घरफिचर्समायमहानगर ब्लॉगभाजपवाल्यांची निष्फळ भविष्यवाणी

भाजपवाल्यांची निष्फळ भविष्यवाणी

Subscribe

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी करून करून महाराष्ट्रातले भाजप नेते थकत कसे नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रत्येक प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्याच्या तारीख पे तारीख जाहीर केल्या. काही वेळा यासंबंधी लोकांना खरेच विश्वास वाटेल, असे वातावरण निर्माण केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि स्वपक्ष असा प्रवास करत भाजपमध्ये आलेले नारायण राणे यांनी तर चार दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार जाऊन मार्चमध्ये भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली आहे. गेल्या वर्षी राणेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती.

त्यावर भापजच्या इतर नेत्यांनी ती नारायण राणे यांनी केलेली मागणी आहे, ते केंद्रातील नेते आहेत, मागणी करू शकतात, असे म्हटले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आम्ही गनिमीकाव्याने राज्यात भाजपचे सरकार आणणार आहोत, असे नुकतेच म्हटले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, हे अपघाताने आलेले सरकार आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे सरकार जाऊन दोन वर्षे होत आली तरी आपणच मुख्यमंत्री आहोत, असे वाटत असल्याचे ते सांगतात, याचा अर्थ आपले सरकार गेले हे वास्तव अजूनही स्वीकारायला भाजपची मंडळी तयार नाहीत. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल आणि भाजपचे सरकार कसे येईल, याच्या अनेक तारखा जाहीर केल्या, पण भाजप नेत्यांची ही भविष्यवाणी वारंवार सपशेल खोटी ठरली आहे.

- Advertisement -

ही मंडळी ठाकरे सरकार पडण्याच्या पुढच्या तारखा जाहीर करत आहेत, पण आपण जाहीर केलेल्या मागण्यांचा अनेक तारखांचा मुहूर्त चुकला, त्याविषयी ही मंडळी कुठलाही खुलासा करायला तयार नाहीत. त्यामुळे असे करता करता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असेच वाटू लागले आहे. महाराष्ट्रात सरकार पडून दुसर्‍या गटाचे सरकार आणण्याची जुनी परंपरा आहे, असे पूर्वी झालेले आहे. पण भाजपवाले हे लक्षात घ्यायला तयार नाहीत, अशाप्रकारे सरकारे बदलवण्याचा हातखंडा असलेले मातब्बर नेते शरद पवार हे सत्तेत आहेत. किंबहुना, आज राज्यात जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले ते शरद पवार यांच्यामुळेच आणि त्यांची इच्छा असेपर्यंतच ते अस्तित्वात राहणार आहे. या सरकारची स्थापना होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम दाबले गेलेल्या अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवार यांनी त्यांचा हा डाव उधळून लावला.

