‘राज’कीय कोंडीचा भाजपचा बृजभूषण डाव!

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या कडव्या विरोधामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करावा लागला आहे. भाजपला राज ठाकरेंना मर्यादित ताकदीवरच ठेवायचं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंचा नावलौकिक होणं भाजपला कधीही परवडणारं नाही. हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंना स्थान मिळू नये, हीच भाजपची भूमिका असावी. म्हणूनच बृजभूषण सिंह यांनी अचानक केलेला विरोध विचार करायला लावणारा आहे. राज ठाकरेंकडे भाजपचे सी टीम लिडर म्हणूनच पाहिलं जातं. बृजभूषण सिंह राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध करताना भाजप नेत्यांनी धारण केलेलं मौन बरंच काही सांगून जातं.

हिंदुत्वाची भगवी शाल अंगावर घेऊन मैदानात उतरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपमधूनच कोंडी केली जात असल्याचं भाजपच्या खासदार बृजभूषण सिंह यांच्या भूमिकेवरून आता स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी राज ठाकरे उत्तर भारतीयांची जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येतच नव्हे तर उत्तर प्रदेशात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. बृजभूषणना भाजपचीच फूस आहे, यात शंकाच नाही. बृजभूषण सिंह यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. पण, भाजपमधूनच त्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटत नसल्याचं दिसून आल्यानंच राज ठाकरेंवर 5 जूनचा अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढावल्याचं राजकीय जाणकारांचं मत बनू लागलं आहे.

राज ठाकरे कधीच राजकीय भूमिकेवर ठाम राहत नसल्याचं अनेकदा दिसून आलेलं आहे. टोलसारख्या सर्वसामान्यांच्या खिशाला थेट कात्री लागत असलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी रान पेटवलं होतं. त्याचं पुढे काय झालं कळलंच नाही. उलट टोलमधील वाढ सुरुच राहिली असून त्यावर ठाकरेंचं मौन सुटायला तयार नाही. सोयीची राजकीय भूमिका घेत असलेल्या राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन त्यामुळंच सायडिंगला गेलं आहे. राज्यात मनसेची होणारी पिछेहाट सुरुच आहे. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होत असली तर मनसेत इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते जाण्यास इच्छुक नसतात, हेच वास्तव आहे.

येत्या काही महिन्यात मिनी विधानसभा समजल्या जाणार्‍या राज्यातील मुंबई महापालिकेसोबत 18 महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानंतर लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात होणार आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. आता आपलं अस्तित्व राखण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा मुद्दा पुढं केला आहे. मनसैनिकांच्या माध्यमातून त्यांनी हिंदुजननायक ही उपाधी घेत हिंदुत्ववादी नेता म्हणून जनतेपुढे येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा रेटताना मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा विषय ठाकरे यांना प्रचंड प्रसिध्दी देऊन गेले. उत्तर प्रदेश सरकारने भोंग्यांवर कारवाईला सुरुवात केली. वातावरण तापल्याने महाराष्ट्र सरकारलाही भोंग्यांवर बोलणं भाग पडलं. अल्टीमेटममुळेच भोंग्यांवर कारवाई सुरू झाल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपही कधी आक्रमक झालेली दिसली नाही. सत्तेसाठी उध्दव ठाकरे यांनीही हिंदुत्वाबद्दल मवाळ भूमिका घेणंच पसंत केलं. ही पोकळी नेमकी राज ठाकरेंनी हेरली आणि हिंदुत्ववादी नेता म्हणून पुढे येण्याचा त्यांनी आटापिटा सुरू केला आहे. दुसरीकडे, भाजपनेही ज्ञानवापी मशीद, मथुरा, ताजमहाल, अयोध्या प्रश्नावर वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. नवनीत राणा, रवी राणा यांच्या माध्यमातून हनुमान चालीसा पठणाचा तमाशा भाजपचं काम करुन गेला. शिवसेनेचा हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा आहे. मात्र, सत्तेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा मेसेज जनमानसात गेला तर त्याचे परिणाम होतील, याची जाणीव झालेल्या उध्दव ठाकरेंनादेखील भाजप आणि राज ठाकरेंकडून होत असलेल्या आरोपांची दखल घेणं भाग पडलं. म्हणूनच मुंबईत सभा घेत घेऊन शिवसेनेचंच हिंदुत्व कसं खरं आहे, हे ठाकरेंना सभेत वारंवार सांगावं लागलं.

हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपवाले राज ठाकरेंच्या माध्यमातून शिवसेनेला कोंडीत पकडण्यात यशस्वी झाले आहेत. महाविकास आघाडीला सतत गॅसवर ठेवण्याचं कारस्थान भाजपकडून सुरू आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील नेत्यांच्या मदतीने आरोपांच्या फाईलींवर फाईल उपसत भाजपने महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना जेरीस आणण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. भाजपने राज ठाकरेंनाही फूस लावून मैदानात सोडून दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे राज ठाकरे आता मोदींचं गुणगान गाऊ लागले आहेत. त्याचबरोबर ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधण्याचं काम करत आहेत. शिवसेना, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंविरोधात राज टोकाची टीका करत नाहीत.

उध्दव ठाकरे, शिवसेनेवर कडवट टीका केली तरी भाऊबंदकीमुळेच आगपागड करत आहेत, असा लोकांचा समज होऊन सहानुभूती उध्दव ठाकरेंना मिळेल, अशीही भीती राज ठाकरे यांच्या मनात असेल. म्हणूनच जहाल हिंदुत्ववादी म्हणून लोकांमध्ये प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी सुरू केला असला तरी भाजप तसं होऊ देणार नाही. एकतर हिंदुत्व हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी त्यांनी काशी, मथुरा, ताजमहाल यासह अनेक धार्मिक मुद्यांना हात घालायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशसारख्या राज्यात बसलेला फटका भाजप जाणून आहे. उत्तर प्रदेशात सत्ता असतानाही भाजपचं संख्याबळ घटलेलं आहे. पंजाबमध्येही धक्का बसलेला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हिंदुत्वाचं कार्ड वापरण्याची भाजपची रणनीती आहे.

भाजपला महाराष्ट्राचीही सत्ता काबिज करायची आहे. त्यासाठी महाराष्ट्रात भाजपने राज ठाकरेंचा वापर सुरू केला आहे. मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालिसाने ते काम करायला सुरुवात केल्याचं दिसू लागलं आहे. दुसरीकडे, मुस्लीम समाज एकगठ्ठा काँग्रेससह इतर पक्षाकडे वळू नये म्हणून भाजपची बी टीम समजली जाणारी एमआयएम कामाला लागली आहे. अकबरुद्दिन ओवेसी यांनी औरंगाबादमधील औरंगाजेबच्या कबरीचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात केली आहे. ज्ञानवापी मशीद, मथुरा, ताजमहाल आदी प्रश्नही बाहेर काढले गेले आहेत. त्यामुळे देशभर याच प्रश्नांची दिवसभर चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदु नेता म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करायची आहे. त्याचबरोबर भारताला हिंदुत्वावादी राष्ट्र म्हणून पुढे आणण्याचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य अजेंडा आहे. त्यादृष्टीनेच सध्या देशभर हिंदुत्वाचे मुद्दे पुढे केले जात आहेत.

शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा खोलवर रुजलेल्या महाराष्ट्रात हिंदुत्व रुजवणं इतकं सोपं काम नाही, याची जाणीव असलेल्या भाजपने राज ठाकरेंना मैदानात उतरवलं आहे. भोंगा, हनुमान चालिसाच्या माध्यमातून राज ठाकरेंनी राज्यात वातावरण निर्मिती करण्याचं काम केलेलं आहे. राज ठाकरेंनी चलो अयोध्येचा नारा देत 5 जूनला अयोध्येत जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण, अचानक भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध करून खो घातला आहे. भाजपला राज ठाकरेंना मर्यादित ताकदीवरच ठेवायचं आहे. राज्यातच नव्हे तर देशात हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंचा नावलौकिक होणं भाजपला कधीही परवडणारं नक्कीच नाही. हिंदुत्ववादी नेता म्हणून राज ठाकरेंना स्थान मिळू नये, हीच भाजपची भूमिका असणार आहे. म्हणूनच खासदार बृजभूषण सिंह यांनी अचानक केलेला विरोध विचार करायला लावणारा आहे. राज ठाकरेंकडे भाजपची सी टीम लिडर म्हणूनच पाहिलं जातं. असं असताना बृजभूषण सिंहांसारखा खासदार राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध करताना भाजप शांत का, यांचं उत्तर अगदी स्पष्ट झालं आहे.

2008 साली राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात मुंबईसह राज्यात मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी मनसैनिक रस्त्यावर उतरून उत्तर भारतीयांना मारझोड करत होते. तेव्हा लाखो उत्तर भारतीय उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पळून गेले होते. हाच मुद्दा आता खासदार बृजभूषण सिंह यांनी उचलून धरला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ठाकरेंना अयोध्याच नव्हे तर उत्तर भारतात पाय ठेऊ देणार नाही, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंना आव्हानही दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज ठाकरेंना भेटू नये, असंही आवाहन सिंह यांनी केलं आहे. गेला आठवडाभर सुरू असलेल्या सिंह यांच्या विरोधाचा सूर टोकाला गेला आहे.

साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरेंची बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. काचंनगिरी यांनी तर बृजभूषण सिंह यांच्या राज ठाकरेंविरोधातील एका पत्रकार परिषदेत हजेरी लावून ठाकरेंची वकिली करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिंह यांनी राज ठाकरेंच्या आंदोलनात मार खाल्लेल्या काही उत्तर भारतीय तरुणांना त्यांच्यासमोर उभं केलं. त्यामुळे साध्वींना पत्रकार परिषदेतून काढता पाय घ्यावा लागला. दुसर्‍या दिवशी साध्वी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप करत ठाकरेंचे समर्थन केले. संत, महंत करार जबाव देतील, अशी धमकी सिंह यांना देण्याचं काम केलं आहे. पण, सिंह यांनी ही धमकी फारशी मनावर न घेता ठाकरेंच्या दौर्‍याला असलेला विरोध कायम ठेवला आहे.

या गदारोळात राज ठाकरेंची तब्येतही अचानक बिघडल्याची बातमी पुढे आली आहे. पुण्याचा दौरा अर्धवट सोडून, जाहीर सभाही न घेता राज ठाकरे मुंबईला परत आले आहेत. विशेष म्हणजे खासदार बृजभूषण यांच्याविषयी ना राज ठाकरे बोलताहेत, ना मनसेचे कुणी नेते. अयोध्या दौर्‍याच्या तोंडावरच कडवा विरोध होत असताना भाजपचा महाराष्ट्रासह इतर एकही नेता ब्र काढायला तयार नाही. यावर भाजपच्या महाराष्ट्रासह इतर नेत्यांनी सूचक मौन बाळगलं आहे. राज ठाकरे हे बृजभूषण सिंह यांचं आव्हान स्वीकारण्याचं धाडस दाखवतील अशी मनसैनिकांची अपेक्षा होती. पण, राज्य सरकारला अल्टिमेटम देणारे राज ठाकरे यांनी तसं धाडस केलेलं नाही. कदाचित भाजपच्या मौनावरून ठाकरेंच्या लक्षात सर्व काही आलं असण्याची शक्यता आहे. म्हणूनच शुक्रवारी ट्विट करून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे. हा दौरा पुन्हा कधी होणार, हेही त्यांनी जाहीर केलेलं नाही. भाजपने एकाअर्थी राज ठाकरेंची राजकीय कोंडी केल्याचेच हे संकेत तर नाहीत ना, हा सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न आहे.