सोन्याची अंडी देणारा शहामृग : ‘आयपीएल’

साहेबांच्या देशातला खेळ म्हणून क्रिकेटकडे बघितलं जायचं, मात्र याच साहेबांच्या खेळामुळे आज भारत देशाने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केलाय. जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाहिलं जातंय. साधारणत: १९२८ मध्ये श्रीगणेशा झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आजवर केलेली कामगिरी विशेषत: आर्थिक प्रगती पाहिल्यास कुणाचेही डोळे विस्फारतील. जगभरातल्या क्रिकेटला शह देत बीसीसीआयने आपल्या इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल)द्वारे उत्पन्नाचा मार्ग धरला आणि त्यात ते पूर्णत: यशस्वीही ठरले. यामुळेच आज जगातल्या टॉप स्पर्धांमध्ये आयपीएल दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ‘आयपीएल’ ही ‘बीसीसीआय’साठी एक सोन्याची अंडी देणारी कोंबडीच नव्हे तर मोठमोठी अंडी देणारा शहामृग ठरतेय, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

गेल्या दशकापासून संपूर्ण जगाला वेड लावणार्‍या इंडियन प्रिमीयर लीगने बीसीसीआयला अगदी मालामाल करून ठेवलंय. यामुळे संपूर्ण जगात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून आता भारताकडे पाहिलं जातंय. केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांचेच नव्हे, तर आयपीएलच्या सामन्यांचे माध्यम हक्क अब्जावधीत विकले जात आहेत. आयपीएलच्या एका सत्रातील फ्रेंचायझीमुळे कोट्यवधींची कमाई होत असून, यापुढे त्यात तब्बल दुपटीपेक्षा अधिकतेने वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर २०२३ ते २०२७ या कालावधीचा विचार केल्यास आयपीएलच्या माध्यम हक्कांद्वारे तब्बल ४८ हजार ४०० कोटी रुपये बीसीसीआयला मिळणार आहेत. हे आकडे ऐकून कुणाचेही डोळे विस्फारतील, यात शंका नाही. भारतात होणार्‍या कुठल्याही सामन्यातील रकमेच्या दुपटीने ही किंमत असून, आता फ्रेंचायझींसाठीही मोठी स्पर्धा जगभरातून पाहायला मिळतेय.

अगदी खोलात जाऊन विचार केल्यास माध्यम हक्कांतून मिळणार्‍या पैशांचं गणित म्हणजे बीसीसीआयला आयपीएलच्या प्रत्येक षटकाला २ कोटी ९५ लाख म्हणजे जवळपास ३ कोटी रुपये मिळणार असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. सर्वात जास्त महत्वाच्या डिस्ने स्टारने भारतीय खंडातील टीव्हीचे हक्क तब्बल २३,५७५ कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय वायकॉम १८ ने २०,५०० कोटी रुपयांना भारतीय खंडाचे डिजिटल अधिकार आणि ३,२५८ कोटी रुपयांना निवडक ९८ सामन्यांचे नॉन-एक्सक्लुझिव्ह डिजिटल अधिकार मिळवले आहेत. याव्यतिरिक्त भारतीय उपखंडाबाहेरील हक्क वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेटने विकत घेतले आहेत. त्यासाठीदेखील १०५७ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. अशाप्रकारे, यंदा चारही पॅकेजेसचे स्वतंत्र लिलाव करून उत्पन्नही वाढवण्याचा निर्णय यशस्वी ठरला आणि बीसीसीआयवर चारही पॅकेजेससह मिळून अंदाजे ४८ हजार ४०० कोटी रुपयांचा जोरदार पाऊस पडला.

अशा या फुगलेल्या आकड्यांमुळे आयपीएलकडे आता बीसीसीआयकडून अधिक प्रामुख्यानं लक्ष दिलं जातंय. अर्थातच, भारतीय क्रिकेट बोर्डाकडूनच नव्हे, तर खेळाडू, प्रशिक्षकांकडूनदेखील आयपीएलला महत्व दिलं जातंय. अगदी देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएल खेळण्यास अधिक प्राधान्य दिलं जातंय, हेही एक विदारक वास्तव आहे. यंदाच्या सत्रात आयपीएलमध्ये दोन संघ वाढल्यानंतर सामन्यांची संख्याही ३५ ते ४० च्या घरातून थेट ७५ पर्यंत पोहोचली होती. यामुळे आयपीएलचा कालावधीही विस्तारत आहे. विशेष बाब म्हणजे, आता विदेशी संघांसोबत आयपीएल संघांचे सामने खेळवण्याचा आगळावेगळा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी बोलून दाखवला आहे. त्यासाठी आयसीसीकडे वेळही मागितला गेला आहे.

कारण जगभरातील आयपीएलची क्रेझ पाहता याहून अधिक उत्पन्नाची चटक आता बीसीसीआयला लागली आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मुख्य म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या आयपीएल सामन्यांसाठी अडीच महिन्यांचा कालावधी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार बीसीसीआय आणि फ्रँचायझी आयपीएल संघांनी परदेशात जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळवण्याच्या योजनेवर आता काम सुरू करण्यात आले आहे. कदाचित त्याचीच ट्रायल म्हणून यावर्षी आयपीएल तब्बल दोन महिने खेळवले गेले. प्रेक्षकांना जास्तीत जास्त किती काळ खिळवून ठेवता येते, याचीही चाचपणी यंदाच्या आयपीएलमधून झाली असावी.

दुसरीकडे, अन्य बाजूंचा विचार केल्यास काही तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ स्पर्धा चालल्याने तिच्यात रटाळपणा आला होता. अनेक खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी आपल्या संघातही परतले होते. अनेक खेळाडूंच्या अतिक्रिकेटमुळे दुखापतींचा त्रासही वाढला होता. तर फ्रेंचायझींचाही खर्च कित्येक पटींनी वाढला होता. त्यामुळे या बाबींचाही आता गांभीर्याने विचार केला जात आहे. मात्र, सर्व गोष्टी घडत असताना कुठल्याही परिस्थितीत आयपीएलला दुय्यम स्थान द्यायचे नाही, असाही निर्धार बीसीसीआयने केलेला दिसतोय. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाच साकडे घातले जात असल्याचे दिसतेय. जेणेकरून मायदेशात होणार्‍या सामन्यांपेक्षा आयपीएलच्या सामन्यांची संख्या अधिक असावी आणि स्पर्धा अधिक काळ सुरू राहून पैशांचा पाऊस अधिकाधिक पडावा.

कोरोना ओसरल्यानंतर पुन्हा क्रिकेटचे वातावरण पोषक बनवण्यात केवळ आयपीएलने महत्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचे बीसीसीआयचे म्हणणे आहे. त्यात सत्यताही दिसते. कारण २०१७ मध्ये डिजिटल स्ट्रीमिंग पाहणार्‍यांची संख्या ५६० दशलक्ष होती, मात्र २०२२ मध्ये ही आकडेवारी पाहिल्यास केवळ ५ वर्षानंतर संख्या ६६५ दशलक्ष एवढी झाली आहे. दुसरीकडे कोरोना काळात सर्वच मैदाने थंडावली होती. त्यातून पुन्हा उभारी घेताना कुठल्याही खेळाला मोठे परिश्रम घ्यावे लागले. मात्र, आयपीएलने आपली क्रेझ कायम राखली आहे, हे विशेष. अगदी कोरोना काळात मैदानावर प्रेक्षक नसतानाही आयपीएलचे सामने मोठ्या धडाक्यात झाले. कित्येक खेळाडू बाधित होऊनही स्पर्धा झालीच. त्यासाठी अनेक खलबते झाली. मात्र, स्पर्धेचे सर्व सामने व्यवस्थित पार पडले. यातून आयपीएलचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये आयपीएलचा समावेश होतो. त्यामुळेच आयपीएलची लोकप्रियता आता संपूर्ण जगभरात वाढत चालली आहे.

याचमुळे बीसीसीआय आता पुढील पाच वर्षांत आयपीएलचे एकूण ४१० सामने आयोजित करणार असल्याचे सांगण्यात येते. २०२३ ते २०२७ पर्यंत बीसीसीआयकडून हे नियोजन केले जात आहे. २०२३-२४ मध्ये ७४ सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, त्यानंतर २०२५ आणि २०२६ मध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. या दोन्ही वर्षात प्रत्येकी ८४ सामने खेळवण्याचा विचार आहे. २०२७ मध्ये तर पुन्हा या सामन्यांच्या आकडेवारीत मोठी वाढ केली जाणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. त्यामुळे आयपीएल सामन्यांची संख्या आणि स्पर्धेचा कालावधी आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्टपणे जाणवतेय. अर्थात सामन्यांचा कालावधी वाढत असताना नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) नंतर जगभरात इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल)चा नंबर लागतो. म्हणजेच जगभरातील टॉप पाच स्पर्धांचा विचार केल्यास भारतातील आयपीएल ही स्पर्धा जगात दुसर्‍या क्रमांकावर पाहिली जाते. यावरून तिची वाढती लोकप्रियता लक्षात येते.

भारतातील आयपीएलच्या मीडिया हक्कांची पाकिस्तानमधील पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)सोबत तुलना केली तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये जवळपास ३४ सामने होतात आणि त्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ८३ कोटी रुपये मिळतात. म्हणजेच पाकिस्तान बोर्डाला प्रत्येक सामन्यातून केवळ अडीच कोटी रुपयांची कमाई होते. याउलट भारतीय प्रिमीयर लीगचा विचार केल्यास आता नवीन कमाईनुसार २०२३ पासून आयपीएलच्या एका षटकाची किंमत पाकिस्तान सुपर लीगच्या उत्पन्नापेक्षा अधिक असेल. यातून केवळ बीसीसीआयच नव्हे, बीसीसीआय संलग्नित प्रत्येक घटक मालामाल होत आहे, हेही विसरून चालणार नाही. आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील विजेत्या संघाला २० कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये, तर तिसर्‍या क्रमांकावरील संघाला ७ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले.

चौथ्या क्रमांकावरील संघालाही तब्बल साडेसहा कोटींचे बक्षीस मिळाले. याशिवाय महिलांच्या आयपीएलमध्येदेखील बक्षिसांचा पाऊस पडल्याचे दिसून आले. ही लीग जिंकणार्‍या महिलांच्या सुपरनोव्हाच संघाला बीसीसीआयने २५ लाखांचे पारितोषिक दिले. पाकिस्तान सुपर लीगच्या एका पर्वात बक्षीस म्हणून साडेसात कोटी रुपये दिले जातात. यात विजेत्या संघाला ३.७५ कोटी, उपविजेत्या संघाला दीड कोटी दिले जातात. तर उर्वरित ३.३५ लाख रुपये सर्व खेळाडूंमध्ये वाटले जातात. यात सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज व अन्य काही महत्वाच्या पुरस्कारांसाठी ६० लाख रुपये दिले जातात, अशी तरतूद आहे. याच्याहून कित्येक जास्त पटींनी आयपीएलमध्ये बक्षिसांचा पाऊस पडतो. अर्थात, आयपीएलसाठी उत्पन्नाचे इन्कमिंगही तितक्याच मोठ्या प्रमाणावर आहेत, हे विसरून चालणार नाही.

२०१८ ते २०२२ पर्यंतच्या कालावधीचा विचार केल्यास, बीसीसीआयला आयपीएलच्या सामन्यांतून सुमारे ५४ कोटी ४९ लाख रुपये मिळायचे. तर भारतीय संघ मायदेशात खेळत असलेल्या एकदिवसीय, टी-ट्वेन्टी, तसेच कसोटी सामन्यांमधून बीसीसीआयला अवघे ६० कोटी १८ लाख रुपये मिळत होते. यातून भारतीय संघाचे देशासाठी खेळलेल्या सामन्यांतील उत्पन्न आणि आयपीएलच्या सामन्यांतील उत्पन्नातील फरक स्पष्टपणे जाणवतो. २०२३ पर्यंत भारतात होणार्‍या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे सर्व मीडिया हक्क स्टार नेटवर्क यांच्याकडे आहेत. यात आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांच्या किंमतीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतील, असे तज्ज्ञांकडून बोलले जातेय. एकूणच, जगभरातील लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असलेल्या आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अनेक सोन्याची अंडी दिवसेंदिवस मिळत आहेत, यापुढेही यात वाढ होईल, यात शंका नाही. त्यामुळे बीसीसीआयची छाती जगभरातील क्रिकेट मंडळांपुढे निश्चितच फुगली आहे, ही भारताच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणावी लागेल.