ज्योतिरादित्यांनी मोहीम फत्ते केली?

ज्योतिरादित्य शिंदे नाराज म्हणजे काँग्रेसमधील ३०-३५ आमदार नाराज असा अर्थ होता. त्यापैकी डझनभर आमदारांनी आपले राजीनामे दिले तरी मध्य प्रदेशाचे कर्नाटक व्हायला वेळ लागणार नव्हता. त्याची सुरूवातही कर्नाटकसारखी झाली. आधी चारसहा आमदार गायब झाले आणि त्यांना परत बोलावून भाजपावर डाव उलटवण्याचे नाटक सुरू झाले. पण परत आलेल्यांनी काँग्रेसला मजबूत करण्यापेक्षा आणखी अनेक आमदारांसह पलायन केले. तोपर्यंत सोनिया वा कमलनाथ यांना जागही आली नाही. मग शिमग्याचा मुहूर्त शोधून होळी पेटवण्यात आली. सोनियांना त्याचे गांभीर्य समजण्यापर्यंत खेळ हाताबाहेर गेला होता.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा मध्य प्रदेशातील पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षासाठी महत्वाची होती. काँग्रेसचे २१ आमदार फोडून भाजपने त्यांची सत्ता संपुष्टात आणली होती. या आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार होत होती. काँग्रेसचे हे आमदार कमी झाल्यामुळे भाजपचे बहुमत सिद्ध होऊन त्यांची मध्य प्रदेशात सत्ता आली होती. काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपच्या यशाचे शिल्पकार होते. त्यांनी आपल्यासोबत २१ आमदारांना भाजपत आणले होते. पक्षांतर्गत बंदी कायद्यामुळे या आमदारांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली होती. हे आमदार पुन्हा निवडून येणे भाजपची सत्ता कायम राखण्याच्यादृष्टीने आवश्यक होते. मंगळवारी संध्याकाळपर्यंत या २१ आमदारांपैकी सुमारे २० आमदार विजयाच्या समीप असल्यामुळे मध्य प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार हे उघड झाले होते.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये उभी राहिलेली समस्या पक्षाने आमंत्रण देऊन बोलावलेली होती. कारण त्याची कुणकुण खूप आधीपासून लागलेली होती. पंधरा वर्षानंतर तिथली सत्ता काँग्रेसला मिळाली, तेव्हाच त्याची बीजे रुजवली गेली होती. आपण इतका दीर्घकाळ सत्तेबाहेर कशाला बसलो, त्याचा साधा विचारही त्या पक्षाच्या नेत्यांना कधी करता आला नाही, म्हणून ते इतका काळ सत्तेबाहेर बसले होते. अन्यथा शेजारच्या राजस्थानात किंवा उत्तरेकडे हिमाचल प्रदेशात आलटून पालटून काँंग्रेस भाजपा यांच्यात सत्तांतर होत राहिले. पण मध्य प्रदेश व त्याचाच पूर्वी एक भाग असलेले छत्तीसगड राज्य, पंधरा वर्षे भाजपाच्या हातात राहिले, त्याचे मुख्य कारण काँग्रेस पक्षात चालू असलेली किंवा न संपलेली सुंदोपसुंदी इतकेच होते. तरीही २०१८ च्या अखेरीस भाजपला त्याच आजाराची बाधा झाली म्हणून त्यांच्या हातून बहुमत निसटले आणि सत्ताही किरकोळ संख्येने गेली.

ती काँग्रेसला आपले बस्तान पक्के करण्याची सुवर्णसंधी होती. पण आत्मघाती बेबनाव हा काँग्रेस नेत्यांमध्ये उपजत असतो वा असावा लागतो. म्हणूनच लॉटरीसारखी सत्ता हाती येताच त्यांच्यातली भांडणे उफाळून आली आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना खड्यासारखे बाजूला ठेवण्याचे डाव खेळले गेले. तिथून या संकटाचे ढग कमलनाथ सरकारला झाकोळू लागले होते. त्यात हस्तक्षेप करण्यासाठी पक्षश्रेष्ठी नावाची माणसे असतात. पण श्रेष्ठींना मंत्रीपद वा मुख्यमंत्री नेमण्यातून आपल्या तिजोरीत काय येणार, इतक्यापुरता रस असल्यावर यापेक्षा वेगळे काय व्हायचे? ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यात गळचेपी होत असेल तर त्यांचे पुनर्वसन कुठेतरी व्हायला हवे होते आणि त्यांची तितकीच अपेक्षा होती. ती पूर्ण होण्याची शक्यता नसल्याची खात्री पटल्यावर पुढला घटनाक्रम अपरिहार्य होता. त्याचे खापर भाजपाच्या माथी फोडल्याने काँग्रेसचे कल्याण शक्य नव्हते, की कमलनाथ सरकार बचावण्याची बिलकुल शक्यता नव्हती. पण हे राहुल व प्रियांका अशा वारशाने नेता झालेल्यांच्या डोक्यात कसे शिरावे?