अजित पवार गेल्यापावली परत आले. त्यामुळे सरकार बदलवण्याची ताकद आजही आपल्या हातात आहे, किंग मेकर मीच आहे, हे शरद पवार यांनी पुन्हा दाखवून दिले. आज शरद पवार यांच्यासारखा डोंगरा एवढा माणूस भाजपसमोर उभा असल्यामुळे भाजपचे काही चालेनासे झाले आहे, ती मंडळी हतबल झाली आहेत. क्रिकेटमध्ये बरेचदा असे होते की, गोलंदाज फलंदाजांना आऊट करण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करतात, विविध प्रकारची गोलंदाजी करतात, पण काहीही केल्या फलंदाज काही आऊट होत नाहीत. गोलंदाजी करून आणि धावून धावून ते थकून जातात, हतबल होतात. मग त्यांना वैफल्य येते, यामुळे हा फलदांज आता आऊट होईल, असे बोलत राहून आपल्याबरोबर जी मंडळी आहेत, त्यांच्या मनात बळ निर्माण करत राहण्याचे ते काम करत राहतात. भाजपचे तसेच झालेले आहे. ठाकरे सरकार पाडण्यासाठी भापजने बरेच प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस थकल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या हाती शरसंधान करण्यासाठी धनुष्य देण्यात आले, त्यांनी केलेले आरोप संकलित केले तर त्याचे एक मोठे पुस्तक तयार होईल, त्यावर एखाद्या विद्यार्थ्याला पीएचडी करता येईल, इतका आता तो मोठा दस्तावेज होईल, असे वाटते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होेते की, ते दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, त्यांनी जो फोडला तो फुसका बार निघाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचीही भविष्यवाणी खोटी ठरली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकार स्थापन झाल्यावर सुरुवातीला म्हणाले होते, हे तीन पक्षांचे तिघाडी सरकार आहे, हे आपसातील मतभेदामुळे कोसळून पडेल. हे त्यांचे म्हणणे पटण्यासारखे होते, पण त्यानंतर त्यांना त्यांच्या या विधानाचा विसर पडला, इतकेच नव्हे तर भाजपच्या सगळ्याच नेत्यांना विसर पडला. ते सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करू लागले. आरोपांच्या आणि घोटाळ्यांच्या फैरी डागू लागले. पण याचा उलटा परिणाम झाला. तीन पक्षांच्या सरकारच्या स्थैर्याला धोका निर्माण न होता, भाजपच्या सातत्यपूर्ण टीकेमुळे ते अधिक मजबूत होत गेले. त्या तीन पक्षांमध्ये मतभेद व्हायला भाजपने जागाच ठेवली नाही. त्यामुळे भाजपचेच नुकसान झाले. भाजपच्या सातत्यपूर्ण आरोपांमुळे तीन पक्ष आपल्यातील मतभेद विसरून अधिक संघटित झाले. खरे तर भाजपच्या नेत्यांनी संयम बाळगायला हवा होता, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयम आणि शिस्त राखण्याच्या संस्कारात वाढलेले भाजपचे नेते सत्तेसाठी इतके उतावीळ कसे काय झालेले आहेत, हेच कळायला मार्ग नाही. त्यांच्या या उतावीळपणामुळे खरे तर त्यांनी स्वत:ची शोभा करून घेतली आहे.

या नेत्यांची जनसामान्यांमधील प्रतिमा खालावली आहे. कारण सत्ता जात येत असते, पण सत्तेसाठी सत्ताधार्‍यांवर आरोप करत राहणे, केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून सत्तेतील नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणे, असे प्रकार सुरू आहेत. आजवर त्यातून काहीही निष्पन्न आलेले नाही, ज्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागतो आहे, त्यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह म्हणत आहेत की, हे माझे आरोप अन्य पोलीस अधिकार्‍यांकडून मी जी माहिती ऐकली आहे, त्यावरून केले आहेत. त्याचा ठोस पुरावा नाही.

अशा ढोबळ आरोपावरून एखाद्याचे मंत्रीपद जाते, त्याला तुंरुगात जावे लागते. याला काय म्हणावे. त्यात पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणा या प्रोफेशनली काम करत आहेत, असा दावा या यंत्रणांचे अधिकारी करत आहेत, पण भाजपच्या कुठल्याच नेत्याच्या मालमत्तांवर या तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या नाहीत, याचा अर्थ राज्यातील भाजपचे सगळे नेते स्वच्छ आहेत असे म्हणावे लागेल. त्यामुळे लोकांनाही या तपास यंत्रणांच्या कारवाईवर शंका येत आहे. भाजपच्या या आतताईपणामुळे अलिकडे झालेल्या काही निवडणुकांमध्ये त्याचा फटका त्यांना बसला आहे. राज्यातील भाजपचे नेते यापासून काही बोध घेतील, असे वाटत नाही, त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण करणार्‍या ठाकरे सरकारला आणखी तीन वर्षे तरी काही धोका आहे, असे वाटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -