घरफिचर्समायमहानगर ब्लॉगBlog: 'बॅट कोरोना' म्हणजे कोविड १९ नव्हे - वटवाघूळ तज्ज्ञ

Blog: ‘बॅट कोरोना’ म्हणजे कोविड १९ नव्हे – वटवाघूळ तज्ज्ञ

Subscribe

या लेखातील मते ही लेखकाची व्ययक्तिक मते आहेत.

आपल्या NIV या भारतीय संशोधन संस्थेने भारतातील जवळपास आठ राज्यांमध्ये भारतीय वटवाघळांचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले. यामध्ये ८ राज्यातील केरळ, कर्नाटक ते हिमाचल प्रदेश पर्यंत सर्वच प्रदेशातील दोन प्रजातींच्या वटवाघळावर संशोधन केले. हे संशोधन आता प्रकाशित करणे म्हणजे एक चूकच आहे. हो चूकच आहे. कारण, आपला मीडिया अर्धवट बातम्या देण्यासाठी जगात प्रसिध्द आहे. कारण निसर्गातील संशोधानाच्या अर्धवट बातम्या देणे, म्हणजे एखाद्या वन्यजीवांचे अस्तित्व संपविणे ठरते. या प्रकाशित संशोधनात काहीच नसताना, कोरोना बॅट नावाचा नवीन विषाणू शोधला असा गवगवा करणे सुद्धा मला चुकीचे वाटते. कारण चीनमधील संशोधक कोविड १९ हा विषाणू हॉर्स शू बॅट अर्थात किटकभक्षी वटवाघळांमूळे होतोय असे सांगतायेत. तर भारतीय संशोधक फलहरी वटवाघळांमध्ये बॅट कोरोना आहे, असे सांगतायेत. अशामुळे सामान्य लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यात आपला मीडिया तर भन्नाटच आहे. त्यांना कोविड १९ आणि बॅट कोरोना हे दोन विषाणू वेगवेगळे आहेत. हे कोण सांगणार? अहो इथे संशोधकांना सुद्धा थांबायला हवे होते. असे संशोधन प्रकाशित करून माध्यमाला द्यायला. ही वेळ चुकीची आहे, अस माझं ठाम मत आहे. पण असो, खरतर भारतामध्ये १२३ जातींची वटवाघळे आहेत. यामधील झाडावर राहणारी Pteropus gigantious आणि गुहेतील Rousettus leschenaultti अशी दोन्हीही फलहारी वटवाघळे आहेत. भारतभर सगळीकडे सापडतात.

या वटवाघळांविषयी भारतात अनेकदा संशोधन झालेले आहे. मात्र चीनमधील वटवाघळांमुळे कोविड १९ हा विषाणू जगभर पसरला आणि मग वटवाघळांच्या विषयी जगभरात पुन्हा एकदा संशोधन तर काही ठिकाणी विरोध वाढत गेला. परवाच भारतीय संशोधकांनी संशोधित केलेल्या या दोन जातीमुळे बॅट करोना हा नवीन विषाणू सापडतो, असे जाहीरपणे सांगितले मात्र आपल्या मीडियाने, संशोधनातील पूर्ण मुद्दे, भारतातील जनतेपुढे मांडलेले नाहीत, अजूनही संशोधन पूर्ण झालेलं नाही, त्यात असे म्हटले आहे की, बॅट कोरोना आणि कोविड १९ हे वेगळे विषाणू आहेत. शिवाय आपल्या भारतीय वटवाघळामुळे बॅट कोरोना विषाणू माणसात जातो की नाही? याविषयी कसलेही संशोधन झालेले नाही. त्यामुळे असे अर्धवट संशोधन मीडियाने प्रकाशित करू नये, ही विनंती. शिवाय यापुढे वटवाघूळ यांच्या १२३ प्रजाती वर काम व्हायला हवे. ते पण AC रुममध्ये बसून नव्हे तर फिल्डवर जाऊन प्रत्यक्षात. हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. यावर लस शोधण्यासाठी प्रकल्प होणं गरजेचं आहे.

- Advertisement -

निवडक मुद्दे :

१. चीनमध्ये सापडलेला कोविड १९ हा विषाणू गुहेतील वटवाघळांमुळे पुढे माणसात आलेला आहे. हॉर्स शू नावाची वटवाघळे आणि त्यापासून हा आजार माणसांपर्यंत आला. अर्थात वटवाघळे खाण्यासाठी गुहेतून पकडून, पिंजऱ्यात ठेवली की, काही दिवसात ती वटवाघाळे आजारी पडतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा हा विषाणू त्याला खायला सुरवात करतो, मग अशा आजारी वटवाघळाला चिनी माणूस जिवंत त्याचे लचके तोडून खातो. मग काय माणूस ते जग असा विषाणूचा प्रवास सुरू होतो.

गुहेतील वटवाघळांच्या शरीरात हा कोविड १९ विषाणू किंवा रेबीज असतो शिवाय त्याला प्रतिकार करणारी यंत्रणा सुद्धा वटवाघळाच्या शरीरात आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही धोका पोहोचत नाही. मात्र गुहेत जाऊन ही वटवाघळे पकडून ती पिंजऱ्यात सोबत ठेवल्यामुळे आणि त्यांना जिवंतपणे खाल्ल्यामुळे हा आजार चिनी लोकांमध्ये पसरला आणि तिथून तो जगभरात पसरला.

- Advertisement -

२. भारतीय संशोधकांनी केलेल्या संशोधनात चिनी संशोधकानी केलेल्या प्रजातींचा अभ्यास केला नाही. मात्र जी वटवाघळे झाडावर आणि गुहेत असणारी ही दोन प्रजातीची वटवाघळे पूर्णपणे शाकाहारी आहेत. यांच्यामध्ये निपाह सारखा विषाणू आहे. शिवाय आता असा बॅट कोरोना हा नवीन विषाणू देखील सापडला. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यांनी संशोधनात स्पष्टपणे सांगितले आहे की, या बॅट कोरोना विषाणूमुळे माणसाला कुठलाही धोका नाही किंवा याविषयी अजून संशोधन झालेले नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे.

३. वटवाघळांना विनाकारण बदनाम करू नये कारण निसर्गात रात्रभर कीटक खाण्याचे महत्त्वाचे काम असंख्य वटवाघळे करत असतात. शिवाय रात्रभर एकाच झाडावरील बिया दुसरीकडे टाकून रात्रभर वृक्षारोपण करण्याचे महत्त्वाचे काम ही वटवाघळे करत असतात. शिवाय त्यांच्याकडून अनेक फुलांचे परागीकरण सुद्धा होत असते त्यामुळे यांच्याबाबतीत विनाकारण गैरसमज पसरू नयेत. आपले जंगल जवळपास ३० टक्केहून अधिक हिरवळ दिसण्यात फलहारी वटवाघळाचा वाटा आहे, हे आपण विसरू नये.

४. मी गेली एकोणीस वर्षे वटवाघळांविषयी संशोधन करीत असून जवळपास सात ते आठ हजार वटवाघळे हाताने पकडली आहेत, मात्र मला कुठलाही विषाणूची लागण आजपर्यंत झाली नाही हे विशेष.

५. चिंपांजीमुळे इबोला आणि एड्स, कोल्ह्यामुळे फॉक्स रेबीज, पक्षांमुळे बर्ड फ्लू, सापांमुळे इ कोलाई, उंदरामुळे प्लेग, हंता, माकड आणि खारीमुळे माकडताप, डुकरामुळे इन्फ्लुनजा, जंगली मांजरामुळे सार्स, डुकरामुळे स्वाइन फ्लू असे विविध आजार येत असतात. तर वटवाघूळमुळे निपाह, रेबीज, हेंद्रा, कोविड १९, बॅट कोरोना असे आजार येत असतात. मात्र यातील कुठलाच आजार आपल्याकडे स्वतःहून येत नाही. आपण त्यांची शिकार करायला जातो, पकडतो खातो आणि मग आपल्याला हे साथीचे आजार येतात. मग काय एक माणूस ते जगप्रवास होतो या विषाणूचा.

६. यापुढे कुठल्याही परिस्थितीत वन्यजीव प्राण्याची शिकार करू नये, नाहीतर आपल्याकडे विषाणू आला म्हणून समजावे.

७. प्रत्येक वन्यजीवांचे लांबून दर्शन योग्य असते. जवळ घेतले की विषाणूचा प्रसार होत असतो. यापुढे वन्यजीवांचे जग फक्त लांबूनच बघा, खरी मजा त्यातच आहे. प्रत्येक जीवाला त्याच्या अधिवासात राहू द्या, आपला हस्तक्षेप पूर्णपणे थांबवा, तरच आपले जीवन जगण्याचा लायकीचे राहील.

८. संशोधकांनी सुद्धा आपले संशोधन समाज उपयोगी, निसर्ग उपयोगी असेल तरच प्रकाशित करावं, नाहीतर त्याचा उपयोग नाहीच, मात्र विनाश नक्की होतो.

९. वटवाघळे अतिशय महत्त्वाची आहेत, त्यांना राहू द्या जिथं आहेत तिथं. आपल्या अवतीभवती असणारी जैवविविधता म्हणजेच आपले जीवन आहे, हे लक्ष्यात ठेवावे. आपल्या परिसरातील फळ झाडे तोडू नयेत. शिवाय वटवाघळे बसतात अशी झाडे तर अजिबात तोडू नयेत, शिवाय आपल्या घराभोवती कपारीत बसणारी वटवाघळे रात्रभर जवळपास एक रात्रीत २००० पेक्षा जास्त डास खाऊन आपले अनेक आजारापासून संरक्षण करीत असतात. अहो युरोपमध्ये तर घरात बॅट बॉक्स करून अशी छोटी वाघळे पाळतात, अश्या छोट्या वटवाघूळाला आपण पाकोळी म्हणतो. वटवाघूळ वाचवा तरच जग वाचेल…


 

लेखक डॉ. महेश गायकवाड (M.Sc. Ph.D.) हे वटवाघूळ तज्ज्ञ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -