घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपॉलिटिक्स इज अ डर्टी गेम!

पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम!

Subscribe

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात आपल्याला हुलकावणी दिलेली सत्ता हासिल करण्याची हीच वेळ आहे असं समजून टीम देवेंद्र काम करतेय. मग त्यासाठी केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या लशी, रेमडेसिवीर इंजेक्शन ते निधीपर्यंत सगळ्याच गोष्टींचं भांडवल केलं जातंय. इतकंच नव्हे तर मागच्या पहिल्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं हे न सांगणारे भाजपा नेते राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मिळेल तिथे घेरायला तयार आहेत. हा राजकारणाच्या डावपेचांचा भाग आहे हे न समजण्याइतकं कुणी अज्ञानी नाही. राजकारण होतंच राहील, पण ही खरंच हा घाणेरडा खेळ खेळण्याची वेळ आहे का?

Politics is a dirty game! असं माननार्‍या सुशिक्षित, उच्च किंवा मध्यमवर्गियांचा एक मोठा वर्ग समाजात आहे. या वर्गाला राजकारण्यांकडून काहीच फुकट नको असतं. त्यांची अपेक्षा असते राजकीय नेत्यांनी आपली जबाबदारी, आपलं काम भ्रष्टाचार न करता पार पाडावं. त्यामुळे हा वर्ग कधी आम आदमीच्या अरविंद केजरीवाल यांच्याकडे तर कधी मनसेच्या राज ठाकरे किंवा ना खाऊंगा ना खाने दूंगा, असं म्हणणार्‍या नरेंद्र मोदी यांच्या भाजपाकडे आकर्षित होतो. पण या नेत्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या समर्थकांच्या कृतीतून पदरी निराशाच पडली की, हा वर्ग पुन्हा तेच म्हणतो, ‘पॉलिटिक्स इज डर्टी गेम’! राजकारण हा घाणेरडा खेळ आहे!

सध्या जग कोरोना बरोबर झुंजत आहे. आणि भारतात त्यातही विशेषतः महाराष्ट्रात राजकीय नेत्यांची जी चिखलफेक सुरू आहे. ती पाहिल्यावर प्रश्न पडतो तो म्हणजे राजकारण खरंच सभ्य लोकांसाठी राहिलं नाहीय का? लोक आपल्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी काळीज पिळवटून जाईपर्यंतचा संघर्ष करतायत, पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जीव धोक्यात घालून जीव जगविण्यासाठी धावाधाव करतायत. आणि राजकीय नेते आपल्या पक्षांसाठी आणि उबग आणणार्‍या राजकारणासाठी अगदी कुठल्याही पातळीवर जायला तयार आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याची भाषा केली गेली यावर काय बोलायचं असाच प्रश्न संवेदनाशील माणसाला पडला नसता तरच नवल. कोरोनाचा धुमाकूळ हा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात आपल्याला हुलकावणी दिलेली सत्ता हासिल करण्याची हीच वेळ आहे असं समजून टीम देवेंद्र काम करतेय. मग त्यासाठी केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या लशी, रेमडेसिवीर इंजेक्शन ते निधीपर्यंत सगळ्याच गोष्टींचं भांडवल केलं जातंय. इतकंच नव्हे तर मागच्या पहिल्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 हजार कोटींच्या पॅकेजचं काय झालं हे न सांगणारे भाजपा नेते राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि विशेषतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मिळेल तिथे घेरायला तयार आहेत. हा राजकारणाच्या डावपेचांचा भाग आहे हे न समजण्याइतकं कुणी अज्ञानी नाही. राजकारण होतंच राहील पण ही खरंच हा घाणेरडा खेळ खेळण्याची वेळ आहे का? याचा विचार सगळ्यांनीच करायला हवा. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या संवेदनशील नेत्याने तर करायलाच हवा.

कारण देवेंद्र फडणवीस हे कुणाही सुशिक्षित, सभ्य, सुसंस्कृत व्यक्तींसाठी विशेषतः ज्यांना राजकारणात यायचे असेल त्यांच्यासाठी परफेक्ट रोल मॉडेल आहेत. शिक्षण, संस्कार, चारित्र्य, अभ्यास, संसदीय डावपेच, पक्षनिष्ठा यांचा उत्तम समन्वय असलेला आताच्या घडीचा पहिल्या पसंदीचा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घ्यावं लागेल. त्याच फडणवीसांना उजव्या बाजूला प्रसाद लाड आणि डाव्या बाजूला प्रवीण दरेकर यांना घेऊन पोलिसांबरोबर आक्रस्ताळेपणे वाद घालताना पाहिल्यावर मनात प्रश्न आला, हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत का जे महाराष्ट्राच्या राजकीय तरुणाईला आपलं रोल मॉडेल वाटतात? ते राज्याचे माजी मुख्यमंत्री एका औषध कंपनीच्या मालकासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कल्ला करतात आणि कॅमेरा सुरू असताना पोलिसांना दरडावतात ही गोष्ट निश्चितच भाजपसारख्या पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मुळीच भूषणावह नाही.

- Advertisement -

कारण नंतर याच औषध कंपनीच्या मालकाला साठेबाजी आणि काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली बलसाड पोलिसांनी अटक केली. महामारीचं वातावरण असताना एखाद्या औषध कंपनीच्या संचालकाला पोलिसांना काही माहिती विचारायची असेल किंवा त्यांची कार्यशैली समजून घ्यायचे असेल तर तो अधिकार पोलिसांना नाही का, असा प्रश्न इथे पडतो. सचिन वाझे हा लादेन आहे का, असा प्रश्न विचारणार्‍या मुख्यमंत्री ठाकरेंना धारेवर धरणारा झंझावती विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकासाठी मध्यरात्री आपल्या दोन-चार सहकार्‍यांना घेऊन जाऊन पोलीस स्टेशनमध्ये आकांडतांडव करणारे फडणवीस या दोघांचेही पाय मातीचेच आहेत का, असा प्रश्न पडून सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसाला ‘पॉलिटिक्स इज डर्टी गेम’ असं जर वाटलं तर त्यात नवल ते काय?

उद्धव ठाकरे हे अननुभवी मुख्यमंत्री आहेत हे वास्तव आहे. राज्यात सध्या महामारीमुळे जी अफरातफरी निर्माण झाली आहे, या सगळ्या व्यवस्थेला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचे चित्र सध्या भाजपकडून उभे केले जात आहे आणि त्यासाठी भाजपची काही बोलघेवडी मंडळी दिवसरात्र कार्यरत आहेत. मग भाजपची मंडळी बोलतात त्याला उत्तर देण्यासाठी सत्ताधार्‍यांची मंडळी बोलतात. कोविडमुळे तुम्ही तुमच्या घरात बंदिस्त झाल्यामुळे हा राजकारण्यांचा तमाशा तुम्हाला घरातल्या ‘इडियट बॉक्स’ वर बघावाच लागतोय. राजकारण्यांचा जो ‘डर्टी ब्लेम गेम’ सुरू असतो तो चॅनेलमधल्या राजकारणी पत्रकारांकडून (कारण आता बहुतांश पत्रकारांनीही सत्ताधारी-विरोधक वाटून घेतले आहेत) पाहिल्यानंतर आपल्याला नसलेला आजार होईल की काय अशी भीती वाटू लागते. सध्या देशातील पाच राज्यांचे मुख्यमंत्री हे कोविडग्रस्त आहेत. राहुल गांधी आणि कोरोना आल्यापासून मास्क नाकारणार्‍या राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि रश्मी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासारखी सतत सुरक्षेच्या कड्यात राहणारी मंडळीही कोरोनाच्या कचाट्यात सापडली. हा विषाणू डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याच वेळेला तो गरीब-श्रीमंत, सत्ताधारी आणि विरोधक असा काही भेदही करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी या दोनच राजकारण्यांचा कोविडमुळे गोंधळ उडाला आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही.

जगभरातील सगळ्याच देशांचे प्रमुख हेदेखील या जीवघेण्याच नव्हे तर शतकातल्या सगळ्यात मोठ्या महामारीने पुरते भांबावून गेलेत. अशा वेळेला ‘56 इंच का सीना’ असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दूरचित्रवाणीवरुन संवाद साधतानाची देहबोली कमालीची भेदरलेली वाटत होती. अशाही परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन देशाला परवडणारा नाही अशी भूमिका मांडताना नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्य सरकारांनी लॉकडाऊन हा आपल्या समोरचा शेवटचा पर्याय ठेवावा, असं मत प्रदर्शित केलं. हेच पंतप्रधान जेव्हा निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये लाखोंच्या जनसभांना संबोधित करतात त्यावेळेला प्रश्न पडतो की पंतप्रधानांचं खरं रूप कोणतं? कॅमेर्‍यासमोर आल्यानंतर भावूक होत ‘देशात लॉकडाऊन नको’ म्हणत जनतेची काळजी घेणारं रुप खरं की बंगालसारख्या डाव्यांच्या राज्यात जाऊन 2024 सालच्या लोकसभेच्या संख्याबळाची काळजी आतापासूनच घेणार्‍या दूरदृष्टीच्या भाजपच्या सर्वेसर्वाचं रुप खरं? कोविडच्या काळात राजकारण नको असं सगळ्या पक्षांच्या नेत्यांना सांगावं असं आर्जव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना केलं होतं.

48 खासदार लोकसभेत पाठवणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या राज्यात ज्या स्वरूपाची गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे त्याला सगळ्याच पक्षांचे नेते आणि त्यांचं उबग आणणारं राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार आपली पाच वर्षांची कालमर्यादा पूर्ण करू शकलं तर आगामी लोकसभेमध्ये भाजपला आणि नरेंद्र मोदींना त्याचा नक्कीच फटका बसू शकतो. याची कल्पना भाजपच्या मोदी-शहा जोडीला एव्हाना आलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील 48 खासदारांच्या संख्याबळात घट झाली तर हातातून जे गमवावे लागेल ते पश्चिम बंगालमधील 4२ खासदारांच्या संख्येतून कमावण्यासाठी मोदी आणि शहा यांचा अट्टाहास सुरू आहे. आणि त्यामुळेच तिथल्या मिरवणुका, तिथल्या जनसभा या माध्यमातून कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रासारख्या राज्यात जो होतोय त्याला याच गोष्टी जबाबदार आहेत. एकूणच काय तर मोदी हे राष्ट्रीय कॅनव्हासवर राजकारण करत आहेत तर फडणवीसांचा प्रयत्न हा राज्य पातळीवरच्या हिडीस राजकारणाचा आहे.

त्यांचा राजकीय तमाशा चॅनेलच्या कॅमेर्‍यासमोर आणि पत्रकार परिषदांमधून सुरू असताना पुण्यात एखादी गरीब शेतकर्‍याची लेक आपल्या वडिलांना रेमडेसिवीर मिळावं म्हणून दहा तास रांगेत उभी राहिल्यानंतर पदरी निराशा पडल्यावर टाहो फोडून आक्रोश करते. तर मुंबईमधल्या सगळ्याच रुग्णालयांमध्ये आपापल्या प्रियजनांचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण स्वतःचा जीव मुठीत घेऊन धडपड करतोय. भयावह परिस्थिती मुंबईसह ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, लातूर, कोल्हापूरसह या सगळ्या राज्यात सुरू आहे. सरकारमधील काही दबंग नेते, काही पालकमंत्री आणि त्या त्या भागातले नेते यांना जो गोंधळ घालायचा तो घालतायत. परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली हे वास्तव जरी असलं तरी राजेश टोपे आरोग्य मंत्री म्हणून आपल्या प्रयत्नांची शिकस्त करत आहेत, ज्या तळमळीने टोपे काम करतात ती तळमळ आणि प्रामाणिकपणा आरोग्य मंत्रालयाचे सचिव प्रदीप व्यास यांच्याकडे आहे का, यावर प्रशासन ज्याला कळतं त्याने जर विचार केला तर पदरी निराशाच पडेल. त्यामुळेच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, कारण सत्ताधारी आणि विरोधक दोघेही डर्टी पॉलिटिक्स खेळतायत. कोरोनापेक्षा ते अधिक महाभयंकर आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -