीचा भाग आहे, असे वाटू लागले.

कुठलेही राजकीय पक्ष आणि त्यांचे सरकार कुठलाही निर्णय घेताना लोकांच्या मतांचा आणि शासकीय तिजोरीत येणार्‍या पैशांचा विचार करत असते. जाहीरपणे मद्य हे कितीही निषिद्ध मानले तरी सरकारला त्यातून प्रचंड महसूल मिळत असतो. तसेच ज्या राज्यांमध्ये मद्यबंदी आहेत, ती किती प्रामाणिकपणे पाळली जाते हादेखील एक संशोधनाचा विषय आहे. कोरोनाच्या काळात सरकारला मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळाला. काही वर्षांपूर्वी लॉटरीला जुगार मानले जात होते, पण पुढे त्यातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल आणि लोकांची पसंती पाहून सरकारने महसूलासाठी लॉटरीला परवानगी तर दिलीच, पण स्वत:ची लॉटरीही सुरू केली.

अलीकडच्या काळात सर्वस्तरातून मद्याला मिळणारी पसंती आणि मिळणारा प्रचंड महसूल लक्षात घेऊन सरकारने त्याचा थोडा सॉफ्ट मानला जाणारा प्रकार म्हणजे वाइनला मोठ्या किराणा दुकानांत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असावा. मोबाईलवर पोर्न साईट्स बंद करण्याला लोकांनीच मोठ्या संख्येने विरोध केला, तेव्हा आता वाईनला किरणा मिळणार्‍या दुकानांमध्ये विक्री करण्यास बंड्यातात्या कराडकर आणि अण्णा हजारे विरोध करत असले तरी बदलत्या काळात जनमत त्यांना किती साथ देते, हे पहावे लागेल.