नानांची घसरगुंडी आणि भाजपची आबाधुबी !

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींचे नाव घेऊन आक्षेपार्ह भाषणबाजी केल्यामुळे यांच्यासह त्यांनी पक्षाचीही शोभा करून घेतली आहे. मी पंतप्रधान मोदींनीविषयी बोललो नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो, अशी सारवासारवी नाना करत असले तरी ते पटण्यासारखे नाही. नानांची घसरगुंडी झाल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी अक्षरश: आबाधुबी केली. भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी नानांचा पंजा आणि जीभ छाटण्यापर्यंत धमकी देण्याची मजल मारली.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषणाबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्यातील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याविरोधात आक्रमक झाले. नानांची घसरगुंडी झाली आणि भाजपवाल्यांनी आबाधुबी सुरू केली. मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य पटोले यांनी केले. त्यांच्याविरोधात पोलीस तक्रारी दाखल करण्यापर्यंत राज्यातील भाजपच्या नेत्यांनी धडक मारली. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक माझ्याकडे करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो.

तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही, हे प्रकरण पेटताना दिसल्यावर नाना पटोलेंनी त्यावर असे स्पष्टीकरण देऊन पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हा मोदी नावाचा गुंड तुम्हाला कधी भेटला का, असे पत्रकारांनी विचारल्यावर गुंड लोक माझ्याजवळ फिरकत नाहीत, असे सांगून त्यांनी एक प्रकारे मोदी नावाचा कुणी गुंड नाही, हेच प्रत्यक्षपणे कबूल केले. पटोले ज्या भागात प्रचार करत होते. त्या भागात कुणी मोदी नावाचा गुंड आहे, अशी पोलिसांकडे नोंदही नाही. त्यामुळे पटोले यांनी आपण पंतप्रधान मोदींविषयी बोललोच नाही, अशी कितीही सफाई देण्याचा प्रयत्न केला तरी ते कुणाला उद्देशून बोलले हे अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. कारण ये पब्लिक हैं, सब जानती हैं.

नानांना मोदींचा इतका राग कशासाठी आलेला आहे. आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आहोत, याचेही नानांना विस्मरण होण्याइतका मोदी नावाचा तिटकारा का आला असावा, याचाही विचार होण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस ही गटातटामध्ये विभागलेली आहे. त्यात पुन्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे देशभरात पक्ष विस्कळीत झालेला आहे. काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वाची पकड घट्ट नसल्यामुळे अशी परिस्थिती झालेली आहे. महाराष्ट्र हा खरे तर काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असे. पण आज महाराष्ट्रात याच पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नाही. काँग्रेसमधील गटबाजीला शमवण्यासाठी सोनिया गांधी यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पाठवून ज्यांना मुख्यमंत्री बनवले होते, ते पृथ्वीराज चव्हाण तर प्रभावहिन होऊन बसले आहेत.

अशोक चव्हाण हेदेखील माजी मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनाही राज्यात पक्षांमध्ये नवा प्राण फुंकणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला संघटित करून त्यात नवचैतन्य निर्माण करू शकेल, यासाठी विधानसभा अध्यक्षपदी असलेेले नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्य काँग्रेसची सूत्रे त्यांच्या हाती दिली. नानांचे व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व तगडे आहे. त्याचा उपयोग राज्यातील काँग्रेसला तगडे बनवण्यात होईल, असे वाटत होते. नानांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथम काँग्रेसच्या स्वबळाची रणगर्जना केली. पण अल्पावधीतच ते बरेच थंड झालेले दिसले. कारण स्वबळाची भाषा करणे वेगळे आणि प्रत्यक्ष स्वबळावर निवडणुका लढणे वेगळे असते.

महाराष्ट्रात सध्या सगळ्याच मुख्य पक्षांना आपले स्वबळावर सरकार यावे असे वाटते, पण प्रत्यक्षात तसे होणे अवघड होऊन बसले आहे. काँग्रेसलाही तसेच वाटत आहे. सध्या काँग्रेसची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अशा दोन्ही ठिकाणी अवघड स्थिती होऊन बसली. त्याला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे ती म्हणजे दुसर्‍यांदा बहुमताने पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन जनतेला केले. त्याला जनतेने मोठा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर भाजपचे पहिल्यांदाच केंद्रात बहुमताचे सरकार आले. त्यावेळी काँग्रेसची अशी स्थिती झाली की, त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी जेवढ्या जागा लागतात, तेवढ्याही जिंकता आल्या नाहीत. पुढे २०१९ च्या निवडणुकीत तर काँग्रेसची आणखी वाईट स्थिती झाली.

या पराभवाचा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी इतका धसका घेतला की, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांनी विनवण्या करूनही ते काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. काँग्रेससारखा मोठा पक्ष असा नेतृत्वहीन ठेवून चालणार नाही, काँग्रेसच्या कबिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून अशा प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण सोनिया गांधी यांना राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारावी, असे खूप वाटत आहे. पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या दोन्ही लोकसभा आणि त्यापूर्वीच्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश आल्यामुळे स्वत: राहुल गांधी आणि सगळ्या पक्षामध्ये नाराजीसोबतच उदासीनता पसरलेली आहे. या सगळ्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. कारण त्यांच्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचे स्थानदेखील मिळणे अवघड होऊन बसले आहे. सत्तारुढ होणे तर खूपच दूरची गोष्ट झालेली आहे.

महाराष्ट्रही सध्या काँग्रेसला जी दुय्यम भूमिका घेऊन सत्तेत सहभागी व्हावे लागेल आहे, यालाही मोदीच जबाबदार आहेत. कारण २०१९ साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपकडे केली आणि आपली भूमिका ठाम ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मिळून महाविकास आघाडीचा अभिनव प्रयोग केला. ज्या आघाडीत शिवसेना आहे, त्यात काँग्रेसला सहभागी व्हायचे नव्हते. कारण ते शिवसेनेला जातीयवादी आणि प्रांतवादी पक्ष मानतात. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वधर्मसमावेशक विचारसरणीला त्याचा फटका बसतो. पण शरद पवारांनी काँग्रेसला विश्वासात घेतले.

महाराष्ट्रातील भाजपची सत्ता घालवून मोदींना केंद्रात शह देण्याची ही संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. मोदींना कुठूनही का होईना शह देता येत असेल तर ते करायला हवे, या भावनेतून काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी झाली. खरे तर काँग्रेसला या महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा द्यायचा होता. त्याला कारण महाविकास आघाडीत शिवसेना आहे. पण राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना याची कल्पना आणून दिली की, काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही, तर नेते आणि कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे पक्षातील लोक हाती सत्ता असलेल्या पक्षांमध्ये मोठ्या संख्येने जातील आणि राज्यात पक्षाचे नुकसान होईल. हे लक्षात आणून दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी सत्तेत सहभागी होण्यास परवानगी दिली.

काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे जेव्हा तो अशा कुठल्या आघाडीला पाठिंबा देतो किंवा त्यात सहभागी होतो, तेव्हा तो फार काळ त्यांच्यासोबत राहत नाही. कारण त्यामुळे प्रादेशिक पक्षांना बळ मिळू काँग्रेस दुर्बल होते. सध्या महाराष्ट्रात तसेच होत आहे. काँग्रेस सत्तेत सहभागी असली तर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि एकेकाळी महाराष्ट्रात अजिंक्य असलेल्या काँग्रेसला आज महाराष्ट्रात दुय्यम भूमिका घ्यावी लागत आहे. सत्तेतून बाहेरही पडता येत नाही. कारण राष्ट्रीय पातळीवर पक्षाची परिस्थिती समाधानकारक नाही. त्यात पुन्हा महाराष्ट्रात आपण सत्तेतून बाहेर पडलो तर भाजपचे फावेल. त्यामुळे मोदी आणखी शिरजोर होतील. त्यामुळे राज्यात सत्तेचे मुख्यपदही मिळवता येत नाही आणि सत्तेतून बाहेरही पडता येत नाही, अशा पेचात काँग्रेस सापडलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली, पण ते बोलण्याइतके सोपे नाही.

त्यामुळे काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या पालखीचे भोई होण्याची वेळ आलेली आहे. त्याला कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कितीही हलवले तरी मोदींना पाडता येत नाही, त्यामुळे वैफल्य येते. त्यातूनच मग मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे उद्गार तोंडातून बाहेर पडतात. पण नानांचे उद्गार हे सध्या एकूणच सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या मानसिकतेचे द्योतक आहे. कारण पक्षाला राष्ट्रीय पातळीवर नेता नाही. राहुल गांधी ऐकायला तयार नाहीत. पराभवामुळे त्यांना वैफल्य. ते ऐकत नाहीत, त्यामुळे सोनिया गांधी यांना वैफल्य, पक्षाला दुय्यम भूमिका घ्यावी लागते म्हणून नानांसारख्या नेत्यांना वैफल्य, त्यातूनच मग अशा कोंडलेल्या भावनांचा विस्फोट होतो. भाजपकडून नानांवर पोलीस तक्रारी करून त्यांच्यावर काय कारवाई होईल हा भाग वेगळा, कारण भाजपच्या आशिष शेलारांनीही शेलक्या शब्दात मुंबईच्या महापौरांची अवहेना केली होती. तेव्हा त्यांच्याविरोधातही शिवसेनेेने पोलीस तक्रार केली होती.

नानांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे भाजपवाल्यांनी म्हणणे आणि मानणे म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे. कारण नानांची इतकी मजल जाईल असे वाटत नाही. पण नानांनी जोशात येऊन जमावाला खूश करण्यासाठी केलेेल्या या वक्तव्यामुळे स्वत:ची आणि सध्या अवघड स्थितीत असलेल्या काँग्रेसची शोभा करून घेतली आहे. बोचरी विधाने करण्यात महाराष्ट्रातील भाजपवालेही मागे नाहीत. चंद्रकात पाटलांच्या अशा विधानांची मोठी यादीच बनेल. नानांच्या आक्षेपार्ह भाषणबाजीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी राज्यभरातील भाजप नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. भाजपच्या एका पदाधिकार्‍याने नानांचा पंजा झाटला जाईल, असा धमकी दिली. तर भाजयुमोच्या एका पदाधिकार्‍याने थेट नानांची जीभ छाटणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. नानांनी मोदीचे नाव घेऊन अशोभनीय भाषा वापरणे चुकीचेच आहे, त्यामुळे आधीच पेटायला तयार असलेल्या भाजपच्या नेत्यांच्या हाती त्यांनी आयते कोलीत दिले आहे.

मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.