शिंदे यांनी अगोदरच आपल्या भूमिकेत आमूलाग्र बदल होत असल्याचे इशारे वेळोवेळी दिलेले आहेत. आधी त्यांनी ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून पक्षश्रेष्ठींना इशारा दिला होता. पण तो समजून घेण्यापेक्षा वा नाराजांना चुचकारण्यापेक्षा डिवचण्यालाच श्रेष्ठी समजले जात असेल, तर ह्या घटनाक्रमातून सुटका नव्हती. महिन्याभरापूर्वी शिंदे यांनी कमलनाथ सरकारला इशारे दिलेले होते. कर्जमाफी वा निवडणुकीतली आश्वासने पूर्ण केली जात नाही. त्यामुळे पक्षाच्याच सरकार विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. हा इशारा सोनिया गांधींना कळत नाही, की राहुल प्रियांकांच्या डोक्यात शिरणारा नाही? हातातले एक मोठे राज्य व तिथले सरकार जाण्याचा तो इशारा होता. पण तिथे डगडुजी करण्यापेक्षा शाहीनबाग किंवा तत्सम गोष्टींवर पोरखेळ करण्यात काँग्रेसश्रेष्ठी रमलेले होते. त्यांना तिथेच खेळवून ठेवताना अमित शहा यांच्यासारखा पाताळयंत्री भाजपानेता मध्य प्रदेशात काँग्रेसची कबर खोदत होता. कारण ते सरकार उलथून टाकणे सर्वात सोपे काम होते.

जवळपास कर्नाटक व मध्य प्रदेशचे आकडे सारखेच होते. त्यातच शिंदे यांच्या पाठीराख्यांची संख्याही त्यासाठी भरपूर होती. शिंदे नाराज म्हणजे काँग्रेसमधील ३०-३५ आमदार नाराज असा अर्थ होता. त्यापैकी डझनभर आमदारांनी आपले राजीनामे दिले तरी मध्य प्रदेशात कर्नाटक व्हायला वेळ लागणार नव्हता. त्याची सुरूवातही कर्नाटकसारखी झाली. आधी चारसहा आमदार गायब झाले आणि त्यांना परत बोलावून भाजपावर डाव उलटवण्याचे नाटक सुरू झाले. पण परत आलेल्यांनी काँग्रेसला मजबूत करण्यापेक्षा आणखी अनेक आमदारांसह पलायन केले. तोपर्यंत सोनिया वा कमलनाथ यांना जागही आली नाही. मग शिमग्याचा मुहूर्त शोधून होळी पेटवण्यात आली. सोनियांना त्याचे गांभीर्य समजण्यापर्यंत खेळ हाताबाहेर गेला होता. शाहीनबागेत बागडायला जाण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या असल्या बेबनावाकडे पुरेसे लक्ष दिले असते तर?

ज्योतिरादित्य शिंदे यांना रात्री सोनियांनीच आमंत्रण पाठवले. त्याकडे शिंदे यांनी पाठ फिरवली, तिथेच कमलनाथ सरकारचे दिवस भरलेले होते. मंगळवारी शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि तोपर्यंत त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्या १९ आमदारांनी बंगलूरू येथे आश्रय घेतला होता. पण त्याकडे बघायला श्रेष्ठींना सवड कुठे होती? सर्व काँग्रेस पक्ष व त्याचे एकाहून एक महान लोक, येस बँकेच्या दिवाळखोरीचे खापर भाजपाच्या डोक्यावर फोडण्यात गर्क होते. त्यात ईडीने लक्ष घातल्यावर प्रियांका गांधीच त्यात फसल्याचे दिसू लागले. मग काँग्रेस नेत्यांचे पहिले कर्तव्य गांधी कुटुंबाला वाचवणे आणि त्यासाठी पक्षालाही मुठमाती देणे असे असते ना? म्हणून इथे पक्षाचे आमदार गायब व बंगळुरूला पळून जात असताना, काँग्रेसचे चाणक्य प्रियांका गांधींना निर्दोष ठरवण्यात रममाण झालेले होते. आधी या फाटाफुटीच्या कारस्थानाची तयारी चालू असताना सगळेच शाहीनबागेत पर्यटन करायला गेले होते आणि नंतर समस्या समोर आल्यावर प्रियांकांचा बचाव महत्वाचा झाला होता.

परिणामी मध्य प्रदेशाच्या पक्ष व सरकारच्या आघाडीवर फक्त दिग्विजयसिंग व कमलनाथ एकटेच पडलेले होते. म्हणून तर इतक्या टोकाला गोष्टी गेल्या असतानाही सोनिया पूर्णपणे गाफिल होत्या. त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटीला येण्याचे आमंत्रण दिले. रांगत गुडघे टेकत शिंदे १० जनपथला येतील, असा आत्मविश्वास नसता तर सोनियांनी हे आमंत्रण कशाला दिले असते? त्यातून त्यांचा गाफिलपणा लक्षात येऊ शकतो. रात्री साडे नऊची वेळ दिलेली असताना आणि दारात तमाम माध्यमांचे पत्रकार प्रतिक्षा करीत बसले असूनही, शिंदे तिकडे फिरकलेच नाही. तिथेच चित्र स्पष्ट झाले होते. पण ते सत्य मानायचे कोणी? ना काँग्रेसला सत्य बघायची हिंमत उरली आहे ना त्यांच्या बुद्धीवादी समर्थकांना सत्य समजण्याची बुद्धी उरली आहे. म्हणून अमित शहांना होळीचा मुहूर्त साधता आला.

एकट्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसला सुरूंग लावला. पंधरा वर्षांनंतर मिळालेली सत्ता काँग्रेसला सोडायला लावली. आपल्यासोबत भाजपमध्ये आलेल्या आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचा पुरुषार्थही शिंदे यांना करायचा होता. त्यातही शिंदे कमी पडले नाहीत, हे दिसून येते. आज मध्य प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार आहे. त्याचे श्रेय अर्थातच ज्योतिरादित्य शिंदे यांनाच आहे. मात्र भाजपला मिळालेला हा विजय काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्यास कारणीभूत ठरणार आहे. काँग्रेसने आत्मपरीक्षण केले तरच त्यांना भविष्यकाळ आहे.