घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराजकारणापलीकडचे गांधी आणि सावरकर ...

राजकारणापलीकडचे गांधी आणि सावरकर …

Subscribe

महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणी वेगळ्या असल्या तरी भारताला स्वातंत्र्य मिळावे आणि भारतीयांची भरभराट व्हावी, यासाठी त्यांची असलेली तळमळ ही एकसारखीच आहे. सावरकरांची जहालवादी भूमिका व्होटबँकेची चिंता वाहणार्‍या काँग्रेसला परवडणारी नव्हती, त्यामुळे त्यांचे अवमूल्यन कसे करता येईल, यावर त्यांचा रोख असतो, तर दुसर्‍या बाजूला संघप्रणित भाजपही सावरकरांच्या हिंदुत्वाच्या तीव्रतेचा वापर करून काँग्रेसला बेजार करू पाहत असतो. खरे तर या दोन्ही पक्षांनी सावरकरांचे राजकारणापलीकडील निस्सीम राष्ट्रप्रेम आणि त्याग लक्षात घेऊन भारताच्या उत्कर्षासाठी आपली शक्ती खर्ची घालायला हवी. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नव्हे.

महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार स्वातंत्र्यवीर वि.दा.सावकर यांंनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ब्रिटिशांकडे सुटकेसाठी याचिका केली होती, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानानंतर काँग्रेस नेत्यांच्या अंगाचा तीळपापड झाला आहे. असे काही झालेच नव्हते. गांधीजींचा आणि सावरकरांचा काही संबंधच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण हे करताना ते हे विसरत आहेत की, महात्मा गांधींजी आणि वीर सावरकर हे दोन्ही नेते भारतीय स्वांतत्र्यासाठी लढले होेते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसची वाटचाल ही ‘हम सब हिंदू है, हम सब हिंदी हैं, ते हम सब भारतीय हैं,’ अशी झालेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले ही जशी सर्व भारतीयांसाठी आनंदाची मोठी घटना होती, त्याचबरोबर मोठी धक्कादायक आणि मनावर अनेक घाव घालणारी दुर्घटना घडली ती म्हणजे भारताची फाळणी झाली.

भारत हा हिंदूबहुल देश असल्यामुळे त्यात संख्येने कमी असलेल्या मुस्लिमांना न्याय मिळणार नाही, त्यामुळे हिंदूंसाठी हिंदुस्तान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान अशी द्विराष्ट्रवादाची थिअरी कायदेआझम बॅरिस्टर जिना यांनी मांडली. त्यांना ब्रिटिशांकडून प्रोत्साहन आणि साथ मिळाली. देशाची फाळणी होऊ द्यायला, त्यावेळचे राजकीय नेते आणि जनता तयार नव्हती. त्यामुळे मग जिना आणि पाकिस्तानवाद्यांनी या देशात ठिकठिकाणी दंगली घडवून आणल्या. महात्मा गांधीजींनी देशाची फाळणी टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण जिनांच्या आक्रमक जहालवादासमोर गांधीजींच्या मवाळवादाचा निरुपाय झाला. शेवटी एकदा काय ते जिनांचे समाधान होवू दे आणि त्यांना हव्या असलेल्या देशात मुस्लीम सुखाने नांदूदेत, दंगली शांत होऊ देत, रक्तपात थांबू देत, असे म्हणून पाकिस्तानच्या निर्मितीला अनुमती देण्यात आली. खरे तर जिनांना सध्या जो पाकिस्तान आहे, त्यापेक्षा मोठा भूप्रदेश हवा होता. पण तो मिळवणे त्यांना शक्य झाले नाही.

- Advertisement -

पाकिस्तानची निर्मिती इस्लामिक स्टेट म्हणजे मुस्लीम राष्ट्र म्हणून करण्यात आली; पण भारताच्या बाबतीत तशी भूमिका घेण्यात आली नाही. ज्या मुस्लिमांना भारतात रहायचे होते, त्यांना इथे राहण्याचे स्वातंत्र्य होते. ज्यांना पाकिस्तानात जायचे होते, ते तिकडे जाऊ शकत होते. पुढे १९७१ साली पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून मुस्लिमांवरच अनन्वित अत्याचार सुरू केल्यावर अनेक मुस्लीम लोक जीव वाचवण्यासाठी भारतीय हद्दीत घुसले, त्यावेळी भारताने त्यात हस्तक्षेप करून त्यांचे जीव वाचवले आणि त्यांच्यासाठी वेगळ्या देशाची म्हणजे बांगलादेशची निर्मिती केली. त्यावेळी देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी अतिशय कल्पकतेने आणि धाडसाने हस्तक्षेप करून पश्चिम पाकिस्तानला एक प्रकारे धडा शिकवला. पाकिस्तानमधील लोक आजही भारताचा उल्लेख हिंदुस्तान किंवा इंडिया असाच करतात, भारत असा करत नाहीत.

