Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग काळाच्या ओघात बदललेले भोंगे!

काळाच्या ओघात बदललेले भोंगे!

Subscribe

महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईने अनेक राजकीय, सामाजिक चळवळींचे आवाज झालेले भोंगे ऐकले. सामान्य मुंबईकरांना साखरझोपेतून उठवणारा गिरणीचा भोंगा हा अविभाज्य भाग होता. भोंगे मराठी कोळी संस्कृतीचा आवाज होते. काळाच्या ओघात भोंगे बदलत गेले आणि डिजे साऊंड सिस्टीम आली. तीही आता बदलत चालली आहे. मात्र महाराष्ट्रातला शेतकरी आणि मुंबईतल्या कामगारांनी मुंबईच्या नाक्यानाक्यावर विविध उत्सवांनिमित्त बांधलेल्या भोंग्यांनी इथल्या सामान्य माणसांना दिलेला ऐक्य आणि आनंद उत्सवाचा संदेश मनात नेहमी जागवायला हवा.

कोणे एके काळी मुंबई नगरीतील पहाट भोंग्यांनी होत असे, पहाटेचा भोंगा अजानाचा किंवा गिरणीचा वाजल्यावर आधीचा दिवस ढकलून गाढ झोपी गेलेला मुंबईकर कामगार, कर्मचारी नव्या दिवसाच्या चिंतेने जागा होई, कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेत हा कामगार तळपती तलवार होई, मात्र गिरणी कामगारांच्या संप लढ्यानंतर ही तलवार राजकारण्यांच्या म्यानात जी खोवली गेली ती आजतागायत बाहेर आलेली नाही, त्याची चकाकती धार शोषितांच्या साहित्यातील आख्यायिकांचा विषय झाल्या. त्यावर जयंत पवारांनी नाटक लिहिलं, सिनेेमे आले आणि गेले. मुंबईतला कामगार मात्र विस्थापित होऊन वसई, विरार, कर्जत, बदलापूर आणि कसार्‍यात स्थायिक झाला. पर्यायही नव्हताच त्यापुढे, नव्या शतकाच्या सुरुवातीला खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे वारे वेगाने वाहू लागले. त्यातच माहिती तंत्रज्ञानाचं वावदान घोंगावत आलं आणि मुंबईतल्या कामगाराला त्याच्या कुटुंबकबिल्यासहीत मुंबईतून या वावटळीनं उडवून ठाणे, पालघरच्या किनार्‍यावर नेऊन आदळलं.

मुंबईतली राहती घरं विकून कामगारही डाऊन दिशेने जाणार्‍या लोकल ट्रेनच्या शेवटच्या विरार, कर्जतला स्थिरावला, कारण नव्या शतकातली ही बदललेली नवी मुंबई जुन्या मुंबईकराला परवडेनारी नव्हतीच, उन्हाळ्यातली पापडाची वाळवणं टाकायला मुंबईच्या चाळींमध्ये जागा उरली नाही. मुंबईतल्या उंचेल्या टॉवरवर चाळीतल्या कौलांवर रोवलेले दूरदर्शनचे अँटिना जाऊन डिजिटल डिशटीव्हीचा जमाना आला. ब्लँक अँड व्हाईटचा काळ रंगिबेरंगी झालेला मुंबईने पाहिला. मुंबईतले होळीचे रंग, मुंबईतल्या चाळवजा दोन इमारतींमध्ये दोरखंड बांधलेली पेरु, फळे, काकड्या, फुग्यांची रांग लावलेली दहिहंडी क्रेनला बांधली जाऊ लागल्यावर दह्याची हंडी एकटी पडली. दिवाळीच्या कंदिलाचे, चाळीतल्या रांगोळीचे रंगही बदलत गेले. तसाच मुंबईतला सांस्कृतिक आवाजही काळाच्या ओघात बदलला. भोंगा ही मुंबईची संस्कृतीच होती. गिरणीचा भोंग्यावर चालणारी मुंबई इतिहासजमा झाली.

- Advertisement -

मुंबईत कधीकाळी सायरन वाजत होते, ‘नामदेव ढसाळ’, ‘नारायण सुर्वे, दुष्यंत कुमार’ आणि कवी ‘धूमिल’ च्या मार्गाने जाणार्‍या अरुण काळेंनी ‘सायरनचे शहर’ नावाच्या कविता संग्रहातून मुंबईतल्या या आवाजाच्या संस्कृतीचा वेध घेतला. मुंबईने इतिहासात अनेक आवाज ऐकले, हे आवाज इथल्या जनतेला ऐकवण्यात भोंग्याचा मोठा वाटा कायम राहिला होता. जॉर्ज फर्नांडीस, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे यांची भाषणे आझाद आणि जांबोरी मैदानात या भोंग्यानीच मुंबईला ऐकवली. गिरणी कामगारांच्या लढ्यांचा एल्गार या भोंग्यांनीच ऐकवला. जॉर्ज फर्नांडिसांनी रेल्वेच्या देशव्यापी ऐतिहासिक संपात मुंबई आणि रेल्वे बंदची घोषणाही जुन्या जाणत्या भोंग्यांनीच मुंबईतल्या गल्लीबोळात ऐकवली होती. मुंबईतल्या राजकीय स्टेजच्या दोन्ही कोपर्‍यात बांधलेले भोंग्यांना सत्तर ऐंशीच्या दशकात खूप मानमरातब होता. भोंगे आंदोलनाची शान होते, भोंगे कामगार चळवळीच्या गाण्यांचा हुंकार होते. शहीद शाहीर विलास घोगरे, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामातंराच्या लढ्यातील वामनदादा कर्डकांच्या लेखणीतून उतरलेली भीम क्रांतीची गर्जना प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमपांच्या आवाजात मुंबईतल्या गल्लोगल्ली या भोंग्यांनीच ऐकवली होती.

मुंबईच्या आवाजी संस्कृतीचा आवाज म्हणजे हे भोंगेच होते. शिवडी, काळाचौकी, वरळी, लालबाग भागात कामगार गीतं, भीमगीतं, चळवळीची गाणी भोंग्यातूनच कामगार वस्तीला ऐकवली जात होती. मुंबईतल्या उंच इमारतींमध्ये विजेचे दिव्यांचा लख्ख उजेड असताना क्वार्टरच्या बाटलीत रॉकेल चिमनी विझवून झोपी गेलेल्या कामगार वस्तीला या भोंग्यांनी जाग येई. लग्न आणि गणेशोत्सवात प्रल्हाद शिंदेची लग्नगीते, गणेशगीते मुंबईला भोंग्यांनीच ऐकवली होती. विठ्ठलाच्या पायी वीट, चंद्रभागेच्या तिरी, किंवा तूच सुखकर्ता…बाप्पा मोरया रे…ही गाणी मुंबईतल्या भोंग्यांनीच ऐकवली. प्रल्हाद शिंदेंची सत्यनारायणाची कथा भोग्यांनीच मुंबईला ऐकवली होती. गणेशोत्सव विसर्जनातल्या बुलबुल तरंगचे स्वर भोंग्यातूनच ऐकवले जात होते. लाकडी बुलबुल तरंगच्या छेडलेल्या तारांजवळ माईक लावून भोंगा कामगार वस्तीला ऐकवण्याचा सत्तर ऐंशीच्या दशकातला काळ होता. लाल बावट्याच्या कम्युनिस्टांच्या सभा, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनाही भोंग्यांची साथ होतीच. बाळासाहेबांची हटाव लुंगीपासून हिंदुत्वाच्या गर्जनेपर्यंत शिवसेनेचा प्रवास या भोंग्यांनीच ऐकवला होता.

- Advertisement -

बाबरी विध्वंसाच्या काळानंतर भोंगे बदलत गेले. तोपर्यंत अजानाच्या स्वरांची मुंंबईला भीती नव्हती. ते अजानचे सूर बेसूर वाटत नव्हते. गणेशोत्सव, दांडिया गरब्यातील नऊ दिवसांत बुलबुल तरंगाचे स्वर वस्तीवर ओतणारे भोंगे आजच्याइतके बेसूर वाटत नव्हते. अल्लाहू अकबर…भोंग्यातून ऐकताना कधीही हे काहीतरी भयंकर वेगळं ऐकतोय, अशी भावना मनात भीतीचं घर करत नव्हती. अगदी बांद्य्रातल्या बेहराम पाड्याशेजारच्या खेरवाडी किंवा भारतनगरच्या वस्तीतही अजानाचे स्वर शेजारच्या सरकारी वसाहतीच्या ओळखीचे झाले होते. डेसीबल, आवाजी त्रास असलं काही समजण्याची बौद्धिक क्षमता त्याकाळच्या माणसांमध्ये विकसित झालेली नसावी. मुंबईतल्या ऐशी आणि नव्वदच्या दशकातील सांप्रदायिक दंगलीनंतर भोंग्यांचे सूर ‘बेसूर आणि भेसूर’ होत गेले. पोलिसांच्या सायरनचे भोंगे मुंबईतल्या गल्लोगल्ली वाजू लागले. परिमंडळ क्षेत्रातल्या संचारबंदीची भीतीदायक घोषणा पोलिसांच्या वायरलेस जीपच्या भोंग्यातून ऐकवली जाऊ लागली.

अजानाच्या भोंग्यातून ‘छुपा’ संदेश दिल्याचे आरोप मोहल्ल्यावर सुरू झाले होते. मुंबईतल्या राम आणि रहिम नगरातल्या भोंग्यांची तोंडे आता एकमेकांवर तोंडसुख घेऊ लागली. त्यानंतर ही तोंडे दोन्ही विरोधी दिशेने वळवली गेली. ‘क्रांतीवीर’ चित्रपटात नाना पाटेकरचा एक प्रसंग आहे. ज्यात प्रताप (नाना) हा मोठा वर्तमानपत्राचा भोंगा बनवून राजकारण्यांवर आगपाखड करतो, त्यावेळी राजकीय सभेला जमलेल्या जनतेला उद्देशून ‘बजाव ताली’ म्हणतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो. कुठल्याही स्फोटक भावनिक विधानांवर टाळ्या वाजवण्याची ही सवय काळाच्या ओघात बदललेल्या भोंग्यांनी इथल्या माणसांना लावली. भोंगे संवेदनशील कधीही नव्हते, भोंगे दंगली घडवत नव्हते, मात्र भोंग्यांच्या मागचे आवाज बदलत गेले. रिक्षाला बांधलेले भोंगे मतदानाचे आवाहन करत हिंडत होते. आरोग्य विभागाचे भोंगे देवीची लस घ्यायला सांगत होते. हे भोंगे राजकीय मंडळींच्या हाती गेल्यावर ते कमालीचे चिथावणीखोर होत गेले.

मशिदीचे भोंगे आणि मंदिरातील घंटा यांचे आकार सारखेच होते आणि आजही आहेत. गोलाकार धातूच्या खोलगट भांड्यात बसवलेला ओळंबा म्हणजे घंटा तसाच आकार मशीद आणि चर्चबेलच्या घंटेचाही असतो, त्यात बदल नाही. मात्र भोंग्यांविरोधात घंटा, घंटाविरोधात भोंगा हे राजकीय कारस्थान याआधीही सुरूच होते. कुठल्याही निवडणुकीआधी ते असेच सुरू होते. हे दोन्ही आवाज एकच असल्याचे धडे जरी शाळेत शिकवले जात असले तरी, तारुण्यात या दोन्ही आवाजांना एकमेकांची भीती घातली जाण्याचे राजकारण या देशात पूर्वांपार चालत आले आहे. चिथावणीखोर भोंग्यांच्या आवाजात पीक करपलेल्या शेतकर्‍याचा आवाज ऐकू येईनासा होतो. वंचित, गरीब, आदिवासी आणि दलितांच्या वस्तीतल्या अत्याचाराचे आवाज या भोंग्यांच्या आवाजापुढे हतबल ठरतात. विस्थापितांचे आक्रंदन राजकीय भोंग्यांच्या आवाजापुढे ऐकू येणारे नसतात. त्यामुळे हळूहळू शहरातील माणसंही बहिरी होतात. बहिरं होणं, बेसूर भेसूर होण्यापेक्षा चांगलंच मानायला हवं.

गोरगरीबांची आक्रंदने ऐकू न जाण्याइतका निबरपणा कानांमध्ये यायला हवा. ही जबाबदारी इथल्या राजकीय भोंग्यांनी घेतल्यावर काम सोपे होत जाते. एकेकाळी उत्सव आनंदाचं प्रतीक असलेला भोंगा आज गोंगाटाची ओळख झाला आहे. अभिव्यक्तीच्या आवाजासाठी भोंग्यांची गरज नसते, हे काम इथल्या वर्तमानपत्रांनी करण्याचे दिवस सरले असून ती जागा समाजमाध्यमांनी घेतली आहे. आता राजकीय भोंगे एकमेकांच्या विरोधात सांप्रदायिक गरळ ओकतात. मुंबईतल्या लोकांना जागे करण्याचे भोंग्यांचे काम आज संपलेले आहे. चार दशकांपासून बेरोजगार झालेले भोंगे आता हातात दगड आणि माणसांची जागाही घेऊ पाहत आहेत. मात्र भोग्यांना मन आणि मेंदू नसतो, त्याला केवळ वाचाच असते. दगडांनी भिरकावलेल्या दिशेचा केवळ वेग असतो.

स्वतःचा मार्ग आणि दिशा शोधण्याची बुद्धी दगडांमध्ये नसते. त्यामुळे जिवंत माणसांनी भोंग्यांच्या आहारी जाऊच नये, भोंग्यांचे ऐकूच नये, परमेश्वराला अनाहत नाद ऐकू जातो असं म्हणतात, मनाची मौनातली साद परमेश्वर ऐकतो, त्यासाठी त्याचे कान आसुसलेले असतात, त्यासाठी घंटा किंवा भोंग्यांचीही गरज नसते. अडीच दशकांपूर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये भजन विरोधात कव्वालीचे सामने रंगवण्याचे राजकीय प्रयत्न झाले होते. हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सामान्य आणि सूज्ञ मुंबई ठाणेकरांनी हाणून पाडला होता. सामान्य मुंबईकांना कुठल्याही भोंगा किंवा घंटेच्या आवाजापेक्षा सकाळी साडेआठच्या लोकलचा भोंगा अधिक आपुलकीचा वाटतो. या भोंग्यामुळे त्याचं घर चालवलं जाणार आहे. सायरनच्या शहरात राहाणार्‍या आणि दंगलीतले सायरनचे भेसूर स्वर ऐकलेल्यांनी मशिदीतील भोंगे आणि मंदिरातील घंटांना एकमेकांविरोधातील युद्धात उभं करण्याचे राजकीय प्रयत्न आताही हाणून पाडायला हवेत.

टाळ मृदुंगाचा निनाद, सुफी संतांच्या कव्वालीचे बुलबुल तंरग ऐकलेल्या मुंबई नावाच्या भोंग्यांच्या शहरात, भीतीदायक पोलिसांच्या सायरनचे आवाज कधीही ऐकायला येऊ नयेत, त्यासाठी दोन्हीकडच्यांनी आपले सांप्रदायिक राजकारणाचे भोंगे बंद करावेत, आणि जर ते बंद करणार नसतील, तर ऐकणार्‍यांनी हे राजकीय भोंगे वाजल्यावर आपले मनाचे कान बंद करावेत. कानातून हा द्वेषाचा आवाज खाली मनात उतरता कामा नये. कारण हृदयातल्या स्पंदनांचा ध्वनी साक्षात त्या परमपित्याने बहाल केलेला असताना इतर कुठलाही आवाजाची त्यात भेसळ होता कामा नये, मग तो मशिदीचा भोंगा असो किंवा मंदिरातील घंटेचा आवाज…या आवाजापासून माणसांनी सावध राहायला हवे, ज्यावेळी माणसांचे सांप्रदायिक भोंगे बनतील त्यावेळी या सायरनच्या शहरात गोंगाटाशिवाय काहीच ऐकू येणार नाही. या गोंगाटात आर्त किंकाळ्या, मरणासन्न उसासे आणि लहान मुलांच्या रडण्याचे आवाजही दबून जातील. या भोंग्यांमुळे आपला महाराष्ट्र इतका बधीर आणि बेसुरा, बहिरा होऊ नये, इतकीच अपेक्षा.

- Advertisment -