Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग दोघांचे भांडण राष्ट्रवादीचा लाभ

दोघांचे भांडण राष्ट्रवादीचा लाभ

Related Story

- Advertisement -

भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्वाचा समान धागा असल्यामुळे त्यांची काही वर्षांपूर्वी युती झाली होती. त्यानंतर मध्ये युती तुटली, त्यानंतर पुन्हा झाली. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये तर बरेचदा दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून पुन्हा बहुमताला संख्याबळ कमी पडले की, त्यांनी एकमेकांशी युती केली असे चित्र बरेच वेळा दिसून आलेले आहे. त्यामुळे बरेचवेळा लोकांना उल्लू बनाविंगचा अनुभव येत असतो. इतकेच नव्हे तर भाजप आणि शिवेसना हे दोन पक्ष निवडणूक प्रचाराच्या वेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सगळी स्पेस खाऊन टाकतात. म्हणजे लोकांचे लक्ष केवळ भाजप-शिवसेनेच्या भांडणांमध्ये गुंतून राहते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय बोलत आहेत, विरोधकांवर काय टीका करत आहेत, याकडे लोकांचे लक्षच जात नाही. भाजप आणि शिवसेना यांची युती असली तरी त्यांच्यात वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा बळावू लागली. त्यातूनच मग मुख्यमंत्रीपद आपल्यालाच हवे, यावरून ताणाताण सुरू झाली.

२०१९ ला महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणावाचा विस्फोट झाला. शिवसेनेने अकल्पित असा निर्णय घेतला. शिवसेनेची गरज आणि निर्धार ओळखून हीच संधी साधण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला. त्यात पुन्हा शरद पवारांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळे त्यांच्या पक्षालाही चांगले यश मिळाले होते. त्यामुळे त्यांचाही उत्साह वाढला होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची मागणी मान्य केली. काँग्रेसला विश्वासात घेतले. या सगळ्याची परिणती म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. खरे तर शरद पवार यांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी या पूर्वी महाराष्ट्रात असे बरेच प्रयोग केले होते. पण अशा प्रकारच्या प्रयोगातून त्यांनी स्थापन केलेली सरकारे फार काळ टिकली नाहीत. पुलोदचा असाच एक प्रयोग पवारांनी केला होता, त्यात चार जनसंघाचेही आमदार होते. इतकेच काय तर २०१४ साली भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. भाजपला बहुमताला काही आमदार कमी पडत होते. भाजप शिवसेनेला विनवण्या करत होती. अशा वेळी विधानसभेत भाजपचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देऊन वाचवले. पुढे मग शिवसेना सत्तेत सहभागी होण्यास तयार झाल्यावर पूर्वीपासून युतीतील मित्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत आले.

- Advertisement -

महाराष्ट्रात पवार हे पुरोगामी विचारसरणीचे मानले जातात. त्यामुळे शिवसेनेशी त्यांची वैचारिक एकरुपता नाही. त्यामुळे ते शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेले सरकार स्थापन करतील, असे वाटत नव्हते. पण पवार हे पुढचा विचार करतात. आज त्यांना फायदा झाला, तर उद्या आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, असाच पवारांचा आजवरचा पवित्रा राहिलेला आहे. त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा जो निर्णय घेतला, त्यामागे महाराष्ट्रात भाजपच्या हातून सत्ता काढून घेऊन दिल्लीत मोदींना शह देणे हा होता. पण पवारांची महत्वाकांक्षा ही इथपर्यंत सीमीत नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनून आता दीड वर्ष झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंंत्र्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आपल्यालाही मुख्यमंत्री बनायला आवडेल, असे म्हटले होते.

भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. पण शिवसेना हा काही राष्ट्रवादीचा नैसर्गिक मित्र नाही. काँग्रेसचा तर नाहीच नाही. त्यामुळे एका बाजूला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे, असे एका बाजूला सरकारमधील नेते सांगत आहेत, तर दुसर्‍या बाजूला वैयक्तिक तयारीही करत आहेत. कारण हे म्हणजे तीनही सरकारच्या सोयीच्या मामला हे तीनही पक्षांच्या नेत्यांना माहीत आहे. आज मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही तितका दबदबा आहे. दुसर्‍या बाजूला विरोधी पक्षात असलेला भाजपा दररोज एखादा विषय राज्य सरकारच्या विरोधात लावून धरत आहे. त्यामुळे सरकारला हादरे बसत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हे प्रकरण विरोधकांनी लावून धरले होते. परिणामी राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महाविकास आघाडीतील भाजपचे मुख्य लक्ष्य हे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. कारण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अट्टाहासामुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेली राज्यातील सत्ता गेली. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सत्तेसाठी जो उतावळेपणा केलेला आहे. त्यामुळे त्यांनी आपलीच शोभा करून घेतली. त्यामुळे लोकांच्या मनातील त्यांच्या स्थानाला नक्कीच धक्का पोहोचलेला आहे. कारण भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, असे असताना त्यांनी खरे तर राजकीय परिपक्वता दाखवायला हवी होती. पण त्यांनी ती तशी दाखवली नाही. राज्यात आपल्याला बहुमत मिळेल, असे भाजपला वाटत असले तरी महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाला अलीकडच्या काळात बहुमत मिळत नाही. त्यांना दुसर्‍या पक्षाशी युती किंवा आघाडी करावीच लागते.

- Advertisement -

सध्या काँग्रेसची स्वबळाची महत्वाकांक्षा वाढीस लागली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार नव्या दमाने हाती घेतल्यानंतर जी विधान केली आहेत, त्यावरून काँग्रेसने पुढील काळातील निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी चालवली आहे, असे दिसते. काँग्रेस सध्या विचित्र परिस्थितीत सापडला आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष सापडेनासा झालेला आहे. राज्यात तर हा पक्ष गटबाजीने खिळखिळा झालेला आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पक्षाच्या स्वबळाचा दिलेला नारा महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे धक्के देत आहे. महाविकास आघाडीत आपल्या मंत्र्यांना हवा तसा वाव मिळत नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे उद्या जर काँग्रेसने अनपेक्षित पाऊल उचलले आणि सरकार कोसळले आणि नव्याने राज्यात निवडणुका घेतल्या गेल्या तर त्याचा फायदा शिवसेना किंवा काँग्रेसला होणार नाही. त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. कारण उद्या लोकांना सामोरे जाताना शिवसेेना कुणावर आरोप करणार हा प्रश्न आहे.

कारण त्यांनी ज्यांच्याशी आघाडी केली, ते त्यांच्या विचारसरणीशी जुळणारे नाहीत. भाजपने आपल्या आक्रस्ताळीपणामुळे आपली लोकांसमोर शोभा करून घेतलेली आहे. त्यामुळे लोकमनातील त्यांच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे. या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, अशीच परिस्थिती आहे. कारण त्यांच्याकडे अजित पवार यांच्यासारखा लोकमान्य नेता आहे. पण याचा विचार भाजपचे नेते करताना दिसत नाहीत, आपली सत्ता घालवणार्‍या शिवसेनेवर त्यांना सूड उगवायचा आहे. पण त्यांच्या आक्रमकपणातून काही साध्य होईल, असे दिसत नाही. कारण महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत, त्यांना याची कल्पना आहे, की सरकार पडले तर तिघांचेही नुकसान होईल. पण तरीही काँग्रेसला आपल्या भविष्याची चिंता आहे. कारण राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांना फार काळ पाठिंबा देत नाही किंवा त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन राहत नाही. त्यामुळे त्यांचे दीर्घकालीन नुकसान होत असते. पण राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय झगड्याचा फायदा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे, असे म्हटल्यास ते फार मोठे रहस्य ठरणार नाही.

- Advertisement -