पण याच हिंदुस्तानात पाकिस्तान एवढेच मुस्लीम राहत आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे प्रगती करता येत आहे, त्यांची प्रगती पाहून पाकिस्तानातील विचारशील नागरिक हळहळत आहेत. आपण भारतासोबत राहिलो असतो तर आपलीही चांगली प्रगती झाली असती असे त्यांना वाटत आहे. किती तरी लोक पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात आले, ते इथे विविध क्षेत्रात नावारुपाला आले. त्यात अनेक मुस्लिमांचा समावेश आहे. पण पाकिस्तानात मागे राहिलेले असे किती हिंदू पाकिस्तानात नावारुपाला आले ते शोधून सापडणे अवघड आहे. भारताचे राष्ट्रपती, सैन्यातील अधिकारी, कलाक्षेत्रातील अनेकजण मुस्लीम आहेत. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर पाकिस्तानच्या क्रिकेट टीममध्ये एकही हिंदू किंवा बिगर मुस्लीम सापडणार नाही; पण भारताच्या क्रिकेट टीममध्ये बरेच मुस्लीम असतात, अझरउद्दीनसारखा मुस्लीम कॅप्टनही होता.

- Advertisement -

पूर्वी जसे अनेक लोक पाकिस्तानातून भारतात आले, तशीच अवस्था नव्याने निर्माण झालेल्या बांगलादेशची आहे. इथून अनेक लोक चोरट्या मार्गाने भारतात येतात आणि वास्तव्य करतात. आज पाकिस्तान आणि बांगला देशमध्ये हिंदू किंवा अन्य धर्मीय नावापुरते उरले आहेत, त्यांच्यावरील धार्मिक अत्याचाराच्या बातम्या येत असतात; पण त्याची भारतातील मुस्लिमांना झळ बसू नये, म्हणून भारतात चर्चा केली जात नाही. इतकेच कशाला देशाला स्वातंत्र्य मिळून काही वर्षांचा काळ लोटल्यानंतर काश्मीरमधील अनेक हिंदूंची तिथल्या मुस्लीम कट्टरवाद्यांनी कत्तल उडवली. त्यांना आपली घरेदारे सोडून पळावे लागले, ते देशाच्या अन्य राज्यांमध्ये आश्रयाला आले. या सगळ्या गोष्टींकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तेत असलेल्या काँग्रेसकडून दुर्लक्ष करण्यात आले. बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांकडून नुकतीच अनेक हिंदूंची घरे जाळून त्यांना बेघर करण्यात आले. पण भारतातून या भयानक दुर्घटनेची फारशी दखलही घेतली गेली नाही. याला काय म्हणावे? भारताने त्या देशावर आणि जनतेवर केलेल्या उपकारांची त्यांनी केलेली ही परतफेड म्हणावी का?

भारताची फाळणी हा खरे तर आक्रमक जहालवादासमोर मवाळवादी गांधीवादाचा झालेला पराभव आहे. कारण त्यावेळी जिना आणि त्यांच्या समर्थकांसारखीच सडेतोड भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली असती तर देशाची फाळणी झाली नसती; पण तशी भूमिका घेणार कोण हा प्रश्न होता. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये यादवी युद्ध सुरू झाले होते, त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन होते. अमेरिकेचे दोन भाग एकमेकांविरोधात लष्करी युद्ध लढत होते. त्यावेळी अब्राहन लिंकन यांनी अतिशय खंबीरपणे परिस्थिती हाताळली, त्यावेळी ते देशाला उद्देशून म्हणाले होते. देशावर हुकुमशाही आली तरी चालेल, पण मी अमेरिकेची फाळणी होऊ देणार नाही.

पुढे अमेरिकेतील यादवी संपली आणि देशही अखंड राहिला. त्यामुळे अब्राहम लिंकन यांना फाळणी टाळणारा महापुरुष असे म्हटले जाते. जिनांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली तेव्हा महात्मा गांधीजी म्हणाले होते की, या देशाची फाळणी होण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे होतील. गांधीजींचे हे विचार प्रामाणिक होते, याबद्दल तीळमात्र शंका नाही; पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अब्राहम लिंकन यांच्यासारखी कठोर भूमिका घेण्यात येथील नेतृत्वाला अपयश आले, त्याचीच फळे आज भारताला भोगावी लागत आहेत. कारण एका बाजूला अतिरेक्यांचा अड्डा झालेला पाकिस्तान भारताला त्रस्त करत आहे. तर दुसर्‍या बाजूला बांगलादेशमार्गे भारतातील माओवादी आणि नक्षलवाद्यांना मदत पोहोचवण्यात येत आहे.

कारण जिनांनी भारतात दंगली पेटवल्या होत्या, त्यातून परस्परांच्या हत्या होऊ लागल्या होत्या, त्यामुळे सत्तेची सूत्रे हाती असलेले काँग्रेसचे नेते बिथरून गेले होते. त्यामुळेच त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला परवानगी दिली, पण पाकिस्तानची निर्मिती होऊन भारतीयांचे हत्यासत्र थांबले आहे का, याचा आजही विचार करण्याची गरज आहे. कारण मुस्लीम दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यातील कितीतरी अधिकारी, सैनिक, सामान्य नागरिक यांची हत्या केलेली आहे. त्यामुळे जिनांसारख्या विभाजनवादी कट्टरवाद्यांची मागणी मान्य करून समस्या सुटलेली नाही. भारताची फाळणी करून मुस्लिमांना वेगळा पाकिस्तान दिल्यानंतर ते तिथे आपली प्रगती करून घेतील आणि सुखाने राहतील अशी भाबडी अपेक्षा होती; पण आज तिथे काय स्थिती आहे ते सगळ्यांना दिसत आहे. भारताचा इतिहास पाहिला तर याच कट्टरवादी वृत्तींनी भारताचे तुकडे पाडलेले आहेत. आणि जे सभोवतालचे भाग भारताचे होते, तेच वेगळे होऊन भारताविरुद्ध लढत आहेत किंवा त्यांच्या भूमीचा वापर करून भारताचे शत्रू भारताला त्रस्त करत आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षे काँग्रेसची राजवट होती. देशाच्या प्रगतीसाठी अनेक पाऊले त्यांच्या राजवटीत उचलण्यात आली. पण आपली सत्ता टिकून राहण्यासाठी त्यांनी सातत्याने या देशातील मुस्लिमांचे लांगुलचालन केले. ते दुखवतील म्हणून सुधारणावादी पावले उचलली नाहीत. त्यामुळे मुस्लिमांमध्ये जो सुधारणावाद आणि शिक्षणाचे प्रमाण वाढायला हवे होते ते वाढले नाही. त्याचा फटका मुस्लिमांनाच बसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने मुस्लीम सुधारणावादापेक्षा त्यांची एकगठ्ठा मते आपल्याला कशी मिळतील याचाच विचार केला, मुस्लिमांना पोटगी मिळण्याचा शहाबानो खटला असो किंवा मुस्लीम महिलांना त्रासदायक असलेला तिहेरी तलाक असे काँग्रेसने नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली. याचाच अतिरेक होऊन शेवटी भाजपच्या हिंदुत्ववादी असलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने दोनदा केंद्रात बहुमत दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातून स्वत:च्या सुटकेसाठी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला, असे म्हणून त्यांना कमी लेखून मुस्लिमांचे तुष्टीकरण करणार्‍या काँग्रेसने सावरकरांनी खरे तर माफी मागायला हवी. त्याचसोबत भाजपनेसुद्धा सावरकरांचा केवळ राजकीय फायद्यासाठी, हिंदू मते आपल्याकडे वळवण्यासाठी उपयोग करू नये तर त्यांच्या राष्ट्रीय भावनेचा प्रामाणिकपणे विचार करायला हवा. सावरकर हे सत्तेच्या राजकारणात कधीच रमले नाहीत, त्यांना पक्षीय राजकारणात रुची नव्हती. कारण त्यांचे अखंड भारतावर निस्सीम प्रेम होते. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शक्तीमान भारत देश उभा रहावा, हे त्यांचे स्वप्न होते. भाजप आणि काँग्रेसने केवळ आरोप-प्रत्यारोपात गुंतून न राहता शक्तीमान भारताच्या निर्मितीसाठी आपली शक्ती एकवटायला हवी.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -